शनिवार, १० डिसेंबर, २०२२

78. आईची माया

        खरच भूत असतात का? हा प्रश्न प्रत्येकालाच पडत असतो. काही लोक म्हणतात, भूत, आत्मा वगैरे या सगळ्या गोष्टी म्हणजे केवळ अंधश्रध्दा आहे. पण आईच्या बाबतीत दुमत कसं असू शकत? आईच्या प्रेमाला जगात कोणत्याच गोष्टीची तोड नाही. आईच्या मरणानंतर देखील तिचं तिच्या मुलावरचं प्रेम कायमचं राहतं. याचं उत्तम उदाहरण हसीम नागराल याच्या अनुभवावरुन होईल.
     पावसाळ्याचे दिवस सुरु होते. पावसाने राज्यात थैमान घातले होते. जणू ढगांना झालेल्या कसल्यातरी दु:खामुळे ढग जोर-जोरात रडत होते. पावसाच्या सरीवर सरी कोसळत होत्या. घरातून बाहेर निघायची सोय नव्हती आणि अशा परिस्थीतीत अजय आणि मेघा त्यांच्या चारचाकी कारने घरी निघाले होते. पावसामुळे समोरचे काही दिसत नव्हते. म्हणून अजय कार हळू चालवत होता. दोघांना घरी पोहचायला उशीर होणार होता. दोघेही वैतागले होते. निसर्गापुढे कुणाचे काही चालले आहे का? हळूहळू रात्र झाली. ढगाळलेल्या वातावरणामुळे काळोख अगदी गडद झाला होता. आता सरळ रस्ता संपून घाट-उतार सुरु झाला होता आणि अजय देखील कार सावधतेने चालवत होता. मधेच काळ्या अंधाराला चिरत एखादी वीज जणू पावसाच्या प्रचंडतेची जाणीव अजय आणि मेघाला करुन देत होती. पावसाळ्याचे दिवस चालू असल्याने गाड्यांचा वावरदेखील कमी झाला होता. घाट उतारावरील एका वळणावर अजयने गाडीला जोरात ब्रेक लावला. जोरदार आवाज झाला. कार थोडी घसरली. त्या धक्क्याने कारच्या हेडलाईट बंद पडल्या. कारदेखील घाटाच्या मध्यावर बंद पडली. मेघाला क्षणभर सुचलेच नाही काय झाले ते. ती कावरी-बावरी होऊन अजयवर ओरडली. पण अजयला काळोखात जे दिसलं ते मेघाने पाहिलं नव्हतं आणि चमकणाऱ्या विजांच्या पांढऱ्या प्रकाशात त्याला एक बाई त्याच्या कारच्या पुढे उभी असलेली दिसली.
          अंगावरील कपडे फाटली होती. डोक्यातून रक्त येत होते. हात-पाय रक्ताने माखले होते जणू त्या बाईचा अपघात झाला होता. ती बाई कारपासून थोड्या अंतरावर उभी होती. आता तर मेघाचे देखील तिच्याकडं लक्ष गेलं आणि भितीपोटी मेघाच्या तोंडून मोठी किंकाळी निघाली.  ती प्रचंड घाबरली, अजय तिला समजवत होता. पण तिचे घाबरणे कमी होत नव्हते. तिला धाप लागली होती. मेघाने झट-पट खिडक्यांच्या काचा वर घेतल्या. इतक्यात त्या बाईचे रक्ताने माखलेले हात कारच्या काचेवर रेंगाळू लागले. अजय देखील मनातून घाबरला होता. त्याने कार चालू करण्याचा खूप प्रयत्न केला पण कार चालू झाली नाही. त्या बाईचे रक्ताने माखलेले हात काचेवरती फिरताना पाहून मेघा घाबरलेली होती. तिला सावरणे अजयसाठी कठीण झाले होते. इतक्यात अजयचे लक्ष त्या बाईच्या हाताकडे गेले. त्या बाईचे दोन्ही हात अजय आणि मेघा समोर जोडले गेले होते जणू ती बाई मदत मागत होती. अजयने मनाशी काहीतरी विचार केला आणि कार मधून घाबरतच बाहेर पडला. मेघा देखील त्याच्या पाठोपाठ कारमधून उतरली. इतक्यात त्या बाईने अजयचे पाय पकडले आणि रडू लागली. रडता रडता बोलू लागली, माझा अपघात झाला आहे आणि माझी गाडी दरीत अडकली आहे. माझा चार वर्षाचा मुलगा त्या गाडीत अडकला आहे. कृपया तुम्ही त्याला वाचवा ना? आणि पुन्हा रडू लागली. मेघाला हा प्रकार भलताच वाटू लागल्याने मेघा खूप घाबरली आणि अजयला तिथून निघून जाऊ असे म्हणू लागली. पण अजयने त्या बाईला मदत करण्याचं पक्क केलं होतं. तो त्या बाईला म्हणाला, चला ताई, कुठे आहे तुमची कार? मी करतो तुम्हाला मदत. आणि ती बाई पुढे चालू लागली. तसेच तिच्या पाठी अजय आणि मेघा देखील चालू लागले होते. ते दोघेही एका दरीच्या उंच कट्टयावर पोहचले होते. अजयला तेथून रडण्याचा बाळाचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. वरुन पावसाची तिरीप डोळे उघडायची संधी देत नव्हती. अशा त्या मुसळधार पावसात अजय त्या छोट्या जीवाचे प्राण वाचविण्यासाठी स्वत:चे प्राण धोक्यात घालून एक-एक पाऊल दरीत उतरत होता. दरी खोल अशी नव्हती पण जीवघेणी मात्र नक्कीच होती. अजय जसजसा त्या कारच्याजवळ पोहचत होता तसतसा त्या मुलाच्या रडण्याचा आवाज तीव्र होत होता. अजय आता त्या कारच्या खिडकीजवळ आला होता. त्यात ते मूल रडताना तिथे दिसत होते. त्याने जवळून अंधारात चाचपडत एक दगड उचलला आणि खिडकीची काच फोडून त्या मुलाला बाहेर काढले. ते मुल देखील अजयच्या हातात येताच रडायचे शांत झाले. अजयने त्याला दरीतून बाहेर काढताना त्याला कारच्या चालकाच्या सीटवर कोणीतरी असल्याचे जाणवले. म्हणून त्याने त्या मुलाला दरीतून बाहेर काढून  मेघाजवळ सोपवून तो पुन्हा त्या दरीत अडकलेल्या गाडीत नक्की काय आहे ते पाहण्याची दरीत उतरु लागला. कारजवळ गेल्यावर त्याने त्या अपघातग्रस्त कारमध्ये चालकाच्या सीटवर नीट डोकावून पाहिले. त्याने जे पाहिले त्याच्या हृदयाला धक्का देणारे होते. त्या सीटवर एका बाईचा मृतदेह पडला होता. अजयने नीट पाहिले तेंव्हा तो अजूनच अवाक् होता. तो मृतदेह त्याच बाईचा होता जी त्याच्याकडे तिच्या मुलाचे प्राण वाचविण्यासाठी मदत मागायला आली होती. त्याने कसलाही विचार आणि बोभाटा करता दरीतून काढता पाय घेतला. तो दरीतून वर आल्यानंतर मेघाने आजूबाजूला पाहिलं आणि अजयला विचारल की, कोण होती ती  बाई? ती तुझ्याचे मागे आली होती. अचानक कुठे गेली. ??????  यावर अजयने एकच उत्तर दिले, ती एक आई होती. तिच्या मुलाला वाचवण्यासाठी आली आणि ते दोघे त्या मुलाला तेथून घेऊन निघून गेले. त्यांची गाडी  देखील नीट चालू झाली. पावसाचा जोर देखील उतरला होता. त्या मातेने मरणोत्तर देखील स्वत:च्या मुलाचे प्राण वाचवले. अशीच अतूट असते आईची माया.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...