सोमवार, २ ऑक्टोबर, २०२३

578. देणं...

      ऑफिसहून घरी आल्या आल्या झोपला तो... न जेवताच. मध्यरात्री त्याची झोप चाळवली ती, अचानक त्याला भरलेल्या थंडीमूळे. ताप येण्याची लक्षणं वाटली त्याला, नी त्याने बायकोकडे क्रोसिन मागितली. रिकाम्या पोटी गोळी घ्यायला नको, म्हणून जेमतेमच दोन मारी बिस्किटं खाल्ली त्याने... आणि गोळी घेऊन, अंगावर ब्लॅन्केट ओढून झोपला तो. "आठवड्याच्या अगदी सुरुवातीलाच दांडी पडली, तर बाॅस बोंबाबोंब करेल"... ह्या विचारातच त्याला झोप लागली होती. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्येही, दिवसभर बेचैनच होता तो... नक्की काय होतंय हे त्याचंच त्याला कळत नव्हतं. आणि अचानक... अचानकच यंत्रवत उठला तो... गाडीत बसला, नी सुरु केली गाडी. कुठे चाललोय आपण?... कोणाकडे चाललोय?... हे काही म्हणजे काहीच डोक्यात नव्हतं त्याच्या. तो फक्त जात होता पुढे पुढे. करकचून ब्रेक मारला त्याने गाडीला... 'पारिजातक' ह्या वृद्धाश्रमाच्या बाहेर. बाहेरच्या बोर्डवर पाटी होती, आणि शहराचं नावही. "आपण कर्जत ला आलो?.पण का अन् नेमकं इथेच कसं?... ते ही इतक्या मेकॅनिकली?". काहीच कळेनासं झालं होतं त्याला.
        आलेलं भान जसं काही स्विच्ड ऑफ झालं... आणि पुन्हा एकदा अगदी यंत्रवत त्याने दरवाजा उघडला गाडीचा, नी बाहेर आला तो. आत शिरुन इथे - तिथे बघू लागला... आणि त्याची नजर खिळली त्यांच्यावर. त्या... त्या बसल्या होत्या तिथे, पारावर... पारिजातकाच्या झाडाच्या बाजूला. ऐंशी वर्षांच्या आस - पास... गोर्‍यापान, सुंदर... पण उदास... चेहरा ओढल्यासारख्या. तो बाजूला जाऊन बसला त्यांच्या, योग्य अंतर ठेऊन. तेवढ्यात त्यांच्या हातातून खाली पडला, त्यांनी पकडून ठेवलेला तो मोगर्‍याचा गजरा... जो पटकन खाली वाकत उचलून, त्याने पुन्हा हातात ठेवला त्यांच्या. डोळ्यांतून कृतज्ञता दाटून आली त्यांच्या. कृतार्थपणे त्यांनी आपला हात, त्याच्या गालावर ठेवला हळूवार. मग तो हात तसाच त्याच्या खांद्यावरून खाली येत, छातीवर स्थिरावला त्याच्या. आणि... आणि अचानक डोळे विस्फारले गेले त्यांचे... क्षणात एका अनामिक आनंदाने, चेहरा उजळून निघाला त्यांचा. गळ्यातून दाटलेला आवंढा, डोळ्यांवाटे वाहू लागला त्यांच्या. कारण... कारण ओळख पटली होती त्यांना. त्याची?... नाही... खरंतर त्याच्या आतील...
      दाराची बेल वाजली... तिने दार उघडलं. दारात त्याला पाहून ती त्याच्यावर बरसणारच होती, काहीही न सांगता कुठेसा निघून गेला म्हणून. तितक्यात त्या डोकावल्या, त्याच्या खांद्याआडून... आणि ती गप्पच झाली एकदम. घसा खाकरुन तो बोलू लागला.
"दोन वर्षांपूर्वी ह्यांच्या मिस्टरांना, जेव्हा ब्रेनडेड डिक्लेअर केलं गेलं... तेव्हा तिथेच त्या हॉस्पिटलमधील दुसऱ्या वॉर्डमध्ये, जवळ जवळ मृत घोषितच करायचं बाकी असलेल्या मला... ह्यांनी त्यांच्या नवर्‍याचं हृदय दान केलं. मिरॅकल झाल्याप्रमाणेच अगदी वाचलो होतो मी. आपल्याला अर्थातच सांगितलं नव्हतं डोनरचं नाव, कारण ते तसं सांगणंही वर्ज्य असतं. मी ही तसा उत्सुक नव्हतोच म्हणा, ते नाव जाणून घेण्यात. कारण खुश होतो मी, मला लाभलेल्या ह्या पुनर्जन्मात. पण..पण गेल्या काही दिवसांपासून... अचानकच धडधडायला लागलं होतं छातीत माझ्या, एक जिवघेणा घोर लागून राहिला होता मनाला. आणि कसं कोण जाणे, पण मेंदू कुठल्याही प्रकारची इन्स्ट्रक्शन देत नसतांनाही, हे माझं हृदय मला तिथे घेऊन गेलं... नेमकं नी अचूकपणे. तिथेच... जिथे ह्यांना गेल्या महिन्यातच आणून सोडलं होतं, ह्यांच्या मुलाने... 'पारिजातक' वृद्धाश्रम. माझी ओळख पटणं नक्कीच अशक्य होतं ह्यांच्यासाठी... पण... पण ह्यांना क्षणात ओळख पटली, माझ्या आतून धडधडणार्‍या ह्या हृदयाची. ह्यांच्या पंजाची प्रत्येक सुरकूती थरथरत होती, माझ्या... म्हणजेच कधीकाळी ह्यांनी जिव ओवाळून टाकलेल्या, ह्या हृदयाच्या ठोक्यांवर. हे खरंच खूप अगम्य आहे... अनाकलनीय आहे... सारासार विचारा विरुद्ध आहे. आणि हे सगळं कितीही जरी खरं असलं, तरी हे एका हृदयाचं दुसर्‍या हृदयाला असलेलं 'देणं' आहे. हे देणं आहे देवाचं आणि दैवाचंही. तेव्हा आता लवकरच, संबंधित लिगल फाॅरमॅलिटीज मी पूर्ण करणार आहे. कारण मी ठरवलंय की यापुढे... यापुढे ह्या एकट्या त्या वृद्धाश्रमात खितपत पडून राहणार नाहीत. आता आपल्यासोबतच राहतील ह्या... कुठल्याही नेमक्या नात्याच्या लेबल शिवाय". 
तो बोलायचं थांबला. ती वाकून पाया पडली त्यांच्या. तिच्या डोळ्यांतून दोन - चार थेंब सांडले पावलांवर त्यांच्या, तर त्यांच्या डोळ्यांतून दोन - चार थेंब ठिबकले तिच्या डोक्यावर. आणि त्याचं हृदय ही अंमळ वेगातच होतं धडधडत... अपार आनंदाने, समाधानाने... अश्रूंची चाललेली ही मूक देवाण - घेवाण बघून.

---सचिन श. देशपांडे 
'World Heart Day' निमित्ताने रि-पोस्ट

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...