शनिवार, १८ ऑक्टोबर, २०२५

2314. डोंगराएवढा माणूस

 "डॉक्टर , व्हिजिटला येता ? " चाळिशीतला एक माणूस आत येता येता विचारत होता.
" कुठं?" मी विचारलं.
त्यानं पत्ता सांगितला.
" त्या डोंगरात? " मी विचारलं.
" हो ; बायको आजारी आहे." 
" काय होतंय?  " मी विचारलं." 
" दोन दिवसांपासून भरपूर ताप आहे." 
" मग इकडेच आणायचं नाही का ? " 
" आणायची कंडीशन नाही. अपंग आहे ती ." 
" ठीक आहे ; एवढा पेशेंट तपासून झाला की जाऊ या." 
 थोड्याच वेळात आम्ही डोंगराच्या  रस्त्यावर होतो. काट्याकुट्यांतून, खड्ड्यांमधून एकदाचे डोंगराच्या पायथ्याशी पोहोचलो. नशीब की स्कूटर पंक्चर झाली नाही.   त्यानं एका छोट्याशा घराजवळ स्कूटर थांबवायला सांगितली. गाडी थांबताच तो पळत घरात गेला. मी तिथंच चिंचेच्या झाडाखाली उभा राहिलो.  तो केवळ डोंगर होता. जवळपास एकही घर नव्हतं. घरा पुढे दोनतीन गुरे होती तेवढंच प्राण्यांचं अस्तित्त्व. माणूस तर लांब लांब पर्यंत दिसत नव्हता.
 "डॉक्टर , आत येता नव्हं ? " त्यानं विचारलं आणि मी त्याच्या मागोमाग घरात गेलो. 
आत एक खाट होती. तिच्यावर एक बाई बसली होती. खाली परकर आणि वर लहानसं झंपर एवढाच पोशाख. मला बघताच ती हरकली. खुणेनंच तिनं नवऱ्याला कोण आहे म्हणून विचारलं.
" डॉक्टर आहेत डॉक्टर. तुला तपासायला आलेत." तो ओरडून म्हणाला. डॉक्टरचं नाव काढताच ती एकदम घाबरली. स्वतःचे दोन्ही दंड दाबून रडायला लागली.
"काय झालं? " मी विचारलं.
"तुम्ही इंजेक्शन देशीला म्हणून ती घाबरलीय." तो म्हणाला.
मी तिला विश्वासात घेतलं. इंजेक्शन देणार नाही हे पटवलं आणि मग व्यवस्थित तपासलं.
"फारसं काही नाही. साधा सर्दी ताप आहे. दोन चार दिवसांची औषधे दिली तर बरा होऊन जाईल." 
  मी बाहेर येऊन पुन्हा झाडाखाली थांबलो.
" यांना काय झालं होतं? या अपंग कशा ? " मी विचारलं.
" शिडीवरुन पडली तेव्हा मेंदूला मार लागलाय .तेव्हा पासून अशीच आहे." 
" किती वर्षं झाली या गोष्टीला ? " 
" बारा वर्षं झाली. लग्नानंतर दोनच वर्षांनी झालं हे." 
" काय सांगताय ? " 
" हो ना ! " 
" मग यांची सगळी कामं कोण करतं? सेवा सुश्रुषा..." 
" मीच की. तिला अंघोळ घालणं, स्वयंपाक करणं, तिला खाऊपिऊ घालणं. कपडे बदलणं, कपड़े धुणं अशी सगळी कामं मीच करतो." 
"यांना तर हर घटका माणसांची गरज पडत असणार. मग तुम्ही गावात रहायचे सोडून डोंगरात का राहता ? "  
"ती मोठी स्टोरी आहे. हीचं असं झाल्यावर गावातले लोक दुसऱ्या लग्नासाठी  माझ्या मागं लागले. रोज एक स्थळ घेऊन येऊ लागले. मी लग्न करणार नाही असं सगळ्याना सांगून दमलो. पण कुणी ऐकायला तयारच नव्हतं. मग सरळ इथं येऊन राहिलो." तो हसला. म्हणाला,  " पुन्हा स्थळ घेऊन कुणी आलंच नाही." 
एक क्षणभर गेला. विचारावं की नको, विचारावं की नको म्हणत मी एक प्रश्न मी विचारलाच.
" खरंच एवढ्या वर्षांत तुम्हांला एकदाही दुसरं  लग्न करावं असं वाटलं नाही ? " 
" नाही ! " तो ठामपणे बोलला, " तिच्या बाबतीत जे घडलंय ते माझ्या बाबतीत घडलं असतं आणि माझ्या आजाराला कंटाळून तिनं दुसरं लग्न केलं असतं तर मला कसं वाटलं असतं? " 
      अरेच्चा ! केवढं हे तत्वज्ञान ! डोंगराच्या पायथ्याला राहणारा, फाटकी विजार आणि तुटक्या वहाणा नेसलेला माझ्या समोरचा  तो मनुष्य आता मला डोंगराएवढा मोठा वाटत होता.

©डॉ.अशोक माळी,
साईनंदन पार्क, मिरज.
(माझ्या ' गोष्टी छोट्या -डोंगराएवढ्या ' या पुस्तकातून)
(Shared fb post )
💐💐💐
संकलन 91 9028914075

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...