सविताच्या नणंदा अगदी हिरीरीने आपले मत मांडत होत्या. सविताचा नवरा विलाससुद्धा त्यात भाग घेत होता. सविताचा मुलगा सोहम आणि त्याची बायको सखी आरोपीच्या पिंजऱ्यात आणि बाकीचे सगळेच स्वघोषित न्यायाधीश झालेले होते. सगळेजण सोहमला आणि त्याच्या बायकोला एकत्र कुटुंबात राहण्याबद्दल सुचवत होते. पटवून देत होते. सविता मात्र शांत बसून भाजी निवडत होती.
सविताचा नणंदेने सीमाने विचारले,"सविता, तुला काहीच बोलायचे नाहीय का? तुला पटलंय का हे? आम्ही एवढे तुमच्यासाठी...."
"आमच्यासाठी नाही... तुमच्या भावासाठी...! मला सोहमच्या वेगळं राहण्यामुळे काही फारसा फरक पडणार नाही." सविता उत्तरली.
"काय? अगं बोलतेस काय तू? अगं तुमचं म्हातारपण? लेक-सून जवळ असले की बरं असतं गं हाताशी..." एक नणंद म्हणाली.
सविताने हातातली भाजी बाजूला ठेवली. म्हणाली, "सोहम आणि सखी वेगळे राहिले की, आमच्याकडे दुर्लक्ष करतील असं का समजता तुम्ही? अनेक मुलगा-सून वेगळे राहूनही आई-वडिलांची काळजी घेतात, एकमेकांच्या गरजेला धावून जातात... ताई, आता पहिल्यासारखं राहिलं नाही,... आता फोनवर अनेक कामं होतात. अनेक सोयी-सुविधा घरातही करुन घेता येतात. मला सांगा, मुलगा-सून जवळ असावेत असं का वाटतं आपल्याला? घरातली कामं करण्यासाठी सून आणि बाहेरची कामं करण्यासाठी मुलगा जवळ हवा असतो आपल्याला... हातात चहाचा कप आणून द्यायला... आल्या-गेल्याला चहा-पाणी करायला सून हवी असते. आपल्याला 'आठवेल तेव्हा' त्या वस्तू दुकानातून आणून द्यायला मुलगा हवा असतो."
"अगं मग चूक काय त्यात? आपण नाही का त्यांच्यासाठी खस्ता खाल्लेल्या असतात?" सविताचा नवरा म्हणाला.
"हो, पण म्हणून आपण त्यांना किती गृहीत धरायचं? आपण त्यांना जन्म देतो, ते आपल्याला ती हवी असतात म्हणून. त्यांना लहानाचं मोठं करतो तेव्हा आपल्यालाही त्यांचं प्रेम मिळतच असतं की... आणि आपल्या म्हातारपणाची काठी मुलं होतातच. पण ते त्यांनी स्वेच्छेने व्हावं असं वाटतं मला. आपली जबाबदारी खरं तर आपल्या पोटचा मुलगा-मुलगी यांची आहे. सून-जावई यांची नाही. त्यांच्यासाठी तशा अर्थी आपण काहीही केलेले नसते. पण सहसा आपण आपला सगळा भार सूनेवरच टाकतो. आणि हेच नकोय मला."
"हो मग? तिचं कर्तव्यच आहे ते घर सांभाळणं, घरातल्या सगळ्यांचं मनापासून करणं हे तिचं कामच आहे." इति मोठी नणंद...ताई.
"जसं मी तुमचं सगळ्यांचं केलं तसंच ना? ताई, मला आईंनी आणि यांनी नोकरी करु दिली नाही... का तर मोठं एकत्र कुटुंब आहे आपलं. सीमा वन्सचं लग्न, तुम्हा दोघींची बाळंतपण, माहेरपण विकास भाऊजींचं लग्न... अगदी तुमच्या लेक सुनेचा पाहुणचार, जावयाचे आगत स्वागत सुद्धा साग्रसंगीत केलं आहे मी... त्याकाळात तर कामाला, पोळ्याना बाई लावणे ही पद्धतही नव्हती. सरळ कुणालाही कधीही जेवायला आमंत्रण जायचं आपल्याकडून. स्वयंपाक मी करणार तर मला आधी विचारावं, किमान कानावर घालावं असंही कुणाला वाटायचं नाही. मी जरा काही आजारी पडले की माझ्या तब्येतीपेक्षा घरातल्या कामाचं काय? याचीच सगळ्यांना जास्त चिंता असायची... विकास भाऊजी कॅनडात असतात म्हणून कोण कौतुक सर्वांना ! दोन-तीन वर्षांतून ते एकदा यायचे... तर आईंना त्यांच्यासाठी काय करु नि काय नको असं होत होतं... मला सांगा, ते आईंसाठी काय करत होते? पंधरा दिवस आल्यावर कुणीही गोड-गोड बोलतं... आपल्याला किती काळजी आणि प्रेम आहे, हे दाखवतात... हा नुसता दिखावा आहे. नातेवाईक, त्यांची जबाबदारी, कुलाचार... यातलं काहीही पडत नाही त्यांच्यावर... तरीही त्यांचा केवढा रुबाब? मी आणि हे मात्र बसलोय इथं माणसं जोडत...! आई गेल्या त्यानंतर तर तीन वर्ष आले नाहीत विकास भाऊजी...! सीमा, तुम्ही दोघी एकत्र कुटुंबाचं महत्व सांगता... पण तुम्ही दोघी तर सध्या स्वतंत्रच रहात आहात...." "अगं पण वहिनी, आम्ही मुद्दाम वेगळ्या रहात नाही. ताईच्या मिस्टरांची बदली झाली दुसऱ्या गावाला म्हणून तिला जावं लागलं... आणि माझे सासू-सासरे गावाकडे राहून शेती बघतात म्हणून... पण आमचं त्यांच्याकडे लक्ष असतं..."
"तेच तर मला म्हणायचं आहे...तुमचं लक्ष असतं हे महत्वाचं !कारण काहीही असो, सध्यातरी अनेक वर्षांपासून तुम्ही सासू-सासऱ्यांपासून लांब रहात आहात... हे खरे. एकत्र कुटुंब पद्धती चांगलीच आहे... पण आता काळाप्रमाणे थोडं बदलायला हवं. आपलाच हेका न चालवता नवीन पिढीचंही थोडं ऐकायला हवं... आताची पिढी प्रॅक्टिकल आहे, हुशार आहे... आपण थोडं त्यांच्याबरोबर दोन पावलं पुढे टाकली तर ते आपल्याला सोबत घेऊन जातील. नाहीतर ते पुढं निघूनही जातील... नाईलाजाने... आपल्याला मागे सोडून... मला आमच्या बाबतीत असं होऊ द्यायचं नाहीय...
आई-वडील, सासू-सासरे चुकत असोत की बरोबर असोत, त्यांचं सगळं ऐकणारी, प्रसंगी आपलं मन मारुन वेळ साजरी करणारी आपली शेवटची पिढी...! जाऊ दे... झालं गेलं पार पडलं सगळं... मला आता कुणाबद्दल तक्रार नाही... आणि सोहम-सखीशी भांडून मला उगीचच त्यांच्याशी वाईटपणा घ्यायचा नाहीय. उलट मी त्यांच्यावर विश्वास दाखवणार आहे, आणि तेही माझ्या विश्वासाला पात्र ठरतील... खात्री आहे मला. मला ना आता यांचं नि माझं सहजीवन हवं आहे... आता हळू हळू आमच्याही जबाबदाऱ्या खूप कमी झाल्यात. इतके दिवस सतत सासरच्या लोकांचं सगळं ऐकत राहिले मी. माझीही तुम्हा सगळ्यांवर माया आहे... मतभेद असले, तरी आपलेपणाही आहेच आपल्यात. पण मला आता माझ्यासाठी, यांच्यासाठी जगायचं आहे... आता मला अगदी सूनेचीही ताबेदारी नको आहे... आणि पूर्वी मी घेत होते तसं टेन्शन तिने घ्यावं असं मला अजिबात वाटत नाही. आम्ही एकत्र राहिलो असतो,तर मला आनंद वाटलाच असता. पण ती दोघं वेगळं राहायचं म्हणतायेत तर उगाच टिपं गाळत काही मी बसणार नाही. आणि लोकं काय म्हणतील... त्याचा विचारही करणार नाही. उलट जे घडेल, त्यातही काहीतरी संधी शोधेन मी. त्या दोघांना वेगळं का राहायचं आहे, माहिती नाही... पण मला मात्र वेगळं व्हायचंय... वेगळं व्हायचय ... मलाच.
मृणालिनी मकरंद जोशी
छत्रपती संभाजीनगर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा