डॉ.विजय सरपोतदार ऑपरेशन थिएटरमधून बाहेर पडता पडता आपल्या टीमला म्हणाले..
'Dont disturb me for a while...'
त्यांचा मुलगा डॉ. विनय व इतरांनी माना डोलवत 'येस सर' म्हंटलं तसे ते बाहेर पडून कॉरीडॉर मधे आले.
ओटी समोरच्या खुर्चीत एक वयस्कर स्त्री ओढग्रस्त चेह-याने बसली होती. डॉ.विजय तिच्याकडे चालत गेले तशी ती चटकन उभी राहिली..
'बसा..बसा...झालय ट्रान्सप्लांट... आठ तास लागतील त्या शुद्धीवर यायला. पण चोवीस तास तुम्हाला त्यांना भेटता येणार नाही. त्या ऑब्जर्वैशन खाली राहतील...'
'खूप खूप आभारी आहे मी तुमचे डॉक्टर..'
डॉ.विजय फक्त थोडेसे हसले व आपल्या केबिनच्या दिशेने निघाले..परत काहीसे आठवून वळाले व त्यांनी विचारलं..
'पेशंट तुमच्या कोण?'
'माझी धाकटी बहीण...तिही डॉक्टर आहे. आम्ही साता-यात राहतो. आम्हाला पुणे जवळ खरे तर...पण तिचा हट्ट होता की तिचे ट्रान्सप्लांट इथे मिरजला, तुमच्याकडेच व्हावे. म्हणून इथे घेउन आलो.'
'आणि हार्ट डोनर?'
'माझे मिस्टर.. स्कुटरवरुन घसरुन पडले पावसात.. तेंव्हापासून गेले दोन महिने कोमातच होते..आज पहाटे डॉक्टरांनी ब्रेन डेड सांगितले..तातडीने त्यांना घेउन इथे आलो...' त्या बाईंनी अगदी matter of factly सांगीतलं. शेवटी दोन महिन्यात मनाची तयारी होतेच माणसाची. डॉ.विजयनी मान डोलवली व ते कोप-यावरच्या आपल्या केबिनमधे शिरले. आतून कडी लावून घेतली. अन..आता पर्यंत रोखून धरलेला त्यांचा बांध फुटला.
डॉ.विजय यांच्या डोळ्यातून अश्रु वाहू लागले.
डॉ.विजय सरपोतदार व डॉ.राधीका लंबे, दोघे मिरज मेडिकल कॉलेजला MBBS ला एकत्र होते, चाळीस वर्षांपूर्वी. त्या काळी जेंव्हा मेडिकल कॉलेजेसमधे देखील प्रेम प्रकरणं दुर्मिळ होती, तिथे तिस-या वर्षी विजय व राधीका एकमेकांच्या प्रेमात पडले. विजय राधीकाच्या साधेपणाच्या व तिच्या गोड गात्या गळ्याच्या प्रेमात होता. राधीका विजयच्या लाघवी स्वभावावर व अंगभूत हुशारीवर जीव ओवाळून टाकत होती. राधीका अतिशय सुरेल गायची. वार्षिक स्नेहसंमेलनात ती कॉलेजची स्टार सिंगर असायची. डॉक्टरकी घरातच असलेल्या विजयची घरची परिस्थिती तगडी असल्याने तो तेंव्हाही कॉलेजला कधीकधी स्कुटर घेउन यायचा. मग तो अन राधीका मिरज जवळच्या दंडोबा डोंगरावर स्कुटरवर जायचे. भन्नाट वा-याच्या संगीतावर राधीका गायची, विजय ते तल्लीन होउन ऐकायचा. पण विजयच्या घरच्यांना या प्रकरणाची खबर लागली व त्याच्या वडिलांनी त्याला सक्त ताकीद दिली. जर तू त्या मुलीचा नाद सोडला नाहीस तर तुझे पुढचे MD /MS चे स्वप्न विसरुन जा. पुढे शिकण्याची खूप महत्वाकांक्षा बाळगणा-या विजयला शेवटी वडिलांच्या इच्छेपुढे झुकावेच लागले. एक दिवस त्याने तिला सारी परिस्थिती सांगितली. राधीकाने समजून घेतलं..पण ती खूप दुखावली.
'मी तुला हृदय दिलय विजय. मी पुन्हा जन्मात कुणा दुस-या व्यक्तिवर प्रेम करेन असे मला वाटत नाही.' अन ती त्याच्या आयुष्यातून दूर झाली. त्यांच्या MBBS च्या शेवटच्या वर्षीचे स्नेहसंमेलन राधीकाच्या अप्रतिम गाण्याने गाजले. विजय मुद्दामच ते पहायला गेला नाही. तिने गायलेले गाणे नंतर त्याला कळाले तेंव्हा विजय तसाच रडला होता जसे आता पासष्ट वर्षीय डॉ.विजय सरपोतदार रडले होते. डॉ.विजयनी मेहनतीने मुंबईतून MS ची पदवी घेतली. तिथेच बॉम्बे हॉस्पिटलमधे काही वर्षे नोकरी केली. काही वर्षातच तो नामांकित हार्ट सर्जन म्हणून नावारुपास आला. घरच्यांच्या दबावाखाली त्याने लग्न केले. त्याची पत्नी आशा डॉक्टर नव्हती पण समजूतदार गृहिणी होती. तिने साथ दिली व विजयने मिरजला येउन वडिलांच्या हॉस्पिटलचा ताबा घेतला. मिरजेतीलच नाही तर पूर्ण महाराष्ट्रातील नामांकित हृदय रोग तज्ञ म्हणून तो लवकरच नावारुपास आला. परदेशात अनेक वेळा जाउन डॉ.विजयनी हार्ट ट्रान्सप्लांट ची अवघड शस्त्र क्रिया आत्मसात केली अन महाराष्ट्रातील पहिली हार्ट ट्रान्सप्लांट मिरज मधे यशस्वीपणे करुन त्यांनी इतिहास घडवला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. एक प्रथितयश हृदय शल्य विशारद म्हणून आज तीन दशक हे हॉस्पीटल चालवल्यावर आता ते पुढच्या पिढीकडे, म्हणजे मुलाकडे त्यांनी सोपवले होते. आता सा-या इतर शस्त्रक्रिया मुलगा व त्याचे सहकारी करायचे. फक्त ट्रान्सप्लांटला मात्र डॉ. विजय स्वतः हजर असायचे. आदल्या दिवशीच परदेशातून पुण्यात पोचून, उशीरा मिरजला आलेले डॉ.विजय, थेट सकाळी या शस्त्रक्रियेसाठी आले होते. फाइल चाळताना राधीका लंबे हे नाव वाचून त्यांना आधी धक्काच बसला. पण जात्याच्या डॉक्टरला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवावं लागतं. तसे ते ठेवत डॉ.विजय यांनी ती शस्त्रक्रिया नेहमीच्या कुशलतेने पार पाडली. शस्त्रक्रिया झाल्यानंतर मात्र त्यांना भावना आवरता येत नव्हत्या. म्हणूनच आपल्या केबिनमधे येउन त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली होती.
त्यांनी हळूच टेबलवर पडलेली डॉ.राधीका लंबें ची हिस्टरी फाईल उघडली. MBBS नंतर आपल्या गावी, साता-यातच तिने दवाखाना चालू करुन जनरल प्रैक्टिशनर म्हणून आपली कारकिर्द घडवली होती. तिच्या हृदयात कॉम्प्लिकेशन्स तीन वर्षापूर्वी उघडकीस आले होते. तिच्या ह्दयाच्या झडपा निट काम करत नव्हत्या. सतत दम लागत होता. त्यामुळे तिने दवाखानाही बंद केला होता. साता-यात असलेल्या बहिणीने, सुजाताने आग्रह केल्याने पुण्यात स्पेशलिस्टना दाखवले तर त्यांनी हार्ट ट्रान्सप्लांट करावे लागेल असे सांगितले. हार्ट डोनरच्या प्रतिक्षेत गेली दोन वर्षे असताना अचानक सुजाताचे पती शरद क-हाडवरुन साता-याला हायवेने येताना त्यांची मोटार सायकल पावसाच्या पाण्यात घसरली. डोक्याला जबर मार बसला. क-हाडला कृष्णा हॉस्पिटलमधे लोक त्यांना घेउन गेले. तातडीने शस्त्रक्रियाही झाली पण मेंदुत खूप रक्तस्राव झाल्याने ते जे कोमामधे गेले ते त्यातून बाहेर आलेच नाहीत. काल रात्री उशीरा डॉक्टरनी त्यांना ब्रेनडेड घोषीत केले. सुजाता व तिच्या मुलाने तो महत्वपूर्ण निर्णय घेतला. पहाटे एकाच एम्बुलेंस ने राधीका व शरद दोघांनाही मिरजला तातडीने आणण्यात आले व सकाळीच ही शस्त्रक्रिया पार पडली होती.
डॉ.विजयनी फाइलमधे पेशंटचा फोटो लावतात तो फॉर्म उघडला. त्यावर राधीकाचा सध्याचा फोटो होता. त्यांनी त्यावरुन हात फिरवला. परत एकदा त्यांना भरुन आले. त्या फॉर्मवर Marital status 'unmarried' असे लिहीले होते. तर Close relative मधे बहिणीचे नाव होते. याचा अर्थ तिने चाळीस वर्षापूर्वी त्याला बोलल्याप्रमाणे कधीच विवाह केला नव्हता. राधीकाने आपला शब्द खरा केला होता. तिचे हृदय तिने इतर कोणालाच दिले नव्हते. आज तेच हृदय त्याच डॉ.विजयकडून तिने ट्रान्सप्लांट करवले होते. डॉ.विजयनी यु ट्युब उघडले. राधीकाने शेवटच्या वर्षी गायलेले तेच गाणे आपल्या फोनवर लावले व आपले डोळे मिटत आपल्या खुर्चीच्या हेड रेस्टवर डोके टेकले. गाणे ऐकताना डॉ.विजय यांच्या मिटलेल्या डोळ्यानी नकळत अश्रुंना वाट मोकळी करुन दिली होती..लता गात होती..
'वो दिल कहांसे लाउं...तेरी याद जो भूला दे...'
© सुनील गोबुरे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा