मंगळवार, १२ सप्टेंबर, २०२३

527. खुजली...

 पिरीएड संपला.आम्ही क्लासरुमच्या बाहेर आलो.नेहमीप्रमाणे आमची पावलं कँटीनकडे वळली.पण आज कुणी खाऊ घालायचं यावरुन सगळ्यांमध्ये वाद सुरु झाले. ते पाहून मी वैतागून अनिलला म्हंटलं
"कुणी तयार नसेल तर चला मी खाऊ घालतो सगळ्यांना "
"अरे कालच तर तू आम्हांला भजी खाऊ घातली.आज परत तूच खाऊ घालणार?नाही.तू अजून नवीन आहेस काँलेजमध्ये. दुसरा कुणीतरी खाऊ घालेल"
तेवढ्यात "अरे आला खुजली.चला कँटीनला"कोणीतरी ओरडलं तसं मी चमकून पाहीलं.एक स्थुल मुलगा डुलत डुलत येत होता. अनिल मला म्हणाला "तुला बघायचं होतं ना खुजलीला?हाच तो खुजली!आर्ट्सला आहे " 
सगळे उठले.त्याच्यामागे जाऊ लागले.कँटीनमध्ये शिरल्यावर आमच्या १०-१२जणांच्या ग्रुपने सर्व कँटीन व्यापून टाकलं.कोपऱ्यातल्या बाकावर मी आणि अनिल बसलो.
"चांगला हसतमुख तर दिसतोय हा.मग याला तुम्ही खुजली का म्हणता?त्याला काही चांगलं नांव असेल ना?" मी प्रश्न केला.
 "अरे बाबा तू पाहीलं नाहीस का तो सतत कुठे ना कुठे खाजवत असतो.म्हणून सगळे त्याला खुजली म्हणतात. त्याचं खरं नाव आहे विनोद चौधरी "
तेवढ्यात खुजली आमच्या टेबलाशी आला.अनिलने माझी त्याच्याशी ओळख करुन दिली.मी त्याच्या हातात हात मिळवला.डोळ्यांच्या कोपऱ्यातून मला दिसलं अनिल नजरेने नाही नाही म्हणत होता.मला कळेना काय झालं ते! 
"मिसळपाव चालेल ना तुम्हाला" खुजलीने विचारलं.
"हो तर!चालेल काय पळेल" मी आणि अनिल एकदमच बोललो.तो गेल्यावर विनोद मला म्हणाला 
"काय गरज होती तुला त्याच्या हातात हात मिळवण्याची?तुला माहीत नाही त्याला किती गंभीर त्वचारोग झालाय ते.यापुढे सांभाळून रहा नाहीतर त्याचा त्वचारोग तुलाही व्हायचा आणि आता जा ,हात साबणाने स्वच्छ धुवून ये " 
"बरं बरं" मी घाबरुन म्हंटलं आणि हात धुण्यासाठी बेसीनकडे पळालो.
त्यादिवसानंतर मला खुजलीबद्दल बरीच उत्सुकता वाटू लागली.अनिल आणि इतर सहविद्यार्थ्यांकडून मी खुजलीची माहीती काढली.खुजलीचे वडिल मोठे व्यापारी होते.त्यांचा हा एकुलता एक नवसाचा मुलगा.वयाच्या बाराव्या वर्षापासून त्याला एका त्वचारोगाने गाठलं.अनेक उपचार झाले.पैशांची कमतरता नव्हतीच त्यामुळे भारतातल्या नामांकित त्वचारोगतज्ञांकडेही उपचार करुन झाले.आयुर्वेदिक, होमिओपॅथी, युनानी झाले.पण उपयोग झाला नाही. मग अघोरी उपचार,गंडेदोरे,जाग्रुत देवदेवता,दर्गे झाले पण कशाकशाचा उपयोग झाला नाही.नाही म्हणायला आधुनिक उपचारांनी त्याला कंट्रोल करणं एवढंच त्यांच्या हातात राहिलं होतं.पण औषधं बंद केली की खुजलीच्या शरीरावर तो रोग वेगाने पसरायचा आणि मग खुजलीकडे बघणंही किळसवाणं वाटायचं.विज्ञान इतकं पुढे गेलेलं असतांना खुजलीच्या या रोगावर कायमस्वरूपी इलाज होऊ शकत नव्हता ही खरंच आश्चर्याची आणि तितकीच खेदाची बाब होती.एक गोष्ट चांगली होती की हा आजार संसर्गजन्य किंवा स्पर्शजन्य नव्हता.पण हे माहीत असूनंही लोकांना खुजलीचा स्पर्श नको असायचा.त्याला सहसा कोणी घरी बोलवायचं नाही आणि त्याच्या घरी गेलं तरी त्याच्या घरचं पाणीही कोणी प्यायचं नाही.काँलेजमध्येही मुलांना त्याच्याकडून पैसे, पार्ट्या हव्या असायच्या पण त्याचा स्पर्श नको असायचा.हे समजत असूनही खुजली दिलदार होता.माणसं जमवायची त्याला आवड  होती आणि त्या माणसांना खुश ठेवण्यासाठी तो सढळ हाताने खर्च करायचा.त्याच्या या दिलदार स्वभावामुळेच मी खुजलीचा चांगला मित्र झालो.काँलेजची मुलं मला त्याच्यासोबत रहाण्यास ,फिरण्यास मनाई करायची,"कशाला विषाची परीक्षा बघतोहेस?"असं वारंवार म्हणायची.पण मला काहीही होणार नाही असं मला नेहमीच वाटत रहायचं .
एकदा माझ्या वडिलांना दवाखान्यात तातडीने अँडमीट करावं लागलं.वीस हजारांची ताबडतोब गरज होती.बऱ्याच जणांना मागून बघितले पण नकारच येत होता.खुजलीला इतरांकडून कळलं तेव्हा तो दहा मिनिटात वीस हजार घेऊन आला.
"अजून लागले तर बिंधास्त माग बरं का?आणि हो देण्याची घाई करु नकोस.तुला जसे जमतील तसे परत कर.नाही दिलेस तरी चालतील "
तो म्हणाला तसे माझे डोळे भरुन आले.बाकीचे मित्रही इतर मदत करत होतेच.पण अडचणीच्या वेळी आर्थिक मदत करणाराच खरा मित्र असतो हे मला जाणवून गेलं.तीन महिन्यांनी मी त्याचे वीस हजार परत करायलो गेलो पण त्याने घेतले नाही.
"काय यार मला परका समजतोस का?ठेव ते तुझ्याजवळच.असं समज मी माझ्या वडिलांसाठी खर्च केलेत "असं म्हणून तो मलाच रागवला.त्यानंतर माझी आणि त्याची दोस्ती चांगलीच घट्ट  झाली.बाकीचेच नाही तर घरचेही मला आमच्या मैत्रीबद्ल रागवायचे."त्याला घरी आणू नकोस,त्याच्यासोबत फिरु नकोस,त्याचा रोग तुलाही होईल " अशी भिती घालायचे पण मी त्याकडे दुर्लक्ष करायचो.
यथावकाश आम्ही पदवीधर झालो.प्रत्येक जण आपापल्या वाटेने निघून गेला.खुजलीला असाही शिकण्यात रस नव्हता आणि तशी त्याला गरजही नव्हती.तो त्याच्या वडीलांचा उत्तम चालणारा व्यवसाय सांभाळू लागला.मी मात्र पुढे शिकून प्राध्यापक म्हणून पुण्यात एका काँलेजला जाँईन झालो.
दोन वर्षांनी खुजलीच्या लग्नाची पत्रिका हातात पडली.पाठोपाठ त्याचा फोनही आला.खुप आनंदी वाटत होता.
" तू आल्याशिवाय मी लग्नाला उभा रहाणार नाही बरं का?काहिही कर पण तू लग्नाला आलंच पाहिजे " 
तो म्हणाला.अर्थात मी जाणारच होतो आणि गेलोही.मंगल कार्यालयात अनिल भेटला.म्हणाला
" तुला माहीतेय खुजलीचं लग्न जमत नव्हतं.तो मुलीला बघायला जाण्याआधीच त्याच्या आजाराची माहिती मुलीकडच्यांना कळायची.नाही कळली तर खुजली स्वतःहून  सांगायचा.अर्थातच मुली नकार द्यायच्या.शेवटी त्याच्या वडिलांनी पंचवीस लाख रुपये देऊन या  मुलीकडच्यांना तयार केलंय.लग्नाचा सगळा खर्चही तेच करताहेत.मुलगी गरीब घरची आहे पण देखणी आहे"
अनिलने माहिती दिली.लग्नाला अनिल आणि माझ्याव्यतिरिक्त काँलेजचं कुणीही आलं  नव्हतं.काँलेजमध्ये असतांना खुजलीने अनेक मुलांना मदत केली होती.पण त्याची जाण त्या मुलांनी ठेवली नव्हती.लग्न थाटामाटात लागलं.मुलगी खरोखरच देखणी होती.खुजलीच्या तुलनेत तर अप्सराच वाटत होती.पण मी का कुणास ठाऊक तिला पाहून अस्वस्थ झालो.
सहा महिन्यानंतर अनिलचाच फोन आला.त्याला खुजली भेटला होता आणि मला ज्या गोष्टीची भीती वाटत होती,तीच घडली होती. खुजलीची बायको त्याला सोडून माहेरी निघून गेली होती .खुजलीचा आजार एवढा भयंकर आहे हे आपल्यापासून लपवून आपली फसवणूक केली असं तिचं म्हणणं होतं आणि आता ती घटस्फोटाची मागणी करत होती.सहा महिन्यात तिनं त्याला स्पर्शही करु दिला नव्हता.नेहमी आनंदी असणारा खुजली अनिलजवळ ढसाढसा रडला.
मी मध्यंतरी गावी जाऊन आलो.खुजलीलाही भेटलो.खुजली आता बदलला होता.व्यसनांच्या आहारी गेला होता.साहजिकच होतं.ज्या संसाराची स्वप्नं त्याने बघितली होती तो संसार सहा महिन्यातच मोडकळीला आला होता.कोर्टात घटस्फोटाची केस सुरुच होती.खुजलीच्या बायकोला समजवण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले होते.
दरम्यान माझंही लग्न झालं.
अनिलचे फोन आता तुरळक येत होते.तोही त्याच्या नोकरीत व्यस्त होऊन गेला होता.खुजलीचे तर बंदच झाले होते.मी स्वतः त्याला दोनतीन वेळा फोन केला पण त्याने उचलला नाही.
वर्षभरानंतर अनिलचा फोन आला तो वाईट बातम्या सांगण्यासाठीच.खुजलीचा घटस्फोट झाला होता.त्याच्या बायकोनं खुजलीकडून घसघशीत रक्कम पदरात पाडून तर घेतलीच पण घटस्फोटानंतरच्या पंधरा दिवसातच ती तिच्या लग्नाअगोदरच्या प्रियकराबरोबर लग्न करुन मोकळी झाली होती.खुजलीशी लग्नाचा फार्स करुन त्याच्याकडून गलेलठ्ठ रक्कम उकळण्याचा तिचा प्लँन होता हे स्पष्ट झालं होतं. एकंदरीत खुजलीनं तिची नाही तर तिनंच खुजलीची घोर फसवणूक केली होती.
पंधरवड्यानंतर बातमी आली की खुजलीच्या वडिलांचा या धक्क्याने म्रुत्यु झाला.मी त्यावेळी परदेशात होतो म्हणून जाऊ शकलो नाही.पण चार दिवसांनी पुण्याला परतलो तर खुजलीची आईही गेल्याचं कळलं.फार वाईट वाटलं.खुजली आता या दुनियेत एकटाच उरला होता.
मी गावी खुजलीला भेटायला गेलो.मला वाटलं तो रडेल पण तो रडला नाही.म्हणाला "आपल्या रोगट मुलानं लग्न करुन एक सामान्य माणसाचं आयुष्य जगावं एवढी छोटीशी अपेक्षा होती माझ्या आईवडिलांची.काय चुकलं त्यांचं?पण धडधाकट माणसांनी माझ्या आणि त्यांच्या आयुष्याची वाट लावली.तिरस्कार वाटू लागलाय मला आता या निरोगी पण स्वार्थी माणसांचा!" 
काय बोलणार होतो मी? घटनाच अशा घडल्या होत्या की त्याचं सांत्वन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नव्हते.मी त्याच्याकडे सहानुभूतीने पाहीलं.त्याने काहीतरी ठाम निर्णय घेतल्याचं मला जाणवलं.
महिन्यानंतर परत एकदा अनिलचा फोन आला.
"अरे आपल्या खुजलीनं काय केलं माहितेय?आपली पुर्ण प्राँपर्टी आणि व्यवसाय विकून टाकलाय.विकून आलेली बहुतांशी रक्कम त्यानं त्याच्यासारख्या भयंकर त्वचारोग्यांकरीता,मतीमंदांच्या शाळा,असाध्य रोगांच्या हाँस्पिटलला दान करुन टाकलीये.विशेष म्हणजे पंचवीस लाख त्यानं तुला दान केलेत तू त्याच्याशी खरी मैत्री निभावल्याबद्दल.नशीबवान आहेस लेका "
"काय सांगतोस काय?पण स्वतः खुजली आहे कुठे?
"खुजली कायमचा निघून गेलाय कलकत्त्याला कुष्ठरोग्यांच्या आणि उपेक्षीत लोकांच्या सेवेसाठी"
ते ऐकून मला गहिवरून आलं.एका सुस्वभावी, दुसऱ्यांच्या मदतीला सदैव धावून जाणाऱ्या व्यक्तीच्या स्वप्नांची आणि आयुष्याची पार राखरांगोळी झाली होती.
महिन्याभरात पंचवीस लाख माझ्या हातात पडले.खऱ्या मैत्रीची खुजलीने लावलेली किंमत होती ती.अर्थात त्यावर माझा काहीच हक्क नव्हता.कारण खुजलीचं आयुष्य सावरण्यासाठी माझा काहीच हातभार लागला नव्हता.तो चेक पाहून मी शांतपणे माझ्या बँकेचा चेक घेतला.त्यावर मेळघाटमधल्या कुपोषित आदिवासींसाठी कार्य करणाऱ्या एका सामाजिक संस्थेचं नांव टाकलं.रु.पंचवीस लाखाचा आकडा टाकला.चेक लिफाफ्यात टाकून लिफाफ्यावर संस्थेचा पत्ता टाकला आणि दरवाजाबाहेर पाऊल टाकलं खुजलीसारख्या उपेक्षितांच्या सेवेसाठी.
©दीपक तांबोळी
   9503011250
(ही कथा माझ्या "कथा माणुसकीच्या " या पुस्तकातील आहे. नावासहीत शेअर करण्यास हरकत नाही.
माझ्या पुस्तकांच्या अधिक माहितीसाठी क्रुपया वरील मोबाईल क्रमांकावर फोन करावा)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...