अमेरिकेत एका कैद्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली . तेव्हा तिथल्या शास्त्रज्ञांनी त्याला असं सांगितलं की, ऐवीतेव्ही तु मरणारच आहेस तर मग आम्ही तुला कोब्रा नावाच्या नागाच्या दंशाने मारतो म्हणजे तुझ्या मृत्यूनंतर तुझ्या मृतदेहावर आम्हाला काही प्रयोग करता येतील. त्या कैद्याने ही विचार केला. चला मरता मरता आपण कुणाच्या तरी कामी येतोय ना. म्हणून त्यानेही फाशी ऐवजी सर्पदंशाने मृत्यू स्विकारण्यास होकार दिला . त्याप्रमाणे त्या कैद्याला डोळ्याला पट्टी बांधण्यात आली आणि वीसेक मिनिटांनी त्याला सर्पदंशाचा भास होईल अश्या पध्दतीने दोन सुया टोचण्यात आल्या आणि त्यानंतर त्या कैद्याचा तात्काळ मृत्यू झाला . पुढे जेव्हा त्याचे शवविच्छेदन करण्यात आले तेव्हा असे लक्षात आले की त्या कैद्याचा मृत्यू हा एका सर्प सदृश विषाने झाला . झालं असं की त्याच्या शरीरात सर्पाच्या भितीने सर्पाच्याच विषासारखं विष आपोआपच तयार झालं आणि त्याच विषाने त्याचा मृत्यू झाला .
भय , भिती ही माणसाच्या आयुष्याला लागलेली एक किड आहे की ज्यामुळे त्यांचे हसते खेळते आयुष्य उध्वस्त होते. तसं पाहिलं तर भिती ही जन्मजातच मनात घर करून असते. अगदी शाळेत उत्तम मार्क मिळवण्यापासून ते प्रत्येक क्षेत्रात कायम टाॅपर रहाण्याच्या धडपडीत मनात दाटून आलेलं भय . आपल्यापुढे कुणी जातयं असं जरा जरी जाणवायला लागलं की आपल्याला भीती वाटायला लागते आपण दुय्यम तर नाही ना होणार ॽ हा किंवा ही आपली जागा तर नाही ना घेणार ॽ आपल्या भीती वाटायला लागते ती अपयशाची , अवहेलनेची , समाजातील आपल्या प्रतिष्ठेला तडा जाण्याची . मग ते सांभाळण्याकरिता माणूस कोणत्याही थराला पोहचतो .
समाजात आपल्या आदर्श अस्तित्वाची ओळख कायम प्रत्येकालाच हवी असते . त्याकरिता प्रत्येकजण हा प्रयत्नशील असतोच . यात खरतर काहीच चुकीचे नाही . पण , खरतर आपलं अस्तित्व हाच एक आभास आहे आणि याची साधी जाणीव ही आपल्याला नसते . असो पण तो आपला आजचा विषय नाही . प्राक्तनाच्या उन्हाने करपलेलं आपलं अस्तित्व हे खरतर एका छोट्याशा काजव्याप्रमाणे आहे . आयुष्याच्या ऊन पावसाच्या खेळातील काचापाण्यांचा खेळात सामील झालेलं . स्वतःच्या अनवट पाऊलखुणा उमटवण्याच्या प्रयत्नात दुस-यांचे अस्तित्व संपवण्याच त्यांना काहीही वाटत नाही . दुस-याला खाली ओढताना , त्यांच्या मनाशी खेळताना , अनधिकृतपणे आपल्या ईच्छापुर्ती करताना समोरच्यांना वेळप्रसंगी बेघर , निराधार करताना त्यांना कुठलीही भिती वाटत नाही .
पण करत असताना या दग्याफटक्यांतील अभिशापांचे हे सावट कुठेतरी मनाच्या डोहात खोलवर गरगरत रहाताना ती सारी भिती हळूवारपणे आपल्या मनावर खोलवर परिणाम करतात . ती अत्याचाराची.... केलेल्या पापांची....भीती आपल्याला आपल्या आत्मनाशाकडे नेत रहाते .
यात मी असं म्हणेन की दुस-याचे पाय ओढून स्वतःच अस्तित्व टिकवण्यापेक्षा आपण स्वतःला एक सुविचारांच, चांगल्या आचारांचं असं बीज बनवा की ज्याच्या डौलदार वृक्षाला सृजनत्वाची , सुविचारांची अनेक फळे निर्माण होतील .
राम राजा होईल आणि आपल्या पुत्राला भरताला त्याचे दास्यत्व आजन्म स्विकारावे लागेल या भीतीने कैकयीने रामायण घडवले . रामचंद्रांनी ही जननिंदेच्या भीतीपोटीच सितेसारख्या साध्वीचा त्याग केला .... या आणि अशा अनेक भीतीपोटी कित्येक रामायणे आजूबाजूला घडत आहेत .
पण याच पद्धतीच्या या भयांचा त्याग करून जर परमेश्वराने दिलेल्या या आत्मारूपी जरतारी वस्त्राला सुखदुःखाची सुंदर वीण घालून कुविचारांची , वाईट वृत्तींची धुळ त्याला न लागू देता तसेच स्वैर इच्छा आकांक्षांचे डाग त्यावर न पाडता आपल्या उत्तम चारित्र्याची प्रेमाची कलाकुसर केली तर जीवन नक्कीच एका सुरेख तैलचित्राप्रमाणे घडेल आणि मग आयुष्यभर......
चिमुकला जीव माझा....
घरटे ता-यांची धुळ .....
शिलालेख कोरताना ....
नाही कधी .....
पानगळ ....
नाही कधी......
पानगळ....
असं स्वतःबद्दल नक्कीच अभिमानाने आणि निर्भीडपणे म्हणता येईल .
सौ ऋतुजा राजेश केळकर
सिंधू वैभव पेपर
ऋतूरंग लेखमाला 11 🌹
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा