काल दुकानाबाहेर रांगेत उभा असताना एक संवाद कानावर पडला. एक बाई पुढच्या दुसरीला मुलांच्या शाळेबद्दल विचारत होती. शाळांनी कसं मुलांना online classes मध्ये अडकवलंय असे त्यांचे विषय सुरु होते. त्यातल्या एकीने सांगितलं ते मला फारच आवडलं, म्हणून तुमच्यासोबत share करतोय. ती सांगत होती, तिचा मुलगा सहावीत ज्ञानप्रबोधिनी शाळेत आहे. Lockdown मुळे शाळा बंद झाल्यावर शाळेने अभ्यासाचे online वर्ग सुरु करण्याऐवजी मुलांना अतिशय नाविन्यपूर्ण उपक्रम द्यायला सुरुवात केली आहे. रोज छोटे छोटे उपक्रम शाळा देते. त्यात मुलांनी नाश्त्याच्या वेळी पडलेली सगळी भांडी घासणं, कपाट आवरणं, कणीक मळून देणं, दुपारचा स्वतःचा खाऊ स्वतः बनवणं, सगळ्यांचा चहा करणं, आठवड्यातून एकदा basin घासणं, कपडे वाळत घालणं, घड्या करणं असं रोज काम दिलं जातं. बरं हे पोरांनी करताना आई बापानी पोरांचे video आणि photo काढून शाळेला रोजच्या रोज mail करायचे असतात. तरच रोजची हजेरी गृहीत धरली जाते. किती मस्त आहे हे.
ह्याच अनुषंगाने परवा एक वेगळाच अनुभव आला. आमच्याच मजल्यावर 2-3 अविवाहित पोरं राहतात. त्यांची आमची ना ओळख ना पाळख. परवा आमचं दार उघडं पाहून त्यातला एक आला आणि बायकोला बोलला आम्हाला पोळ्या लाटून द्याल का? कणीक आम्ही मळून देतो, फक्त पोळ्या करून द्या. मी आणि बायको चकितच झालो. पूर्णपणे अनोळखी व्यक्तीला विचारण्यापर्यंत ते हतबल व्हावेत? गेला महिनाभर मग त्यांनी कसं निभावलं की त्यांना परवा घरी येऊन आम्हाला विचारावंस वाटलं?
ह्यातून एक धडा मिळाला स्वतःच्या पोराला कामाला लावयला पाहिजे. घरातली लहान लहान कामं त्याच्यावर टाकलीच पाहिजेत. ज्ञानप्रबोधिनीचा वर सांगितलेला किस्सा किती गरजेचा आहे ते खूप प्रकर्षाने जाणवलं. स्वतःच्या घरातली फरशी अस्वच्छ नसलेली स्वच्छता उरकणं, ताटपाणी करणं, किमान स्वतःचं ताट, वाटी, पेला रोज स्वतःच घासून ठेवणं, जेवणानंतरची आवराआवरच नव्हे तर कमीत कमी वरण भाताचा कुकर, सॅन्डविच, मॅगी, बटाट्यासारखी एखाद दुसरी सोपी भाजी करता यायलाच हवी. अर्थातच मुलगा मुलगी दोघांनाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या कशाचीच लाज न वाटणं अतिशय महत्वाचं आहे. तरच ही बायकी कामं आहेत असल्या बुरसट विचारांमधून आपली पोरं बाहेर पडतील आणि भविष्यात बायकांच्या शिव्या कमी खातील.
निसर्ग न करो आणि आजच्या कोरोनासारखं संकट भविष्यात आलं आणि आपण मुलांसोबत नसलो, तर परिस्थितीला तोंड देताना आपल्या पोरांना मदतीसाठी कुणाचं दार ठोठावायला लागता कामा नये. मुलं मोठी होतील, शिकतील, महागड्या शाळा त्यांना यशस्वीही करतील पण रोजच्या आयुष्यात उपयोगी पडणारी फुटकळ समजली जाणारी पण अतिशय गरजेची कौशल्यं (life skills) शिकवायची हीच ती वेळ आहे आणि ती आपण आई-बापानीच शिकवायची आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा