दिवसभर फिरूनही काम न मिळालेले मोकळे खिसे संध्याकाळ होताच अस्वस्थ होतात. काही केल्या त्यांची पावले घराकडे वळत नाहीत.. रस्त्यावर झगमगते लाइट्स लागलेले असतात, सगळीकडे माणसांची आणि वाहनांची गर्दी झालेली असते मात्र त्या गर्दीतही अगदी एकटेच असतात. मोकळ्या खिशांचं दुःख तुटलेल्या पुरुषाला आणि त्याच्या प्रतिक्षेत दरवाजावर बुब्बुळं खिळवून ठेवणाऱ्या त्याच्या स्त्रीला अधिक ठाऊक असतं. त्यांची संध्याकाळ कधी सरत नाही, घरी आल्यावर मोकळ्या खिशांचं व्यक्त होणं कसल्याही प्रकारचं असू शकतं. कधी त्याचे पाय थरथरत असतात, तर कधी शरीर भेलकांडत असतं, कधी तोंडाला शिसारी आणणारा उग्र दर्प तर कधी घरी आल्याबरोबर बायकोपोरांना मारझोड असं कसंही ते व्यक्त होतात.नाहीतर बऱ्याचदा मोकळे खिसे संध्याकाळ सरून अंधार गडद व्हायची वाट बघत उजेडात कुढत फिरतात, घनगर्द झाल्यावर थकलेल्या पायांना घरी खुरडत ओढत आणतात. रिकामे खिसे बहुत करून उपाशी पोटी झोपी जातात कारण त्यांचे शरीरच काय मनदेखील दमलेले असते. रात्रीस सराईतपणे त्याच्या शेजारी झोपणाऱ्या खंगलेल्या चिरगुटल्या देहाला मात्र काही केल्या झोप येत नाही कारण त्या देहाची बुब्बुळे आता लेकरांच्या पोटांना चिकटलेली असतात ! मोकळे खिसे जगातलं सर्वात मोठं ज्ञान शिकवून जातात जे जगातील कुठल्याच धर्माच्या धर्मप्रसारकाला, धर्मगुरूला अवगत नसतं! हेच अटळ सत्य आहे.
संतोष काळे पत्रकार मंगरूळनाथ जिल्हा वाशीम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा