प्रथम आपला स्थूल देह म्हणजे अन्नमय कोश गळुन पडतो पक्व झालेले झाडाचे फळ आपोआप जमिनीवर पडावे तसे. यावेळेस देहातील दहा प्राण क्रमाक्रमाने शरिरातुन बाहेर पडताच आत्मा चार कोषासह सूक्ष्म देह धारण करुन बाहेर पडतो तेंव्हा या देहाला मरण येते. आत्मा अजरामर आहे. देहा भोवतीच हा आत्मा घुटमळत असतो, घरात रडारड सुरु होते. शेवटी स्मशानभूमित या देहावर अग्नी संस्कार करतात. आपल्या जीवनातला तो शेवटचा यज्ञ असतो म्हणून याला अंतेष्टी म्हणतात. अंत म्हणजे शेवटचा आणि इष्टी म्हणजे यज्ञ. अंतेष्टीच्या वेळेस जे मंत्र म्हंटले जातात त्याचा अर्थ असा आहे की, मेलेल्या वेक्तिला संबोधुन मंत्र आहेत. कारण आत्मा तिथे हजर असतो व तो हे सर्व पहात असतो. तेंव्हा त्या मंत्राचा आशय असा आहे की आता तुमचा या देहाशी काहीही संबंध राहीलेला नाहि तुम्ही आता पुढच्या मार्गाला जा. याला गती प्राप्त होणे म्हणतात. आता आम्ही तुमचा हा देहसुद्धा जाळुन टाकणार आहोत असे म्हणून त्या प्रेतावर संस्कार करतात, जो संस्कार करणारा असतो तो आपल्या डाव्या खांद्यावर पाण्याने भरलेला माठ घेवुन प्रेताला अपसव्य म्हणजे डावि प्रदक्षिणा घालतो. यावेळेस एका दगडाने खांद्यावरिल मडक्याला एक भोक पाडतात, अशा तिन प्रदक्षिणा करुन प्रेताच्या मस्तकाजवळ उभे राहून ज्या दगडाने माठाला छाद्र पाडले गेले तो दगड खांद्यावर माठ असणाऱ्याच्या मागे ठेवतात मग त्या दगडावर खांद्यावरील माठ मागे सोडून देतात तेव्वा त्या माठाचा फ sss ट् असा आवाज होवुन तो फुटतो यालाच घटस्फोट असे म्हणतात .( आता नवरा जिवंत किवा बायको असतानाच घटस्फोट घेतला जातो ) या ठिकाणी डाव्या मनगटाने बोंब मारली जाते आणि सांगितले जाते की तुमचा आमचा संबंध संपला आता तुम्ही इथुन जा. मग तो दगड गळ्यात घातलेल्या वस्त्रामधे बांधतात याला अश्मा असे म्हणतात . त्या नंतर प्रेताळा जाळले जाते.
आत्मा हे सगळं पहात असतो. त्याला आपला देह जळताना पाहुन वाईट वाटते. त्याला रडायला येते. ( येथे आशी कुणी शंका घेवु नये की आत्मा रडतो का? तर आत्मा अजुनही चार कोषामधे बद्ध आहे व यात मनोमय कोष असल्यामुळे वासना, भावना असतात ) प्रेताला अग्नी दिल्यावर आपण घरी येतो. तो आत्माही आपल्या सोबत घरी येतो मात्र तो फडक्यात बांधलेल्या अश्म्यावर बसतो म्हणून फडक्यात बांधलेला अश्मा दाराच्या बाहेर ठेवतात. दहा दिवस हा आत्मा तिथे बसलेला असतो. घरात दक्षिणेकडे कडे तोंड करुन दिवा लावला जातो याला नमस्कार करुन आलेली मंडळी निघुन जातात. घरातिल माणसं अंघोळ करुन पिढलभात खायला मोकळी होतात. अशी अंधश्रद्धा आहे की मेलेल्या व्यक्तीला पुढील मार्ग दिसावा म्हणून दिवा लावतात व त्या दिव्याखाली राख किंवा पीठ पसरून ठेवतात कारण त्या दिव्याखालील पिठावर किंवा राखेवर, गेलेल्या माणसाला कोणता जन्म मिळाला त्याची पावलं उमटतात असा सर्वदूर समज आहे पण हा समज पूर्णतः चुकीचा आहे.लगेच त्याला दुसरा जन्म मिळत नाही त्याचि प्रक्रिया आहे ती आपण पुढे पहाणार आहोत. आता हा जो दिवा लावला जातो तो दिवा म्हणजे मृत व्यक्तीचे प्रतिक आहे, आत्ता फोटो काढण्याची व्यवस्था आहे म्हणून गेलेल्या व्यक्तीचा फोटो लावला जातो पण पुरातन काळी फोटो काढायची सोय नव्हती म्हणून त्या आत्म्याचे प्रतीक, आत्मज्योत म्हणून पणती मधे ती ज्योत दहा दिवस तेवत ठेवतात कारण दहा दिवस आत्मा घराबाहेच्या अश्म्यावर असतो आणि दहा दिवसा नंतरच त्याचा पुढचा प्रवास सुरू होतो. त्या दहा दिवसांत अनेक नातेवाईक, मित्र मैत्रीणी, परिवार भेटायला येतात, घरातील मंडळी रडत असतात, आलेली मंडळी गेलेल्या व्यक्ती बद्दल घरात चांगलं बोलतात बाहेर पडले की नको ते बोलतात हे सगळं तो आत्मा पहात असतो , ऐकत असतो.आपल्या बद्दल कोण खरंखोटं बोलतो, कोण खरंखोटं रडतो हे सगळं त्याला कळत आसतं त्यामुळे त्याला खुप दुःख होतं व रडायला येतं. या दहा दिवसाच्या आत प्रेताची रक्षा व अस्थीचं विसर्जन वहात्या पाण्यात मातीच्या किंवा तांब्याच्या कलशातुन कलशासगट करावं. दहाव्या दिवशी त्या अश्म्याला घेवुन घाटावर जातात तेथे अग्नी देणाऱ्याने क्षौर करावे म्हणजे दाढी मिशा व डोक्यावरील केस काढावेत.
कालच्या लेखात एका वाचकाने शंका विचारली की क्षौर का करतात तर त्याचे उत्तर असे आहे की, जेव्हा आपण एखादे पुण्य कर्म करतो, एखादे व्रत करतो, अनुष्ठाण करतो तेंव्हा क्षौर करावे, कारण आपला देह शुद्ध करूनच अशी कर्मे करावीत.आपण कळत नकळत दररोज अनेक प्रकारची पापं करत असतो आणि आपण केलेली पापे आपल्या देहात आपल्या केसाला धरून घट्ट बसतात म्हणून दर पौर्णिमेला व अमावास्येला प्रत्येकाने क्षौर करावे.अजुनही संन्यासी दर अमा.व पौर्णिमेला क्षौर करतात. पण आता केस वाढवायची फँशन आहे , सलमान खानने डोक्याचा गोटा केला आणि दाढिमिशा भादरल्या की आमचे सगळे हिंदू तरूण आपलं डोकं भादरून मिशी काढून टाकतिल बाप जिवंत असताना सुद्धा .थोडक्यात एका जीवाला सद् गती देणं हे सुद्धा पुण्य कर्मच आहे. त्या मागचा दुसरा हेतु हा असतो की, गेलेल्या माणसा बद्दल ची कृतज्ञता ,भावना, प्रेम मुंडण करून व्यक्त करण्याची प्रथा आहे. जेव्हा हिन्दु हृदय संम्राट बाळासाहेब गेले तेंव्हा हज्जारो तरुणांनि मुंडण केले होते असो . दहाव्या दिवशी तीन पिंड करून त्याच्या शेजारी हा अश्मा ठेवतात व मंत्रयुक्त त्या आत्म्याला पिंडामधे विलीन करतात आणि त्याना असे सांगितले जाते की तुमचा दैह जाळुन टाकला आहे, तुमच्या नावाने क्षौर केले आहे आता तुमचे येथे काहीही शिल्लक राहिलेले नाही आता तुम्ही पुढच्या मार्गाने सद् गतीला जा अशा आशयाचा तो विधी केल्यानंतर तो पिंड एका बाजुला नेवुन ठेवतात. जर त्या आत्म्याची वासना कशातच राहिली नसेल तर पटकन् कावळा त्या पिंडाला शिवतो अन्यथा तासंतास गेले तरी शिवत नाही. कारण आत्मा त्या पिंडावर बसलेला असतो व तो कावळ्याला जवळ येवु देत नाही. कावळा आणि कुत्रा हे दोनच प्राणी असे आहेत की त्याना मृत्यू व आत्मा दिसतो म्हणून कुणी मरणार असेल तर तिथलि कुत्री भेसुर रडतात. कावळा शिवल्या नंतर मग सगळे त्या अश्म्याला म्हणजे दगडाला अंगठ्या वरून पाणी देतात याला तर्पण असे म्हणतात .
कालच्या भागात एका वाचकाने प्रश्न विचारला आहे की, अंगठ्या वरूनच पाणी का देतात? त्याचे उत्तर असे आहे की, देवाला, रूषी आणि पितर यांना जे पाणी दिले जाते त्याला तर्पण असे म्हणतात. आपल्या हाताची पाच बोटं आहेत त्यातील अंगठा आणि अंगठ्या शेजारील पहिले बोट ज्याला तर्जनी म्हणतात, ही दोन बोटे पितरांकरता वापरावीत, मधले बोट स्वतःच्या कपाळाला गंध किंवा कुंकू लावण्या करता वापरावे. करंगळीच्या शेजारचे बोट आनामिका याने देवाला, गुरुंना , साधुसंताना गंध लावावे. म्हणून देवाला तर्पण करताना सरळ हातावरून पाणी द्यावे. रूषींना तर्पण करताना करंगळी च्या बाजुने तिरकी ओंजळ करून पाणी द्यावे आणि पितरांना अंगठ्याच्या बाजुने तिरपा हात करून पाणी द्यावे.
दुसरी शंका ॲड. मिलिंद जोशी यांनी अशी विचारली आहे की, आत्म्याचा प्रवास या आभ्यास पुर्ण लेखातुन अनेक बाबी समजत आहेत, या बाबतच एक शंका आहे, हल्ली च्या धावपळी च्या जिवनात समजा जर आपल्या अगदी जवळचे कोणी निवर्तले व सुतक असेल तर, सुतक असलेल्या व्यक्तिने सुतकात त्याचे व्यवसाय अथवा कार्यालयात जाऊन त्याचे कर्तव्य करणे जरूरीचे असेल तर त्याने करावे का ???? व त्या संदर्भात व या दरम्यान अन्नग्रहण करणे बाबत याोग्य ते यम नियमनां बाबत तज्ञांनी योग्य ते मार्गदर्शन करावे ही नम्र विनंति.
शंका निरसन - वरील शंका विचारली आहे त्याचे उत्तर सुतकामधे घरातील देवपूजा व कोणतेही मंगल कार्य करू नये अथवा कुठल्याही मंगल कार्यास जावु नये, कुठल्याही देवळात जावु नये मात्र देवतेचे बाहेरून दर्शन घ्यायला हरकत नाही. आपला जो नित्यनियम आहे तो करावा , उदाहरणार्थ हरिपाठ वाचन , गायत्री मंत्र सोडुन ईतर नामजप ,कीर्तन ,प्रवचन करण्यास हरकत नाही . नित्याची नोकरी , कामधंद्यास जायला हरकत नाही मात्र जाने अग्नी दिला आहे त्याने वरील कोणत्याही गोष्टी करू नये व दहा दिवस घराबाहेर पण जावु नये . सुतकामधे पलंग , गादीवर झोपु नये , चहा सोडुन कुठलेही गोड पदार्थ खावु नये, दररोज अंघोळ करावी मात्र कपाळाला तिलक लावु नये, अत्तर अथवा स्प्रे पर्फ्युम वापरू नये , नवीन वस्त्र परिधान करू नये, बाकी नित्याचे व्यवहार चालु ठेवावेत. दहाव्या व अकराव्या दिवशी घरातील सर्वांनी डोक्यावरून अंघोळ करावी , सुतकातील सर्व कपडे धुवावेत, आणि घरात सगळीकडे गोमूत्र शिंपडावे. अकराव्या दिवशी कपाळाला कुंकू, टिकली गंध लावावे . या आत्म्याला पुढील गतीकरता अकरावा , बारावा , व तेराव्या दिवशीचे विधी करावेत . चवदाव्या दिवशी घरात निधनशांत व उदकशांत करावी आणि मगच घरातील देवपूजा करावी. त्या दिवशी खांदेकर्यांना नातेवाईकांना गोडाचे भोजन द्यावे. संध्याकाळी अग्नी देणाऱ्याने डोक्यावर नविन टोपी घालावी , खांद्यावर टाॕवेल किंवा उपरणे घ्यावे व शंकराच्या मंदिरात जावुन गाभार्यात तुपाचे निरांजन लावुन ठेवावे, शंकर ही मृत्यूची देवता आहे, आत्म्यास सद् गती प्राप्त व्हावी व कुटुंबातील सर्वांचे रक्षण करावे अशी प्रार्थना करून डोक्यावरील टोपी व खांद्यावरील उपरणे तेथेच काढुन ठेवावे , लावलेले निरांजन घरी आणु नये. काल आपण दवाव्या दिवसा पर्यत ची गती पाहिली , पुढे
शरीर सोडुन संस्कारासह जीवात्मा जातो |
विचारी मना शोधुन पाही , कोठे तो जातो ||
संस्काराच्या समाप्तीने तो जीव होय मुक्त |
परोपरीने सांगितले ते आहे गीतेत ||
पितृणां लोकमपि गच्छंतु ये मृताः |
आपल्या वंशातील सर्व मृत व्यक्तीच्या आत्म्याला प्रेतयोणीतुन मुक्ती मिळावी हाच या विधि करण्या मागचा हेतु आहे. वैदिक धर्मात आनादि कालापासुन हे संस्कार चालत आले आहेत. नव्याने स्थापन झालेले जैन, पारशी, मुसलमान , ख्रिश्चन , वगैरे धर्मातही त्यांच्या प्रथेप्रमाणे ते विधि करतात. विस्तार भयास्तव ते येथे देण शक्य नाही. जो पर्यंत प्रेतावर आपआपल्या धर्माप्रमाणे संस्कार आपण करत नाही तो पर्यंत त्या आत्म्याला प्रेत अवस्थाच असते, त्याना पुढील गती प्राप्त होत नाही. ते अंतराळात भरकटत फिरतात आणि मग रात्रीस खेळ चाले सुरु होतो. अलिकडच्या काळात देह दान करण्याची प्रथा सुरु झाली आहे किंवा मृत्यू पत्रात लिहुन ठेवतात की मी मेल्यावर माझ्यावर कुठलेही संस्कार करु नका. पण सज्जन हो असे करु नका जो पर्यंत मृत देहावर संस्कार होत नाहीत तो पर्यंत त्याला प्रेत अवस्थाच असते. एखाद्या वेळेस रक्तदान करा , नेत्रदान करा , किडणी दान करा पण चुकुनही देह दान करु नका जर तसे कराल तर पिशाच्च होवुन घरच्याच लोकांना त्रास देत बसाल. या संदर्भात अलिकडच्या काळात प्रत्यक्ष घडलेली उदाहरणे मी देणार आहे.
या विश्वात एकुण चौदा भुवनं म्हणजे चौदा लोक आहेत . १) भुः, २) भुवः , ३) स्वहः , ४)महः , ५) जनः , ६) तपः , आणि ७) सत्यम् असे सात लोक आहेत व १) अतल , २) वितल , ३) सुतल, ४) तलातल , ५) रसातल , ६) महातल , व ७) पाताल असे सप्त पाताळ आहेत. अशी एकुण चौदाभुवनं आहेत . ही चौदाहि भुवनं एकापेक्षा एक सूक्ष्म आहेत. आपण सगळे भुः लोकात राहतो. भुवः लोकात भुत, प्रेत, पिशाश्च , शाकिणी, डाकिणी इत्यादी दुष्ट योणी राहतात. भुः लोकात राहणाऱ्या पेक्षा भुवः लोकात राहणाऱ्या या दुष्ट योणीचा देह सूक्ष्म आसतो.ते आपल्याला पाहु शकतात पण आपण त्याना पाहु शकत नाही. आशी दुष्ट शक्ती जवळुन गेल्याचा भास मात्र होतो. अशा आत्म्याना लिंग देह असतो, मन व वासना आसतात, इच्छा असतात. असे आत्मे अंतराळात भरकठत असतात. असे अतृप्त आत्मे एखाद्याच्या शरीराचा ताबा घेवुन आपली वासना तृप्त करून घेत असतात. जी माणसं अंघोळ करित नाहीत, अमंगळ राहतात, लघवी परसाकडेला जावुन आल्यावर हातपाय धुवत नाहीत. स्त्रिया मासिक पाळीत अमंगल ठिकाणी जातात. चवथ्या दिवशी डोक्यावरून अंघोळ करून केस मोकळे सोडुन घराबाहेर पडतात अशा अमंगल स्त्री पुरूषांच्या देहात असे आत्मे प्रवेश करतात म्हणून सदा सर्वकाळ मंगल, पवित्र राहणं किती गरजेचं आहे हे यावरून कळेल. हे अतृप्त आत्मे जेव्हा आपल्या देहात प्रवेश करतात तेव्हा भयानक यातना होतात. अमंगल देहात गती न मिळालेले अतृप्त आत्मे प्रवेश करतात. एकाच देहात एक अथवा एकापेक्षा अनेक आत्मे प्रवेश करु शकतात. आज मी अलीकडच्या काळात कांही घडलेली उदाहरणे सांगणार आहे.
१) माझ्या पत्नी ची मैत्रीण एक दिवस आमच्या घरी आली होती, आमच्या घरातील पवित्र व मंगलमय वातावरण पाहुन तिने मला तिच्या घरातील एक घटना सांगुन प्रश्न विचारला.
ती घटना अशी —
तिच्या घरी दररोज रात्री दोन ते अडीच वाजता घरातील दिवे आपोआप लागायचे व बंद व्हायचे. कुणी पायऱ्या उतरल्याचा स्पष्ट आवाज यायचा. घरातील लहान मुलं घाबरायची, रात्रभर कोणालाही झोप यायची नाही. काही दिवसांनी तिला तिचा मृत झालेला सासरा दिसु लागला आणखी काही दिवस गेले आणि तो सुनेशी बोलु लागला तु मला या योणीतुन मुक्त कर .माझा मुलगा किंवा माझी बायको मला मुक्त करणार नाहीत म्हणून मी तुला दिसतो आहे व सांगतो आहे. हे ऐकून प्रथम माझ्या अंगावर काटा आला कारण तिच्या डोळ्यात भीति स्पष्ट दिसत होती. मी तिला पहिला प्रश्न विचारला तुझा सासरा मेल्यावर त्याच्या देहावर अग्नी संस्कार करून सर्व विधी केले होते का? तेंव्हा तिने उत्तर दिले की , माझ्या सासु सासर् याचे एकमेकाशी कधीच पटले नाही, सतत घरात भांडणे व्हायची त्यामुळे रागाच्या भरात सासर् याने ससुन हॉस्पिटलमध्ये जावुन मरणोत्तर देहदानाचा फाॕर्म भरला आणि घरी येवुन सांगितले की मी देह दान केला आहे माझ्यावर कुठलेही संस्कार करू नका. कालांतराने सासरा मरण पावला व सासुने मृत देह ससुन हॉस्पिटलला देवुन टाकला . तेंव्हा पासुन घरात हे प्रकार सुरु आहेत आता मी काय करू म्हणजे त्याना गती मिळेल? मी तिला सल्ला दिला की, प्रथम ससुनच्या शवागारातुन सासर् याची बॉडी मिळाली तर ती ताब्यात घेवुन त्यावर विधिवत् अग्नी संस्कार करा व दहा दिवस सुतक पाळुन पुढील चौदा दिवसा पर्यंत चे सर्व विधी करा किंवा त्र्यंबकेश्वरला जावुन त्रिपिंडी श्राद्ध करा म्हणजे मुक्ती मिळेल. देह ताब्यात मिळाला नाही मात्र त्रिपिंडी केल्यावर दिवे चालुबंद होण्याचे व सासरा दिसायचे थांबले. म्हणजे च तो आत्मा पुढील गतीस प्राप्त झाला. आज आपण या देहाला मृत्यु कसा येतो व आत्मा कसा बाहेर पडतो ते क्रमाने यापुढील लेखमालेत पहाणार आहोत.
आपल्या देहाला दोन प्रकारे मृत्यू येतो. १) कालमृत्यु व २) अकालमृत्यु . कालमृत्यु हा आपल्या दैववशानुसार, प्रारब्धात लिहिल्या प्रमाणे येतो. आपल्याला श्वास मोजुन दिलेले असतात ते घेऊन संपले की मरण येते. तो कोणालाही चुकवता येत नाही. मात्र अकालमृत्यु चुकवता येतो. आकालमृत्यु म्हणजे मोजुन दिलेले श्वास घेऊन संपायच्या आत अचानक आलेले मरण. हे मरण अपघाताने, सर्प चावुन, अग्नीने भाजून, पाण्यात बुडून, विषप्रयोग इत्यादी कारणाने येते मात्र असे टाळता येते. ते कसे तर आपण सत्यनारायणाचे किंवा देवळात गेल्यावर त्या त्या देवतेचे तीर्थ घेतो , तीर्थ घेताना आपण एक मंत्र म्हणत असतो , तो मंत्र असा आहे.
अकालमृत्यु हरणं सर्व व्याधि विनाशनम् |
श्री परमेश्वर पादोदकं तीर्थं जठरे धारयाम्यहम् ||
खरच असे तीर्थ घेतल्यास अकालमृत्यु टळतो का? तर याचे उत्तर आहे नाही. कारण ते तीर्थ सुद्धा मंत्रयुक्त झालेले असेल तरच अकालमृत्यु टळतो. नुसते देवाच्या डोक्यावर पाणी ओतले आणि ते तीर्थ म्हणून दिले तर काहीही परिणाम होत नाही. मग हे तीर्थ कसे तयार होते ? तर जेव्हा देवाच्या मूर्तीला अभिषेक केला जातो तेव्हा त्या मूर्तीवर मंत्रयुक्त पंचामृत घातले जाते. पंचामृत म्हणजे पंचअमृत म्हणजेच देशी गाईचे दुध, दही, तुप, मध व साखर या पाच पदार्थात अमृत आहे , प्रत्येक पदार्थ देवावर घालताना पाचही पदार्थाचे मंत्र म्हंटले जातात , ते मंत्र स्वरयुक्त असावेत. पंचामृत स्नानानंतर वेदातील स्वरयुक्त सूक्त म्हणून पाण्याची धार देवाच्या मस्तकावर धरली जाते , संपूर्ण सूक्त म्हणून झाल्यावर जे तीर्थ तयार होते ते मंत्रयुक्त तीर्थ असते. ते कसे तर , आपल्या देवाच्या मूर्ती सुवर्ण , चांदी, तांबे, पितळ, पंचधातु अथवा पाषाण इत्यादी धातुच्या असतात. प्रत्येक धातुचा औषधी गुणधर्म असतो. त्या त्या धातुच्या मूर्तीवर जेव्हा स्वरयुक्त सूक्त म्हणून पाणी घातले जाते तेंव्हा त्या पाण्यात धातुतील औषधी गुणधर्म उतरतात व मंत्राच्या प्रभावाने त्याचे रसायण तयार होते व हे रसायण मंत्र म्हणून पोटात घेतले की त्याच्या प्रभावाने शरीरातील सर्व रोग जळुन जातात. शरीरातील रोग नाहीसे होण्याकरिता वैद्य आपल्याला धातुपासुन तयार केलेले भस्म देत असतात. उदा. सुवर्णभस्म, लोहभस्म, वगैरे अशा भस्माने रोग जसा नाहीसा होतो तसे या धातुच्या मूर्तीवर मंत्रयुक्त केलेल्या अभिषेकाने तयार झालेले तीर्थ रोग जाळून टाकते व अकाल मृत्यू टळतो. पंचगव्यामुळे सुद्धा शरीरातील हाडाला चिकटलेले रोगसुद्दा जळुन जातात मात्र ते मंत्रयुक्त तयार झाले पाहीजेत. पंचगव्य पोटात घेताना मंत्र म्हंटला जातो तो असा आहे,
यत्वगस्ति गतंपापं देहे तिष्ठति मामके |
प्राशनात पंचगव्यस्य धव्त्यग्नीरिवेंधनम् ||
म्हणजे आम्ही केलेली पापे रोगरूपाने देहातील हाडाला चिकली असतील तर पंचगव्य प्राशन केल्याने जळुन जातात. हे पंचगव्य म्हणजे देशीगाईचे शेण, मूत्र,दूध, दही आणि तूप हे पाच पदार्थ प्रमाणात मंत्रयुक्त एकत्र करून दर्भाच्या काडिने मिसळले जाते. यावरून आपल्या लक्षात आले असेल की गाईला किती महत्व आहे. थोडक्यात अशा मंत्युक्त तीर्थाने अकालमृत्यु टळतो मात्र कालांतराने ठरलेल्या वेळी कालमृत्यु येतोच. आज प्रेतकर्माचा अकरावा दिवस आणि लेखमालेचा क्रमांक ही अकरावा हा सुद्धा एक योगायोगच आहे. माझ्या असे लक्षात आले आहे की , ही लेखमाला वाचायला बरेचजण घाबरतात, कारण अनेकांचा असा गैरसमज आहे की ही लेखमाला म्हणजे गरूड पुराण आहे व हे फक्त घरात कुणी मेले तरच वाचायचे असते. वाचकहो हा निव्वळ गैरसमज आहे.मुळात गरूड पुराण कुणी मेल्यावरच वाचावे असे कुठल्याही ग्रंथात अथवा पुराणात सांगितले नाही. आणि या लेखमालेत कुठेही गरूड पुराणातला विषय आलेला नाही. तेंव्हा घाबरायचे कारण नाही. तसेच मी याज्ञिकी करत नाही किंवा यातले कुठलेही विधी मी करत नाही , अथवा यातून मला कुठलीही प्रसिद्धी मिळवायची नाही. हे विधी आतिमहत्वाचे असुन सर्व सामान्या पर्यंत हे ज्ञान पोहचावे एवढीच प्रामाणिक इच्छा आहे.असो. अकराव्या दिवशी,कालच्या लेखात सांगीतल्या प्रमाणे घरातील सर्वांचे शुद्धिकरण झाल्यावर,अग्नी देणाऱ्याने नदि किणारी असलेल्या घाटावर जावे , धुतलेले वस्त्र परिधान करावे, प्रेताचे उत्तरीय वस्त्र जानव्या सारखे गळ्यात घालावे, व प्रेताच्या पुढील गती करता अकराव्या दिवसाचे एकोद्दिष्ट श्राद्ध करावे. सर्व प्रथम आचमन प्राणायाम करून,देशकालाचा उच्चार करुन पुढील संकल्प करावा. अद्य अमुकगोत्रस्य अमुक प्रेतस्य प्रेतत्व निवृत्या उत्तमलोक प्राप्तये एकादशाहे अग्नौ मह्यकोद्दिष्टं करिष्ये. असा संकल्प करुन पुढील विधी करावा. प्रथम गायत्री मंत्र म्हणून अग्नी प्रज्वलीत करून स्थंडिलावर स्थापना करावा..त्या शेजारी दोन दर्भाच्या काड्या ठेवून दर्भबटु तयार करावा.याला चटश्राद्ध म्हणतात .या श्राद्धात आपण उपस्थित रहा अशी त्या बटुला प्रार्थना करावी. नंतर स्थंडिलावरिल अग्नीची पूजा करुन प्रेताला उत्तमलोक प्राप्त व्हावा म्हणून अग्नीत प्रथम एक तुपाची आहुती द्यावी. अग्नीसमोर पळीभर पाणी टाकुन त्रिकोण करावा व त्यावर पत्रावळीच्या पानावर भात घ्यावा, व *उदिरतामवर*आदि आठ मंत्र म्हणून प्रत्येक मंत्राच्या चार आहुती अशा एकुण बत्तीस आहुत्या प्रत्येक मंत्र म्हणून झाला की स्वाहा म्हणून द्याव्यात . सदर मंत्रांचा अर्थ असा आहे की , पृथ्वी आणि भक्तरक्षक ,मध्यमलोकनिवासी, प्राणस्वरुप, सत्यभाषणी अजातशत्रू पितर स्वर्गात जावोत व तेथे अढळ राहोत. राजस कार्यकारी, समृद्ध, बांधवतुल्य,पुरातन व उत्तरकालीन मृत पितरांना माझा नमस्कार असो. स्वधापूर्वक हविर्दत्त, दर्भाच्या आसनावर बसलेले, या यज्ञात स्थानापन्न झालेले, ज्ञानवान आणि संतुष्ट झालेल्या पितरांनो मला या यज्ञाचे फळ द्या आणि मला सतत यज्ञ करण्याची प्रवृत्ती द्या. हे भक्तपाचारीत आणि भक्तरक्षक पितरांनो, तुमच्या पेक्षा खाली उत्तरकालीन लोकांना अभय आणि निर्दोष सुख द्या. या यज्ञातील हविर्द्रव्याचा स्वीकार करा. यज्ञाच्या दक्षिण भागात स्थानापन्न झालेल्या पितरांनो, अपराधामुळे काही चुकले असेल तर क्रुद्द होवु नका. देवाजवळ स्थानापन्न झालेल्या पितरांनो, या यज्ञीय पुत्राला धन द्या.अशी प्रार्थना करून अग्नीत पितरा करिता बत्तीस अहुत्या द्याव्यात. अग्नीजवळ पिंड ठेवण्यासाठी एक दर्भाची काडी ठेवुन ती जागा पाण्याने प्रोक्षण करावी. प्रेताचा प्रतिनिधी स्वरूप पिंडासाठी दर्भासन, तिलोदक, भाताचा पिंड, अंजन (काजळ ), अभ्यंजन (तूप ), पाद्य, अर्घ्य, आचमनीय, स्नान, वस्त्र, गंध, फुलं, माका, तुळशी, धूपदीप, चरू( नैवेद्य ), तांबुल( विडा ),दक्षिणा,उत्तरीय वस्त्र, शयन, आसन, अलंकार , पादत्राण, छत्री, पाण्याचा तांब्या व भांडे , इत्यादि वस्तू यथाशक्ति अर्पण कराव्यात . त्या नंतर देवाला नमस्कार करुन अग्नि विसर्जन करावा.ब्राम्हणांना व गरीबांना दक्षिणा व अन्न द्यावे. यानंतर ‘ अभिरम्यताम्’ म्हणून सर्व पिंडाचे विसर्जन करावे. शेवटी दर्भबटू स्वरूप दर्भावर प्रेताला उद्देशून पिंड अर्पण करावा आणि नमस्कार करावा. येथे अकराव्या दिवसाचे कर्म संपते.
वाजश्रवस नावाच्या रूषीने विश्वजीत नावाचा यज्ञ केला आणि या यज्ञाची सांगाता करताना, यज्ञाकरिता आलेल्या ब्राह्यणांना दक्षिणेच्या स्वरूपात गायी दान द्यायला सुरूवात केली. त्या सर्व गायी भाकड होत्या म्हणजे ज्यांचे दुध काढुन संपले आहे? ज्यांचा चारा खावुन संपला आहे म्हणजे थोडक्यात म्हाताऱ्या झालेल्या , मरायला टेकलेल्या गायी दान द्यायला सुरूवात केली. आपले वडील खोटं दान करत आहेत हे पाहुन लहान असलेल्या नचिकेताला ते सहण झाले नाही. तो म्हणाला बाबा ! ज्या ब्राह्यणांनी विश्वजीत यज्ञाकरिता उत्तम वेदमंत्र म्हंटले त्या बदली तुम्ही त्यांना काहीही उपयोग होणार नाही अशा गायी दान स्वरूपात देत आहात म्हणजे पुण्यकर्म करायचे सोडुन पापकर्म करत आहात. ज्या गायींचा आज पर्यंत उपयोग करून घेतला , त्या गायींचा आता काहीही उपयोग नाही म्हणून दान करत आहात त्याप्रमाणे एकनएक दिवस माझाही कांहीही उपयोग होणार नाही हे तुमच्या लक्षात आल्यावर तुम्ही मलाही कोणाला तरी देवुन टाकाल . मग मला आजच सांगुन टाका की मला कोणाला देणार आहात ? हे ऐकून वडिलांना भयंकर राग आला . कारण सर्वांसमक्ष आपल्याच मुलाने इज्जतिचे वाभाडे काढले होते. रागाच्या भरात ते म्हणाले जाss ! तुला यमाला देवुन टाकला आहे. ( आजच्या भाषेत जा एकदाचा मर , तोंड काळे कर ) हे ऐकून नचिकेत वडिलांना नमस्कार करून यमाकडे सदेह निघाला. तो स्वतःला धन्य समजत होता कारण यमाकडे सगळेच जातात मात्र ते बोलावणे आल्यावर पण एवढ्या लहान वयात सदेह यमाकडे जाणारा तो पहिलाच होता. यमाच्या दरबारात तो आला तेंव्हा यम नेमकं कुठे तरी दौऱ्यावर गेला होता . यमाच्या पत्नीने व सेवकांनी या नचिकेताचे स्वागत केले , त्याला काही सेवन करण्या करिता पदार्थ व पाणी दिले पण त्याने ते नाकारले आणि तो म्हणाला, की जो पर्यंत हा देह यमाच्या स्वाधीन करत नाही तो पर्यत अन्न पाण्याला स्पर्श करणार नाही. तिथेच तो मांडी घालुन बसुन राहीला. तीन दिवसानंतर यम तिथे आला, दुता कडुन वार्ता कळली की मृत्यू लोकातुन एक ब्राम्हण कुमार आपल्याला भेटायला आला आहे. हे ऐकून यम रेड्या वरून खाली उतरला . यमानेच या नचिकेताला नमस्कार केला . का केला तर अतिथी देवो भवा |
आपल्या करिता कुणीतरी मृत्यु लोकातुन एक कुमार आपल्याला भेटायला आला आहे आणि तीन दिवस माझ्या करिता अनशन् म्हणजे उपाशी राहिला आहे हे पाहुन यम खुष झाला आणि या तीन दिवसा करिता तीन वर मागुन घ्यायला सांगितले. नचिकेताने पहिला वर पीतृ रूणातुन मुक्त होण्यासाठी यमाला मागितले की, माझ्या बाबांच्या हातुन पुण्य कर्म करीत असताना पाप कर्म घडले आहे. त्याना त्या पापातुन मुक्त कर, मी परत तुझ्याकडुन घरी गेल्यावर माझ्यावर त्यांचे पूर्वी सारखेच प्रेम राहु दे. कारण तुझ्या दरबारातुन परत गेल्यावर कोणीही जवळ येत नाही. यम म्हणाला तथास्तु. दुसरा वर समाज रूणातुन मुक्त होण्या करता मागीतला. तो म्हणाला हे यमधर्मा पृथ्वीवर असे कोणते पुण्य केले म्हणजे मनुष्य तुझ्या तावडीत सापडत नाही. तेव्हा यमधर्म म्हणाला पृथ्वीवर यज्ञ करणारा मोक्षास प्राप्त होतो. तो यज्ञ कसा असतो? यज्ञ कुंडास किती विटा लागतात इत्यादी इत्थंभूत माहिती नचिकेताला दिली. (जिज्ञासुनी ही सविस्तर माहिती कठोपनिषद या ग्रंथात वाचावी.) प्रसन्न झालेल्या यमाने नचिकेला आणखी एक ज्यादा वर दिला कारण नचिकेताने दोन्ही वर स्वतः करिता न मागता दुसऱ्या करिता मागीतले होते. यम म्हणाला मी प्रसन्न आहे ज्यादा वराच्या द्वारे मी तुला आशीर्वाद देतो, की ज्या यज्ञामुळे मोक्ष प्राप्त होतो त्या यज्ञातील अग्नीला आजपासुन तुझ्या नावाने ओळखतील त्या अग्नीला ” नाचिकेतस् अग्नी ” या नावाने ओळखतील. यम म्हणाला बाळा आता तिसरा वर मागुन घे. नचिकेत म्हणाला हे यमधर्मा माझे तिसऱ्या वराचे मागणे असे आहे की, तु माणसाला मारतोस म्हणजे नेमकं काय करतोस ? देहतर तिथेच पडलेला असतो ‘ मग तु त्या देहातील काय घेवुन येतोस ? हे मला सांग . हे ऐकून यमाला घाम फुटला व यम म्हणाला बाळा स्वारी , माफ कर मी तुला हे सांगू शकत नाही ! हा वर सोडून तु आणखी शंभर वर माग पण हा वर माझ्याकरिता इथेच सोडुन दे. तेव्हा नचिकेत म्हणाला मला तुझे शंभर वर नको मला हाच वर हवा. हे ऐकून यमाने कांही प्रलोभने दाखवली ,
तिसऱ्या वराद्वारे कुमारवयाच्या नचिकेताने सरळ मृत्यूला हात घालुन, प्रत्येक्ष मृत्यूच्या आधिकारी यमासच विचारले की ,
येयं प्रेते विचिकित्सा मनुष्येSस्तीतिचैके |
एतद्विद्यामनुशिष्टस्वयाsहम् वराणामेव वरस्तृतीयः||
अन्वयार्थ – या इयम् विचिकित्सा मनुष्ये प्रेते ( सति) अयम् अस्ति इति एके , च (अयम् ) न अस्ति इति एके
एतत् विद्याम् त्वया अहम्| अनुशिष्टः वराणाम् एषः तृतीय वरः|
भावार्थ – (मनुष्य मेल्यावर कुणी म्हणतात तो आसतो तर कुणी म्हणतात तो नसतो. हा संदेह सर्वांच्याच मनात आहे. तुम्ही या विषयाचे अधिकारी आहात, तुम्हीच मला हे सर्व ज्ञान द्या की याचे पुढे काय होते ? याचे काय गूढ आहे ? हे मला तिसऱ्या वराद्वारे प्राप्त करुन द्या .) हे ऐकून यमाला घाम फुटला कारण हा प्रश्न आज पर्यंत यमाला कोणीही विचारला नव्हता. यमाच्या मनात आले की हे या मुलाला मी सांगावे का नाही? मी जरी या विषयाचा अधिकारी असलो तरी हा या विषयाचा अधिकारी आहे का? जर अधिकारी नसेल तर हे ज्ञान याला देणे योग्य आहे का? कारण मोठमोठी माणसं सुद्धा या विषयाला घाबरतात. याचे तर खेळण्या बागडण्याचे वय आहे, मी काय करावे? अशा कुमार वयाच्या नचिकेताची परिक्षा पहाण्या करिता म्हणून यमधर्म म्हणाला बाळा !
देवैरत्रापि विचिकित्सितं पुरा
न हि सुविज्ञेयमणुरेष धर्मः|
अन्यं वरं नचिकेतो वृणीष्व
मा मोपरोत्सीरति मा सृजैनम्||
अन्वयार्थ- देवैःअपि अत्र पुरा विचिकित्सितं न हि अयं सुविज्ञेयम्, अणुःएषःधर्मः, नचिकेतः अन्यम् वरम् वृणीष्व, मा मा उपरोत्सीः, एनम् मा आतिसृज .
भावार्थ- (या विषयी प्राचीन काळी देवांनाही संमोह निर्माण झाला होता; हा विषय समजण्यास सोपा नाही. ते सूक्ष्म तत्व आहे. हे नचिकेता, तू दुसरा वर माग ; मला आग्रह करु नकोस ; माझ्यासाठी हा वर इथेच सोडून दे.) मृत्यूनंतर आत्म्याचे काय होते?” हा प्रश्न नचिकेताने यमाला विचारल्यावर मोठ्या कुशलतेणे यमराज त्याची परिक्षा घेण्या करिता समजावुन सांगतात की हे गूढ आणि सूक्ष्म ज्ञान आहे तेंव्हा तुला आत्ता या वयात ते पेलवणारे किंवा समजणारे नाही. तेंव्हा तू हा वर माझ्या साठी इथेच सोडून दे आणि या वराच्या बदली दुसरा वर माग. यमाने नचिकेताला अन्य वराचे प्रलोभन दाखवुन मृत्यू या विषया पासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. यम म्हणाला ,
शतायुषःपुत्रपौत्रान्वृणीष्व
बहून्पशून्हस्तिहिरण्यमश्वान|
भूमेर्महदायतनं वृणीष्व
स्वयं च जीव शरदो यावदिच्छसि||
हे नचिकेता मला विचारलेला मृत्यूचा प्रश्न सोडून दिलास तर मी तुला शंभर वर्षे जगणारी मुलं तुला देतो. त्या मुलांच्या पोटी शंभर वर्षे जगणारी मुल जन्माला येतील तसेच संपत्ती, हत्ती,घोडे,सोने हे तू मागशील तेवढे मी तुला देईन, तसेच तुला जितके वर्ष जगावे वाटेल तितकी वर्ष तुला मी मारणार नाही. संपूर्ण पृथ्वीचा पती तुला बनवतो. (संपूर्ण पृथ्वीवरील जमिनीचा सातबारा तुझ्या नावावर करून देतो.) तसेच सर्व प्रकारचे कामभोग तुला प्राप्त करून देतो. तसेच पृथ्वीवरील मानवास जे भोग प्राप्त होत नाहीत ते मी तुला देतो म्हणजे उत्तम प्रकारचे रथ, स्वर्गात असणाऱ्या अप्सरा तुझ्या समोर नृत्य गायन करतील तू त्यांचाही उपभोग घे मात्र मृत्यू संदर्भात मला विचारू नकोस. हे यमाचे बोलणे ऐकून अतिषय शांतपणे, मनाची कुठेही चलबिचलता न होवु देता नचिकेत म्हणाला, हे यमधर्मा मी अपनहून तुला काहीही मागीतले नव्हते , तू स्वतःहून मला वर देतो म्हणालास ! जर एखाद्याला दिलेले परत घेतले तर काय होईल ठाउक आहे का? (दे दान घे दान पुडच्या जन्मी पाकीस्तान) विनोदाचा भाग सोडून द्या.
नचिकेत म्हणाला, हे यमराजा ! तू देवू केलेले सर्वभोग मर्त्यलोकात नाश पावणारे आहेत, नाशिवंत आहेत, या मर्त्यलोकात इंद्रियाचे तेज कालांतराने नाहीसे होते, जरा अवस्था प्राप्त होते. मला देवुकेलेले पुत्रपौत्र हे कालांतराने मरणारच आहेत. तू देवुकेलेले हत्ती घोडे तेही कालांतराने मरणार आहेतच म्हणजेच मला तू जे जे देणार आहेस त्या प्रत्येकावर तुझीच सत्ता असणार आहे म्हणून तुझे हे सगळे वर तुलाच राहू दे. तू जे धन,सुवर्ण वगैरे देवुकेलस त्या मुळे मनुष्य कधीच तृप्त होत नाही. जसजसे धन ऐश्वर्य मिळत जाते तसतसा लोभ वाढत जातो ( एकदा सर्व सत्ताधारी मंत्र्यांकडे जावुन ये म्हणजे माणसं किती लोभी आसतात ते तुला कळेल) कितीही लोभी माणूस आसला आणि त्याने कितीही मिळवले तरीही त्याला तू एकनएक दिवस मारणार आहेसच म्हणून मी जे तुला मृत्यू संदर्भात विचारले आहे तेच योग्य आहे आणि मला तेच सांग.
नचिकेताचा हा दृढ निश्चय ऐकून यम खुष झाला कारण नचिकेत प्रसन्न झाला व नचिकेताला आत्मस्वरूपाचे ज्ञान दिले. यमराजाने घेतलेल्या परिक्षेत नचिकेत पास झाला. यमाने एवढ्यासाठी परिक्षा घेतली होती की मरणाला किंवा या विषयाला मोठमोठी माणसं घाबरतात. हा मुलगा अजून लहान आहे. याचं वय खेळण्याबागडण्याचं आहे, याला हे ज्ञान देणं कितपत योग्य आहे? म्हणून परिक्षा घेतली. आता हे ज्ञान या मुलाला देण्यास हरकत नाही म्हणून ते ज्ञान देण्यास सुरूवात केली.
प्रथम मृत्यूच्या दाढेत कोण सापडतात ते सांगत असताना यम म्हणाला हे नचिकेता ! या जगात दोन गोष्टी आहेत एक श्रेयकर आणि दुसरी प्रेयकर. वास्तविक पहाता ज्या ज्या म्हणून श्रेयकर गोष्टी आहेत त्या मानवाच्या कल्याणार्थ आहेत पण त्या किती लोकांना आवडतात? परंतु ज्या प्रेयकर गोष्टी आहेत त्या माणसाला अधोगतीला घेवून जाणाऱ्या आहेत हे ठावूक असून सुद्धा माणव प्रेयकर म्हणजे स्वतःला आवडणार्या गोष्टीत रममाण होतो आणि पुनःपुन्हा मृत्यूच्या दाढेत सापडतो. ( ही सर्व माहीती जिज्ञासुनी ”कठोपनिषद” या ग्रंथात पहावी. विस्तार भयास्तव येथे देता येत नाही.)
यम म्हणाला हे नचिकेता आत्मा कधीहि मरत नाही.
न जायते म्रियते वा विपश्चित् नायं कुतश्चिन्न बभूव कश्चित् |
अजो नित्यः शाश्वतोSयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे ||
हा मेधावी आत्मा जन्म पावत नाही अथवा मरत नाही. तो कशाही पासून निर्माण झाला नाही अथवा त्याच्या पासून कांही निर्माण होत नाही. तो अजन्मा आहे, नित्य आहे, शाश्वत आहे आणि पुरातन आहे. मर्त्य शरीर मेले तरी तो मारला जात नाही. हा आत्मा कसा आहे ? तर
अणोरणीयान् महतो महीयान् आत्मास्य जन्तोर्निहितो गुहायाम् |
तमक्रतुः पश्यति वीत शोको धातुप्रसादान्महिमानमात्मनः||
याचा अर्थ असा आहे की , हा आत्मा सूक्ष्माहून सूक्ष्म आहे आणि स्थूलाहून स्थूल आहे.
या बाबतीत या आत्म्याला जाणणारे तुकाराम महाराज म्हणतात ,
अनुरणीया थोकडा तुका आकाशा एवढा |
समर्थ रामदास स्वामी भीमरूपी स्तोत्रात सांगतात,
अणुपासोनी ब्रह्मांडाएवढा होत जातसे |
तयासी तुळणा कोठे मेरूमांदार धाकुटे||
हे आत्म्याचे स्वरूप आहे व हा आत्मा प्रत्येक प्राणिमात्राच्या हृदयरूपी गुहेत असतो. तो कोणालाही दिसत नाही.(हृदयाची चिरफाड करणाऱ्या डाॕक्टरला सुद्धा दिसत नाही.) मात्र तो जो पर्यंत त्या हृदयरूपी गुहेत आहे तोपर्यंतच प्राणी जीवंत असतो आणि हे ज्ञान जो विवेकी जाणतो तोच या मृत्यूच्या भयापासून मुक्त होतो व शोकरहीत होतो.
हा आत्मा कसा आहे? तर ,
आसीनो दूरं व्रजति शयानो याति सर्वतः|
कस्तं मदामदं देवं मदन्यो ज्ञातुमर्हति |
याचा अर्थ – हा आत्मा स्थिर असूनही दूरपर्यंत जाऊ शकतो. कोणी झोपला असेल तर देहातील आत्मा देहातही असून तो कुठेही दूरपर्यंत जाऊन येवु शकतो. हे नचिकेता हर्षररित आणि हर्षसहीत अशा आत्म्याला माझ्या शिवाय कोण जाणु शकतो ! ही अनुभूती अपण नेहमी अनुभवतो ती अशी की , आपण गाढ झोपलेले असतो, झोपेत एखादे स्वप्न पडते, स्वप्नात आपण एखादा विषय उपभोगतो पण जाग येताक्षणिच काही क्षण त्या विषयाची अनुभूती आपल्या जवळ असते. उदाः- आपण स्वप्नात एखाद्या हाॕटेल मधे जाऊन गरम गरम कांद्याची भजी खातो. पण जाग येता क्षणीच काही काळ ती चव जिभेवर असते याचे कारण आपल्या स्थूल देहातील सूक्ष्म देहाकडून आत्म्याने तो विषय उपभोगलेला असतो. या अशा आत्म्याला जो ज्ञानी पुरुष, विद्वान हा आत्मा शरीररहीत आहे , पण या नाशिवंत देहात हा पक्का स्थित आहे जरी असला तरी तो महान व सर्वव्यापी आहे हे जाणून ते शोकरहीत होतात.
यमराज पुढे सांगतात,
नायमात्मा प्रवचनेन लभ्यः न मेधया न बहुना श्रुतेन |
यमेवैष वृनुते तेन लभ्यः तस्यैष आत्मा विवृणुते तनूं त्वाम् ||
याचा अर्थ- कितीही वेदांचा अभ्यास केला तरी हा आत्मा कळत नाही किंवा या आत्म्या संदर्भात कितीही युक्तिवाद केला तरी तो कळत नाही किंवा या आत्म्या संदर्भात प्रवचन केले तरी तो कळत नाही. कितीही ऐकले म्हणजे श्रवण केले तरी तो कळत नाही तर केवळ जो अंतर्मुख होवुन आत्म्यास शरण जावुन देहो अहंभाव टाकून सतत अहंब्रह्मास्मिचे चिंतन करून आत्म्यासी एकरूप होतो त्यालाच आत्म्याचे स्वरूप कळते.
हे नचिकेता! जो दुराचारी आहे,ज्याचा इंद्रियावर ताबा नाही, ज्याचे मन स्थिर व शांत झालेले नाही, अशा माणसाला कितीही ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला तरी त्याला कधीच आत्मप्राप्ती होत नाही. या शरीरात आत्मा कशा पद्धतीने राहतो? या शरीरात त्याचे काय स्थान आहे? तर यमधर्मम्हणाला
आत्मानं रथिनं विद्धि शरीरं रथमेव तु|
बुद्धीं तु सारथिं विद्धि मनः प्रग्रहमेव च ||
आपले शरीर म्हणजे एक रथ आहे. या रथाला पंच ज्ञानेंद्रिय रूपी घोडे जोडले आहेत,या रथाला चारपुरुषार्थ रुपी चाकं आहेत. (धर्म ,अर्थ ,काम आणि मोक्ष) या इंद्रियरूपी घोड्याचा लगाम म्हणजे मन आहे, बुद्धि म्हणजे या रथाचा सारथी आहे मनरूपी लगाम बुद्धिरूपी सारथ्याच्या हातात आहे आणि या शरीररूपी रथात जीवात्मा रूपी मालक आरूढ झाला आहे. हे रूपक भगवत्गीतेत दाखवले आहे, भगवत्गीतेच्या ग्रंथातील रथाचे चित्र पहा. शरीररूपी रथाच्या इंद्रिय रूपी घोड्यांना विषयरूपी खाद्य किती आणि केंव्हा द्यायचे हे बुद्धिरूपी सारथ्याने विवेकाने ठरवायचे आहे. जर बुद्धिरूपी सारथ्याचा मनरूपी लगाम सैल सुटला तर इंद्रियरूपी घोडे स्वैर (सैराट) सुटतील व विषयरूपी खाद्य अधाशासारखे खावुन सैराट होतील व जीवन रथ कोलमडून पडेल व जीवात्मारूपी मालकाची अधोगती होइल. याउलट, जो मनुष्य विवेकाने बुद्धी चालवून मनाद्वारे इंद्रियरूपी घोड्याना ताब्यात ठेवून संयमाने वागतो तोच संसाररूपी यात्रेचा शेवट गाठतो, आणि तोच परमात्म पदाला जावुन पोहचतो व जन्ममरणाच्या म्हणजेच मृत्यूच्या तावडितून सुटतो.
आता पंचकोषाचे विघटन होवून पुढील प्रवास कसा सुरु होतो ते आपण पाहणार आहोत. सध्या आपण पुस्तकी ज्ञानाने अतिशहाणे झालो आहोत आणि यात काय आहे ? आणि त्यात काय आहे? म्हणून पुरातन काळापासून चालत आलेल्या रुढी व विधी मोडीत काढत आहोत.या लोकापेक्षा आणखी कांही लोक आहेत ही गोष्टच विचारात घेण्यात येत नाही. जुन्या विचारसरणीचे व धार्मिक विचाराचे लोक जन्म-मरण, स्वर्ग-नरक, बन्ध-मोक्ष, या दोन टोकाच्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवुन विचार करत असतात परंतु जन्म-मरण या अवस्थांमधे किती अंतर आहे ? व किती टप्पे आहेत ? व आपल्याला किती ठिकाणी मुक्काम करावा लागतो ? या गोष्टींचा विचारच आम्ही करत नाही.
या आत्म्याला किती मोठा प्रवास करावा लागतो, किती ठिकाणी मुक्काम करावा लागतो या गोष्टीचे ज्ञान सर्वांना होणे अत्यंत गरजेचे आणि महत्त्वाचे आहे म्हणूनच महत्प्रयासाने ही लेखमाला मी सुरु केली आहे पण लाजीरवाणी गोष्ट ही आहे की बरीच कृतघ्न मंडळी लेखमालेच्या शेवटी घातलेले माझे नाव खोडून स्वतःच्या नावावर लेख दुसऱ्या समुहावर पाठवत आहेत. असो. माणसाची इंद्रिय क्षमता व दृष्टीची मर्यादा ठरलेली आहे. त्या पलीकडे आम्हाला दिसत नाही.याचा अर्थ त्या पलीकडे कांही नाही असे म्हणता येणार नाही, हे ही जाणुन घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हेच तर आपण आता पुढील लेखात क्रमाने पहाणार आहोत.
या विश्वात एकुण १४ भुवनं आहेत, सप्तलोक आणि सप्तपाताळ. सप्तलोक – १) भूः, २) भुवः, ३)स्वः, ४)महः, ५)जनः, ६)तपः, ७)सत्यम् सप्तपाताळ- १)अतल, २)वितल, ३)सुतल, ४)तलातल, ५) रसातल, ६) महातल, ७) पाताळ. आपण रहातो त्या लोकापासून सप्तलोक वर व सप्त पाताळ खाली आहेत. अतेंद्रिय म्हणजे आपल्या इंद्रियांना न दिसणारे असे लोक एकापेक्षा एक विरळ म्हणजे सूक्ष्म आहेत.यालाच भुवने असेही म्हणतात . जीवात्मा अनुक्रमे या लोकातून प्रवास करत असतो.या प्रत्येक लोकात त्याला कांही काळ रहावे लागते, तेथे त्याची उन्नती होते व पुढील लोकात तो क्रमाने सरकतो.मात्र कांही जिवात्मे मधे कुठेही न थांबता एकदम उर्ध्वगतीला जातात म्हणजे जीवनमुक्त होतात ,जीवन्मुक्त कोण होतात हे आपण पुढे पहाणार आहोतच. प्रवास करताना प्रत्येक लोकात त्याला कांही बंधने असतात.तो जसजसा पुढील लोकात जाईल तसतशी त्याची बंधने कमी होत जातात आणि त्याला नवनव्या शक्ती प्राप्त होत आसतात.मात्र पूर्व अवस्थेत जे संस्कार घडलेले असतात आणि त्या लोकातील अनुभव आलेले असतात त्यानुसार त्याचा कल पुढील लोकाकडे न राहता पूर्वस्थानाकडे म्हणजे मागील लोकाकडे असतो आणि हे त्याच्या पुढील प्रवासाला धोकादायक ठरते. विशेषतः पुढील उच्चस्थानाला पोहचून तेथील विशेष लोकांचा परिचय होईपर्यंत पूर्वस्थानाकडे सतत ओढ घेत असतो. ज्या प्रमाणे शाळेच्या प्रथम वर्षाच्या प्रथम दिवशी आपण तिथे रमत नाही परंतु काही दिवसानंतर त्या वर्गाशी व तेथील वातावरणाशी आपण समरस होतो. तीच अवस्था दरवर्षी पुढील वर्गात असते व कालांतराने तिथे आपण रमतो. तसा हा जीवात्मा पुढील लोकापेक्षा मागील लोकाकडे ओढ घेत असतो. व्यसनी दारुड्याची ओढ जशी पुन्हा पुन्हा दारुच्या गुत्याकडे असते तशी या जीवात्म्याची ओढ पुन्हा पूर्वस्थितीकडे म्हणजे मृत्यू लोकाकडे असते.
आता प्रत्यक्ष प्रवास कसा सुरु होतो ते पाहु. आपला देह हा पंचमहाभुतांपासून बनलेला असुन तो एकुण पाच कोशयुक्त असतो.
१) अन्नमयकोश, २)प्राणमयकोश, ३)मनोमयकोश, ४)विज्ञानमयकोश, ५)आनंदमयकोश
मनुष्य जेंव्हा मृत होतो तेंव्हा अन्नमयकोश म्हणजे आपले शरीर येथे टाकून जातो, परंतु जाताना तो आपल्या सोबत कांही गोष्टी घेऊन जातो. इथे असा प्रश्न निर्माण होतो की, देहच जर इथे मरुन पडतो तर मग हा जीवात्मा कांही गोष्टी कसं नेत असेल? तर याचे उत्तर असे आहे. आपल्याला एकुण चार देह असतात. १)स्थूलदेह, २)सूक्ष्मदेह, ३)कारणदेह, ४)महाकारणदेह यालाच जीवात्मा म्हणतात. जरी अन्नमयकोश गळून पडला म्हणजे स्थूलदेह इथे पडला आणि या देहाची प्रत्येक धर्मानुसार विल्हेवाट लावली तरी अजुन तीनदेह असतात आणि हे तीनही देह वेगवेगळ्या द्रव्याने बनलेले असतात.
आता हे पाच कोश किंवा चार देह यांचा प्रवास कसा सुरु होतो ते पाहु, आपल्या सर्वांच्या दृष्टीला दिसणारा स्थूलदेह म्हणजेच अन्नमय कोश सप्तलोकांपैकी भुः लोक म्हणजे भूलोकात असतो. तो कळून पडल्यावर बाकी तीन देह चार कोशासह अन्नमय कोश टाकून प्राणमय कोशासह पुढे सरकतात. एक देह संपून दुसरा देह किंवा एक कोश संपून दुसरा कोश कुठे प्रारंभ होतो हे मात्र निश्चित सांगता येणार नाही. पंचमहा भूतांपासून घेतलेल्या अंशाना एकत्र बांधुन ठेवण्याचे काम प्राणमय कोश करत असतो. हा प्राणमय कोश म्हणजेच शरीरातील प्राण निघुन गेला की शरीरातील पंचमहाभूताचे अंश पंचमहाभूतात जाउन मिसळतात. यालाच आपण अमुक एक ग्रहस्थ पंचत्वात विलिन झाले असे आपण म्हणतो. अन्नमयकोश आणि प्राणमयकोश यांचे आपल्या देहातून गमन जवळ जवळ एकदमच होत असते. अन्नमय कोशितून बाहेर पडलेला प्राणमय कोश काःही काळ देहा भोवती घुटमळत असतो. ज्या प्रमाणे एखाद्या झाडावरील एखाद्या पक्षाचे घरटे मोडून पडल्यावर पक्षी जसा त्या झाडाभोवती कांही काळ घिरट्या घालतो त्याप्रमाणे प्राणमय कोश या देहापासून लवकर दूर जात नाही. कालांतराने अन्नमय कोशा प्रमाणे प्राणमय कोशही पंचभूतात्मक सृष्टीतील प्राणमय पसार्यात विलीन होतो. कारण त्याला स्वतंत्र वावरण्याची शक्ती नसते. यातून मनोमयकोश विज्ञानमय व आनंदमय कोशासह बाहेर पडतो. प्राणमय कोशातून मनोमय कोश बाहेर पडला की, त्याची गती त्याच्या वासनेवर अवलंबुन असते.
या संदर्भात दोन प्रसंग आपण पाहीले. असाच एक भयानक अलिकडच्या काळात प्रत्यक्ष घडलेला प्रसंग आजच्या लेखात सांगणार आहे. या सत्य घटनेतील मूळ नावं बदलली आहेत.
सत्य घटना : शामराव खोत कोकणात राहणारे पण नोकरी निमित्त मुंबईत आले . छान नोकरीपण मिळाली. सर्व कांही उत्तम चालले होते. पुढे योगायोगाने कोकणातल्याच मुलीशी लग्न झाले. १९९७ साली. पत्नी दिसायला अतिशय सुंदर, नाजुक, सुस्वभावी. सुखाचा संसार सुरु झाला. पत्नीच्या पायगुणाने सहा महिन्यातच मुंबई सारख्या ठिकाणी ठाण्यात स्वतःच्या मालकीचा फ्लॅट झाला. सारे कसे उत्तम चालले होते.सावळ्या रंगाची गोंडस स्मार्ट , जिचे ढोपरा पर्यंत काळेभोर केस होते. चारचौघांचे सहज लक्ष जावे अशी सडपातळ बांध्याची प्रीती सुखाने संसार करत होती. जीवनातली ही घडी अशीच राहू दे असच कांहीतरी आनंदाने स्वतःच्याच मनाशी ती गुणगुणायची. पण सुखाची घडी कायम अशीच राहील याची खात्री नसते. तिला स्वप्नातही वाटले नव्हते की, भविष्यकाळात आपल्यावर भयाणक प्रसंग येणार आहे. जेमतेम लग्न होवुन तीन वर्ष झाले आणि भयानक संकट तिच्यावर आले. हळुहळु आपले अंगजड होत आहे. काहीतरी विचित्र संवेदना शरीरास होत आहेत हे तिला जाणवायला लागले. कामात उत्साह राहीला नाही. रोज नित्यनियमाने पोथी वाचन व्हायचं ते बंद पडलं आणि तिच्या लक्षात यायला लागलं की आपल्या शरीराचा ताबा कोणातरी अज्ञात शक्तिने घेतला आहे. त्या अज्ञात शक्तिच्या प्रभावाखालीच ती वावरते आहे. या गोष्टीचा तिला भयानक त्रास होत होता पण नेमकं काय होतय हे सांगता येत नव्हते. हळुहळु अचानक हातपाय ताठ व्हावेत. एक दिवस रात्री आपल्या हातात कोणाचा तरि परका हात आहे हे स्पष्ट दिसले. जोरात किंचाळली जवळ आलेल्या पतिला जोरात ढकलुन दिले. घरातील सगळे घाबरले नेमकं काय होतय हे कोणालाही कळेना. आता हा रोजचाच खेळ सुरु झाला. रात्रीस खेळ चाले, कुणीतरी आपल्या देहाशी झोंबतय हे तिला कळायच पण कितीही प्रतिकार केला तरी कांहीही उपयोग व्हायचा नाही. एक नव्हे दोन नव्हे तर किमान चार अदृश्य पुरुष तिला झोंबत होते. हातापायाच्या शिरा भयंकर दुखायच्या अशा अवस्थेत तिला दिवस गेले पण कालांतराने आपल्या पोटातील गर्भ कोणीतरी जबरदस्तीने काढून नेतय याची जाणीव झाली आणि पहिला गर्भपात झाला. किती यातना ,किती दुःख सहण केलं असेल? आणि एक नव्हे तीन वेळा गर्भपात झाला. दि.१२-११-२००२ वार मंगळवार दिवाळीची अष्टमी या दिवशी ढोपरा पर्यंत असलेले काळेभोर दृष्टलागावे असे केस एकमेकात गुंतले. हा प्रकार पाहुन कोणीही केस कापायला तयार होईना. शेवटी घरीच काना पर्यंत केस कापुन गुंता सोडवला. आज पर्यंत घरचे कोणी विश्वास ठेवत नव्हते आता मात्र धावाधाव सुरु झाली. मांत्रीक शोधले .मांत्रीक सुद्धा घाबरायचे की हिच्या देहातील चार पिशाच्चाना बाहेर कसे काढावे. एक नव्हे दोन नव्हे तब्बल दहा वर्ष प्रीतीने हा त्रास सहण केला. पुरती होरपळून गेली होती. केवळ दैव बलवत्तर म्हणूनच ती वाचली. कारण या कुटुंबाने ही जागा सोडल्यावर सात ते आठ माणसं त्या जागेत मेली. पुढे त्या जागेला भूतबःगला म्हणूनच सगळे ओळखु लागले. ती जागा सोडली आणि आता प्रीती व तिचा पति दुसऱ्या जागेत सुखी आहेत पण अजुनही हा प्रसंग आठवला की थरथर कापायला होते. नंतर असे कळले की जीथे या जागेचे बांधकाम झाले तिथे अनेक लोकांचा खून झालेला होता आणि त्या वास्तुत ते अतृप्त आत्मे रहात होते. या प्रसंगावरुन आपल्या आता लक्षात येईल की, मृत झालेल्या व्यक्तिच्या आत्म्याला सद्गती लाभणं किती गरजेचं आहे. योगायोग असा की जिला हा त्रास सहन करावा लागला ती आपल्या ग्रुपवर आहे.
जन्मभर ज्या प्रकारच्या वासनेचे प्राबल्य आपल्या देहात असते ती वासना कितीही उपभोगली तरी शमत नाही. उलट ती वासना वाढत जाते. म्हणून मृत्यूनंतरही हा जीवात्मा जर त्या वासनेत अडकला असेल तर ती वासना शमविण्याकडेच त्याचा कल असतो. जसे एखादा दारुडा सतत दारू पीत असतो, रोज त्याचे पाय दारूच्या गुत्याकडे, दुकानाकडे वळत असतात. साहजीकच मेल्यानंतरही तो आत्मा दारुच्या दुकानाबाहेर आसपास घुटमळत असतो आणि अशाच एखाद्या दारूड्याच्याच्या देहात प्रवेश करून आपली वासना पूर्ण करित असतो. एखादा विषयी माणूस असेल आणि त्याची कामवासना पूर्ण झाली नसेल कांही अंबटशोकीन किंवा कामवासनेने बरबटलेले एखाद्या मंदिरातून किंवा उद्यानातून किंवा जिथे प्रेमीयुगुल बसलेले असतात तिथे जावून आशाळभूत नजरेने, वखवखलेल्या नजरेने एकटक लाजलज्जा सोडून तासंतास उभे असतात. यातून म्हातारे सुद्धा सुटलेले नाहीत. पुढे याच विषयाने ते मॕड होतात. अशी विषयी माणसेही मुक्त होत नाहीत. मेल्यानंतरही कोणालाना कोणालातरी त्रास देत असतात. मी एकदा उजैनला कीर्तनासाठी गेलो असताना तेथील एका सरकारी दवाखान्यातील सुंदर दिसणारी एक परिचारीका(नर्स) मला भेटली आणि तिने तिच्या जीवनातला घडलेला प्रसंग सांगीतला. ज्या वेळेस रात्रपाळीला ती असते त्यावेळेस स्टाॕपरुममधे तिच्यावर कांही अतृप्त आत्मे तिच्यावर बलात्कार करायचे. तिच्या शरीरावर उठलेले ओरखाडे मी स्वतः पाहीले आहेत. थोडक्यात अशा अनेक वासनेमधे जीवात्मे अडकलेली असतात. परंतु प्रामुख्याने सर्वसाधारण बहुतांश लोकांची वासना खाण्याकडेच जास्त प्रमाणात असते. एखादी खाण्याची वस्तू दिसली की आमचं मन लगेच तिकडे ओढ घेत असतं म्हणून या सर्व वासनेतून भरकटलेल्या जीवात्म्यांना सद्गती देण्यासाठी अन्नाद्वारे त्यांची वासना पूर्ण करता येते आणि त्या वासना पूर्ण करण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे दरवर्षी केले जाणारे श्राद्धकर्म होय. श्राद्धे ही प्रथम दररोज, नंतर कांही दिवसाच्या अंतराने, महीन्यानी वर्षानी आणि शेवटी कांही महत्वाच्या दिवशी अशा पद्धतीने कमीकमी करीत मृताचा इहलोकीचा ओढा कमी करण्याचा हा एक प्रयत्न आहे. कारण श्राद्धाच्या वेळेस जे मंत्र म्हंटले जातात त्याचा अर्थच असा आहे की, त्या मृत व्यक्तीला उद्देशून आपला आता इकडचा संबंध सुटला असून आपणास मागे वळावयाचे नसून पुढे जायचे आहे.असा आहे.
श्राद्धाचे प्रकार : नित्य श्राद्ध ,षण्णवति श्राद्ध ,युगादि श्राद्ध ,मन्वादि श्राद्ध , संक्रांति श्राद्ध , वैधृति श्राद्ध , व्यतिपात श्राद्ध , महालय श्राद्ध प्रोष्ठपदि श्राद्ध , भरणी श्राद्ध*कृत्तिका श्राद्ध , कपिलाषष्ठी श्राद्ध , माघ्यावर्ष श्राद्ध , अन्वष्टक्य श्राद्ध , नवमी मातृ श्राद्ध , द्वादशी सन्यासी पितृ श्राद्ध , मघा त्रयोदशी श्राद्ध , *गजच्छाया श्राद्ध, चतुर्दशी शस्त्र हत श्राद्ध, दौहित्र श्राद्ध,सूर्य ग्रहण श्राद्ध , चंद्र ग्रहण श्राद्ध , अर्धोदय श्राद्ध , पद्मक योग श्राद्ध , अमायां योग विशेष श्राद्ध , महाव्यतिपात श्राद्ध , भीष्माष्टमी श्राद्ध , युगादिनां योग विशेष श्राद्ध , पौर्णिमा श्राद्ध , गोष्टी श्राद्ध , शुद्धी श्राद्ध , दैविक श्राद्ध , औपचारिक श्राद्ध , सद्यः श्राद्ध ,ऐच्छिक श्राद्ध ,नवान्न श्राद्ध , तीर्थयात्रा घृत श्राद्ध , इत्यादी श्राद्धाचे प्रकार श्राद्ध मंजिरी या ग्रंथात सांगीतले आहेत. या सर्व श्राद्धाची सविस्तर माहीती लेखन विस्तार भयास्तव येथे देणे शक्य नाही. तसेच काम्य श्राद्ध , नांदी श्राद्ध , इत्यादी श्राद्धाचे प्रकार आहेत .
मृत्यूनंतर प्रथम वर्षी केले जाणारे श्राद्ध याला वर्षश्राद्ध म्हणतात . या संपूर्ण वर्षात दर महिन्याला केले जाणारे श्राद्ध याला मासिक श्राद्ध म्हणतात आणि प्रथम वर्षातील पितृ पंधरवड्यातील चतुर्थी किंवा पंचमीला भरणी नक्षत्रावर केले जाणारे श्राद्ध याला भरणीश्राद्ध म्हणतात . हे तीन प्रकारचे श्राद्ध फक्त मृत्यूनंतर पहिल्याच वर्षी करावे. त्या नंतर मृत व्यक्ती ज्या तिथीला गेला असेल त्या तिथीला दर वर्षी श्राद्ध करावे याला प्रतिसांवत्सरिक श्राद्ध म्हणतात . आणि याच तिथीला भाद्रपद वद्य पक्षात केलेल्या श्राद्धाला महालय श्राद्ध किंवा पक्ष म्हणतात . श्राद्धातील मुख्य क्रिया कोणती ? तर श्राद्धात प्रामुख्याने १)ब्राम्हण पूजन ,२) ब्राम्हण भोजन, ३) पिण्डप्रदान आणि अग्नौकरण हे मुख्य व आवश्यक कृत्य आहेत. कांही ग्रंथात पिण्डदानास श्राद्धातील मुख्य कृत्य सांगीतले आहे.कांही ग्रंथात भोजनास आवश्यक कृत्य म्हंटले आहे. क्षेत्राच्या ठिकाणी केल्या जाणाऱ्या श्राद्धात पिण्ड दानाला आवश्यक मानले जाते. गयायांपिण्ड दानेण, कांही श्राद्धात पिण्डदान वर्ज सांगीतले आहे.उदाहरणार्थ गर्भिणीपतिकर्तृक श्राद्ध, संक्रांती श्राद्ध इत्यादी श्राद्धात पिण्ड प्रदान करु नये असे सांगितले आहे.यावरुन पिण्ड प्रदान न करता सुद्दा श्राद्ध होवु शकते हे सिद्ध होते मात्र भोजना शिवाय श्राद्धाची सांगाता होत नाही.यावरून पिण्ड प्रदानापेक्षाही भोजनाची आवश्यकता विशेष आहे. तसेच शिधा व दक्षणा देवून चट श्राद्धही केले जाते.
दोन पद्धतीने श्राद्ध केले जाते १) पार्वणविधी व २) एकोदिष्ठ विधी. प्रथम पार्वण विधी म्हणजे काय ते पाहू. पार्वण विधी म्हणजे तीन पिढ्यांना उद्देशून केले जाणारे श्राद्ध .या श्राद्धात आपल्या घरचेच पितर म्हणजे वडिलांचे श्राद्ध असेल तर १)वडिल, २)अजोबा,३)पंजोबा किंवा आईचे श्राद्ध असेल तर १) आई, २) आजी,३) पणजी असे तीन पिढ्यांना उद्देशून केले जाणारे श्राद्ध म्हणजे पार्वण श्राद्ध .हे श्राद्ध दरवर्षी येणारे सांवत्सरिक श्राद्ध होय. हे श्राद्ध आई आणि वडिल गेल्यावर पुत्राने करावे. ( जिवंत असताना करु नये.) एका पेक्षा अनेक पुत्र असतील आणि वेगळे रहात असतील तर एकत्र येवुन करावे किंवा प्रत्येकाने स्वतंत्र ते ज्या तिथिला गेले असतील त्या तिथीला करावे.तारखेला करु नये.दर वर्षी कुळधर्म कुळाचारा प्रमाणेच न चुकता आईचे वेगळे व वडिलांचे वेगळे त्या त्या तिथीला करावे. श्राद्धाच्या दिवशी संपूर्ण घर सुचिर्भूत करावे,आपण सुचिर्भूत व्हावे,श्राद्धाला आचार संपन्न ब्राम्हण बोलावावेत, सोवळ्यात स्वयंपाक करावा. स्वयंपाकात प्रामुख्याने सहा प्रकारच्या रसाचे सर्व पदार्थ करावेत.ते सहा रस म्हणजे १)अंबट, २)तिखट ,३)तुरट,४) खारट,५)गोड आणि ६) कडू .या सर्व चविचे पदार्थ बनवावेत.प्रामुख्याने कढी, वडा खीर,कारल्याची भाजी, आमसुलाची चटणी असावी. प्रथम आलेल्या ब्राम्हणाचे स्वागत करावे. एकुण सहा ब्राम्हण सांगावेत पितर स्थानी तीन, देवस्थानी दोन व श्राद्ध विधि चालवणारा एक असे एकुण सहा ब्राह्मण असावेत. परिस्थिती नसेल तर तीन सांगावेत एक पितरस्थानी , एक देव स्थानी व एक श्राद्ध विधी सांगणारा.एवढी ऐपत नसेल तर एकच ब्राह्मण सांगावा त्याला पितरस्थानी बसवावे व देवस्थानी पाटावर शाळीग्राम ठेवून सर्व विधी करावेत. जर सहा ब्राह्मण असतील तर तीन ब्राह्मण उत्तरे कडे तोंड करुन पाटावर वडिल,आजोबा , पंजोबा यांचे प्रतिनिधी म्हणून बसवावेत. येथे वडिल ,आजोबा, पंजोबा यांचे मंत्रयुक्त आव्हाहन करावे. पूर्वेकडे तोंड करुन पाटावर दोन ब्राह्मण देवाचे प्रतिनिधी म्हणून बसवावेत. येथे पुरव व आर्द्रव या दोन देवांचे मंत्रयुक्त आव्हाहन करावे व या सर्वांचे आसन, अर्घ्यपाद्यादि पूजन करुन, सर्व अन्नपदार्थावर यवोदक तिलोदक दर्भाच्या काडीने गायत्री मंत्राने प्रोक्षण करावे. या नंतर प्रथम ब्राह्मण भोजन घालावे.भोजन शक्यतो केळीच्या पानावर वाढावे.प्रथम पानाला तूप लावावे, मग भात वाढावा व त्या नतर नाना प्रकारच्या चटण्या , कोशिंबीरी,रायते, भाज्या, सर्व वाढून झाले की मग भातावर पुन्हा वरण व तूप वाढावे. भोजन झाल्यावर तीन पिंड करावेत.पिंड करताना भातामधे खीर,वडा व सर्व भाज्या किंचित प्रमाणात घालुन तीन मोठे पिण्ड करावेत व या पिण्डदाना वडिल,आजोबा, पंजोबा यांचे स्मरण करुन पूजन करुन तर्पण करावे. शक्यतो श्राद्ध प्रयोग स्वतः चालवावा व आपण कुठे चुकत नाहीना हे तपासण्या साठी अधिकारी ब्राह्मण बोलवावेत पण आता आम्ही साधी संध्या सुद्धा करता येत नाही आणि येत असेल तर वेळ नाही. २) एकोदिष्ट श्राद्धः- एकोदिष्ट श्राद्ध म्हणजे फक्त एकाच व्यक्तीला उद्देशून केले जाणारे श्राद्ध .
एकोदिष्ट श्राद्ध म्हणजे एकाच व्यक्तीला उद्देशून केलेले श्राद्ध . आता हे श्राद्ध कोणी कोणाकरता करावे ? तर १)प्रथम घरच्या लोकांचे पाहु. घरचे म्हणजे स्वतःचा भाऊ , बहीण , गेले असतिल तर भावाने श्राद्ध करावे.
२) मुलगा गेला तर बापाने श्राद्ध करावे.
३) काका गेला असेल आणि त्याला कोणीच नसेल तर पुतन्याने श्राद्ध करावे.
४) आत्या गेली असेल आणि तिला कोणीच नसेल तर भाच्याने करावे.
६) बायको गेली आणि मुलगा नसेल तर नवर्याने करावे.
आता बाहेरचे पाहु .
१) मामा गेला आणि त्याला कोणीच नसेल तर भाच्याने करावे.
२) मावशी गेली आणि तिला कोणी नसेल तर बहिणीच्या मुलाने करावे.
३) सासरा गेला आणि त्याला कोणी नसेल तर जावयाने करावे.
४) कुलगुरु , आचार्यगुरु , विद्यागुरु, गुरु, मोक्षगुरु गेले आणि त्याना कोणी नसेल तर शिष्याने श्राद्ध करावे.
५) शिष्य गेला आणि त्याचे कोणिही नसेल तर गुरुंनी करावे.
६) मित्र गेला आणि त्याला कोणीही नसेल तर त्याचे श्राद्ध मित्राने करावे.
हे एकोदिष्ट श्राद्ध सुद्धा पार्वण विधि प्रमाणेच करावे. मात्र या श्राद्धाला दोनच ब्राह्मण चालतात.एक पितरस्थानी व एक देव स्थानी.
भरणी श्राद्ध : भरणी श्राद्ध हे मृत झालेल्या व्यक्तीचे प्रथम वर्षी भाद्रपद वद्य पक्षात म्हणजे पितरपंधरवड्यात ज्या दिवशी भरणी नक्षत्र असेल त्या दिवशी करावे.
भाद्रपदकृष्णपक्षे यस्मिन् दिने भरणीनक्षत्रं भवति तस्मिन् दिने पिण्डरहितं सांकल्पविधिना श्राद्धं कुर्यात्|
पिण्ड दान न करता नुसत्या संकल्प विधिने हे श्राद्द करावे.हे श्राद्ध गेलेल्या व्यक्तीचे फक्त एकदाच करावयाचे आहे.
श्राद्ध करण्याचा अधिकार कोणाला आहे? मुलगा त्याचे उपनयन झाले नसले तरी श्राद्धाचा अधिकार आहे.
मुलगी, नातू, पणतू, पत्नी, इस्टेट घेणारा मुलीचा मुलगा , सख्खाभाऊ, पुतण्या, चुलत भावाचा मुलगा , पिता, आई, सून , थोरली बहीण , धाकटी बहीण , त्यांची मुले , मामा, सपिंड, समानोदक ( सपिंड व समानोदक याचा अर्थ मागील लेखात सांगीतला आहे.) शिष्य, उपाध्याय, मित्र , जावई, या क्रमाणे पहिला नसेल तर दुसऱ्याने श्राद्ध करावे.
”पितृपक्ष”, ”अपरपक्ष”, *”पितृपंधरवडा”*अशा नावाने आपण भाद्रपद वद्य प्रतिपदा ते अमावास्या या पंधरा दिवसाला ओळखतो.अनेकांच्या मनात पितरांकरता हेच पंधरा दिवस का निवडले ? अशी शंका येणं साहजीक आहे. मग हाच कालावधी का निवडला ? तर याचे कारण, पूर्वी आश्विन शुद्ध प्रतिपदे पासून वर्षारंभ व्हायचा. म्हणजे वर्ष सुरु व्हायचे आणि भाद्रपद महिना अखेर म्हणजे भाद्रपद आमावास्येला वर्ष संपत असे.वर्षाच्या शेवटी सर्व पितरांच्या तृप्ती करता एक श्राद्ध करण्याची चाल निर्माण झाली. आणि तीच चाल सद्या चालु आहे. हे कृत्य आपल्या पितरांच्या रूणातून मुक्त होण्यासाठी कृतज्ञताबुद्धिने केले जाणारे श्राद्ध आहे. मग हाच काल श्राद्धाकरिता का ठरवला गेला? तर त्याचे कारण असे आहे की, स्वर्गात सहा महिन्याचा दिवस आणि सहा महिन्याची रात्र असते.आपले एक वर्ष म्हणजे देवांचा एक अहोरात्र,म्हणजे एक दिवस आणि एक रात्र असते. यालाच आपण दक्षणायण आणि उत्ररायण म्हणतो. दोन्हींचा कालावधी सहा सहा महिन्याचा असतो. आपण भाद्रपद वद्य पक्षात महालय श्राद्ध करत असतो.हे श्राद्ध आपण दक्षिणायनात करत असतो.दक्षिणायन म्हणजे स्वर्गातली रात्र आणि पितृलोकातील दिवस असतो. कारण स्वर्ग हा पृथ्वीच्या उत्तरेस असून पितृलोक हा दक्षिणेस आहे.म्हणजे दक्षिणायनात दक्षिणेकडे सूर्य असल्यामुळे जरी उत्तरेकडील स्वर्गात रात्र असली तरी दक्षिणेकडील पितृलोकात दिवस असतो. पितरांना काही उद्देशून करायचे झाले तर ते दक्षिणायनातच करणे योग्य आहे आणि या कालावधीत अपरान्ह काळातच पितरांना उद्देशून भोजन देणे योग्य आहे. कर्क राशीपासून धनुराशीपर्यंत देवांचा दिवस धरल्यास कन्या व तूळ या राशीवर सूर्य असतो तेंव्हा पितरांचा अपरान्ह काळ असतो. वर्षातून एकदाच सर्व पितरांना भोजन द्यायचे कारण त्यांचा तो एक दिवस असतो. म्हणून महिन्याच्या दृष्टीने हाच कालावधी योग्य आहे. आता हा पितृलोक म्हणजे नेमकं काय आहे ते पाहु.
पितृलोक : पितृलोक म्हणजे अंतरिक्ष स्थान. स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यामधील अंतरिक्ष स्थानाला पितृलोक असे नाव आहे.या लोकात राहणाऱ्या पितराना पितृदेवता असेही म्हणतात .
माध्यामिको यम इत्याहुः | तस्मात् माध्यामिकात्पितृमन्यते |
यम हा पितृलोकाचा अधिपती आहे.असे रुग्वेदात म्हंटले आहे. निरुक्त छंदामधे देवतांचे तीन वर्ग सांगितले आहेत.
१) द्युस्थ,
२) अंतरिक्षस्थ,
३) पृथ्वीस्थ या वरुनच पितरांचे सुद्धा तीन प्रकार झाले.
१) खालच्या लोकात राहणारे,
२) मध्यम लोकात राहणारे, आणि
३) वरच्या लोकात राहणारे.या संदर्भात रुग्वेदात एक मंत्र आला आहे.
उदिरतामवरउत् परास,उन्मध्यमाःपितरःसोम्यासः|
असुं य ईयुरवृका रुतज्ञाः,ते नोsवन्तु पितरो हवेषु||
याचा अर्थ ,पितरांचे मुक्तकंठाने स्तवन करा.पितृगण सोमप्रिय आहेत.त्यापैकी कांही खालच्या, कांही मधल्या तर कांही वरच्या लोकात राहतात.ते सरळ वृत्तीचे, धर्म जाणणारे आणि प्राणरूप आहेत. हविदान करणाऱ्या आमचे ते रक्षण करो. छांदोग्य उपनिषदात यालाच ”पृथ्वीलोक”, ”सूर्यलोक” व *”ब्रह्मलोक”*म्हंटले आहे. तसेच पृथ्वी आणि चंद्रलोक यामधे पितृलोक असल्याचे वर्णन आढळते.
मासेभ्यः पितृलोकं पितृलोकात् आकाशम्,आकाशात् च चंद्रमसम् | (छांदोग्य५.१०.४)
वरिल सर्व लोक मृत्यूनंतर आत्म्याच्या प्रवासाचा एक मार्ग आहेत.
पृथ्वी , चंद्रलोक आणि सूर्यलोक या तिनही स्थानी, आपल्या कर्मा प्रमाणे जाणाऱ्यांना रुग्वेदात पितर असे म्हंटले आहे. या पितरांची गती कोणत्या कर्माने कोणत्या ठिकाणी होते हे छांदोग्य उपनिषदात सांगीतले आहे. म्हणून आत्म्याच्या पुढील गतीसाठी त्यांच्या तिथिला श्राद्ध करणे किती महत्वाचे आहे हे या वरून लक्षात येईल. आता सर्वांनाच गेलेल्या व्यक्तीची मृत्यू तिथी माहीत असतेच असे नाही. मृत्यूतिथी माहीत नसेल तर काय करावे?
मृत्यू तिथी माहीत नसेल तर काय करावे याचे विधान शास्त्रात पुढील प्रमाणे सांगीतले आहे.
१) मृत्यू तिथी माहीत नाही पण मृत्यू झालेला महिना ठावुक असेल तर त्या महीन्याच्या अमावास्येला श्राद्ध करावे.
२) मृत्यू तिथी किंवा महीना कांहीच ठाऊक नसेल तर माघ महिन्याच्या किंवा मार्गशीर्ष महीन्याच्या अमावास्येला श्राद्ध करावे.
३) एखादि व्यक्ती घरातून बाहेर पडली आणि पुन्हा आलीच नाही, कांहीच वार्ता लागली नाही तर ती व्यक्ती ज्या तिथीला घरातून बाहेर पडली असेल त्या तिथीला श्राद्ध करावे.
४) एखादी व्यक्ती घरातून निघुन गेली आणि कधी मेली ते कळले नाही मात्र मेला आहे ही बातमी ज्या तिथीला कळेल त्या तिथीला श्राद्ध करावे.
५) एखादी व्यक्ती घरातून निघुन गेली , शोध लागला नाही तर पंधरा वर्ष वाट पहावी. पंधरा वर्षात आला नाही तर त्याची प्रतिमा करुन त्यावर अंत्य विधी करावा, चवदाव्या दिवसा पर्यंतचे सर्व क्रियाकर्म करावेत व प्रतिमेला अग्नी दिला ती तिथी धरावी. (या ठिकाणी मी हे सांगु इच्छितो की कांही मंडळी पुढाऱ्यांचे पुतळे जाळतात हे अतीशय अशुभ कर्म आहे.असे करु नका.)
६) पंधरा वर्ष वाट पाहुन मृत झाला असे समजुन अंत्यविधी क्रियाकर्म केले असेल आणि अचानक अशी व्यक्ती कधी घरी आली तर त्याचा पुनर्जन्म झाला असे समजून त्याचा जातकर्म विधी करुन त्याला व्यवहारात घ्यावे.
७) श्राद्धाच्या दिवशी सोयर किंवा सूतक असेल तर ते संपल्यानंतर ताबडतोब श्राद्ध करावे.किंवा त्या महिन्याच्या एकादशीला अथवा अमावास्येला श्राद्ध करावे अथवा पुढील महीन्याच्या त्याच तिथीला करावे.
८) श्राद्ध करणाऱ्यांच्या पत्नीला मासिक पाळीची अडचण आली असेल तर पिण्ड न करता श्राद्ध करावे किंवा पाचव्या दिवशी श्राद्ध करावे आणि महालय श्राद्ध असेल तर ते पुढे ढकलावे.( महालय श्राद्ध दिवाळी पर्यंत केंव्हाही करता येते.)
९) पत्नी नसल्यास अथवा तुम्ही प्रवासात असाल तर शिधा द्यावा अथवा हिरण्यश्राद्ध करावे म्हणजे नुसती दक्षिणा द्यावी.
१०) संध्याकाळी , सध्याकाळच्या जवळच्या वेळेला अथवा रात्री श्राद्ध करु नये.
११) श्राद्ध शक्यतो तळमजल्यावर स्वतःच्या घरातच करावे अथवा दुसऱ्याच्या घरात त्याच्या परवानगीने करावे.
||आपत्कालीन श्राद्ध प्रकार||
१) श्राद्धाच्या दिवशी आचार संपन्न उत्तम ब्राह्मण मिळाले नाहीत तर जसे ब्राह्मण मिळतील तसे सांगुन श्राद्ध करावे.
२) आईचे श्राद्ध असेल आणि ब्राह्मण मिळत नसतील तर सुवासिनी बोलवुन(सांगुन) श्राद्ध करावे.
३)कोणीच ब्राह्मण मिळाले नाहीत तर पाटावर दर्भाचे ब्राह्मण बसवावेत आणि यथाविधी श्राद्ध करावे.याला चटश्राद्ध असे म्हणतात .
४) स्वतःला राजकार्यामुळे, तुरुंगवासामुळे, अथवा अजारपणामुळे श्राद्ध करण्यास जमत नसेल तर आपल्या पुत्राकडून, शिष्याकडून अथवा ब्राम्हणाकडून श्राद्ध करुन घ्यावे.
५) विधियुक्त श्राद्ध करणे शक्य नसेल तर आमश्राद्ध करावे. आमश्राद्ध म्हणजे शिधा देवुन बाकी श्राद्धाचे सर्व विधी करावेत.
६) क्रमाने वरीलप्रमाणे श्राद्ध करणे शक्य नसेल तर हिरण्यश्राद्ध करावे. हिरण्यश्राद्ध म्हणजे फक्त दक्षिणा देवुन केले जाणारे श्राद्ध . या श्राद्धात पिण्ड दान करत नाहीत.७) ब्रह्मार्पणविधीने*श्राद्ध करावे.ब्रह्मार्पणविधी म्हणजे ब्राम्हणांना घरी बोलावुन हातपाय धुतल्यावर आसनावर बसवावे,त्यांची पंचोपचार पूजा करावी आणि *पितृस्वरूपी जनार्दन वासुदेवो प्रीयताम् असा संकल्प करुन भोजन घालावे व दक्षिणा द्यावी.
८) पिण्डश्राद्ध करावे. पिण्डश्राद्ध म्हणजे संकल्पपूर्वक केवळ पिण्ड दान करावे.येथे ब्राह्मण भोजन नाही घातले तरी चालते.
९) वरिल कांहीही करणे शक्य नसेल तर पितरांच्या नावाने पाण्याने भरलेला कुंभ ब्राह्मणाला द्यावा.
१०) एखाद्या गरीबाला, भुकेल्याला अन्न देवुन पितरांचे स्मरण करावे.अथवा
११) ब्राम्हणाला तीळ देवुन पितरांचे स्मरण करावे. अथवा
१२) थोडी दक्षणा देवुन पितरांचे स्मरण करावे.अथवा
१३) यथा शक्ती धान्य देवुन पितरांचे स्मरण करावे.अथवा
१४) गाईला गवत घालुन पितरांचे स्मरण करावे. अथवा
१५) तिलोदकाने तर्पण करावे.अथवा
१६) थोडे गवत जाळुन पितरांचे स्मरण करावे.अथवा
१७) श्राद्धाच्या दिवशी उपवास करुन पितरांचे स्मरण करावे. अथवा
१८) श्राद्ध विधी वाचावे, किंवा ही माहीती वाचून पितरांचे स्मरण करावे.
१९) या पैकी कांहीही करणे शक्य नसेल तर वनात जावुन गवताची काडी सूर्याला व लोकपालांना दाखवून दोन्ही हात वर करुन प्रार्थना करावी की , हे पितरांनो माझ्याजवळ श्राद्धाकरिता कांहीही धनसंपत्ती नाही.मी सर्व पितरांना नमस्कार करतो.माझ्या प्रार्थनेने सर्व पितर तृप्त होवोत. अथवा
२०) निर्मनुष्य अरण्यात जाऊन हात वर करून मोठ्याने म्हणावे हे पितरांनो मी निर्धन आहे, मला पितृरूणातून मुक्त करा. अथवा
२१) दक्षिणेकडे तोंड करून रडावे.
अर्थात हे सर्व पर्याय आहेत.
वाचकहो यावरून आपल्या असे लक्षात आले असेल की प्रति वर्षी श्राद्ध करणे किती महत्वाचे आहे. जेवढे कुळधर्म कुळाचाराला महत्व आहे तेवढेच महत्व दर वर्षी येणाऱ्या श्राद्ध कर्माला आहे.
कृपया लेख पुढे पाठवताना नावासकट पाठवावे ही विनंती.
राष्ट्रीय कीर्तनकार
ह भ प. श्री पुरुषोत्तम महाराज कुलकर्णी पुणे
७०३८०३३३६१
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा