'प्रतिपूर्ती' हा शब्द फारसा परिचित नाही.. पण कुठलं ही नाते टिकवायचे असेल, तर प्रतिपूर्ती किवा reciprocation आवश्यकच आहे. 'मी त्याच्यासाठी इतकं केलं, त्याने काय केलं माझ्यासाठी?' ही अशी वाक्यं आपण नेहमीच ऐकतो.... प्रतिपूर्ती किंवा reciprocation चा अभाव हेच त्याचे खरे कारण....! समाजात राहतांना, नाते संबंध जपतांना, एकमेकांसाठी काही ना काही करावे लागते. त्या शिवाय नाती टिकूच शकत नाहीत..... हे काहीतरी करणे म्हणजेच प्रतिपूर्ती ... अर्थात याचा अर्थ दर वेळेला कुठले तरी काम करणे असे नसून, त्या व्यक्तीशी चांगलं वागणं, बोलणं, शब्दातून धीर देणं अश्या स्वरुपात ही असू शकतं .... माणूस जसा जसा प्रगती करु लागला तस तसा त्याच्यातील "मी" पणा वाढायला लागला... आपल्या माणसाचा वापर करुन घेणे सुद्धा त्याला कळले...
समाजात धूर्त, कपटी माणसे आहेत तशीच साधी भोळी देव माणसे सुद्धा अजून आहेत. अश्या लोकांचा मग पध्दतशीरपणे नात्यांमधे वापर होवू लागला... गोड गोड बोलून आपली कामे साधण्यापुरता त्या व्यक्तीचा उपयोग केला जाऊ लागला. नाती सांभाळायची, तर जाऊ द्या.. विसरुंन जाऊ .. ह्या शब्दांचा पद्धतशीरपणे वापर होऊ लागला. पण कुठेतरी, कधीतरी एक वेळ येतेच. त्या वेळी केलेल्या कामाच्या पोच पावतीची अपेक्षा केली जाते... "जाऊ दे" चा कधीतरी कंटाळा येतो... एकतर्फी नाती टिकवण्याचे अथक प्रयत्न अखेर निष्फळच होतात, आणि एक ना एक दिवस नाती दुभंगतात. म्हणूनच नात्यांमधे प्रतिपूर्तीला महत्व आहेच..
प्रतिपूर्ती ही प्रत्येक वेळी मोठमोठ्या gifts देऊनच होते असे नाही. आपलेपणा, आत्मीयता या गोष्टीची किंमत करताच येत नसते. वृद्ध सासू सासऱ्यांची सेवा करणाऱ्या सुनेला "तू आमच्यासाठी खूप करतेस" असे म्हणणे/ तिच्या सेवेची पावती देणे सुद्धा प्रतिपूर्तीच आहे.... म्हातारपणात कुठलीही शारिरिक मदत शक्य नसते. पण मुलाला आणि सुनेला, *"आम्ही घरी थांबतो... तुम्ही दोघे निश्चिंत मनाने बाहेर जा....." अशा आश्वासक शब्दानेसुद्धा प्रतिपूर्ती होत असते. परदेशात राहणाऱ्या भावाने, भारतात रहाणार्या अणि वेळोवेळी आई वडीलांच्या मदतीला धाऊन जाणाऱ्या बहिणीला/भावाला ... *तू आहेस म्हणून मला आई बाबांची काळजी नाही हे म्हणणे, म्हणजे एक प्रकारे प्रतिपूर्तीच आहे... सुखात आणि दुःखातही माणसाला आपल्या माणसाची गरज असतेच. नाती टिकवणं ही जरी काळाची गरज असली, तरी प्रतिपूर्तीचा अभाव असेल तर नात्यांमधे तणाव निर्माण होतोच... एकतर्फी नाती कधीच टिकू शकत नाहीत. सहानभूती आणि सांत्वनाचे फक्त दोन शब्दही दुःखाच्या काळात मनाच्या जखमेवर फुंकर घालुन जखम भरण्याचे काम करतात. ज्याला दुःखाच्या दिवसातील आपल्या माणसांचे महत्त्व कळले...त्याला प्रतिपूर्ती कळली, असेच म्हणावे लागेल....!
या साठी प्रत्येकाला म्हणा.
Thank you for being in my Life.
तुमचे माझ्या जीवनात असणे, खूप महत्त्वाचे आहे. त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद.
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा