सोमवार, १८ सप्टेंबर, २०२३

540. देव आणि दैव...!

      गवतात हात घालून दुर्वा तोडताना पाहून सुषमा ताई थांबल्या. आजीना म्हणाल्या, "आजी, अहो गवतात हात घालून दुर्वा घेताय, चावेल काही अन् हाताला लागू शकेल, बाहेर १०-२० रुपये देऊन स्वच्छ जुडी मिळते दुर्वांची."
त्यावर आजी बाईंनी मागे वळून सुषमा ताईंकडे पाहिलं आणि किंचित गालात हसून म्हटल्या, "तुम्ही पण या माझ्या सोबत वेचा दुर्वा आणि घरी जाऊन स्वच्छ धुवून २१-२१ बांधा आणि वाहून पाहा गणरायाला खूप आनंद मिळेल. हा आनंद त्या विकतच्या जुडीत नाही हो. परसात आलेली फुलं देवाला वाहाताना जो आनंद आहे तो २०रुपयाचा फुलाचा पूडा आणून वाहाण्यात नाही."
खरं तर सुषमा ताई काळजीपोटी आजीना सूचना देत होत्या, पण आजी त्यावर मनातलं बोलू लागल्या. "कुठे राहाता तुम्ही ?" आजीनी ताईना प्रश्न केला. ताई उत्तरल्या, "बी विंग मधे राहाते. नवीनच आलोय राहायला. मी आणि आहो. मुलगी परदेशात असते लग्न झालंय तिचं. बस फार जबाबदारी नाही. वेळ भरपूर असतो मग एका संस्थेसाठी काम करते. अनाथ आश्रमात."
सुषमा ताईंकडे बघण्याची आजीबाईंची नजर आता बदलली होती.
सुषमा ताई बोलू लागल्या,"आजी या अनाथाश्रमातील मुलांकडे पाहीलं ना की या देवावरचा विश्वासच उडतो हो..." त्यांचे डोळे पाणावले.
आजीबाईंनी त्यांच्या पाठीवर हात ठेवून, शेजारीच असलेल्या मंदिराच्या पायरीवर बसा अशी खूण केली. एक मिनीटाच्या शांततेनंतर आता आजी त्यांच्या अनुभवाचे बोल बोलू लागल्या... "पोरी, 'देव'ही फार मोठी संंज्ञा आहे. प्रत्येक जण स्वतःला हवा तसा त्याचा अर्थ लावत असतो. देवाला रजनीकांत सारखा हीरो बनवतात. तर कधी प्रेम चोप्रा, एक व्हिलन. कधी माय माऊली तर कधी दगड. पण खरा देव कोणाला कळालाच नाही. 'देव आणि दैव' यात एकाच मात्रेचा फरक असला, तरी फार भिन्न अर्थ आहे. देव ही पवित्र शक्ती आहे, पण दैव हे भोग आहेत आयुष्याचे. कधी सुखाचे भोग, कधी दुःखाचे."
"पण आजी मी एकेकाळी खूप केलंय हो देवाचं..." सुषमा ताईं मधेच बोलल्या, "पण मला सुद्धा एकटेपणा आहे. माझे अहो आजारी असतात. मुलगा अपघातात गेला. मुलगी परदेशात. मलाच का हे दुःख ?"
आजी जरा गंभीर होऊन बोलू लागल्या,"समाजात चार प्रकारची माणसे असतात. एक जी पिढी, रुढी, परंपरा म्हणून देवाचं करतात, दुसरा स्वतःची संपत्ती उधळायला, बडेजाव मिरवायला दिखावा म्हणून देवाचं करतात, तिसरा भीती पोटी देवाचं करतो. आणि चौथा मनशांतीसाठी करतो, श्रध्देपोटी करतो. या चार प्रकारच्या माणसांत तू कुठे बसतेस ?  ते तूच स्वतः शोध तुला सारी उत्तरं मिळतील..."
सुषमा ताई बुचकळ्यात पडल्या. त्यांची संभ्रमावस्था पाहून आजी समजावून सांगू लागल्या, "अगं जे इथे भोग आहेत ते भोगूनच जायचंय. देवाबद्लची अढी पहिली मनातून काढून टाक. लढायची ताकद देणारी शक्ती कधीही आपलं काढून घेत नाही गं. निरपेक्ष पणे देवाचं कर. मनःशांती शोध त्या देवात. दैव आणि देव यांची सांगड नको घालूस. देवाला भ्यायचं नाही, त्यावर श्रद्धा ठेव. तुझ्या डोळ्यात जे अश्रू आले तो देव आहे. त्या अनाथ मुलांना पोसणाऱ्या प्रत्येकात देव आहे... त्या मुलांसाठी जेवण बनवणारा, औषधोपचार करणारा, ज्ञान शिकवणारा, शिस्त लावणारा आणि तुझ्यासरखे समाजाचे देणे देणाऱ्या मधे देव आहे. जे मिळालं ते, आपलं जे सुटून गेलं, ते आपलं नव्हतंच गं. येते मी जप हो" असं म्हणत खूप काही मोलाचे बोल बोलून आजी नी त्यांच्या घराची वाट धरली...
त्या दिसेनाशा होईपर्यंत ताई त्यांच्या कडे पाहात राहील्या. भानावर आल्यावर रूखरूख लागली,
 त्या माऊलीचे चरण धरायचे राहून गेले...!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...