सोमवार, १९ डिसेंबर, २०२२

91. प्रेमाची परीक्षा

        एक मुलगा आणि मुलगी एकमेकांवर खूप प्रेम करायचे. मुलगा मुलगी दोघेही मध्यमवर्गीय घरातले होते. एक दिवस मुलगी त्या मुलग्याची प्रेमाची परीक्षा घ्यायची ठरवते. तो जेंव्हा तिच्या घरी येतो, तेंव्हा ती बेडवर झोपलेली असते आणि त्याच्या हातात दिला जातो एक कागद. तो कागद दुसरं-तिसरं काही नसून डॉक्टरांनी दिलेलं एक सर्टीफीकेट असतं ज्यांत लिहलेलं असतं की तिला कॅन्सर झालाय. तिच्याजवळ फक्त सोळा तासांचा वेळ शिल्लक आहे. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बघण्यासाठी ती आतुर झालेली असते. पण तो काही बोलता तसाच निघून जातो. तिला वाटतं की बहुतेक त्याला कळालंय की हे सर्टीफिकेट खोटं आहे.
          तो चार तासांत परत येतो आणि म्हणतो, चल. आणि पुढचे बारा तास मला कोणतेही प्रश्न विचारायचे नाहीत. मी सांगेल तेच करायचं. असं सांगून तो तिला घेवून जातो. सकाळच्या नयनरम्य वातावरणात ती हिरवीगार झाडी आणि त्यावर पडलेलं दव, बाईकवर असतानाचा तो थंडगार झोंबणारा वारा याच्या आनंदाने ती खूपच शहारुन गेलेली असते. दोन्ही हात लांब करुन तो वारा कवेत घेण्याचा ती प्रयत्न करत असते. तिचा हाच आनंद त्याला हवा असतो. त्यानंतर तो तिला प्राणी संग्राहलयात घेऊन जातो. तिने आधी पाहिलेले कितीतरी प्राणी तिथे पाहिले आणि तिला ते खूप आवडले. थोड्याच वेळात तो तिला ड्रिमवर्ल्ड मध्ये घेऊन गेला. पाण्याचे खेळ, उंचच उंच पाळणे, जलतरण तलाव अशा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये ती इतकी रमून गेली की या जगाचं तिला भानच राहिलं नाही. तिच्या चेहऱ्यावरचा ओसांडून वाहणारा आनंद त्याला खूपच मोहून जातो. संध्याकाळचे सहा-सव्वासहावाजता तो तिला समुद्रकिनारी घेऊन जातो. तिने कधीही आधी पाहिलेला सनसेट (सूर्यास्त) पॉईंट तिला दाखवतो. ते पाहून ती हळूच त्याच्या मिठीत विसावते. तिथे दोघेही एकत्र फोटो काढून घेतात. ते फोटो तो तिची शेवटची आठवण म्हणून स्वत:जवळ ठेवून देतो. काहीवेळानंतर ते शॉपिंगला जातात. तिला जे जे आवडतं ते सर्व काही दोघे खरेदी करतात.  तो स्वत:साठी मात्र काही खरेदी करत नाही. रात्र झाली. नंतर ते तिच्या घरी जातात. दिवसभराच्या मिळालेल्या आनंदाच्या वातावरणातून ती थोडी बाहेर येते. मग ती विचारात पडते की याने इतके पैसे आणले कोठून? हाच प्रश्न ती त्याला विचारते. तो म्हणतो, तुझ्यासाठी मी माझं घर विकलं आहे. हे ऐकल्यावर तिला खूप संताप होतो. आणि ती त्याला म्हणते, अरे पण का विकलंस तू घर? तो म्हणतो, तुझ्यासाठीतुझ्याकडे फक्त सोळा तास शिल्लक आहेत, जेंव्हा मला हे कळलं तेंव्हा खरंतर रडावंस वाटत होतं.पण तुझे उरलेले आयुष्य तू फक्त आणि फक्त आनंदानं जगावंस असं मला वाटत होतं. आणि तो आनंद तुला मला द्यायचा झाला तर मला माझं घर विकावं लागेल याची जाणीव मला झाली. म्हणूनच मी माझं घर विकलं. आता हेच बघ ना दिवसभरात तुला दुसऱ्या कशाची आठवण आली का? नाही ना? हेच तर हवं होत मला. हे ऐकताच तिच्या हातातून शॉपिंग केलेल्या बॅग्स खाली पडल्या आणि तिनं त्याला मिठीत घेतलं. ती म्हणाली, मला माफ कर. मी तुझी दोषी आहे. तू सांगशील ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. तो म्हणतो, कशाबद्दल? ती म्हणते, मी तुझ्याशी खोटे बोलले. मला कॅन्सर वगैरे काही झालेलं नाही. मी तर तुझी फक्त परीक्षा घेण्यासाठी खोटे बोलले. खोट्याने वागले, मला माफ कर. ती खरच आपल्याला सोडून जाणार नाही या आनंदाने त्याचे डोळे पाण्याने भरुन आले. घर गमावल्याच्या दु:खापेक्षा प्रियसीला पुन्हा मिळविल्याचा आनंद त्याला जास्त होता आणि त्यानं तिला माफ केलं. त्याची मिठी आणखीनच गडद झाली. तो तिला म्हणतो, तू खरच मला सोडून जाणार नाहीस ना? ती म्हणते, नाही रे राजा, मी तुला कधीही सोडून जाणार नाही. तो म्हणतो, खरंच, हा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस आहे. संपूर्ण आयुष्यभर जितकं रडलो नसेन तितकं मी तुला कॅन्सर झालाय ही बातमी ऐकल्यापासून रडलोय. ती म्हणाली, मला माफ कर. मी पुन्हा असं तुझ्याशी खोटं बोलणार नाही. तो म्हणतो, ठीक आहे. पण पुन्हा असली चेष्टा करु नकोस. नाहीतर तुझ्या अगोदर मीच मृत्यूला सामोरे जाईनतो असं बोलताच तिनं त्याच्या तोंडावर हात धरला आणि ते दोघे एकमेकांच्या मिठीत विसवले.
             असं म्हणतात की, प्रेम जितक्या परीक्षेत पास होत जातं तितका त्यातला गढुळपणा कमी कमी होत जातो आणि त्यांच पावित्र वाढतं. ही गोष्ट मलाही मान्य आहे. पण त्या परीक्षा किती आणि कोणत्या प्रकारच्या असाव्यात यालाही काही मर्यादा आहेत की नाहीत? हीच गोष्ट लक्षात ठेवा आणि तुम्ही डोळसपणे निवडलेल्या साथीदारावर डोळेझाकून विश्वास ठेवा.  म्हणजे बघा तोच साथीदार तुमची किती सुरेख साथ निभावतो ते.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...