शनिवार, १८ ऑक्टोबर, २०२५

2322. असे शिक्षक आणि असे विद्यार्थी

    नाशिक जिल्ह्यातील ‘वाखारी’ नावाच्या छोट्याशा खेडेगावात नुकतंच रुजू झालेल्या आणि अल्पावधीतच पंचक्रोशीत आरा (आनंदराव रामभाऊ) गुरूजी या नावानं ओळखलं जाणाऱ्या एका तरुण शिक्षकानं शाळेच्या परिसरात एका लहान मुलाला फिरतांना पाहिलं..
रस्त्यावर भटकणाऱ्या त्या मुलाच्या पायात चपला नव्हत्या,
आणि डोळ्यांत स्वप्नं असली तरी शिक्षणाची वाट त्याला माहीतच नव्हती..
गावकुसाबाहेरच्या वस्तीत रहाणारा असल्यानं परिस्थिती बेताचीच होती; आरा गुरूजींनी त्याला हाताला धरून शाळेत आणलं आणि त्याच्या मनात शिक्षणाचा दिवा पेटवला.”बाळा,तुझं आयुष्य तुझ्याच हातात आहे,"गुरुजी म्हणाले,”पण त्याला आकार द्यायचा असेल तर शिकायला हवं." गुरूजींनी पालकांच्या परवानगीविना स्वत:च त्याला शाळेत दाखल करून घेतलं..
त्या साध्या शब्दांनी या मुलाच्या आयुष्याला दिशा दिली.
त्यानं शिक्षणाला आपलं सर्वस्व मानलं.गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली तो शिकत राहिला.
गावातून शहरात,या शहरातून त्या शहरात आणि मग एका मोठ्या बँकेत अधिकारीपदापर्यंतचा त्याचा प्रवास थक्क करणारा होता..
मेहनत,जिद्द आणि गुरुजींच्या आशीर्वादाने तो बँकेत वरिष्ठ अधिकारी बनला.आपल्या मुलांनाही उच्चशिक्षित बनवलं,
बडोद्यासारख्या शहरात स्वत:ची दोनेक घरं घेतली,कुटुंबाला सुखी केलं,घरी गूजराती सुनाही आल्या पण मनात नेहमी एक कृतज्ञतेची भावना जपली ती होती गुरुजींसाठी ज्यांनी त्याला आयुष्याची पहिली पायरी चढायला शिकवलं..
आता निवृत्ती नंतर त्याला गावची ओढ लागली,आपल्या लोकांच्या आठवणीनं मन व्याकूळ होऊ लागलं,गुरुजींची आठवण तीव्रतेनं जाणवू लागली..
धाकटा मुलगा पुण्यात शिफ्ट झाल्यानंतर त्यानं पुन्हा गावी जायला सुरूवात केली,गावातल्या घराचं नुतनीकरण केलं,
नव्यानं शेतीही विकत घेतली पण एव्हाना त्याचे गुरूजी कधीच हे जग सोडून गेले होते..
“पुण्यात आपल्या गुरुजींच्या नातवांचं हॅास्पिटल आहे” असं जेव्हा त्याला कळलं तेव्हा त्याला प्रचंड आनंद झाला त्यानं भेटायला जायचं ठरवलं..
ढोबळ माहितीमुळं हॅास्पिटलचं नाव सर्च करून कॅाल केले फोन कधी पिंपरीत कॅाल लागला तर कधी खराडीत पण आज बरोब्बर कॅाल लागला आणि डॅाक्टरांचं नाव ऐकून कॅब मागवत हा विद्यार्थी हडपसरहून पेठेत हजर झाला..
"मी तुमच्या आजोबांचा विद्यार्थी ‘अरुणकुमार’ तुमच्या आजोबांनीच मला शाळेत घातलं आणि आज मी जे काही आहे त्याचं सगळं श्रेय त्यांनाच आहे." 
आमच्या आजोबांच्या या विद्यार्थ्याला बघून आणि त्यांच्या आठवणी ऐकून आम्हालाही भरून आलं..
आजोबांचा साधेपणा,प्रसंगी कठोर पण तितकाच प्रेमळ स्वभाव आणि त्यांच्या प्रत्येक विद्यार्थ्याप्रति योगदान..त्यांना काय सांगू आणि काय नको असं झालं होतं..
“त्या दिवशी त्यांनी मला शाळेत नेलंच नसतं तर?” ते राहून राहून एकच वाक्य पुटपूटत होते..
आज या भेटीतून एक नवीन बंध जन्मला; जगात प्रेम,मुल्ये आणि कृतज्ञता जिवंत असल्याची जाणीव झाली; ही भेट फक्त दोन पिढ्यांची नव्हती तर ती होती एका शिक्षकाच्या दूरदृष्टीची आणि एका शिष्याच्या कृतज्ञतेची..
एका शिक्षकानं दिलेला हात आणि विद्यार्थ्यानं दिलेल्या सकारात्मक प्रतिसादात एक उज्ज्वल भविष्य देण्याची ताकदंय हे मनोमन पटलं..
हल्ली तर मुलांना शाळेत दाखल करायचा वेगवेगळ्या अटीशर्ती असतात..
आधी तुमचा आर्थिक-सामाजिक स्तर बघितला तर जातोच त्यापलिकडं पालकांपैकी कुणीतरी एक घरी असावं-शाळेच्या ठराविक परिघातच रहिवास असावा-मुलाच्या डब्यात सांगितलेला मेन्यूच असावा एवढंच काय एका शाळेची “मुलास जन्मजात मधुमेह नसावा” ही अट देखील वाचलेली मला आठवली..
नावाखेरीज एका शब्दाचीही विचारणा न करता किंबहुना आपल्या मुलाचं नावं रेकॅार्डला ज्या शैलीत ‘अशोककुमार’ लिहिलं अगदी त्याच शैलीत आपल्या विद्यार्थ्याचंही ‘अरुणकुमार’ नाव लिहित स्वत:हून विद्यार्थ्याला शाळेत दाखल करून घेणारे शिक्षक हे आपले आजोबा होते या भावनेनं थोडं गहीवरूनही आलं ! 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...