४ ऑक्टोबरला एक मैत्री विनंती आली. नाव होते "अंजू शर्मा" राहणार गांधीनगर, गुजराथ. मी सहसा अशा विनंती स्वीकारत नाही. पण कधी कधी मनात येते... "चलो... कुछ तुफानी करते है !" आणि मी आलेली मैत्री विनंती स्वीकारली. संध्याकाळी संदेश खिडकीत ( मेसेंजर विंडो हो ) त्या व्यक्तीकडून आलेला संदेश दिसला.
"Hi"
"रामराम" मी नेहमीप्रमाणे उत्तर दिले.
"Ram Ram, Kaise Ho?"
"ऐश कर रहा हू और आप?"
"ok"
एवढ्यावरच बोलणे थांबले. त्यानंतर ३ दिवसांनी म्हणजे ७ ऑक्टोबरला परत त्या व्यक्तीचा संदेश दिसला.
"Hi"
"रामराम"
"Aap kaha se ho"
"नाशिक, महाराष्ट्र और आप?"
"Gujarat, Give me whatsapp number"
दोन दिवसातच कुणी मला फोन नंबर मागितला की मी सतर्क होतो.
"मै whatsapp युज नही करता." मी उत्तर दिले.
"Kyu"
"whatsapp पे बहोत कम लोगोंसे आप बात कर सकते हो, फेसबुक पे आप बहोत लोगोंसे बाते कर सकते हो." मी मोघम उत्तर दिले.
"ok"
दुसऱ्या वेळेसचे बोलणे संपले. त्यानंतर ९ तारखेला पुन्हा संदेश दिसला.
"Good morning"
"सुप्रभात..."
"Ek baat bolu"
"जरूर"
"Enjoy kare video call per"
वरील मेसेज दिसला आणि मला हसू आले. मनात विचार आला, आता आपणही जरा 'येडा' बनावं.
"क्या एन्जॉय करू?"
"Sex karenge"
"हेहेहे... सॉरी... नॉट इंट्रेस्टेड"
"Why"
"आपको मराठी आती है?" मी त्या व्यक्तीच्या प्रश्नाला बगल देत प्रश्न केला.
"Nhi"
"पढना आता है?"
"Nhi"
तिसऱ्या वेळेसचे संभाषण इथेच थांबले. त्यानंतर 12 तारखेला पुन्हा संदेश दिसला. यावेळी ना 'हाय' होते ना 'गुड मोर्निंग' सेक्स करेंगेच्या मेसेजलाच रिप्लाय आला होता.
"Kr lo na yr"
मनात म्हटले, 'अब तो परदा गिराना पडेगा |'
"Surendra Sir, Aap Hariyana me aur mai maharashtra me. Aap bhi male ( इंग्लिश वाला ) , main bhi male. तो कैसे होगा मेल ( हिंदी वाला )?"
मला वाटले होते, त्याचे खरे नाव आणि लोकेशन वाचून भाऊ मला अनफ्रेंड करेल पण कसले काय? भाऊ माघार घ्यायला तयारच नाही.
"Yr video call per kr lo"
मग ठरवले आता ब्रम्हास्त्र काढू.
काही वर्षांपूर्वी 'व्यक्तिवेध' नावाचा खास मुंबई पोलिसांच्या कार्याला समर्पित असलेला दिवाळी अंक मुंबईमध्ये प्रकाशित होत होता. सुनिता धुरी ताई त्याच्या संपादक होत्या. २०१६ च्या व्यक्तिवेध मासिकाचे काही लेख / कथा यांचे व्याकरण तपासण्यात आणि संपादन कामात मी ताईंना थोडी मदत केली होती. त्यासाठी ताईंनी मला स्मृतीचिन्ह दिले होते. प्रकाशन सोहळा मुंबईला होता आणि मी नाशिकमध्ये. मला सोहळ्यालाही उपस्थित राहता आले नव्हते त्यामुळे जवळपास दीड महिन्यांनी सुनिताताई नाशिकला येताना माझे स्मृतीचिन्ह सोबत घेऊन आल्या होत्या. स्मृतीचिन्ह माझ्या हाती आल्यावर त्यात एक मोठा घोळ झाल्याचे लक्षात आले. त्यावर चुकून "पोलीस खात्यातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल विशेष गौरव" असा उल्लेख आला होता. जवळपास दीड महिन्यानंतर मुंबईला जाऊन त्यात बदल करणे अवघड होते म्हणून मीही त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. पण तेच स्मृतीचिन्ह आज उपयोगी आले.
मी लगेच त्या स्मृतिचिन्हाचा फोटो पोस्ट करून लिहिले,
"Ye photo dekho aur ye award muze kyu mila hai ye bhi dekh lo. Shayad aap samajh jaoge."
आणि तेंव्हापासून त्या व्यक्तीचा मला एकही संदेश आलेला नाही. ते म्हणतात ना... "समजदार बच्चा है |" हेहेहे...
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल. त्या व्यक्तीचे नाव आणि तो कोणत्या राज्याचा आहे हे मला कसे समजले? हे माहिती करून घेणे बिलकुल अवघड नाही. तुम्हीही हे अगदी सहजपणे करू शकतात.
ज्यावेळी कुणी तुम्हाला whatsapp नंबर मागतो त्यावेळी आधी तुम्ही त्याच्या वालवर जाऊन त्याने फोन नंबर टाकला आहे का हे बघा. असे लोक आपण खोटे नाही आहोत हे दाखविण्यासाठी त्यांची बाकी खोटी माहिती टाकून फोन नंबर खरा टाकतात. जर त्या व्यक्तीने फोन नंबर टाकला नसेल तर तुम्ही आधी त्याला फोन नंबर पाठविण्यास सांगा. एकदा का आपल्याकडे त्या व्यक्तीचा फोन नंबर आला की तो नंबर GPay वर टाका. तिथे तो नंबर खरा आहे किंवा नाही हे समजेलच, त्याच बरोबर तो कोणत्या नावाने रजिस्टर आहे हेही समजेल. जर दोन्ही नावे वेगवेगळी असतील तर समजून घ्या, काहीतरी काळेबेरे आहे.
दुसरी गोष्ट, त्या व्यक्तीच्या वालवर जाऊन त्याने टाकलेले फोटो किंवा पोस्टच्या तारखा तपासा. त्या शक्यतो एकाच दिवशीच्या असतील तर समजून घ्या. ही व्यक्ती शिकारी असून आपल्याला अडकवण्यासाठी जाळे टाकलेले आहे.
तिसरी गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीचे लोकेशन माहिती करणे. यासाठी तुम्हाला Python भाषेची थोडी माहिती असणे गरजेचे आहे. या भाषेत लिहिलेला प्रोग्रॅम वापरून तुम्ही एखाद्या फोन नंबरबद्दलची बेसिक माहिती अगदी सहजपणे मिळवू शकता. अर्थात याचा गैरवापर करणे कायद्याने गुन्हा आहे हेही लक्षात ठेवा.
आणि सगळ्यात महत्वाचे. तुमचा फोन नंबर फेसबुक सारख्या ठिकाणी कुणालाही बघता येईल असा ठेऊ नका. तसेच कुणी मागितला तर खात्री असल्याशिवाय देऊ नका. आणि समजा दिला तरी आपण ज्याच्याशी संवाद साधतो आहोत तो काय आणि कसा बोलतोय याकडे बारीक लक्ष असू द्या. कारण अनेकदा आपल्या फोन नंबरचा वापर करून अनेक शिकारी आपल्याबद्दलची माहिती खूप सोप्या पद्धतीने मिळवू शकतात.
सावधान... फेसबुक हे एक जंगल आहे. इथे देखावे जितके मनमोहक आहेत, तितकाच धोका जास्त आहे. कोण कधी आणि कशी तुमची शिकार करेल हे सांगणे अवघड आहे. त्यासाठी आपणच कायम सावध असणे गरजेचे आहे. त्या व्यक्तीला मी ब्लॉक करून त्याचे अकौंट फेसबुककडे रिपोर्ट केले आहे. पण तसेही असे अकौंट काही दिवसांचेच असतात. महिनाभरात ते बंद ही होतात आणि पुन्हा येतात, नवीन चेहऱ्याने आणि नावाने.
-- सावधानतेचा इशारा देणारा नाशिककर, मिलिंद जोशी...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा