गुरुवार, १२ ऑक्टोबर, २०२३

585. द होल थिंग इज् दॅट...

 काकासाहेब संध्याकाळच्या वेळी फिरायला बाहेर पडले.  चौकाच्या कोपऱ्यावर फळांची पुष्कळ दुकाने  होती.
कोहिनूर फ्रुट सेंटर...
नुरजहान फ्रुट सेंटर....
केजीएन फ्रुट ज्युस सेंटर...
अनारकली फ्रेश फ्रुटस् ...
काकासाहेब मनातल्या मनात म्हणाले- " आमची मराठी पोरं ग्रॅज्युएट होऊन इकडे तिकडे बोंबलत फिरतात, त्यापेक्षा असला काही धंदा केला तर कुठल्या कुठे गेली असती..."
असा विचार करत करत चार-आठ पाऊले पुढे जातात न जातात तोच त्यांची नजर एका ठेल्यावर पडली.......
" इंजिनिअर केळीवाला "  ...
ठेल्यावरचा तो बोर्ड वाचला आणि  काकासाहेब थांबले.
थोडं  उपरोधिक स्मित करत  स्वगत बोलले - " इंजिनिअर होऊन शेवटी केळीचा ठेलाच लावायचा होता तर इंजिनिअर झालाच कशाला रे बाबा !!..."
काकासाहेब ठेल्याजवळ गेले. ठेला अतिशय आकर्षक पद्धतीने मांडला होता. केळीचे दर लिहिलेले फलक लावलेले होते. ठेल्याच्या दोन बाजूला डिजीटल पेमेंटसाठी QR कोड लावलेले होते. माश्या, कीटक वगैरे घोंघावू नयेत म्हणून ठेल्याच्या दोन बाजू नाजूक अशा पारदर्शक जाळीने बंद केलेल्या होत्या. दोन्ही बाजूंच्या जाळीवर एकीकडे श्री. रतन टाटा आणि दुसरीकडे डॉ. अब्दुल कलाम यांचे फोटो लावलेले होते.
कलाम साहेबांच्या फोटोच्या खाली  लिहिलेले होते - " जिसने की शरम - उसके फुटे करम ."
रतनजी टाटा यांच्या फोटो खाली लिहिलेले होते -  " संपत्तीची निर्मिती बुद्धीने होत असते - घाम गाळून नव्हे."
आजूबाजूला ही केळीचे ठेले होते. २५० रुपयांच्या चायनीज भोग्यांवर -  ' केला ५० रुपैय्या डझन -  केला ५० रुपैय्या डझन ' असं अखंड ते ही बिनखर्चात ध्वनी प्रदुषण करत त्यांचे केकाटने सुरू होते. हा इंजिनिअर ठेलेवाला मात्र शांतपणे उभा होता. पांढरा शर्ट, नवनाथ रसवंतीच्या फडतरे बंधू सारखी पांढरी विजार आणि गळ्यात भगवं उपरणे.
काकासाहेब त्याच्या जवळ गेले आणि विचारले - " एम.बी.ए. चायवाल्याच्या अपार सफलते नंतर आता इंजिनिअर केळीवाला का? .."
तो ठेलेवाला हसला - " हो, तसं म्हणा हवं तर.."
काकासाहेब - " काय भाव दिली केळी ? .."
इंजिनिअर ठेलेवाला - " ही जळगावची केळी ६० रूपये डझन...ही तामिळनाडूची केळी ७० रुपये आणि ही कलबुर्गीची लाल केळी ८० रूपये डझन.."
काकासाहेब केळीचे हे तीन तीन प्रकार पहिल्यांदाच पहात होते... 
 त्यांनी विचारले ले - "  मित्रा , तुझ्या आजूबाजूला  केळी ५० रूपये डझनाने विकताहेत मग तुझी ६०रूपये - ७० रूपये भावाची केळी कोण घेईल ? .."
ठेलेवाला - " Yes, the whole thing is that की शेवटी आपण   विचार कशाचा करतो? - तर पैशाचा !!.. शेतकरी , लाखांचा पोशिंदा वगैरे वगैरे सगळं बाद में... मला किती स्वस्त मिळतं ते महत्त्वाचं....केळीत असं काय मोठं असतं असं म्हणतो - बरोबर ??...म्हणजे तुम्ही केळी घ्यायला नाही तर इंजिनिअर केळीवाला ही काय भानगड हेच बघायला आलात बरोबर ना ? .."
काकासाहेब काही बोलले नाहीत..
इंजिनिअर ठेलेवाला पुढे म्हणाला - " ही केळी आमच्या बागेतली - आमच्या शेतातली आहेत आणि पारंपारिक पद्धतीने पिकवलेली आहे - केमिकलने नाही... त्यामुळे ती महाग नक्कीच वाटतील पण आरोग्याला अपाय करणारी नाहीत.."
आजकाल फळं केमिकल लावून पिकवली जातात अन् भाज्या केमिकलात बुडवून सुकवल्या जातात हे वाचलेलं काकासाहेबांना आठवलं आणि -  " सुकाळाचा केणा हगवणीला काळ " - ही जुनी म्हण पण आठवली...
तेवढ्यात इंजिनिअर ठेलेवाल्यांने एक पाॅमप्लेट त्यांच्या हातात ठेवले...
" Banana Democratic " - startup by Engineers..
काकासाहेबांनी विचारले - " हे काय आहे ? .."
इंजिनिअर बोलला - " आमची माहिती....केळीचा ठेला लावून सवंग प्रसिद्धी करण्यासाठी आम्ही हे करत नाही... आम्ही ४ इंजिनिअर मित्रांनी मिळून हे स्टार्ट अप सुरू केलंय...ह्यात जळगावच्या २० शेतकऱ्यांना आम्ही सामील करून घेतलंय आणि चांगल्या प्रतिची केळी ग्राहकांना देण्याचा आमचा प्रयत्न आहे...आज शहरात १० ठिकाणी आमचे असे ठेले आहेत... आम्ही PAN INDIA विस्तार करणार आहोत...आमची वेबसाईट बघा त्यावर तुम्हाला बरीच माहिती मिळेल.."
काकासाहेब म्हणाले - '' अरे पण एवढं इंजिनिअर झालात मग एखादं इंजिनिअरिंग स्टार्टअप सुरू करण्याचं सोडून केळी कसली विकत आहात? .."
इंजिनिअर - " अहो काका, मुकेश अंबानी रिलायन्स फ्रेश मध्ये भाज्या विकतोय ते उगाच नाही... धंदा हा धंदा असतो - तो हलका भारी नसतो...भाज्या - फळे विकण्याचा धंदा हा हलका धंदा आहे म्हणून आम्ही लोकांनी दुर्लक्ष केलं होतं म्हणून मग काही लोकांनी आपली मोनोपल्ली स्थापित केली, आज ते तुमच्या पैशाशी आणि आरोग्याशी खेळताहेत...आम्हाला तेच बदलून टाकायचं आहे...खरंतर आमच्या सारख्या पोरांना तुम्ही लोकांनी ' लढ ' म्हणत प्रोत्साहन दिलं पाहिजे..."
काकासाहेबांना जाणवलं...
पोरगा शंभर टक्के खरं बोलत होता - " The Whole Thing is that की कालच्या पिढीने आजच्या पिढीला कमी न लेखता   ते आपल्यापेक्षा Smart आहेत  हे accept केलं पाहिजे... तुम्हाला काही कळत नाही असं पालूपद लावून धरत त्यांना हात्सोहीत न करता प्रोत्साहित केलं पाहिजे.."
काकासाहेबांनी ८० रूपये डझनाची कलबुर्गीची लाल केळी विकत घेतली अन्  इंजिनिअर केळीवाल्या पोराला- ' आल द् बेस्ट ' - अशा शुभेच्छा देऊन निघाले. त्यांना केव्हा तरी वाचलेल्या दोन ओळी आठवल्या....
" ह्या नभाने भुमीला ही मान द्यावा...
आणि स्वराने खुद्द कधी तरी कान घ्यावा "
----------------------------------------------------
©️ शरणप्पा नागठाणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...