शनिवार, १८ ऑक्टोबर, २०२५

2320. बॅलन्स

 "सरु चल ग. लाव आता मलाही हळदीकुंकू. निघते मी. आज घरी सगळ्यांचाच उपास असतो, उगीच उशीर नको." ताई  म्हणाली.
"अगं ताई ना थांब ना अजून थोडा वेळ. मुली येतीलच आता" सरिता घड्याळ्यात पाहात म्हणाली.
"नको ग. इतका वेळ त्यांच्यासाठीच तर थांबले होते. पण त्यांचा काही भरवसा आहे का? एक लेक कमी होती म्हणून की काय तू सूनही IT मधली आणलीस. कठीण आहे ग बाई तुझं. आपणही नोकऱ्या केल्या की इतकी वर्षं, पण घर आणि ऑफिस दोन्हीचा बॅलन्स कसा बरोब्बर सांभाळला की नाही? ही असली ऐट नाही बाई केली कधी..मला काम आहे म्हणत सासूवर नाही सगळं सोपवलं."
ताईंच हे बोलणं एकून समोरच बसलेल्या सरिताच्या विहीणबाईंना म्हणजे माधुरीच्या आईला कान कोंडल्यासारखं होऊन गेलं. 
ते लक्षात आल्यामुळे सरिताने विहीणबाईंकडे बघत तुम्ही ताईचं बोलणं मनावर घेऊ नका अशा अर्थाने हळूच डोळे मिचकावले आणि ताईकडे मोर्चा वळवत म्हणाली, "अगं एकाच कंपनीत काम करणाऱ्या दोघी मैत्रीणीच ना त्या मग उशीर दोघींनाही होणारच की ! माधुरीला सून म्हणून आणायचा निर्णय आधी आमच्या प्रणवचा मग आमच्या सगळ्यांचा बर का! आणि आपल्या बद्दल बोलायचं झालं ना तर आपलं जग खूप वेगळं होतं ताई. खरंतर अगदी लिमिटेड होतं ते. पण या मुलींचं तसं नाही. 
ह्यांचे क्लायंट्स आणि बॉसेस तिकडे परदेशात बसून त्यांच्या त्यांच्या टाईम झोननुसार यांना कामं देतात. तसं तेही थोडंफार समजून घेतात, नाही असं नाही. पण आज त्यांचा तो रिलीज का काहीतरी आहे ना त्यामुळे दोघींनाही लवकर रिलीज मिळणार नाही हे माहीतच होतं आधीपासून. म्हणूनच तर माधुरीने प्रणवला घरी लवकर यायला सांगितलं आज माझ्या मदतीला. म्हणजे बघ तिनेही बॅलन्स साधलाच की नाही."
सरिताचे अगदी शांतपणे पण मनापासूनचं हे बोलणं  ऐकून माधुरीची आई चाट पडली. खरंच किती समजूतदार आहेत या. उगीच नाही माधुरी सतत यांचं कौतुक करत. खूप शांत, समजूतदार, शिवाय मुलींशी वागतातही अगदी मैत्रीणीसारख्या. ज्या सवलती लेकीला त्याच सूनेलाही. खरोखर माधुरीच्या या वेळांना मीही कधी यांच्याइतकं समजून घेऊ शकले नाही. लग्नाआधी माधुरी सणासुदीला घरी वेळेवर येत नाही म्हणून मी कित्येकदा तिच्यावर चिडचिड केली. 
पण इथे या सरिताताई खरंच ग्रेट आहेत. एकाचवेळी एखाद्या नदीसारख्या उत्साही, आनंदी, हॅपनिंग आणि समुद्रासारख्या प्रगल्भ व शांतही. विचांरांची संपन्नता आणि प्रगल्भतेचे स्थैर्य दोन्ही अगदी भरभरून आहे यांच्याकडे म्हणूनच ही मोरपिशी टसर अगदी खुलून दिसतेय यांच्या अंगावर. किती ग्रेसफुल ! मलाही शिकलं पाहिजे यांच्याकडून असं शांत राहून दुसऱ्याला समजून घ्यायला.
जशी आई तसाच  लेक. आज माधुरीला उशीर होतोय तर स्वतः घरी लवकर आलाय. कुठलेही आढेवेढे न घेता आईला मदत करतोय. आई बायकांच्या ओट्या भरते आहे तर तो तिथे उभा राहून आईच्या हाता एकेक वस्तू देतोय, बायकांना भरलेली ओटी काढायला पिशव्या देतोय. नवरा बायको दोघं मिळून संसाराचा बॅलन्स उत्तम सांभाळत आहेत. खरंच नशीब काढलय माधुरीने. 
माधुरीची आई असा विचार करत असतांनाच माधुरी आणि प्रणोती घरी आल्या.
आल्या आल्या दोघींनीही सॉरी सॉरी मावशी म्हणत मावशीची कळी खुलवली. मावशीही मगाचचा तोरा सोडून त्यांची प्रेमाने विचारपूस करू लागल्या.
माधुरीने फ्रेश होऊन लगेच मावशीची ओटी भरली. सरिताने ताईच्या हातात फृट सॅलेडचा डबा ठेवला. तो घेऊन ताई आनंदाने घरी गेल्या.
नंतर हसत खेळत सगळयांचा फराळ झाला. आपल्या लेकीचा सुखासमाधानाने भरलेला संसार पाहून माधुरीच्या आईच्या मनात आनंदाचा मोर नाचू लागला आणि आजच्या मोरपंखी रंगाला सार्थ करून गेला.

©® धनश्री दाबके
माझी लेखणी 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

3100. तुम्ही फक्त या घराच्या सून नाही

 "वहिनी, प्लीज... आज माझे कॉलेजचे मित्र-मैत्रिणी घरी येणार आहेत. फक्त एकदा माझी अब्रू राखा ना…" 🙏 असं म्हणत सईने हातातली भाजीची ट...