...आणि आता येतो आहे कुशाग्र कुशलकर'... पायल टीचरने अनाउन्स केलं...
हातात छोटंसं रोपटं घेऊन कुशाग्र पुढे आला... त्याच्या हातातलं बिनफुलांचं, साध्या पानांचं, रस्त्याकडेच्या कोणत्याही झुडपासारखं दिसणारं रोपटं पाहून टीचर चकित झाल्या... वर्गातला सगळय़ात ब्रिलियंट मुलगा हे असलं रोप घेऊन आलाय?...
स्पर्धा होती रोप वाढवण्याची... चार महिन्यांपूर्वी जाहीर झालेली... वर्गातल्या सगळय़ा मुलांनी स्वतः घरी एकेक रोप वाढवायचं, त्याची काळजी घ्यायची आणि जागतिक वृक्षदिनाच्या दिवशी ते रोप घेऊन शाळेत यायचं... त्या रोपाबद्दल बोलायचं, अशी ही स्पर्धा होती... वर्गातल्या मुलांनी बोन्सायपासून, गुलाब, मोगरा, विविधरंगी सदाफुली, कढीपत्ता, मिरचीपर्यंत वेगवेगळय़ा प्रकारची रोपं प्रेमाने वाढवली होती... इतर सर्व स्पर्धांप्रमाणे ही स्पर्धाही कुशाग्रच जिंकणार अशी पायल टीचरना खात्री असताना तो मात्र हे मरतुकडं रानटी रोपटं घेऊन आला होता...
``आदरणीय टीचर, पेरेण्ट्स आणि मित्रांनो,'' कुशाग्रने नेहमीच्याच सहज आत्मविश्वासाने सुरुवात केली, ``मी हे जे रोप आणलेलं आहे, त्याचं नाव मला माहिती नाही. त्याच्या पानांची भाजी होत नाही. त्याला छान फुलं येत नाहीत. चविष्ट फळंही येत नाहीत. त्याच्यात कोणतेही औषधी गुणधर्म नाहीत. ते आकर्षकही नाही. त्याचा आपल्याला काहीही उपयोग नाही...'' कुशाग्रच्या या परखड
कबुलीने सगळय़ांमध्ये एकदम चुळबूळ सुरू झाली... ``मित्रांनो, मीही तुमच्यासारखंच एखादं छान पानांचं, फुलांचं, फळं देणारं रोप वाढवायचा निर्णय केला होता. चार महिन्यांपूर्वी ही स्पर्धा जाहीर झाली त्या दिवशी शाळेतून आनंदात नाचत घरी चाललो असताना खिशातून काहीतरी पडलं म्हणून खाली वाकलो, तर माझ्या पायाखाली चिरडलं गेलेलं हे रोप दिसलं. तेही माझ्यासारखंच कोवळं होतं, त्याचा काही दोष नसताना माझ्यामुळे त्याची ही अवस्था झाली होती. मी तेच उपटून घरी आणलं आणि त्याची देखभाल केली. नसेना का त्याचा काही उपयोग माझ्यासाठी! तेही निसर्गाचा एक भाग आहे. जगातली प्रत्येक वस्तू आपल्या उपयोगाची कशाला असायला हवी? मला फळ, फूल, पान, भाजी यातलं काही देणार नसेल, तर मी या झाडाचा विचारच करता कामा नये का? हा फार मोठा स्वार्थीपणा होईल नाही का? मला माहिती आहे, मला, माझ्या झाडाला बक्षीस मिळणार नाही. पण, हे झाड मी जगवू शकलो, तेच माझ्यासाठी सर्वात मोठं बक्षीस आहे...''
...हुंदक्यांच्या हमसाहमशीत आणि टाळय़ांच्या प्रचंड कडकडाटात विजेता म्हणून कुशाग्र कुशलकरचं नाव जाहीर झालं तेव्हा कोपर्यातून
त्याची आई आपल्या कुशीतून जन्मलेल्या या रोपटय़ाकडे विस्मयाने पाहात होती...
...तिच्या मनात आनंदाहून अधिक भयच दाटून आलं होतं...
``आईशप्पथ, स्पर्धा विसरूनच गेलो गं मॉम! आता काहीतरी आयडिया लढवायला लागणार,'' असं म्हणून आज सकाळीच घराबाहेर जाऊन रस्त्याकडेचं हे रोपटं उपटून घेऊन आलेला कुशाग्र तिला आठवत होता...
संकलक
प्रा. माधव सावळे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा