श्रीने आईला जरा अर्जंट बोलवलं म्हणून आई दुपारीच पोहचली, मुग्धा ऑफिसला गेलेली होती, पण श्री आईला घ्यायला स्टेशनवर गेला, गाडीतबसताच आईने विचारलं, "काय रे मुग्धाची तब्येत बरी आहे ना ?"
अग आई तब्येत एकदम छान आहे तिची, पण चार दिवसांनी तिला आठवा महिना लागेल त्या आधी मला तिचं सरप्राईज डोहाळे जेवण करण्याची आयडिया आली आहे डोक्यात. म्हणून तुला आणि तिच्या आईला पण बोलावलं आहे मी.
आई हसायला च लागली अरे, दुसऱ्यांदा गरोदर असलं की नाही करत डोहाळे जेवण फक्त सुरवातीलाच करतात. श्री म्हणाला मला वाटलंच होतं तू हे म्हणशील, पण मला सांग का करता ग डोहाळे जेवण ?
अरे का म्हणजे, "ती आई होणार असते ना, सृष्टीचा निर्मितीचा क्षण तिने आनंदाने स्वीकारावा,तिला आनंद मिळावा, आपली सृष्टी कशी बहरली की हिरवीगार दिसते, तसा बहरण्याचा तिचा क्षण ती पण कशी छान अंगोपांगी बहरते शरीराने, नवनिर्मितीचे तेज तिच्या चेहऱ्यावर झळकत असते. मग तिलाही ह्या धरणी माते सारखं हिरवं वस्त्र घेतात म्हणून तर हिरव्या रंगाची साडी आणि त्या साडीची आठवण मग आयुष्यभर तिला त्या गोड क्षणांची आठवण करून देते, त्या गर्भाला वेगवेगळ्या चवी हव्या असतात ते तिचे डोहाळे. सोबतीला हलके झोके आणि आनंदाचे गाणे. आई गुणगुणत होती, "लाडक्या राणीला लागले डोहाळे,पुरवा सोहळे रामराया".
आई, हेच गाणं परवा कुठंतरी ऐकलं आणि मला मग वाटलं की फक्त पहिल्याच वेळी एवढा थाट त्या बाळाच्या आगमनाचा मग दुसर्या वेळी का नको?? अग आताही तिला आनंदी रहायच आहे त्या बाळाला तिचे आनंदी ठोके ऐकायचे आहेत ना, पहिल्या वेळेस नव्हती एवढी खम्बीर, पण आताआई आहे ती. पण तरीही हा सोहळा करायला काय हरकत आहे ? आपण सगळे सणवार करतोच की परत परत. तसं हे आहे दुसर्यांदा तर साजरा करायला काय हरकत आहे ? मग मी ठरवलं आहे काही सांगायच नाही तिला. झोपाळा, फुलांची वाढी सगळी ऑर्डर देऊन झाली आहे. आता आपण मस्त हिरवीगार साडी घेऊ. रेडिमेड ब्लाउज घेऊ, आणि उद्या सोहळा करूच.
आईला मनोमन समाधान वाटलं. एवढा छान विचार आपल्या मुलाने केला खरं फार छान वाटलं. आई होतानाच्या ह्या आठवणी फार सुंदर असतात, आजही त्यांना त्यांच डोहाळजेवण आठवलं आणि हसू आलं. तेवढ्यात गाडी साडीच्या दुकानासमोर थांबली. दोघांनी हौसेने हिरवीगार सुंदर साडी निवडली। दुसऱ्या दिवशी श्रीच्या सासुबाई पण आल्या मुग्धाला. कळेचना ह्या दोघी का आल्या. पण दोघींनी वेगवेगळी कारण सांगुन दिली ती ऐकून मुग्धा ऑफिसला गेली. आणि मग ह्यांची सोहळा मोहीम सुरू झाली. श्रीच्या सासुबाईला जावयाची कल्पना आणि तयारी सगळीच फार आवडली. श्री स्वतः आर्टिस्ट असल्याने होडी, चंद्र, रथ ह्याचे सुंदर सेट बनवले होते. ते सुद्धा त्याने मांडून दाखवले मग तर मुग्धाच्या आईच्या डोळ्यात पाणीच आलं. विहिणबाई नशिबानं घ्यावं लागतं बरं..,
त्यावर हसत श्री ची आई म्हणाली अहो नशीबापेक्षा नव्या विचारांनी, कल्पनांनी घ्यावं लागतं. आपल्या तर कधी डोक्यात पण आलं नाही दुसरं डोहाळजेवण. दोघीही हसल्या खळखळून. छोटीशी चिमणी दुपारी शाळेतून आली. हे सगळं आईला बसायला म्हंटल्यावर तिला हसूच आलं. मग तिने पण आजीला रांगोळी काढायला मदत केली. मुग्धा ऑफिसमधून येण्यापूर्वी पाहुण्यांनी घर गच्च भरलं. सगळ्या मैत्रिणी, नातेवाईक सगळ्यांनाच हा थाट पाहून जरा वेगळंच वाटलं. मांडणी ,सजावट सगळं फार छान पण दुसऱ्यांदा डोहाळजेवण?असा प्रश्न अनके वयस्कर बायका घेऊन मिरवत होत्या आणि असा नवरा मिळावा म्हणून काही नवीनच लग्न झालेल्या म्हणत होत्या.
मुग्धा बाहेरच चपलांचा ढिग बघून भांबावली. सनईचे सुर, फुलांचा घमघमाट, अहाहा तिला एकदम प्रसन्न वाटलं, ती मध्ये शिरताच सगळ्यानी टाळ्या वाजवल्या. समोरचा सजवलेला झोपाळा तिला कळून चुकलं, श्रीच नेहमी सारखं आगळं वेगळं सरप्राईज. तिला सासुबाईनी फ्रेश होऊन यायला पाठवलं. आईने देवापुढे बसवून ती हिरवीगार साडी ओटीत दिली. अगदी तिला आवडतो तसाच प्रसन्न हिरवा रंग,... ती मनोमन सुखावली. आधीच गर्भाच तेज आणि त्यात ह्या आनंदाच. साडी नेसताच तिची मैत्रीण फुलांचे दागिने घेऊन आली. सगळे तिला घातले,...
ते घालताना तिला आठवलं पहिल्या डोहळजेवणाला आपण एवढं एन्जॉय नव्हतं केलं. कारण ह्या घरात नवीन, त्यात सगळ्यांचे स्वभाव एवढे जुळले नव्हते, बऱ्याच वेळा होणारे वाद, रुसवे आणि त्यात ते न पेलवणार गर्भारपण पण आता आपण एका बाळाची आई आहोत.अतिशय विचारपूर्वक हे गर्भारपण आपण स्वीकारलं आहे, त्यामुळे मन आधीच आनंदी आणि त्यात हा आनंद.
आंनदी चेहऱ्याने ती झोपाळ्यावर, रथावर, चंद्रावर आणि होडीतही बसली ज्यांच्याकडे ट्रीटमेंट चालू होती त्या डॉकटर पण आल्या होत्या. त्यांना हे सगळं खुप आवडलं. आणि त्यांनी आवर्जून दोन शब्द व्यक्त केले, जन्म देताना होणार त्रास तिच पेलणार आहे, पण असं जर प्रत्येक आईची आनंदाच्या क्षणांनी ओटी भरली तर ते क्षण तिला त्या वेदनादायी प्रवासात नक्कीच सोबत करतील.
दोघी विहिणबाईनी मिळुन,... " लाडक्या राणीला लागले डोहाळे पुरवा सोहळे रामराया,.." हे गाणं म्हंटल,... आणि तिने भावूक होऊन श्री कडे पाहिलं आणि त्याच क्षणी पोटातील बाळ पण मासोळी सारखी हालचाल करून आनंद व्यक्त करतंय असं तिला जाणवलं.
© स्वप्ना मुळे (मायी) औरंगाबाद.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा