रात्रीचे अकरा वाजले होते.
संपूर्ण घर झोपेत बुडालं होतं.
फक्त स्वयंपाकघरातून येणारा मंदसा छन-छन आवाज
त्या शांततेला भेदत होता.
टेबलवर अर्धवट जेवलेले ताट ठेवलेलं होतं.
भाजी थंड झाली होती, पोळी कडक झालेली,
आणि अर्चना त्या ताटाकडे बघत होती.
तिच्या डोळ्यांत झोप नव्हती.
फक्त थकवा आणि ओलसरपणा होता.
दाराच्या पलीकडून कुणीतरी डोकावलं,
पण तिला पाहणारा कोणीच नव्हता.
पहाटे पाच वाजता घरातील सगळे अजूनही निजलेले,
आणि अर्चना झाडू हातात घेऊन स्वयंपाकघरात कामाला लागलेली.
गॅसवर दूध ठेवलेलं, सासूबाईंसाठी चहा तयार होत होता,
मुलांच्या डब्यासाठी आलू पराठे बनवले होते,
आणि नवरा मनोजचा शर्ट प्रेस होत होता.
“इतका उशीर का झाला ? माझा चहा थंड झाला !”
सासूबाईंचा रोजचा ओरडा कानावर पडला.
अर्चना काहीच बोलली नाही.
फक्त मान खाली घालून तिने पुन्हा चहा बनवला -
जणू तिने आपल्या तोंडाला कुलूप लावलं होतं.
मनोज ऑफिसला जाताना फक्त एवढंच म्हणाला,
“कपडे नीट ठेव, मीटिंग आहे, उशीर होतोय मला.”
ना “निघतो” म्हटला,
ना “काळजी घे.”
फक्त चाव्या टेबलावर आपटल्या आणि निघून गेला.
दुपारपर्यंत घर चमकत होतं,
पण ती स्वतः मात्र फिकी दिसत होती.
सासू त्यांच्या कमरेच्या दुखण्याचं रडगाणं गात होत्या,
सासरे टीव्हीवर बातम्या पाहत होते,
मुलं शाळेत होती..
आणि ती भिंतीला टेकून बसली होती.
तिच्या बोटांपर्यंत थकवा पोहोचला होता,
तरीही ती सगळ्यांसाठी जेवण बनवत होती.
जेव्हा ती स्वतः जेवायला बसली,
तेव्हा भाजी थंड, पोळी कडक झाली होती.
तेवढ्यात दरवाजाची बेल वाजली.
शेजारच्या रत्नाताई आल्या.
“अगं अर्चना , तू दिवसभर या कामातच गुरफटलेली असतेस!
थोडा वेळ स्वतःसाठीही काढ ना!”
अर्चनाने हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली —
ते हसू तोंडावर होतं, मनात नव्हतं.
“वेळ माझ्या वाट्याला फक्त झाडू आणि भांडी घेऊनच आला आहे ताई…”
सायंकाळी मुलं परत आली,
त्यांच्यासाठी दूध, खाऊ, गृहपाठाचा डोंगर तयार होता.
रोहन आला तेव्हा फोनवर कुणाशी तरी बोलत हसत होता.
“आज ऑफिसमध्ये खूप काम होतं का?”
अर्चनाने हळूच विचारलं.
तो म्हणाला, “हो, थकलोय,”
आणि थेट टीव्हीसमोर बसला.
अर्चना काही बोलू पाहत होती..
“मीसुद्धा थकलेय, मनोज…”
पण तिचे ओठ बंद झाले.
कारण तिला ठाऊक होतं..
या घरात तिला थकण्याचा हक्क नव्हता.
रात्र गडद झाली.
मुलं झोपली, सासू-सासरे त्यांच्या खोलीत गेले.
अर्चना अजूनही स्वयंपाकघरातच होती —
गॅस बंद करत होती, सिंक पुसत होती, उद्यासाठी भाजी चिरत होती.
अचानक तिचं डोकं गरगरलं,
तिने भिंतीचा आधार घेतला.
डोळे मिटले,
आणि कधी झोप लागली हे कळलंच नाही.
रात्री दोनच्या सुमारास मनोज जागा झाला.
स्वयंपाकघराची लाईट लागलेलीच होती.
तो चिडला, “ही अजून काय करतेय ?”
तो तिथं गेला..अर्चना खुर्चीवर बसलेली,
डोकं खाली, पूर्ण शांत.
“अगं अर्चना , झोपलीस का ?”
कुठलाही प्रतिसाद नाही.
त्याने खांदा हलवला
शरीर गार झालं होतं.
त्याच्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडला.
तो किंचाळला — “आई! आई!”
सगळं घर धावत आलं.
डॉक्टर आले — पण उशीर झाला होता.
डॉक्टर म्हणाले,
“शरीर पूर्ण थकलं होतं. कदाचित अनेक दिवस तापात होती, पण विश्रांती घेतली नाही.”
मनोजच्या कानात जणू कुणीतरी हातोडा मारला. तो पुटपुटला
“पण तिने कधी सांगितलंच नाही की ती आजारी आहे…”
डॉक्टर शांतपणे म्हणाले -
“सांगण्यासाठी ऐकणारा तरी हवा ना…”
सकाळ झाली.
सूर्य उगवला, पण त्या घरात काळोख होता.
स्वयंपाकघरात तेच अर्धवट ताट पडलं होतं..
थंड आणि निःशब्द.
सासूबाई चहा बनवत रडत होत्या,
“कधी विचारच केला नाही की ती इतकं सहन करत होती…”
मुलांनी विचारलं “आई कुठे आहे ?”
मनोज काहीच बोलू शकला नाही.
काही दिवस गेले.
घर चालू होतं, पण जीवन थांबलं होतं.
एका संध्याकाळी मनोजला कपाटात एक डायरी सापडली —
वर लिहिलं होतं,
"माझं मौन"
पहिलंच पान उघडलं,
आणि डोळ्यातून अश्रू ओघळले —
> “आज ताप आहे, पण काम तर करायचंच आहे मला.
मी थांबले तर हे घर थांबेल.
कुणी विचारेल का की मी ठीक आहे का ? बहुतेक नाही.
मी आता एक मशीन झालेय,
जी सकाळी सुरू होते आणि रात्री बंद होते.”
“मला भीती वाटते की एखाद्या दिवशी मी कोसळेन,
आणि कुणाला कळणारही नाही. कदाचित तेव्हा लक्षात येईल
घर भिंतींनी नाही, एका स्त्रीच्या श्वासांनी चालतं.”
शेवटच्या ओळीवर मनोज थांबला “जर माझ्या जागी कधी दुसरी कुणी आली, तर तिला एवढंच विचार...
‘थकलीस का?’
हे शब्द एखाद्याचं आयुष्य वाचवू शकतात.”
मनोजचे हात थरथरू लागले.
त्याचे डोळे पाण्याने भरले.
पहिल्यांदा तो खऱ्या अर्थाने रडला.
त्या दिवसानंतर त्याने स्वयंपाकघरातले ते ताट जपून ठेवले ,
आठवण म्हणून की,
स्त्रीची मेहनत कधीच हलकी नसते,
जरी तिचा आवाज कुणाला ऐकू येत नसला तरीही.
प्रत्येक घरात एक “अर्चना” असते.
जी सगळ्यांची काळजी घेते, पण स्वतःला विसरते.
ती बोलत नाही, पण तिचे हात, तिचे डोळे,
आणि तिचा थकवा रोज ओरडतो.
कधी तिच्या शेजारी बसून फक्त एवढंच विचारा
“थकलीस का ?”
कारण हेच शब्द एखाद्याचं जीवन वाचवू शकतात. 💔
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा