शुक्रवार, १६ डिसेंबर, २०२२

87. कोरोना लॉकडाऊन मधील एक प्रसंग

    ताटलीतल शेवटचं भाताचं शीत उचलण्याच्या नादात रिकाम्या ताटात बोटांनी ओढलेल्या रेघोटयांच्या जंजाळात तिला कदाचित येणाऱ्या उद्याची विवंचना सतावत असावी...
      साधारण ६.३० वाजले असतील सकाळचे. चांगलंच फटफटल होते, मी बाल्कनीतून लॉक डाउन मुळे लोकांची चाललेली लगबग बघत होतो. एरियातले बरचसे ओळखीचे चेहरे काही ना काही घेण्यासाठी रस्ता फुलवत चालले होते आणि मला ती दिसली... वय असेल २८ ते ३० च्या दरम्यान. डोळे खोल गेलेले अंगावर मळकी साडी, उजव्या हातात एक   पट्टा तुटलेली काहीतरी सामानाने भरलेली शबनम बॅग, डाव्या हाताने कमरेवर एक छोटंसं बाळ सावरत आशाळभूत सरभरलेल्या नजरेने काहीतरी शोधत होती. पण कोणी तिच्याकडे पाहायला तयार नव्हतं, सगळेच जण आपापल्या धुंदीत....७.३० ला पोलीस येऊन सगळे बंद करतात ना त्याच्या अगोदर आपल्याला लागणारे सामान घ्यायच्या गडबडीत..
    ती रस्ता क्रॉस करून माझ्या घराच्या गेटसमोर येऊन उभी राहिली....शेवटी तिची आणि माझी नजरानजर झालीच आणि मी काही बोलायच्या आधीच तिने विचारले...सांडपाण्याच्या पाईप लाईन चे खड्डे साफ करायचे आहेत का?... मी नाही म्हंटलं तसे काही न बोलता स्वतः च्या पदराने त्या छोट्या बाळाच्या डोक्यावर पदर सरकवत पिशवी उचलून चालू पडणार तेवढ्यात मी तिला थांब म्हणून सांगितलं...मी खाली गेलो तिला गेट उघडून आत घेतले आणि तिला पार्किंग मध्येच बसवलं...पण तिची नजर रस्त्यावर,  जणू तिला लवकर जायचं होतं तिला….मी म्हंटल नाव काय तुझं? ....चेंबर्स साफ करायचे म्हणतेस पण सामान तर काही दिसत नाही तुझ्याकडे...ती अस्वस्थ.... त्यात ते छोटंसं बाळ किरकिर करू लागले... काही खाणार का म्हणून विचारलं तसं तिच्या डोळ्यात मला तिची असहायता जाणवली....
       तिला आश्वस्त करण्यासाठी म्हंटल, तू एक काम कर,  त्या नळावर हातपाय धुवून घे मी आलोच दोन मिनिटात आणि वर आलो... तो  पर्यंत मनूपण उठलीच होती आणि तिने सवयीप्रमाणे फ्रिजमधून दूध काढून गरम करायला ठेवले होते .... त्यातले एक पेलाभर दूध आणि एक बिस्कीट चा पुडा घेऊन परत खाली आलो...मनूला काही कळेना ती पण आली खाली माझ्या मागे..त्या बाईला म्हंटले बाळाला भरव दूध बिस्कीट आणि थांब थोडावेळ तुझ्यासाठी पण आणतो काहीतरी...
      वगारलेला भात आणि आदल्या दिवशीच्या उरलेल्या पोळ्यांचे केलेले तीन खाकरे घेऊन मी परत खाली आलो तो पर्यंत ते लेकरु आता आईच्या पाठीला पकडून उभे राहून आजूबाजूला कुतूहलाने बघत होते ....तिने त्याला पण नळावर ओल्या हाताने पुसून काढला होता वाटते....त्या बाळाच्या पाऊल खुणा उठल्या होत्या तिच्या आजू बाजूला...तिने नाशता केला आणि मग अश्या काही नजरेने पाहिलं आमच्याकडे की जणू तिला कोड पडले होते, व्यक्त कसे व्हावे ह्याचं...
        तिने मला तिच्या पिशवीतून एक प्लास्टर करायची थापी काढून दाखवली आणि म्हणाली मी ह्याने साफ करते चेंबर...नंतर बोलायला लागली ती...
         तीच नाव होतं चिमी आणि त्या बाळाचं नाव होतं राणी...ती मूळची कर्नाटकची, लॉकडाउन... काम मिळत नाही आणि त्यात दारुड्या नवऱ्याने पैशासाठी तिला कोणाकडे तरी गहाण ठेवले...आणि तो तथाकथित सावकार चिमीच्या अंगाचे लचके तोडत होता महिनाभर... जणू काही व्याजाचा हिशोबच सांगायचा तिला...कालची रात्र मात्र तिच्यासाठी खूप चांगली होती...तो तथाकथित सावकार लवकरच दारू पिऊन तराठ झाला आणि चिमी त्याच्या तावडीतुन निसटली... जिवाच्या आकांताने धावत सुटली रस्ता नेईल तिथे...दहिसर मोरी ते डोंबिवली जवळजवळ १४ ते १५ किलोमीटरचे अंतर ती राणीला कडेवर घेऊन फक्त चालत होती...अनवाणी पायाने... भकास चेहऱ्याने आणि रुक्ष डोळ्यांनी तिने तिचे दुःख सांगितले...मन कातरून गेले...मनूने तिला थोडीशी बिस्किटे आणि   ५०० रुपये दिले...त्यावर तिने जो नमस्कार केला ना तो सगळे काही बोलून गेला... तिच्या त्या रुक्ष डोळ्यात पापण्यांच्या कडेला अश्रूंची झालर बघितली आणि मनाला एक अनामिक समाधानाची जाणीव झाली.. वगारलेल्या भाताची शीत गोळा करतांना चिमीच्या बोटांनी ताटात ओढलेल्या रेषा बरंच काही सांगून गेल्या....
        एव्हाना ती उभी राहिली होती एका अनामिक निर्धाराने आणि ती मनूला म्हणाली, मला निघायला हवं, तुम्ही माझी ही वेळ भरून काढलीत पण पोट खूप बेकार असते हो ...जगण्यासाठी काय करायला लावेल त्याचा नेम नाही... बिगारीगीरी करणारी जमात आमची पण सध्या सगळे काम थांबलय ना... त्यात नवऱ्याची दारू ... सगळे कसे विस्कटून गेलंय...पण तुमचे पैसे द्यायला मी नक्की परत येईन...आणि ती जायला निघाली सुद्धा...
         तिची जगण्याची जिद्द आणि आयुष्याकडे पाहायचा सकारात्मक दृष्टिकोन सकाळ सकाळ मला खूप काही शिकवून गेला...Never Give Up....म्हणतात ते ह्या पेक्ष्या नक्कीच वेगळे नसावे....
मनात एक विचार आला की देवाने किती सुंदर आयुष्य दिलंय आपल्याला आणि आपण धावतोय ऐहिक सुखाच्या मृगजळामागे...एव्हाना चिमी गेटमधून बाहेर पडून दिसेनाशी झाली सुद्धा...
देव करो आणि कोणाच्याही वाट्याला असे वेदनादायी आयुष्य येऊ नये असा विचार करत मी गेट बंद करून परत घराच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...