सोमवार, ३० ऑक्टोबर, २०२३

640. बेवारस झेंडू आणि आमचा जिद्दी आबा

 आबा तसा आमचा जिद्दी शेतकरी.दोन वर्षे  कोरोनात गेली पण गडी कधी थकला नाही. बापानं करून ठेवलेले सोसायटीचे कर्ज, खाजगी सावकाराचे देणे असूनही गडी कधीच भिला नाही. लॉक डाऊन मध्ये रानात थोडे माळवं-भाजीपाला पिकवायचा आणि सायकलवर तर कधी मोटरसायकल वरून लांब शहरापर्यंत भाजीपाला विकाय जायचा.लॉकडाऊन मध्ये कोणी पकडलं तर त्याला किलो दोन किलो वांगी दोडका देऊन जागेवरच सेटलमेंट पण करायचा.लय जुळलं नाही तर खिशातल्या डायरीतुन माझा मोबाईल नंबर काढून "तेवढं आमच्या वकील साहेबांशी बोला, पुण्याला लय मोठं वकील साहेब हाईत "असं म्हणायचं
    एकदा एकाच पोलिसाला दोन वेळा लॉकडाऊन मध्ये सापडला मग आबाला पोलीस चौकीतच बसवून ठेवला. शेवटी मीच जाऊन चौकीतून बाहेर सोडवून आणला. बापडेपणाने आबा परत वळून चौकीत गेला आणि सगळ्यांना वांगी तंबाटी देऊन हसत हसत बाहेर आला. तिथले पोलीस अधिकारी पण चांगले होते त्यांनी आबाचा भोळेपणा पाहून त्याच्या मालाचे पैसेही दिले असा आमचा भोळा भाबडा वारकरी संप्रदायातला शेतकरी आबा. यंदा मात्र आमचा हा भाबडा शेतकरी आबा रडला-हतबल झाला.दसरा नवरात्रात झेंडू फुलाला चांगली मागणी असते म्हणून आबांनी अगोदरच झेंडूची लागवड केली होती. परवा त्याच्या गावाला घरी गेल्यावर आवर्जून आबाने झेंडूची लागवड केलेली बाग मला दाखवली.शेना मातीत सारवलेले घर, अंथरुणावर पडलेला आजारी बाप, बाजरीचे दळण निवडत बसलेली म्हातारी आई, दोन ठिकाणी शिवलेले फ्रॉक घालून अभ्यास करत बसलेली पोरगी, ठिगळाणी जोडलेले चड्डी घालून अंगणात पोरगा खेळत होता. आबाने मला त्याची झेंडूची बाग फिरवून मोठ्या कौतुकाने दाखवली. तेवढ्यात डोक्यावरचा पदर सावरत आबाच्या बायकोने स्टीलच्या फुलपात्रात गरमागरम कोरा चहा आणून दिला.आबाने पोरीला जवळ करत तिच्या शाळेतल्या वहीतले मोत्यासारखं सुंदर अक्षर मोठ्या कौतुकाने दाखवले.*
निरोप घेताना आबा म्हणाला "यावेळी दसऱ्याला झेंडू विकला की पोरांना चांगली कपडे हडपसर वरून घेऊन येतो. साहेब यावेळी तुमच्या हडपसरच्या ऑफिसा समोर उड्डाण पुलाच्या खाली जागा धरतो झेंडू विकायला. तिथं लय चांगलं पैसं होतील."
        ठरल्याप्रमाणे आदल्या दिवशी आबाच्या सगळ्या कुटुंबाने अगदी आनंदाने झेंडूची फुले तोडली भाड्याने टेम्पो घेतला. म्हातारी आई आणि पोटच्या लेकीला मदतीला घेऊन पहाटे साडेतीनला  हडपसरला माझे ऑफीस समोर उड्डाण पुलाखाली जागा पटकावुन दसऱ्याच्या दिवशी आबाने छान दुकान थाटलं. फुलाचे दोन ढीग करुन एका ढिगावर म्हातारी,पोरगी आणि दुसरे फुलाच्या ढिगावर आबा झेंडू विकाय बसला.मला सकाळी आठला मोठ्या खुशीत फोन केला"त्यावेळी झेंडू घ्या झेंडू जोर जोरात ओरडायचा."
      पण सकाळी नऊ नंतर झेंडू ची आवक मोठ्या प्रमाणात पुलाखाली वाढली.खुप माल घेऊन विक्रेते वाढले. 60,-80 रुपयेचा झेंडू तासा दोन तासात 30 रुपये 20 रुपये वर आला.दुपार नंतर तर एक पण गिराईक आबा आणि म्हातारी कडे येईना.आबानं रडवला चेहरा करत शेवटी प्लास्टीकची क्यारी बैग भरून दहा रुपये  किलो दर केला.घसा बसो पर्यंत झेंडू घ्या झेंडू ओरडायचा .तरी पण गिराईक काय फीरकत न्हवते.शेजारी बसलेली म्हातारी आई उसने अवसान घेऊन आबाला धीर देत होती. पण आबाच्या डोळ्यासमोर पोरांची सनासुदी साठीची नवी कापडं सारखी दिसत होती.समोर लहान मुलांचे कपड्याच्या दुकानावर आबाची सारखी नजर राहुन राहुन जात होती. सोबत आणलेल्या पोरीकडे लक्ष गेले की  आबाच्या डोळ्यात टचकन पाणी येत होते. शेवटी या कोरोनाला न घाबरणारा आमचा आबा संध्याकाळी मात्र हतबल आणि केविलवाना झाला. शेजारचे झेंडू विक्रेते झेंडूची फुले तशीच बेवारस सोडून कधीचीच निघुन गेली होती. मात्र आबाचं तर अजुन टेम्पो चे भाडे पण वसुल झाले न्हवते. मला समोर बघीतल्याव आबा धायमोकलू रडायला लागला. सकाळ पासुन माय लेकराने अन्नाचा घास खाल्ला न्हवता.पोरगी सुधा भुकेली होती.सोडून द्या आबा आता, उठा म्हणत मी त्या तिघांना माझे ऑफिस शेजारच्या हॉटेलात घेवुन गेलो. तिघांच्या पोटाला खायला घातले, चहा ची ऑर्डर देवून मी परत आलो म्हणत *मी समोरच्या कपड्याच्या दुकाना गेलो. आबाच्या पोराला-पोरीला नवीन ड्रेस विकत घेतला.आबाच्या हातावर मी नविन ड्रेस ठेवताच आबा  परत रडायला लागला. धीर देत गाडी भाड्याचे  पैसे मी देऊ लागलो तर भाबडेपणाने नको, हायती थोडं फार जमल्यात म्हणाला.निरोप घेवुन पोरीचा हात पकडत आबा आणि म्हातारीने बेवारस पडलेल्या त्यांच्या सोनेरी झेंडूवर  डबडबलेल्या डोळ्यांनी पुन्हा एक नजर टाकत गावची वाट धरली.कष्टाने पिकवलेल्या झेंडुंच्या फुलांना आखेरचा निरोप देवून एक हतबल राजा परतीच्या वाटेने चालला होता..उद्याच्या संकटाशी पुन्हा दोन हात करायला. 

 लेखक एडवोकेट वैभवराव रामदास धायगुडे पाटील, हडपसर पुणे  9822760659 
ज्यावेळी भाजी खरेदीला मंडईत तुम्ही जाल त्यावेळी फार घासा घिस करू नका..आभाळा एवढी नाहीत पण छोटीशी स्वप्न दडलेली असतात  शेतकऱ्याची
(विनंती -: पोस्ट लेखकाच्या नावासहित फॉरवर्ड करावी)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...