एक मुलगा...वय साधारण १५ वर्षे. Duchenne Muscular Dystrophy (DMD) या आजाराने ग्रस्त. फारच सुंदर मुलगा... मोठे डोळे, अगदी गालावर खळी वगैरे. हा आजार फक्त पुरुष मुलांनाचा होतो. सगळंच इथे सांगणं शक्य नाही पण सगळ्यात आधी मांडीचे स्नायू आणि कंबर कमकुवत होतात, उभा राहणं कठीण होत जातं. त्यात त्या बाळाचा किंवा मुलाचा खरंतर काही दोष नसतो, हा X- क्रोमोझोमशी निगडित आजार कुठेतरी वंशानुगत रक्तात रुजलेला असतो, जो वयानुसार उद्भवतो. सगळं काही सुरळीत चालू असताना तिसरीत जाणारा तो मुलगा अचानक चालायला अवघडू लागला. चालता चालता पडू लागला, पिंडरीचे स्नायू मोठे दिसू लागले, अगदी चालणं सुद्धा टाच उंचावून पंजावर किंवा फक्त पायांच्या बोटावर होऊ लागलं. ते स्नायू मोठे दिसणं किंवा पंजावर चालणं हे स्नायू कमकुवत होत असल्याचं लक्षण होतं. खरंतर त्याचं चालणं हळूहळू बंदच झालं, रांगू लागला.
नऊ वर्षांचं पोरगं रांगू लागलं... पुन्हा. माणूस म्हणून आपण नेहमी कालपेक्षा आज आणि उद्याकडून चांगलंच मागतो. कालपर्यंत स्वतःच्या पायावर चालणारा, धावणारा मुलगा गुडघ्यावर बसण्याचा प्रयत्न करू लागला, रांगू लागला. आई वडिलांना कसं वाटत असेल? उद्यासाठी काय मागावं त्यांनी? लक्षणं एवढ्या डिटेल्स मध्ये लिहायचं कारण हेच की आपल्या आजूबाजूला कोणी असं मूल असेल तर दुर्लक्ष होऊ नये. लवकर उपचार सुरू करावेत. पुढे जाऊन त्याच्या फुफ्फुसात इन्फेक्शन झालं, Respiratory Failure मध्ये तो जाऊ लागला. श्वास अपुरा पडू लागला. उपचार सुरू झाले. कोणतेही आईवडील फार फार तर हेच मागतात की, माझ्या मुलाने मोठे होऊन डिग्री मिळवावी, नोकरी करावी, व्यवसाय करावा, पैसा कमवावा, नाव मोठं करावं... सहा वर्षे झाले अंथरूणाला खिळून होता तो! त्या आईवडीलांचं एकच मागणं होतं. आमच्या पोरांनं फक्त एकदा कसलाही आधार न घेता स्वतःच्या पायावर उभा राहावं. मेला तो मुलगा.
शेवटच्या काही क्षणांपूर्वी वडिलांना जेव्हा सांगितलं की, 'आता शेवटची वेळ आहे, प्रयत्न सुरू आहेत. तेव्हा त्या बापाच्या चेहऱ्यावर एक स्मित होतं. एका टोकाला ते प्रचंड प्रेमळ तर दुसरीकडे तेवढंच भेसूर स्मित असावं. त्या मुलाने जन्मावेळी फोडलेल्या पहिल्या टाहोपासून ते आता सताड उघडे ठेवलेल्या डोळ्यापर्यंतचा तो अख्खा प्रवास त्या हास्यामध्ये असावा. तो बाप मुलाचे डोळे झाकत म्हणाला,
"डॉक्टर...आता काहीच करू नका, फार थकलाय तो. सहा वर्षे झाली सुखानं झोपलं नाही आमचं बाळ. शांत झोपू द्या त्याला.
पायावर उभा राहणं,चालणं, धावणं, बोलणं, डोळे उघडणं, हसणं... अशा कितीतरी गोष्टी आपल्या जीवनात किती सहजपणे घडत असतात. आपल्याला त्याची किंमत नसते. फार उशिरा कधीतरी कळते तेव्हा वेळ निघून गेलेली असते. आज त्या बेडवर तो मुलगा होता, उद्या दुसरं कोणी असेल परवा कदाचित आपण. साखळी चालतच राहणार आहे... जिवंत आहेत तोवर माणसं जपली पाहिजेत, प्रेम केलं पाहिजे. तो मुलगा परत कधीच येणार नाही पण आठवणींच्या कोपऱ्यात त्याच्यासाठी एक जागा नक्कीच असेल.
डॉ. प्रकाश कोयाडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा