आपण जर आंबे पेरले तर त्याला कधीच फणस येणार नाहीत. आपण जी जी कृती करतो त्याचं फळ आपल्याला फिरुन दुप्पट तिप्पट प्रमाणात परत मिळतं.आपले वरीष्ठ आपल्याला नेहमीच सांगतात कायम शुभ बोलावं चांगलं वागावं. पण अस का??? इथं कर्माचा सिद्धांत मला सांगावासा वाटतो. आपण जे जे कर्म करतो मग ते चांगले अथवा वाईट त्याचे फळ हे आपल्याला मिळतेच. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे.
"मन से कोई बात छुपे ना....
मन के नैन हजार....
तोरा मन दरपन कहेलाये.... "
एखादेवेळी आपण जगाला फसवू शकू पण आपण आपल्या अंतरात्म्याला नाही फसवू शकत. अगदी साधं उदाहरण घ्यायचे झालं तर आपण एखाद्यावर प्रचंड प्रेम करतो.... त्याची सर्वातपरी काळजी घेतो .... पण ते कधीचं दर्शवत नाही. पण ती नाजुकशी भावना आपण स्वतः पासूनच नव्हे तर त्या व्यक्तीपासून ही कितीही प्रयत्न केला तरी लपवू शकत नाही.
आयुष्यात प्रत्येक गोष्ट ही स्वार्थासाठीच करायची नसते. आपण एखाद्याला त्याच्याबद्दल कुठलीही माहिती नसताना बेफाटपणे बेलगाम बोलत सुटतो. विचारला नसताना ही फुकट सल्ले देतो.यात प्रथमतः आपले पर्यायाने आपल्या मात्यापित्यांचे आणि सर्वात शेवटी आणि महत्त्वाचे असे घराण्याचे संस्कार काढले जातातच शिवाय दुखावलेली ती व्यक्ती आपल्याला मनातून शाप देते त्याला "हाय लागणं " असंही म्हणतात. आणि तुम्ही मान्य करा अगर नका करू पण एखाद्याची लागलेली हाय आपला जन्मोजन्मी पाठलाग करते. तर कधी आपण कुणाचं अगदी कळत न कळत चांगलं केलं तरी त्याचीही दुवा आपल्याला आपल्या वाईट काळात तरून नेते. म्हणून म्हणते तुम्हाला कुणाचं चांगलं करता नाही आलं तर नका करू पण कुणाचं वाईट तर स्वप्नात ही करु नका. कारण तुम्हाला जाणीव ही नसते पण श्वासागणीक आपल्या पापपुण्यांचा हिशोब त्या चित्रगुप्ताच्या वहीत टिपून ठेवला जात असतो. शरीर बदललं तरी आत्मा तोच असतो त्याची वृत्ती त्याच्या इच्छा आकांक्षा त्याच असतात. कालानुरुप त्या थोड्या बहुत प्रमाणात अनुभवाने बदलतात इतकचं त्या आत्म्यास एक परिपक्वता येते ही, जशी ओली माती हळू हळू सुबक मूर्तीत रूपांतरीत होते,तसा वृत्तीत आचारविचारात फरक पडतो आणि मग कुकर्मांकडून सुकर्मांकडे वाटचाल सुरु होते. म्हणूनच कित्येकदा वाईटाचा जय होतो आणि सीतेला धरणी मातेचाचं आसरा घ्यावा लागतो तिथे आपल्या सारख्या सामान्यांची काय व्यथा? पण केलेली कुकर्मे आपली पाठ सोडत नाहीत. वळणा वळणांवर मिळालेले शाप आपला पिच्छा पुरवला असतात आणि मग त्याचीच परिणीती म्हणून कृष्णा सारखा दैवी अंश तर पोटी जन्माला येतो परंतू आयुष्यभर कारावास भोगावा लागतो तोही आपल्या भावाकडून.पण अंधाराला कायम प्रकाशाची भिती असतेच म्हणूनचं कुणीही कितीही यत्न केला तरी आपण आपला सन्मार्ग सोडू नये कारण आपण चांगले आहोत.
ज्या प्रमाणे रात्रीच्या गर्भात उद्याचा उषःकाल दडलेला असतोच त्या समान दुःखांचा अंत होऊन सुखाची वाट नक्कीच सापडते आणि जरी तसे झाले नाही तरी पुंण्याचे हे गाठोडे आपण जेव्हा देहरूपी वस्त्र बदलू तेव्हा आपल्या सोबतच येणार त्यामुळे साम दाम दंड आणि भेद करण्याऐवजी तुम्ही सचोटीने आपले कर्म करत रहा कारण भले त्या जगज्जेत्याच्या लाठीत आवाज नसतो पण ती जेव्हा पडते तेव्हा भल्याभल्यांची बोबडी वळते. तसेच जेव्हा तो करूणाकर आपल्यावर कृपेची बरसात करतो तेव्हा "घेशील किती करांनी" अशी अवस्था होते हे लक्षात ठेवा.
ऋतू
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा