मानवी समुदाय हा गुणदोषांनी व्याप्त आहे. यातील प्रत्येकांनाच जशा जाणिवा तशाच उणिवा देखील आहेत. यातील बहुसंख्यीय मतप्रवाहाचे प्रतिनिधिक स्वरूप भिन्न मतप्रवाहास आपल्या परिप्रेक्षात बसवून बघू इच्छीते. इतरांचे वैचारिक स्वातंत्र्य अबाधित न ठेवता त्याने माझ्यासारखेच व्हावे व रहावे असे अभिप्रेत धरून असतात. इतरांनी मला मदत करावी परंतू माझ्याकडून तशी मदतीची अपेक्षा करू नये असेही समाजमन असतेच. केवळ लाभासाठी झपाटलेली समाज मनं विवेकास फारसा थारा देण्यास मागे पडतात. माझा व माझ्या मताचा तेवढा इतरांनी आदर, आतिथ्य व सन्मान करावा परंतू ती अपेक्षा इतरानी माझ्या कडून न केलेलीच बरी अशाही मानसिकतेने पछाडलेले काही कमी नसतात.
प्रचलित समाजिक प्रवाहात कोणी वेगळेपण जोपासत असेल तर लगेच त्याचे पराकोटीचे विरोधक तयार होतात. असले विरोधक जसे कुटूंबात तसेच ते मित्र परिवारात व समाज समूहातही असतात. कौटूंबिक सदस्य, मित्र परिवार व समाज यांना अशा मोजक्या लोकांचे पारंपारिक वैचारिकपण जसे असते तसे इतरांचेही विवेकी वेगळेपणही असू शकते हे मान्य करायला ते सहसा तयार होत नाहीत. मग असल्या परंपरावाद्यांना इतरांचे विवेकी विचार व वेगळेपण स्वीकारणेही जड होऊन बसते. त्यांना अशांचे देव न माणने , पूजाविधी न करणे , अंधश्रद्धविरूद्ध बोलणे , प्रचलित प्रवाहाला छेद देणारी विचार प्रणाली आदी कितीतरी बाबी असहाय्य होतात. मग ही मंडळी त्याच्यासह त्याच्या पारिवारिक सदस्यांचा आजारपणाचे थेट संबंध या विरोधी मतप्रवाहाशी जुडवून शोधतात. पारंपारिक मतप्रवाहाला तडे जाणारे सुसंवादही त्यांना नकोसे व न पटणारे होऊन बसतात. नव्हे ती व्यक्तीच नकोशी होऊन बसते. मग आंतरिक घृणांचा जन्म होऊन तो वाढतच जातो . प्रचलित प्रवाहवादी जोपासत असलेला पारंपारिक मत प्रवाहाने विवेकवाद जोपासणाऱ्यास फारशी अडचण वाटत नाही. तेव्हा परंपरावाद्यांनी तरी ती का वाटून घ्यावी. त्यांच्या वेगळ्या मतप्रवाहाचे उत्तर देणे जेव्हा यांना कठीण होऊन बसते तेंव्हा त्याचा सामाना करण्याचे धाडस व युक्तीवाद कमी पडतो आणि मग असुयेपोटी व्यक्ती विरोधाचा जन्म होतो.
भारतातील कोणत्याही लहान मोठ्या आजाराने ग्रस्त असणारे व अपघातात, नैसर्गिक आपत्तीत जखमी होणारी व मृत पावणारी ९९.९९ टक्के लोकं हे कोणत्या तरी देवाधर्माला मानणारी, पूजाअर्चा करणारी, पारंपारिक मतप्रवाहाने श्रद्धावान बनून जीवन व्यतीत करणारीच असतात. त्यांच्यावर अशी आपत्ती कोसळल्यास त्या प्रसंगाचा मतितार्थ सोयीस्करपणे ईश्वराची मर्जी, नशीब - प्रारब्ध यात शोधायचे परंतु या बाबी न माणणाऱ्यास याच प्रसंगी देवाची शिक्षा म्हणून हिनवायचे ही सोयीची व स्वसमाधान करून घेणारी थेअरी किती बावळट आहे हे लक्षात कोण घेतो? कितीतरी प्रचलीत श्रद्धावान हे सर्व करण्यात फार आनंद व मानसिक समाधान मिळते अशी वल्गना करतात. इतरांना ते न करताही आनंद व समाधान मिळत असेल तर नेमके ते करायलाच हवे हा अट्टाहस का?
नशावान महाशय मदिराप्राशन करण्यात, बीडी - सिगारेट, ओढण्यात फार आनंद मिळतो असे सागण्यात धन्यता मानतात. त्यांना पिण्यातून आनंद मिळत असेल तर त्यांनी खुशाल प्यावे. परंतु ते न पिणाऱ्यानीही प्यावे हा आग्रह का? कोणास पिण्यातून आनंद प्राप्त होत असेल तर इतरांना न पिण्यातही आनंद असू शकतो. देवा - धर्माच्या, श्रद्धेच्या, परंपरेच्या नशेत चुर झालेले असो वा मदिरा वा अन्य व्यसनात चुर झालेले असो हे सर्व समसमानच असतात. असले व्यसन आरोग्यास घातक आहे. असे निष्पन्न होऊनही वैद्यक क्षेत्रातील व सामाजिक क्षेत्रातील डॉक्टरांनी कितीही सांगितले तरी ते त्यांना सोडावेसे वाटत नाही. त्यावरील होणारा अपव्ययही त्यांना नकोसा वाटत नाही. असे नशावानांचे व श्रद्धावानांचे होऊन बसलेले आहे. त्यांना यापासूनचे इतरांचे वेगळेपण, वेगळे विचार सहसा न पचणारे व न मान्य होणारेच असतात. मग सनतनवाद विरूद्ध विवेकवादाचा संघर्ष जन्माला येतो.
प्रवाहाविरूद्ध जाण्याचे स्वत:ही साहस करत नाही व इतरांनी केलेलेही ते सहन करू शकत नाही. आजपर्यंतचा मानवाचा प्रगतीचा प्रवास प्रचलित नशेच्या मान्यतेस छेद देऊनच पुढे गेलेला आहे. म्हणून ते विवेकवादी आजरामर झालेत. सोयीसाठी तेवढे विज्ञानास अध्यात्माची जोड असावी असे सांगून स्वसमाधान करून घेण्यापुरते जरी ते बरे वाटत असले तरी मुळात तो सिद्धांतच चुकिच्या पायावर उभा आहेत हे सोयिस्करपणे विसरले जाते. जुने सोडण्याचे व नवे स्विकारण्याचे धाडसच यांच्या अंगी बनलेले नसते. विवेकवादी विचार काही काळ नकोसे होतात परंतु ते स्विकारूनच पुढचा प्रवाह अधिक सुखकारक सुरू होतो हे मान्य करण्यास ते धजावत नाही. यदाकदाचीत धजावलेही तरी त्यास हेच लोकं समरस करून आपलीच घोडी पुढे दमटवत त्यासही आपल्याच बहूसंख्य मताच्या प्रवाहात मिसळून पुन्हा सनातनी विचारास उसळी देत प्रवाहित करतात. नविनतेच्या आधाराने सुखही उपभोगायचे परंतू जुने ते सोने म्हणून कवटाळतही बसायचे तेथेच विवेकाची, वैज्ञानिक शोधाची - जिज्ञासेची - प्रज्ञेची हत्या करतो आहोत याचेही त्यांना नशेच्या अधिनतेत भान तरी कसे राहणार ???.....
होमेश भुजाडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा