सोमवार, २ ऑक्टोबर, २०२३

572. लेकी...

          पुण्यात असताना काही काळ IELTS  ची ट्रेनर म्हणून काम करत होते.परदेशी ,त्यातही जिथे इंग्रजी ही मुख्य भाषा आहे तिथे उच्च शिक्षण ,नोकरी किंवा स्थलांतर या दृष्टीने जायचं असेल तर ही परीक्षा देऊन यात 7 बँडस मिळवणं अनिवार्य आहे.(अपवाद अमेरिका -तिथे GRE TOFEL लागते)  सकाळी साडे आठ वाजता माझी बॅच सुरू व्हायची कारण  विद्यार्थी वर्ग बहुतांश पोटापाण्याचे उद्योग असलेला आणि साडे नऊ वाजता ऑफिस,हॉस्पिटलमध्ये पोहचणारा एक दिवस मला कसलासा उग्र दर्प आला. त्यापाठोपाठ एक तरतरीत,कृश मुलगी माझी वाट बघत उभी होती. "मॅम, मला आशिष  सरांनी (माझे एक विद्यार्थी) पाठवलं आहे.मला इंग्लिश शिकायचं आहे. ही इतकी फी पुरेल ना?"
  फी या प्रकाराचा ट्रेनर म्हणून माझ्याशी संबंध नव्हता.तिला ऑफिसमध्ये पाठवलं. ऑफिस मधली मुलगी चक्रावून गेली. मॅम ही म्हणतेय इंग्लिश शिकायचं.आपली बॅच सगळी IELTS ची नाहीतर मग कम्युनिकेशन ची ,कसं  होणार? दुसऱ्या ट्रेनर कडे पाठवू का? पण मुलीला तेवढी एकच वेळ शक्य होती. इंग्लिश तसं बरं होतं.शेवटी तिच्याशी बोलून सध्या तिला कम्युनिकेशन व ह्या बॅच मध्ये आठवडाभर नुसतं बसू द्यावं अस ठरलं. दोन तीन दिवसांनी तिच्यापेक्षा दोन तीन वर्षे मोठी एक मुलगी आली ,सहज चौकशी करायला आणि पुन्हा तोच उग्र दर्प, पण यावेळी जरा जास्तच! मला किंचित ठसका लागलेला बघून ती ओशाळाली 'सॉरी मॅम, पण मी शवागारात पोस्ट मॉर्टम च काम करते.तिथे  formaldehyde वापरतात ना,त्याचा तो वास आहे.अंघोळ केली तरी जात नाही.' मी चक्रावून गेले! आई वडील सहावीतच गेलेले. हे काम करून धाकटी बहीण आणि भाऊ यांच्या आयुष्याची जबाबदारी या माउलीने  आपल्या कोवळ्या खांद्यावर घेतली होती. स्वतः साठी स्वप्न बघायच्या वयात आपल्या बहीण भावाच आयुष्य मार्गी लावायच स्वप्न बघत होती.
 माझ्या अंगावर सरसरून काटा आला.
या बहिणी खेड शिवापूर हुन सकाळी सहा वाजता निघायच्या, मग ही मुलगी माझ्याकडे यायची आणि बहीण बाहेर ऑफिसच्या पायरीवर बसून राहायची. मग ती हॉस्पिटलमध्ये तर ही कॉलेजमध्ये जायची. कधी काम जास्त असेल तर बहिणी सोबत देखील जायची. माझ्या पोटात तटकन तुटलं. काही खाऊन तरी येत असतील का या कोण जाणे? तिच्याशी बोलताना आपोआपच माझा आवाज जरा मऊ व्हायचा. बाहेर मुलं चिडवायची "मॅम ती तुमची फेवरेट".आमच्याशी पण वागा ना प्रेमाने! पण फार जवळीक साधूनही चालत नसतं. प्रोफेशनल लेव्हल वर काम करताना एक अंतर ठेवावं लागतंच.  तिला कुठलंही प्रिव्हिलेज न देता तिने  कोर्स पूर्ण करावा यावर मी ठाम होते.कारण चिमुकलं का असेना पण स्वतःच्या हिमतीवर मिळवलेलं यश आणि कुणी उपकार म्हणून झोळीत दिलेलं दान यात जमीन अस्मानाचा फरक असतो. पुन्हा ती मला भेटणार नव्हतीच पण तिने इथून ताठ मानेने बाहेर पडावं अशी माझी इच्छा होती.  सगळ्या चकचकीत वातावरणात ही मुलगी काहीशी बुजल्या सारखी असायची.सोबत असणाऱ्या विद्यार्थ्यांशी फार बोलायची नाही ;कारण ते सगळे सर आणि मॅडम च्या पदावरचे.
 आपले साधेसे कपडे, काहीसा naive म्हणता येईल असा अवतार यांचा कॉम्प्लेक्स आणि अस्खलित इंग्रजी बोलणाऱ्या, चकाचक कपडे, डियो वैगरे आत्मविश्वासाने अंगावर मिरवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या  त्या वातावरणात तिला  belongingness  वाटणं शक्यच नव्हतं. एक दिवस extempore टॉपिक्स वर बोलायच्या टास्क मध्ये तिला म्हटलं  "तुझ्या कामाबद्दल सांगशील?" हळूहळू तिने जमेल तसं सांगायला सुरुवात केली. निर्जीव, विद्रुप झालेली शरीर, कधी जळलेली, कधी पाण्यात फुगून सडलेली. हात लावला की आतून सगळं तुंबलेलं बाहेर यायच! सगळ्यात कठीण काम कवटी फोडणे. कधी अवयव गोळा करून ते नीट शिवायचे.  बॉडी ताब्यात देताना नातेवाईकांना पैसे मागणार तरी कसे? कुणी द्यायचं कुणी नाही.हॉस्पिटलमध्ये मिळतील तितके मिळतील! हा वास सततचा डोक्यात, नाकात बसलेला. व्यसन करून काम करणाऱ्या पुरुष सहकाऱ्या सोबत काम करताना आलेले किळसवाणे अनुभव! गळ्याशी दुखून आलं भयाण शांतता पसरली. तिची हलकेच पाठ थोपटून बस म्हटलं. दुसऱ्या दिवसापासून  आधी indifferent असणारे विद्यार्थी तिच्याकडे प्रचंड आदराने बघू लागले. मुलगी पण  खुलली आणि कोर्स छान पूर्ण केला. मुलाखत देण्याइतपत आत्मविश्वास आला.  बरेच दिवस गेले .नव्या बॅच ,नवे विद्यार्थी यात मी बिझी होऊन गेले. 
एक दिवस ऑफिसच्या मुलाने सांगितलं ,' मॅम तुम्हाला कुणीतरी भेटायला आलंय. कसला वास येतोय हो मॅडम ,मला तर उभं  राहवेना!
. तीच! बाहेर थांबली होती. 'मॅम हे पेढे घ्या, मला नोकरी लागली".तिचे डोळे चमचम करत होते.नियतीने एखाद्या रोपाच्या फांद्या छाटून टाकाव्यात आणि त्याने दिमाखाने नवी पालवी जगासमोर मिरवावी तसं काहीसं दृश्य होत ते. मॅम आता मी बहिणीला सांगितलं आहे की तुझं राहिलेलं शिक्षण पूर्ण कर ,बाहेरून पेपर दे'.हे रोपटं सावली धरायला सज्ज सुद्धा झालं होतं तर!
पायाशी वाकू लागली तेव्हा तिला अडवलं. कुणी पाय धरावेत अस आपलं काहीही कर्तृत्व नाहीये याची मला जाणीव आहे.तिने तिच्या हिमतीवर, स्किल वर नोकरी मिळवली होती आणि यात माझा खारीचा वाटा देखील नव्हता!
माझ्या दृष्टीने ते यश देदीप्यमान होतं!  तशी एरवी कोरडी असणारी मी त्यादिवशी मात्र माझ्या डोळ्यातून पाणी बाहेर सांडू नये म्हणून आटोकाट प्रयत्न करत होते.
त्यावर ती मला न जुमानता म्हणाली " मॅम ,मी  तुम्हाला मुलीसारखी, नाही म्हणू नका. 
आई आठवत नसलेली, आयुष्याला भिडणारी  ही लेक माझ्याच आयुष्यावर किती मोठा प्रभाव टाकून गेली कस सांगू तिला? माझ्या यशापयश , कष्ट ,सुख यांच्या व्याख्या बदलून टाकणारी हीच माझी शिक्षिका होती का?
असलेली सुखं खुपायला लागली की मला ही लेक आठवते!
भूतकाळात रमण्याचा माझा जराही स्वभाव नसला तरी  प्रत्येक daughter's day ला या लेकीची प्रकर्षाने आठवण येते. जिथे असेल तिथे तिला सुख लाभो असा आशीर्वाद आपोआपच दिला जातो!

- गौरी साळवेकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...