बल्लू..! शेजारच्या अपार्टमेंटमध्ये राहणारा माझ्या मित्राचा मुलगा..नव्या जनरेशनचा 'मॉड' प्रतिनिधी..पण भाविकही तेवढाचं.. चौकातल्या 'नवशा गणपती'चा परम भक्त..!!
सकाळचे आठ साडेआठ झाले असतील..!
मी 'मॉर्निंग वॉक'ला जाऊन परत येत होतो आणि सोसायटीच्या गेटसमोर असताना बल्लू (मूळनाव बलभीम पण गर्लफ्रेंडसनी शॉर्ट केलेलं..!) माझ्याकडे आला..
आपली बाईक माझ्याजवळ थांबवत आणि डोळ्यावरचा गॉगल कपाळावर चढवत म्हणाला "अंकल..तुम्हाला डिस्टर्ब करतोय पण मला चटईच्या बैठका आणि 'अथर्वशीर्षा'ची पुस्तकं कुठे मिळेल ते प्लीज सांगा ना..!"
अरे, पण तुला त्याची आज कशी काय आठवण आली.? "
"अंकल ..यू डोन्ट नो..? अहो.. उद्या गणेश जयंती आहे आणि चौकातल्या गणेश मंदिरात उद्या सकाळी अथर्वशीर्षाच्या पठणाचा कार्यक्रम आहे..
आणि पठणाला बसणाऱ्यांसाठी लागणाऱ्या एकवीस बैठका आणि अथर्वशीर्षाच्या प्रति आणण्याची जबाबदारी माझ्याकडे आलयं.. आणि हो..उद्या मीसुद्धा अथर्वशीर्ष पठण शेअर करणार आहे..तुम्ही पण या ना..!"
"अरे अथर्वशीर्षाच्या प्रति तुला कुणाकडेही मिळून जातील पण बैठकांचं मी काहीं सांगू शकणार नाही..तू एक काम कर ..समोर कट्टृयावर मोरेकाका बसले आहेत त्यांना विचार.!
त्यांच पुर्वी 'पेठेत' पुजा साहित्याचं दुकान होतं..!
बल्लूनं आपली बाईक तेथेच पार्क केली आणि तो मोरेकाकांकडे विचारायला गेला..
कुणालाही सरळ उत्तर देतील तर ते मोरेकाका कसले..!!
त्यात पुन्हा 'पेठा'त आयुष्य गेलेलं..!
"अरे चटयांचीच बैठक कशाला पाहिजे .? तुझ्या घरी सतरंजा असतील ना त्याच्याच घड्या करुन टाकायच्या.. आहे काय आणि नाही काय.. !"
बल्लू त्यांना काहींतरी सटकावण्याच्या बेतात होता पण बैठकांच काम महत्त्वाचं असल्यामुळे कसाबसा राग आवरुन तो पेट्रोल पंपावर आला..!
पेट्रोल भरून बाजाराकडे निघणार इतक्यात समोरून 'बुलेट'वरून आलेला त्याचा वर्गमित्र सॅम त्याला दिसला..
सॅम म्हणजे 'खाओ पिओ मजा करो' कल्चरचं प्रॉडक्ट..!
गप्पा मारता मारता बल्लूनं त्याला आपला प्रॉब्लेम सांगितला.
"क्या यार इस उमरमें गणेश पूजन करने बैठता है..आगे बुढापेमें तो वही करना है..'अलका' में
'गदर'का शो चालू है. चल शाममें पिक्चर देखने जायेंगे..मै टिकट निकालता हूं..!" सॅमनं बाईकच्या मिररमध्ये स्वतःचा चेहरा बघत बेफिकीरीनं उत्तर दिलं..
श्रीगणेश म्हणजे बल्लूचं श्रद्धास्थान..जीव की प्राण.!
चिडलेल्या बल्लूनं त्याचं मनगट धरलं.."गदरच्या तिकिटाचं काय करायचं ते नंतर बघू.. पण पुन्हा गणेशाबद्दल असं काहीं बोललास तर तुझाच 'गदर' करीन.."
बल्लूचा चौकातला 'दरारा' माहीत असल्यामुळे सॅमनं हळूच तेथून काढता पाय घेतला..!
आधीच वैतागलेल्या बल्लूनं गाडीला किक मारली आणि तो मेन बाजाराकडे निघाला..!!
आणि त्याला अचानक आठवलं आज एक्साईज वाढीच्या निषेधार्थ व्यापारयांनी बंद पुकारला
आहे आणि बाजार बंद आहे..!
आता मात्र बल्लूला टेन्शन आलं. साध्या चटईच्या बैठका आणता आल्या नाही तर
त्याचा चौकातल्या 'वट्' कमी होणार होता..!
अथर्वशीर्षाच्या प्रति सोसायटीत आणि काहीं मित्रांकडे मिळाल्या पण इतक्या बैठका कुठेच मिळेनात..!
शेवटी तो वैतागला..
संध्याकाळपर्यंत बैठका आणणं आवश्यक होतं आणि त्याला त्या काहीं केल्या लवकर मिळत नव्हत्या...
आणि मग बेठकांचा नाद सोडून द्यावा आणि अथर्वशीर्षाच्या कार्यक्रमातून माघार घ्यावी असाही विचार त्याच्या डोक्यात येऊ लागला..
शेवटचा उपाय म्हणून त्यानं आपल्या सगळ्या व्हॉटसप गृपवर
एक मेसेज टाकून दिला.."वैयक्तिक कामासाठी आजच अर्जंट एकवीस चट्ईच्या बैठका विकत किंवा तात्पुरत्या स्वरुपात पाहिजेत..कुणाकडे असल्यास किंवा माहित असल्यास कृपया त्वरीत मेसेज करणे..धन्यवाद."
आणि वाट पाहून कंटाळलेल्या आणि निराश झालेल्या बल्लीला अचानक दुपारी फोनवर एक मेसेज आला..!
तो मेसेज चौकातील गणेश मंदिराच्या मागे एकट्या राहणाऱ्या कानडेसरांचा होता..!!
नेहमी गणेश मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या आणि कोणत्याही सार्वजनिक आणि सामाजिक कार्यात नेहमी हिरिरीने भाग घेणाऱ्या कानडेसरांच घर बल्लूला माहित होतं..त्यानं बाईक स्टार्ट केली आणि तो त्यांच्या घराकडे निघाला.
कानडे सरांनी लग्न केलं नव्हतं..
बँकेतून निवृत्त झाल्यानंतर एकटेच रहात असणाऱ्या आणि मुळचा सामाजिक पिंड असणाऱ्या कानडे सरांनी एका अनाथ विद्यार्थी गृहात संचालक म्हणून काम स्विकारलं होतं..! दुर्दैवानं त्यांना सहा महिन्यापूर्वी पॅरॅलिसिसचा मोठा अटॅक आला होता आणि संधीवातही असल्यामुळे ते अंथरुणावरच खिळून होते..! आणि कानडे सरांना तशा त्या अवस्थेत पाहून बल्लूला धक्काच बसला..! बल्लूनं त्यांना कसबसं बेडवरून उठून बसवलं आणि
विचारलं.."सर.. तुम्ही आजारी आहात हे मला माहीत नव्हतं.. एक फोन करायचा ना..?"
"बल्लू बेटा.. आता हे कायमचं दुखणं आहे.. कुणा कुणाला म्हणून सांगणार..!
तुझा मेसेज कुणीतरी मला फॉरवर्ड केला तो वाचून मी तुला बोलावलं आहे..!"
अर्धांगवायूमुळं त्यांच बोलणं अस्पष्ट आणि जड झालं होतं..
"तुला तर माहित आहे बॅंकेतून रिटायर झाल्यावर मी थेऊरजवळच्या एका अनाथ विद्यार्थी गृहात संचालकाचं काम करत होतो.. दुर्दैवाने हा पॅरॅलिसिसचा अटॅक आला.. आणि असा मी अपंग आणि असहाय होऊन पडलोय..
तुझा मेसेज वाचला.. तुला मी त्या बैठका देण्याची व्यवस्था करू शकतो..!
मी संचालक असलेल्या अनाथ विद्यार्थी गृहाकडे मी मुलांच्या जेवण्यासाठी म्हणून भेट दिलेल्या चटया आहेत पण जेवण्यासाठी टेबल खुर्ची आल्यापासून त्या आता पडून आहेत.. मी त्यांना फोन करतो.. तू त्यांच्या कडे जाऊन त्या घेऊन जा..!!"
पण माझं एक छोटसं काम करायचं बेटा..
मी आजपर्यंत कुणाला सांगितलं नव्हतं पण आता तुला सांगतोय..!
त्या 'अनाथ विद्यार्थी गृहाच्या पाच मुलांच्या शिक्षणाचा खर्च मी माझ्या बँकेच्या पेन्शनमधून गेल्या अनेक वर्षापासून करतोय..घरातच पडून असल्यामुळे ह्यावेळी मी 'लाईफ सर्टिफिकेट' वेळेवर देऊ शकलो नाही त्यामुळे माझं पेन्शन जमा झालेलं नाही.. आणि नेमकं त्यांच्या 'परीक्षेची फी' भरण्याच्या आज शेवटचा दिवस आहे..!! माझ्याकडे पाच हजार रूपये शिल्लक आहेत.. तुला माझी एवढीच विनंती आहे की ते पैसे मी तुझ्याकडे देतो.. प्लिज तेवढी फी भरून त्या अनाथ आणि गरीब विद्यार्थ्यांच शैक्षणिक वर्षे वाचव..नाहीतर केवळ परीक्षेची फी भरली नाही म्हणून त्या मुलांचा वर्षभरचा अभ्यास आणि मेहनत वाया जाणार आहे..!" करशील ना माझं एवढं काम..?
कानडे सर आपले थरथरते हात जोडून म्हणाले..त्यांच्या स्वरातली व्याकुळता त्याला जाणवत होती..
बल्लूला आता गहिवरून आलं होतं..!
चटयांच्या एका छोट्याश्या कामासाठी तो सकाळपासून वणवण भटकत होता आणि इथं अंथरुणावर खिळलेला एक असहाय वृद्ध, आपल्या आयुष्याची कमाई खर्च करून अनाथ विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून तळमळतं पडला होता..! बल्लूनं आपल्या डोळ्यात जमा झालेले अश्रू पुसले..कानडे सरांनी दिलेले पैसे घेऊन तो थेऊरकडे भरधाव निघाला...! पाच वाजण्यापूर्वी त्याला पोहोचणं आवश्यक होतं...अर्ध्या तासात तो त्या अनाथ विद्यार्थी गृहात पोहोचला. कानडे सरांनी फोन केल्यामुळे तिथले व्यवस्थापक परिक्षेची फी शाळेत पाठवून देण्यासाठी त्याची वाटच पहात होते..बल्लूनं फीचे पैसे देऊन पावती घेतली आणि त्यांनी दिलेल्या बैठका घेऊन तो परत निघाला.. त्याला त्या मुलांना पण भेटायचं होतं पण ती शाळेत गेलेली होती.. बल्लूच्या चेहरयावर आता एक वेगळाच सात्विक आनंद आणि समाधान विलसतं होतं.! आणि तो आनंद केवळ बैठका मिळाल्याचा नव्हता तर श्रीगणेशाची सेवा करण्याचा.. भक्ती करण्याचा एक नवा सन्मार्ग सापडल्याचा होता..! कानडे सरांनी त्याला तो मार्ग दाखवून दिला होता..!!
सत्संगांच्या कार्यक्रमाला न जाताच त्याच्या हातून 'सत्संग' घडला होता..!! बल्लूनं एका अनाथ विद्यार्थ्यांची पुढच्या वर्षाची फी भरण्याचं आता आपल्या मनातल्या मनात ठरवलं होतं..! संध्याकाळ होत आली होती..बल्लू घरी पोहोचला. त्यानं हातपाय धुतले. श्रीगणेशाच्या फोटोसमोर दिवा लावला..आणि हात जोडून मित्रानी दिलेली अथर्वशीर्षाची प्रत घेऊन तो मोठ्याने वाचू लागला....
ओम नमस्ते गणपतये... त्वमेव प्रत्यक्षं
तत्वमसि../ त्वमेव केवलं
कर्तासि../ त्वमेव केवलं
धर्तासि.......
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा