सोमवार, ३० ऑक्टोबर, २०२३

645. बाप लेक......गाढव

 विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही, तो स्मशानात गेला आणि झाडावर लटकत असलेल्या वेताळाचे प्रेत खांद्यावर घेऊन चालू लागला....
तद्वतच....
बापाने आपल्या गोठ्यातील गाढव सोडले...
मुलाला आवाज दिला आणि ते दोघे गाढवाला घेऊन  बाजाराकडे निघाले...
पूर्वीच्या काळी एक बापलेक असेच गाढवाला घेऊन बाजाराला निघाले होते तेंव्हा रस्त्यात गावोगावी भेटणारे लोक त्यांची टिंगलटवाळी करत होते...
बापाला वाटले - " आता पुर्वीचा जमाना राहिला नसेल...काळ बदलला आहे... जग गतिमान झाले आहे... लोक सुशिक्षित झाले आहेत...ते इतरांच्या भावनांचा आदर करत असतील... इतरांना नावं ठेऊन हिणवत नसतील कदाचित.."
गाढव पुढे पुढे चालत होते...
मागे मागे बाप आणि मुलगा....
पहिले गाव लागले...
रस्त्याच्या कडेला बरीच मंडळी बसली होती.‌..
ती आपापल्या मोबाईल मध्ये व्यस्त दिसत होती...
गाढव, बाप, मुलगा जाऊ लागले तसं लोकांनी त्यांना फक्त पाहिलं आणि पुन्हा एकदा आपल्या मोबाईलमध्ये घुसले....
एखाद्याने साधी दखल देखील घेतली नाही कमेंट करणं तर दूरच....
(बापाला वाटले - " फरक पडला आहे तर !!... पुर्वी हेच लोक म्हणाले होते - अति शहाणे त्यांचे गाढव रिकामे..")
आता बापाला पुन्हा एकदा प्रयोग करून बघण्याची ईच्छा झाली..
पुढचे गाव आले तसे बापाने मुलाला गाढवाच्या पाठीवर बसवले...
लोकांनी पाहिले पण नो कमेंट्स..
सगळे मोबाईल मध्ये बिझी.....
(पुर्वीच्या वेळी लोक बोलले होते - " काय निर्लज्ज पोरगं आहे... म्हाताऱ्या बापाला चालावं लागतं आहे अन् स्वतः आरामात गाढवावर बसलाय...")
त्याच्या पुढचे गाव आले....
आता बाप गाढवाच्या पाठीवर बसला आणि पोरगा पायी चालू लागला...
लोकांनी पाहिले पण पुन्हा नो कमेंट्स...
सगळे आपापल्या मोबाईल मध्ये दंग....
आता मात्र म्हाताऱ्याला खात्री पटू लागली की जग खूपच बदललं आहे...
आज कोणीच काही बोलत नाही....
( मागच्या वेळी लोक बोलले होते - " काय बेअक्कल म्हातारा आहे... लहान पोराला पायी चालावं लागतं आहे अन् हा मारे बसलाय ऐटीत..." )
चौथे गाव आले...
आता बाप आणि मुलगा दोघे ही गाढवाच्या पाठीवर बसले...
दोघांच्या ओझ्यामुळे गाढव अडखळत चालू लागले तसं म्हाताऱ्याने गाढवाला चाबकाने फटके मारायला सुरुवात केली... गाढव ओरडत होते... म्हातारा मारत होता...
लोकांनी फक्त एकदा त्यांच्याकडे पाहून न पाहिल्या सारखं केलं आणि पुन्हा आपापल्या मोबाईल मध्ये डोळे रोवून बसले....
आता मात्र म्हाताऱ्याला शंका आली...
ईजा बिजा तिजा - ठिक...
पण चौथ्यांदा देखील कोणीच काही बोलत नाही....
हे कसं ?????....
रस्त्यात जवळच म्हाताऱ्याच्या गुरुचा आश्रम होता....
म्हाताऱ्याने ठरवले - जग इतकं कसं बदललं हे कोडं गुरू महाराजांनाच विचारले पाहिजे...तेच सोडवतील हे...
महाराजांनी म्हाताऱ्याचा अनुभव ऐकून घेतला आणि विचारलं - " मला तुझा मोबाईल बघू दे बरं जरा..."
म्हाताऱ्याने आपल्या खिशातला १ इंच रूंद अन् २ इंच लांब चुन्याच्या डबी एवढा मोबाईल काढून महाराजांच्या समोर धरला...
महाराजांनी मोबाईल पाहिला आणि विचारलं - " अजून ही तु २० व्या शतकातच आहेस ??... अरे बाबा हे  २१ वे शतक आहे...स्मार्टफोन वापरत नाहीस का?... इंटरनेट वगैरे ??..."
म्हातारा म्हणाला - " नाही बा... काही कामच नाही पडत, हे बरं आहे आपलं बोलायला..."
महाराजांनी मग आपला आयफोन काढला आणि त्यांवर आलेल्या कमेंट्स दोघा बापलेकांना दाखवल्या .....
फेसबुक, इंस्टाग्राम, what's up नुसतं रिल्स, फोटो, व्हिडिओ वगैरेंनी भरभरून वहात होतं....
कमेंट्स तर हजारो आल्या होत्या आणि येतच होत्या....
पहिली कमेंट -
अति शहाणे त्यांचे गाढव रिकामे..
दुसरी कमेंट -
म्हाताऱ्याला अक्कल आली - गाढव ठेवू नये खाली...
तिसरी कमेंट -
साठी बुद्धी नाठी...
पोरगं चालतं पायी,
बाप गाढवाच्या पाठी...
चौथी कमेंट पाहीली... 
" ही दोन्ही मुर्ख माणसं मुक्या जनावराच्या पाठीवर बसून त्याला फटके मारत आहेत...हा मुक्या प्राण्याचा अमानुष छळ आहे तेंव्हा ह्या दोघांना मनेका गांधींच्या  समोर उभं करा आणि १९६० च्या भारतीय कायद्यानुसार अटक करा... कठोर शिक्षा द्या..."
चौथी कमेंट बघून म्हाताऱ्याच्या डोळ्यांपुढे अंधारी आली...
म्हातारा कळवळून म्हणाला -
" महाराज, मला वाटलं जग सुधारलंय... बदललंय..."
महाराजांनी स्मित हास्य केले आणि म्हणाले - " तु तरी कुठं बदललास?...जो पर्यंत माणूस नावाचा प्राणी आहे तोपर्यंत काही ही बदलणार नाही..."
म्हातारा - " मग आम्ही काय गाढव बाजाराला न्यायचं नाही ??.."
महाराज - " वत्सा, सरकार तुझ्या बांधावर यायला तयार असताना तु कशाला वणवण करतो आहेस ??..."
म्हातारा - " महाराज, सरकार तर वादळ वारं आलं, नापिकी झाली तरच बांधावर येतं..."
महाराज - " अरे मग तु स्मार्ट हो ना...OLX वगैरे वर जा... तिथं गाढवाचा फोटो टाक...लोक गाढव न्यायला तुझ्या घरी येतील...आता तुम्ही सोशल मीडियावर झळकला आहात... तुम्ही सेलिब्रिटी झाला आहात... तुझ्याकडे तर रांग लागेल रांग..."
म्हातारा मनात बोलला....
महाराज म्हणतात म्हणजे ते खरं असलं पाहिजे...
आता पहिलं एक स्मार्ट फोन विकत घेऊन फेसबुक , इंस्टाग्राम वगैरे सुरू केलं पाहिजे...OLX वर गेलं पाहिजे म्हणजे झालं...
महाराजांना नमस्कार करून दोघं बापलेक निघाले...
गुरुदक्षिणा द्यावी म्हणून म्हाताऱ्याने बंडीच्या खिशातून एक किरकोळ नोट काढली तसं महाराज म्हणाले -
" असू दे.."
बापलेक बाहेर पडले...
आश्रमाच्या आवारात गाढव दिसेना...
म्हाताऱ्याने महाराजांच्या शिष्याला विचारले - " आमचं गाढव होतं इथं..."
शिष्य बोलला - " असू द्या... गाढव महाराजांनी गुरूदक्षिणा म्हणून ठेऊन घेतले आहे..."
बापलेकांना समजलं -
प्रश्न गाढवाचा नव्हता....
प्रश्न गाढव " असण्याचा "  होता...
बऱ्याच वेळा आपल्याला देखील व्यवस्थेसमोर गाढव कधी बनलो हे समजत नाही.हल्लीचं जग दिखावा आणि कोडगेपनाकडे वेगाने जात आहे.सावध रहा...आभासी जगात तुम्ही सदा सर्वकाळ वावरू शकत नाही. वास्तववादी बना.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...