मंगळवार, १२ सप्टेंबर, २०२३

522. एका आईची विनंती

 तिला जे होऊ नये वाटत होतं तेच घडलं. तिची मुलगी व जावई त्याच गावात रहात होते. तिचं पहिलं नातवंड दोन महिन्यात येणार असल्याने घरी आनंदी आनंद होता. नेव्ही मधे असूनही नशिबाने जावई कुठे दूर देशी गेले नव्हते. सगळं कसं मनासारखं चाललं होतं.  पण युक्रेन वॅार सुरू झाल्याची बातमी वर्तमानपत्रात आली आणि तिच्या काळजात लक्क झाले. “दोन महिने जावयांना बोलावणं नाही आलं तर किती बरं होईल..बाळ तरी बघता येईल. देवा, दोन महिने त्यांना बोलावणं नको!” तिनं देवाला विनवलं. 
चार दिवसातच लेकीचा फोन आला. “आई, सकाळी सकाळी आज दारावरची बेल वाजली. युक्रेन मधे जाण्यासाठी त्याला तातडीचे बोलावणं आलं आहे. माझ्या पायातील शक्तीच गेली आई." लेक हताश होऊन बोलत होती. 
"अरे देवा" म्हणत ती व तिचा नवरा पटकन तयार होऊन लेकीकडे गेले.  
जावयाने सर्व सामान बाहेर आणले होते. त्याच्या खांद्यावरची मेडलस् दिमाखाने चमकत होती. प्रत्येक मेडल मिळवताना जीवाची बाजी लावलेल्या आपल्या नवऱ्याकडे ती कौतुकाने, अभिमानाने बघत होती. चेहऱ्यावर उसने हसू होतं. 
“आपला मुलगा दोन महिन्यात या जगात येत आहे. मी नक्की परत येईन बाळ बघायला! तू काळजी करू नको. मी परत येणारच आपल्या बाळांचं स्वागत करायला!” त्यानं तिला जवळ घेऊन धीर दिला. तिने भरून आलेले डोळे पुसत त्याच्या खांद्यावर मान ठेवली. 
त्याने सासु सासऱ्यांना सांगितलं की तुम्ही जवळ आहात हा फार मोठा आधार आहे. 
डोळ्यातील पाण्याला बाहेर येण्याची परवानगी न देता तो बाहेर पडला. 
दोन महिन्यानी तिनं निरोगी, देखण्या बाळाला जन्म दिला. ते बाळ म्हणजे वडिलांची प्रतिकृती होती. पण त्याचे अतिशय शूर आणि देखणे बाबा त्याच्या स्वागतासाठी तिथे नव्हते. 
युक्रेन मधे दोन आठवड्यांपूर्वी त्यांचे फायटर जेट शत्रुच्या गोळीबारामध्ये खाली आले होते. त्याच्या शौर्याने त्याने युक्रेन मधल्या नागरिकांवर हल्ला करणारी अनेक रशियन जेट्स पाडली होती पण त्यात त्याचा अंत झाला होता. 
बाळाच्या आजीची सर्वांना एकच विनंती आहे. 
“देवाजवळ दिवा लावताना अशा कुटुंबांची आठवण ठेवा. तुमचे सण साजरे होण्यासाठी ते त्यांचे सण करत नाहीत. तुमची मुलं तुम्हाला रोज घट्ट मिठी मारतात तेव्हा त्यांची मुलं बाबाच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली असतात. कित्येकांनी बाबा फक्त फोटोत बघितलेला असतो. वेडवाकडं काही झालं नसेल ना अशा अनिष्ट विचारांना बाजूला सारून आई मुलांना “बाबा लवकर येतील परत” सांगत असते. केवळ वाट बघणे तिच्या नशिबात असते. दिवस..आठवडे.. महिने... वर्षे. वाट बघणं.. देवाला साकडे घालून त्याच्या परतीची प्रार्थना करणे फक्त हातात असते. आणि जेव्हा युनिफॉर्म मधले अनोळखी ऑफिसर्स दारात दिसतात तेव्हा सारे संपल्याच्या जाणिवेने मन बधीर होणं नशिबी असतं..पण त्याग आणि समर्पणाशिवाय देश उभा रहात नाही याची तिला पूर्ण जाणीव आहे..
मी माझ्या लेकीसाठी व नातवासाठी मला जे जमेल ते करत आहेच पण देवाजवळ दिवा लावताना माझ्या मुलीचं कल्याण होऊ दे एवढी प्रार्थना मात्र करा. तुमच्या ह्रुदयात तिला जागा द्या. देवाजवळ ती व तिच्या  बाळासाठी दुवा मागा. तुमच्या सदिच्छांमुळे ती परत उभी राहू शकेल. 
एवढच माझं तुमच्याकडे मागणं आहे. कारण तिला याची खूप जरूर आहे! आपण सारे तिचे कुटुंबीय आहोत! आपण तिला उभे राहण्यासाठी बळ देऊया!” 
©® ज्योती रानडे
हा लेख युक्रेन वॅार सुरू झाल्यानंतर वर्तमानपत्रात आलेल्या बातमीवर आधारित आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...