मंगळवार, ३१ ऑक्टोबर, २०२३

653. सोप्प_नसतं...

 "सोप्प नसतं नवजात अर्भकाला अंगावर पाजण,
त्याच्या पिटुकल्या जिव्हणीत थेंब अमृताचे सोडणं.

सोप्प नसतं इवल्याशा जीवाचं पोट समाधानाने भरणं,
दिवसरात्र जागून त्याचे तृप्त ढेकर काढणं.

एकदा झाली ओळख मायलेकराला एकमेकांची,
की झोपेतही हसवते जिवतीमाय थेंब आपसूक पाजूनी,
तसच अगदी तसंच.

सोप्प नसतं अंगावर पित्या बाळाचं दूध सोडवणं,
दात आल्यावर त्याचं चावून चावून हैराण करणं

दुधाबरोबर रक्तही पिते लेकरू अनावधानाने,
माय ओरडते त्याची हुळहूळणार्या जखमेने.

अन्नाची गोडी लावून लाडेलाडे घास भरवते,
तरीपण लेकराला हुक्की दुधाचीच येते.

तेच असते त्याच्यासाठी जन्मापासूनचे पूर्णान्न,
मग एक दिवस अचानकच आईचे त्याला नाही म्हणणं.

ते बिचारं बावरते प्रश्नार्थक नजरेने विचारू लागते,
कालपर्यंत पटकन देणारी आई आता का नाही म्हणते.

एक सुरक्षिततेची भावना जिच्या कुशीत समजली,
गंध ओळखीचा जाण मायेची तीच का दुरावली.

डोळ्यांत आणून पाणी लेकरू केविलवाणे बघते,
माझ्या हक्काच्या अन्नापासून आई मला का तोडते.

मग सुरू होतो खेळ नवनवीन चवींच्या ओळखीचा,
आंबट खारट तुरट गोड आणि कडू पदार्थांचा.

तरीदेखील लेकराला आईचं हक्काची हवी असते,
दूध लेकराचे तोडतांना पापणी तिची जडावते.

मानसिकरित्या एक खंत सतत छळत राहते,
असूनही हक्काचे दूध का तिला लेकराला तोडावे लागते.

लेकरू रडते बिलगते ओरडून थकून झोपी जाते,
अंगाई गात गात आई मुकाट टिपे अश्रूंची गाळते.

सोप्प नसतं उघड्या डोळ्यांनी लेकराला अर्धपोटी झोपलेलं बघणं,
सोप्प नसतं त्याच झोपेत दचकून आईला बाऊ झाला म्हणणं.

दोघांची ही मानसिकता हळुवार तयार होते,
माय लेकराचे नाते आपसूकच समजदार होते.

जरी ऋण फिटणारे नसतात आईच्या दुधाचे,
तरी जाण असावी लेकराला तिने सोसलेल्या यातनेचे.

दोघांसाठी असतो क्षण हा सर्वात कठीण,
त्यातूनच जन्मते एका गोड नात्याची घट्ट वीण.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...