आमची मुंबईहून सन १९९७ मध्ये पुण्याला बदली झाली तेंव्हा माझी मुलगी वास्तू शस्त्राच्या दुसऱ्या वर्षाला होती. तिला मुंबईतच सोडायचा निर्णय आम्ही घेतला.आधी P.G. व नंतर जागा मिळेल तेव्हा सावित्रीबाई फुले हॉस्टेल मध्ये ठेवायचे असे ठरले.
सगळी पॅकिंग आवरून आवरून आम्ही गाडीत बसलो तेव्हाचा तिचा हिरमुसलेला चेहरा मला अजून आठवतोय. तिला मुंबईत राहणं अगदीच आवडत नव्हतं. तिथल्या धकाधकीच्या जीवनाला ती वैतागून जायची अन् मुंबईच्या हवेत तिला सारखी कसली तरी ॲलर्जी व्हायची. आज तो प्रसंग आठवला की माझ्या काळजात कसेसेच होते.
एखादी वीज चमकून जावी तसे मला माझ्या आईचे,खूप वर्षांपूर्वीचे शब्द आठवले.मला जेव्हां आमच्या गावाकडून पुण्याला पुण्याला कॉलेजच्या कॉलेजच्या शिक्षणासाठी ती सोडायला आली, तेव्हा तिच्या मैत्रिणीला म्हणाली होती,"आता ही आमच्या हातून गेली ती गेलीच. शिक्षण पूर्ण होईपर्यंत लग्न होईल. जे काही थोडे दिवस सुट्ट्यांमध्ये येईल तेवढच."
माझ्या बाबतीत तिचे भाकीत खरे ठरले. मी तो विचार बाजूला सारला. मला वाटलं कदाचित आमची पुन्हा मुंबईला बदली होईल व आम्हाला पुन्हा एकत्र राहायला मिळेल.मात्र तसे झाले नाही.
तिची मला अधून मधून पत्रे येत असत. त्यात ती तिचा वैताग ओतून काढत असे. पत्र लिहून झाल्यावर ती दोन चेहऱ्यांचे चित्र काढत असे.एक पत्र लिहिण्यापूर्वीचा वैतागलेला चेहरा व एक लिहिल्यानंतर चा तृप्त चेहेरा! आज वाटतं वाटतं मी ती पत्रे जपली असती तर!
वर्षा मागून वर्षे गेली. ती आर्किटेक्ट झाली.... अन तिने पुढच्या अभ्यासासाठी अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला. माझ्या काळजात जणु कोणी सुरा खुपसला. ती त्या तयारीस लागली. तिचा प्रत्येक दिवस खूप भरगच्च असे. त्या दरम्यान आमची पुण्याहून नाशिकला बदली झाली. त्यामुळे माझ्या मुलालाही मुलालाही आम्हाला पुण्यात सोडावे लागले. त्याच्या एमबीए साठी म्हणून. नाशिकला येऊन पाच सहा महिने होतात न होतात तोच यांची नागपूरला बदली झाली अन माझ्या मुलीचा अमेरिकेला जाण्याचा दिवस उजाडला.
आम्ही मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर उभे होतो. यावेळी मात्र तिचा चेहेरा हिरमुसलेला नव्हता. तिच्या डोळ्यात भविष्याची सोनेरी स्वप्ने होती, आणि माझ्या डोळ्यातून कित्येक दिवसांपासून अश्रुधारा थांबत नव्हत्या. ती गेली. आम्ही मुंबईहून परतलो. दोघच.
चार बेडरूम आणि प्रत्येक बेडरूम बरोबर दोन दोन ante rooms असलेलं प्रचंड घर. प्रत्येक बेडरूम बरोबर दोन दोन बाथरूम.
माझं मन भूतकाळात शिरलं. वेगवेगळ्या पोस्टिंग मधल्या मधल्या आठवणी डोकावू लागल्या. माझ्या लहानग्या मुलांचे आवाज कानात घुमू लागले. त्यात माझाही आवाज मिसळला.
"आई बघ याने माझ्या युनिफॉर्म वर ओला टावेल अडकवला!"माझी मुलगी वैतागून सांगत होती.
"आई तिने बाथरूम मध्ये बघ किती केस गोळा केलेत! तिला काढायला सांग!"माझा मुलगा ओरडला.
"मला कोणाचं काहीही ऐकायचं नाही. चला आटपा लवकर! बस यायला पाचच मिनिटे राहिलीत "मी पुन्हा त्यांच्या मागे लागले.
"आई माझे मोजे सापडत नाहीत,"इती मुलगा.
"तुला मी कितीदा सांगते की, रात्रीच सगळे काढून ठेवत जा! बस आता शोधत!"
"आई प्लीज शोधू लाग ना!"तो काकुळतीला आला.
कशीबशी वॉटर बॉटल भरली गेली... टिफिन बॉक्स स्कूल बॅग मध्ये कोंबले गेले.
दोघं एकदाची शाळेत गेली गेली आणि मी हुश्श केलं! आता निवांत चहा घेता येईल. त्यांची आपापसातील भांडणे, पलंगावरचा पसारा, डेस्क वरची अस्ता व्यस्त पुस्तके,कपाटात घड्या न करता कोंबलेले कपडे! देवा! यांना कधी अक्कल येणार? मी नेहमी जाहिरातीतली घरे बघायची आणि मला असूया वाटायची. किती नीट नेटकी मुले, किती स्वच्छ आणि शिस्तबद्ध!
आज अगदी नीट नेटक्या , आवरलेल्या आणि अगदी निर्जीव दिसणाऱ्या दिसणाऱ्या रूम मध्ये मी उभी होते. माझ्या मुलाची रूम. चादरीवर कुठे सुरकुती नाही... फेकलेले कपडे नाहीत... कपाटे आवारलेली. डेस्क वर असता व्यस्त पुस्तके नाहीत.नेल कटर सापडत नाही म्हणून शोधा शोध नाही. माझे डोळे भरून आले! मन म्हणाले," घे ही तुझी जाहिरातीतील खोली!"मला वेडीला कसे समजले नाही की, मुलं मोठी झाली म्हणजे घरट्यातूनच उडून जातील. मी त्यावेळेस त्यांना पंखात घेऊ पाहीन, त्यांना मात्र पंख फुटलेले असतील, आकाशात भरारी घेण्यासाठी. लोक नेहमी पक्ष्यांचे उदाहरण देतात. त्यांची पिल्ले नाही का उडून जात? मला ते उदाहरण अर्धवट वाटते. पक्षी पुन्हा पुन्हा अंडी देतात... त्यांना पिल्लं होतात. त्यांचं सत्र चालू राहतं. माझी मात्र ही दोनच पिल्लं आहेत. त्यांचं लांब उडून जाणं माझ्या जिव्हारी लागणारच!
मन पुन्हा भूतकाळात शिरलं. त्यावेळेस माझा मुलगा दोन अडीच वर्षांचा असेल. बोबडे बोलायचा. एके रात्री माझ्या मागे लागला,"मला गोष्ट छांग!"
"तू झोप बरं आता! मला वेळ नाही! आजीला वाढायचं आहे ना?"मी म्हणाले.
"छोटी गोष्ट छाग", तो मन धरणी करू लागला!
"हे बघ!तो वी विली विंकी काय करतो माहित आहे ना! जी मुलं आईचं ऐकत नाहीत, त्यांच्या आईलाच तो नेतो... मुलांना मागेच सोडतो."मी म्हटलं.
"छोरी,छोरी, आई त्याला सांग मी झोपतो."आणि आणि त्याने घट्ट डोळे मिटून घेतले. खूपदा तो मी कामात व्यग्र असले की स्वतःच स्वतः ला गोष्ट सांगत झोपायचा. आता वाटतं मी सगळं सोडून अधून मधून त्याला गोष्टी सांगितल्या असत्या तर?
अजून एक प्रसंग माझ्या डोळ्यांसमोरून सरकला. हा तेव्हा दोन अडीच वर्षांचा होता. सारखा अंगठा चोखायचा. सगळेजण मला सांगायचे की मी याची ही सवय मोडवी. सगळे प्रयत्न करून झाले होते पण मला यश आले नव्हते. एकदा मी त्याला जवळ घेऊन बसले आणि
सांगू लागले,"बघ, मी अंगठा चोखत नाही, तुझे बाबा अंगठा चोखत नाहीत.... इत्यादी इत्यादी, अनेकांची यादी मी त्याच्यासमोर मांडली. त्याने तोंडातून अंगठा काढला. मला वाटलं त्याच्या लक्षात आलंय. पुढच्याच क्षणी माझ्या कुशीत येत तो म्हणाला," त्या छगल्याना छांग चोखायला"आणि अंगठा पुन्हा तोंडात.
त्याच्या खोलीतून मी माझ्या मुलीच्या खोलीत आले. Portfolio, application forms, इत्यादी साठी डेस्क वर पसरलेली कागदपत्रे नव्हती... अर्धवट भरलेल्या सूट केसेस नव्हत्या.
सगळी एकदम टापटीप. कुठे फेकलेला दुपट्टा नाही की भिर्कावलेल्या चपला नाहीत.... हो, कोपऱ्यात मागे सोडलेल्या दोन कोल्हापुरी चपला मात्र होत्या.रिकामे ड्रेसिंग टेबल,रिकामा कम्प्युटर... कम्प्युटर वरून भांडणारी दोघेही नव्हती. शांत टीव्ही. कोणता चॅनल बघायचा यावर वाद नाही. शेवटी कोणालाच काही बघून देणार नाही अशी ओरडणारी मी एकटीच गप्प उभी.
आम्ही ठाण्याला असतानाचा अजून एक प्रसंग आठवला. माझ्या मुलीला कसले तरी तरी भयानक इन्फेक्शन झाले होते. बरेच दिवस 104ताप येत होता.ती अगदी शांत पडून राहायची. फक्त उलटी वगैरे होत असल्यास मला हाक मारायची. तिच्या कुठल्याही दुखण्यात तिने माझ्याजवळ बस असा हट्ट कधीच केला नाही.असो.
त्या दुखण्यातून ती जरा बरी झाल्यावर तिने अगदी आपणहून माझ्याकडून एक कागद पेन्सिल मागितली आणि माझ्यावर एक छोटासा निबंध लिहिला. ती केवळ सहा वर्षांची होती. तिने लिहिले,"मला बरे वाटल्यावर आईने माझ्या केसांना तेल लावून हळुवारपणे गुंता काढला. गरम पाण्याने अंग तर ती रोजच पुसायची पण त्यादिवशी मला आंघोळ घातली व छान छान पावडर लावली.
मी आजारी असताना ती अगदी मला मला पाणचट जेवण देत असे. तेव्हा मला तिचा खूप राग येत असे. पण त्यामुळेच तर मी बरी झाले. "
एका चिमुकलीने आपल्या आईला दिलेले ते एक सुरेख प्रशस्तीपत्रक होते. Tribute होते. मी मूर्खा सारखे त्याची कॉपी न काढता काढता तिच्या टीचरला वाचायला दिले. ते मला परत मिळालेच नाही.
आम्ही नाशिकला असतानाचा एक प्रसंग. माझा मुलगा तेव्हा सात-आठ वर्षांचा असेल. दिवाळीच्या सुमारास खरंतर त्याला खर्च करायला म्हणून मी थोडेसे पैसे दिले. तो बाजारात गेला आणि कुठल्याशा ठेल्यावरून एक पितळी हार घेऊन आला व खुशीत मला म्हणाला,"हे बघ, मी तुझ्यासाठी काय आणले आहे! सोन्याचा हार! दिवाळीच्या दिवशी तू घाल!
दिवाळीच्या दिवशी रांगोळी काढताना काही वेळ तो घालून मी त्याला दाखवून दिला. नंतर कोणाला तरी देऊन टाकला. एक दोनदा त्याने त्याबद्दल विचारले देखील. पण मी तो हार बँकेत लॉकर मध्ये ठेवला म्हणून त्याला सांगून टाकले! किती मूर्ख होते मी! तो हार खरंच जपला तर? आज त्याचे मूल्य मला मला कितीतरी पटीने अधिक वाटते आहे. तो हार त्याला मी दाखवला असता. त्याने केलेल्या प्रत्येक गोष्टीचे मूल्य मला आहे हे त्याला कदाचित पटले असते. सततच्या बदल्या व सामानाची अडगळ वाटून कितीतरी अमूल्य गोष्टी काळाच्या ओघात अशा हरवल्या!
आज माझी मुलगी परदेशात आहे. जीवनमूल्ये झपाट्याने बदलत आहेत. भौगोलिक सीमा रेषा नगण्य ठरत आहेत. तरीही माझ्या चिमण्यांनो! आमच्या जीवनाच्या संध्याकाळी तरी परत फिरा अशी माझी आर्त हाक आहे! ही माती तुमची आहे! तुमच्यावर मायभूमीचे ऋण आहेत. माझी तुमच्या पासून काहीही अपेक्षा नाही. फक्त या देशात असा. माझे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत आणि डोळे तुमच्या परतीच्या मार्गावर. कधीतरी जो हात धरून तुम्ही पहिलं पाऊल टाकलं तो हात थर थर कापेल तेंव्हा तो हात आपल्या हातात धरा, सुरकुतलेल्या कपाळावरून हात फिरवा. गगनचुंबी प्रासाद व आईची मोडकी झोपडी यांची ही टक्कर आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा