सोमवार, १८ सप्टेंबर, २०२३

539. पुढची पिढीही अगदी व्यर्थ जाणार नाही

 
       आजकाल जेव्हा मी लोकांशी बोलते तेव्हा मला त्यांच्याकडून आजकालच्या मुलांविषयी एकच तक्रार ऐकू येते, ती म्हणजे हल्लीची मुलं आमच्या बोलण्याला काही किंमतच देत नाहीत. ती उर्मट असतात. आणि त्यांचं वाचनही अगदी कमी असतं. 
         नुकतीच मी इजिप्तला भेटीसाठी गेले होते. मला त्या देशातील सर्वात जुना पिरॅमिड बघायचा होता. तो गिझा येथे नसून साक्कारा येथे आहे. कैरोपासून २४ किलोमीटर अंतरावर पारो झोशेयरसाठी बांधलेला हा एक पाच पाय-यांचा पिरॅमिड आहे. त्याचा वास्तू शिल्पकार म्हणजे इमेनटहॉटेप. हा त्या काळचा अत्यंत विद्वान माणूस. मी प्रवासात बरोबर एक गाईड घेतला होता. त्याचा इजिप्ताॅलॉजी या विषयाचा सखोल अभ्यास होता. काही पिरॅमिडवर कोरलेले लेख तो वाचून दाखवत होता. काही लेखांकडे बोट दाखवून तो त्यांचं भाषांतर करून दाखवत होता. तो म्हणाला, आपल्या पुढच्या पिढीची मुले अत्यंत उधळी असतील. ती फारसा विचार करणार नाहीत आणि आयुष्याविषयी त्यांना फारशी समज नसेल. त्यांचं भविष्य नक्की काय असेल ते काही आपल्याला माहित नाही.  तो हे मला सांगत असताना माझ्या मनात वेगळेच विचार चालू होते. आज आपल्या देशात सुद्धा नव्या पिढीविषयी बोलताना हीच गा-हाणी ऐकू येतात. प्रत्येक पिढी ही आपल्या नंतरच्या पिढीविषयी अगदी याच तक्रारी करत असते. हे सारं प्रत्येक पिढीत चालूच असतं. सर्व जगभर चालू असतं. निदान गेली पाच हजार वर्षे तरी चालूच आहे.
        आमच्या पिढीच्या मानाने आजच्या मुलांना फार जास्त ज्ञान आहे व फार कमी धीर आहे. अशीच एक दिवस मी माझ्या टीनएजर मुलांशी बोलत होते. मी त्याला सहजच म्हणाले या शतकातील सर्वात महत्त्वपूर्ण असे तीन महत्त्वाचे शोध सांग पाहू. त्यावर तो क्षणभर माझ्याकडे बघत राहिला व नंतर म्हणाला, तू घरी पण शिक्षिकाच असल्यासारखी वागतेस. या शतकातील सर्वात महत्त्वाच्या संकल्पना माझ्या दृष्टीने जर कोणत्या असतील तर त्या म्हणजे अहिंसेचे तत्व, हिंसेमुळे घडून येणारा परिणाम आणि दळणवळणाच्या साधनांचा परिणाम. त्याचे उत्तर ऐकून मी स्तिमित झाले.  तो म्हणाला मी तुला स्पष्ट करून सांगतो. मी त्याच्या उत्तरामुळे बुचकळ्यात पडल्याचं त्याच्या लक्षात आलं होतं. भारत जेव्हा शतकानुशतके गुलामगिरीत होता,  जेव्हा आपल्यात निर्णय घेण्याची शक्ती नव्हती, तेव्हा एका लहानशा माणसाने एक वेगळी रक्तपात विरहित चळवळ सुरू केली. शस्त्रास्त्रे नाही, पैसा नाही, पण राज्यकर्त्यांना केवळ एक संदेश, आम्ही तुमच्याशी सहकार्य करणार नाही. मग काय व्हायचं असेल ते होऊ दे. या नवीन विचारधारेमुळे त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. खरं म्हणजे शांततेसाठी देण्यात येणारे नोबेल प्राईज त्यांना द्यायला हवे होते. तो माणूस म्हणजे मोहनदास करमचंद गांधी, राष्ट्रपिता. त्याच्या क्रांतिकारी कल्पनांनी मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर, नेल्सन मंडेला, अनुग सॅन सू की अशा कित्येक नेत्यांना प्रेरित केले व त्यांनी आपापल्या देशांना स्वातंत्र्य मिळवून दिले.
       दुसरी कल्पनासुद्धा साधारण याच कालखंडातील. पण बरोबर याच्या विरुद्ध दिशेने चाललेली आहे. या माणसाने विदेशांच्या संकल्पनेवर विश्वास ठेवला. आपण शस्त्रास्त्रे व हिंसेचा वापर करून लोकांवर राज्य करू शकू असे त्याला वाटले. त्याने चिलटाप्रमाणे माणसांना मारून टाकले. प्रेम, दया या शब्दांचा अर्थ त्याला कधी उमगला नाही. आपल्या या मार्गाने तो शांती कधीच प्रस्थापित करू शकला नाही व दुसऱ्या महायुद्धाला तोच कारणीभूत झाला. त्याच्यामुळे,  त्याच्या धोरणामुळे कोट्यावधी लोकांना यातना भोगाव्या लागल्या. त्याचे संपूर्ण आयुष्य म्हणजे युद्ध, असहिष्णुता व पूर्वग्रह यांचे उत्तम उदाहरण आहे. तो म्हणजे ॲडॉल्फ हिटलर. 
         मला माझ्या मुलाच्या बोलण्यात तथ्य वाटले. परंतु माझ्या मते मात्र या शतकातील सर्वात महत्त्वपूर्ण शोध म्हणजे कॉम्प्युटर आहे. माझ्या मुलाला ते पटले नाही. आज प्रसार माध्यमामुळे सर्व जग आकुंचित होऊन जवळ आले आहे. जगभरात कुठे काय चाललंय हे आपल्याला क्षणार्धात समजू शकतं. टेलिव्हिजन आणि इंटरनेट हे त्याचेच भाग आहेत. त्यांच्यामुळे दळणवळणाचा खर्च एकदम कमी झाला आहे व सर्व अडसर हळूहळू निघत चालले आहेत. याचा परिणाम उद्योगक्षेत्रात तसेच आपल्या सामाजिक जीवनात सुद्धा दिसून येतो. याचा अर्थ असा नव्हे की आपली सर्व जुनी संस्कृती हरवत चालली आहे. मी असं म्हणेन, की आपल्याला इतर संस्कृतींचीही ओळख होत आहे. माझ्या या छोट्या मुलाच्या तोंडचे हे शब्द ऐकून मी चकित झाले. याला बोटात पेन्सिल कशी धरायची ते मी शिकवलं होतं. आणि आता हिंसा, शांती, दळणवळण अशा मोठमोठ्या विषयावर हा एखाद्या प्रौढासारखा बोलत होता.  मला खात्री आहे, अनेक पालकांना कधी ना कधी हे असं वाटतच असेल. आपली लहानशी मुलं आपल्यापेक्षा हुशार आणि शहाणी झाल्याचा अनुभव त्यांना येत असेल. आपले जुने धर्मग्रंथ सांगतात, जो ज्ञानसंपन्न आहे, त्याचा नेहमीच आदर करावा. मग त्याचं वय, लिंग व जात कोणतीही असो. माझ्या मुलाची परदेशी जाऊन शिक्षण घेण्याची इच्छा आहे व माझ्या या छोट्याशा मुलाला ते कसं काय जमणार अशी भीती मला वाटायची. पण आमचं हे बोलणं झाल्यावर मला कळून चुकलं, या पाखराचे पंख चांगले शक्तिशाली झाले आहेत. आता त्यानं आपली आपण झेप घेऊन आसमंतात विहार करण्याची वेळ आली आहे.
लेखिका - सुधा मूर्ती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...