मंगळवार, १२ सप्टेंबर, २०२३

523. प्रायोरीटी

 "पाऊस उघडलाय तर चल ना, जरा बाहेर चक्कर मारुन येऊ... पाणीपुरी सुद्धा खाऊन येऊ"... तो बायकोला म्हणाला. 
"अरे पण तू आत्ता थोड्यावेळापुर्वीच आईंना सांगितलंस ना फोनवर की... तुला अंगात कणकण आल्यासारखी वाटतीये म्हणून, जेव्हा त्या तुला जरा घरी येऊन जा सांगत होत्या"... ती म्हणाली. 
मान उडवत तो बोलला... "ठिकेय गं... मला कंटाळा आलेला आई - बाबांकडे जायचा आज... सो व्हाॅट?... आणि आई - बाबा आत्ता अशा पावसा पाण्याचं कशाला घराबाहेर पडणारेत, नी नेमकं आपल्यालाच बघणारेत फिरतांना... तू हो तयार". 
पाचेक मिनिटांतच पुन्हा फोन वाजला. ह्यावेळी बाबा होते फोनवर. 
काहीशा घाबरल्या आवाजातच बोलू लागले बाबा... "अरे... ही जिन्यावरुन पडली... पाचेक पायर्‍या घसरत खाली गेली... गुडघे जरा दुखावलेत... पावसाचं पाणी जिन्यावर आलेलं, नी नेमका सरकला हिचा पाय त्यावरुन". 
तो वैतागुनच बोलला... "अहो पण बाबा काय गरज होती आत्ता घराबाहेर निघायची?... बसायचं की चुपचाप घरीच... ह्या वयात पावसा पाण्याचं फिरायची, काय एवढी हौस म्हणतो मी". 
बाबा म्हणाले... "फिरायला म्हणून नव्हतो पडलेलो रे बाहेर आम्ही... अरे तु...". 
"मग काय किर्तनाला?... अहो काय बाबा?... आईला एक कळत नाही, पण निदान तुम्ही तरी अडवायचंत तिला... तर तुम्ही स्वतःही निघालात बाहेर उत्साहात?"... तो अजूनही घुश्शातच होता. 
बाबा शांतपणे घसा खाकरत बोलले... "हो रे... मी ही पडलो बाहेर हिच्या बरोबर... तुझ्या अंगात कणकण होती, म्हणून तुला बघायला येत होतो तुझ्याकडे... हिला राहवेना ना... चुकलंच नै आमचं?... आणि काय रे इतका वैतागलायस ते?... तुझा काही प्लॅन बिन मोडला का आम्ही?... तसं असेल तर तू काही कॅन्सल करु नकोस रे बाबा तुझं ठरलेलं... तसाही पाऊस उघडलाय... जाऊन या कुठे ते... काय आहे की प्रत्येकाच्या प्रायोरीटीज, वेगवेगळ्या असूच शकतात की... आमची तू आहेस पण म्हणजे तुझीही आम्हीच असायला हवं, असं काही नाही बरं का... डाॅक्टरांना घरी बोलावलंय, ते येतीलच इतक्यात... तेव्हा ठेवतो फोन". इतकं बोलून बाबांनी फोन ठेवला. 
पलीकडून ठेवलेल्या फोननंतरचा, तो रिकामा आवाज मग ऐकत बसला होता तो हताशपणे... आणि त्या पोकळीत भरून राहिलेल्या, आपल्या आईच्या वेदनाही जाणवल्या होत्या त्याला. त्याच्या भरुन आलेल्या डोळ्यांतून आता, झरझर ओघळू लागलं होतं... त्याच्या बाबांचंं म्हणणं... आणि आईचं कण्हणं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...