शनिवार, १८ ऑक्टोबर, २०२५

2323. स्त्रीशक्तीचा जागर - एक माळ तुझ्यासाठी तृतीयपंथ

 नवरात्रीच्या नऊ माळेवर घट बसल्यापासून भरभरून लिहिले जात आहे. रोज एक माळ मध्ये कुटुंबातील सगे सोयरे आई, आजी, काकी, मामी, ताई ई. सारे गुंफल्या जात आहेत. काही ठिकाणी fb मैत्रिणी वर प्रत्येक दिवशी भरभरून बोलल्या जाते. त्यांचे कोड कौतुकाच्या वर्षावात पूर्ण fb नऊ दिवसात न्हाऊन निघत आहे. कुणी डॉ., टीचर, परिचारिका, कंडक्टर ई. महिलांना भरभरून मानवंदना देत आहेत. आनंद आहे.
   मी ही आज एकच दिवस माझ्या आयुष्यात आलेल्या अश्या स्त्रीला मानवंदना देणार आहे की जिला पाहून लोकं तोंड मुरडतात, त्याचं स्पर्श टाळतात. त्यांनी डोक्यावर हात ठेवला की झिडकरतात. त्या म्हणजे तृतीयपंथी. आपण त्यांना हिजडा, छक्का या नावाने छान ओळखतो.
   २०१७ चे साल माझ्या व्यवसायाने पूर्णविराम घेतला. म्हणजे साधारण पाच वर्षांपूर्वी. तब्बल २१ वर्षे मी माझ्या लॉंड्रि व्यवसायात होते. अनेक प्रकारची लोकं येत असत. तसेच एके दिवशी एक उंचपुरी, धिप्पाड व्यक्तिमत्व असलेली एक तृतीयपंथी १६ साड्या घेऊन आली. अगोदर तीन कस्टमर उभे होतेच. त्यात ही चौथी. तिला पाहून सारे फटाफट बाजूला सरले. तिने गुपचूप हातातील साड्या काउंटरवर ठेवल्या व मागे जाऊन उभी राहिली. पूर्वीच्या तीन कस्टमरला  मोकळं करून मी तिच्या साड्या हातात घेतल्या तशी ती पुढे आली. मी साड्या चेक करू लागली माझ्या कामाचा एक भाग म्हणून. दीदी सब अच्छा साडी है. ती बोलली. फटा कपडा, कलर स्प्रेड सब देखना पडता है. बील मे लिखाना पडता है. मी बोलले. त्यावर ती काहीच न बोलता उभी राहिली. नियमानुसार बील बनले. नाव विचारले बीलवर लिहिण्यास "चांदनी" केवढं सुंदर नाव पण दिसायला बेढप व काळी. ती बील घेऊन गेली सात दिवसांनंतर ये असा वायदा घेऊन.
   ती आली बील घेऊन ठरल्या तरखेवर. दरम्यान माझी नवऱ्यासोबत साडी व कस्टमर यावर चर्चा झाली. तृतीयपंथी आहे ना...!! म्हणून आमच्या नफ्यातील १०℅ सूट यापुढे तिला देण्याचे त्यांनी सुचवले. मीही मान्य केले. तिच्या १६ साड्या व्यवस्तीत बांधून दिल्या व नवीन घेऊन आलेल्या साड्यांचे बील बनवले गेले ठरल्याप्रमाणे १०℅ सूट देऊन. दीदी कैसे लगाया साडी...? 
उसमे तो ज्यादा लगाया है. ती बील पाहून बोलली.
उसमे ज्यादा नाही लगाया. इसमे कम लगाया.... मी
एवढं ऐकून निघून गेली. ती परत आली खूप सारे कस्टमर घेऊन. रेखा, आशा, शैला इ. आता ती हळूहळू कमी येऊ लागली. तिच्या त्या मुलीच तिच्या साड्या आणू लागल्या, त्या तिला गुरू म्हणत. सुरवातीला ३-४ वेळा आली तेवढीच पण तेवढ्या तिच्या सहवासातही ती मला खूप आपली वाटली. बोलणं मोजकच, मुद्देसूद. कुठलीच कटकट नाही. साड्या आणून टाकायची व न्यायची. तेवढ्या वेळेचं तिचं काऊंटरला उभं रहाणही इतर सो कोल्ड कस्टमरना काही रुच नव्हतं. ती असली की चार हात लांबच उभे राहायचे. ती गेल्यावर सल्ले ही जोरदार. यांची पावलं चांगली नसतात हो....इनको ज्यादा देर तक खडा होने मत देना.....एक ना दोन पण मला तीचा काही वाईट अनुभव आला नाही. बिचारी शांत व सुस्वभावी होती. परत मधेच तिनं येणं सुरू केलं. आज आप आये... मी मोठ्या आपुलकीने प्रश्न केला. हं...बच्ची लोक गाव गई है ना ती बोलली. असे काही दिवस निघून गेले. तब्बल दीड वर्ष तिच्या १२ साड्या माझ्या शोकेस मध्ये लागलेल्या होत्या. कोणीच न्यायला आलं नाही. आणि एके दिवशी एक स्त्री कस्टमर आली. अरे या साड्या कुणाच्या....तिने विचारलं. मी म्हटलं आहेत एकीच्या. अरे मॅडम त्या छक्क्याच्या साड्या. मी विचारलं तू ओळखतेस का..? व्हय माझ्याच जागेत रायला हायती. द्या मी घिऊन जाते. किती पैसं झालं? नाही....मी म्हटलं. त्यांना पाठवून दे. त्याचं अस हाय ना... ते आता नाही रात तिथं पण येतात माझ्याकडं. मी देईन. मी नकार देताच तिच्या तोंडून एक बातमी बाहेर पडली. आणि का कोण जाणे ऐकून काळजात चर्रर्र झालं. ती गुरू हाय ना मेली व. 
कधी ....मी विचारलं. 
झालं वर्स होऊन गेलं. 
माहीत नाही का पण मनात कालवा कालव झाली, मन गलबलून गेलं. पाय एक जागीच थबकले. वाटलं उगाच कळली बातमी. आणि तिच्यासोबत चे थोडे बहूत का होईना क्षण डोळ्यासमोर तरळून गेले. नकळत पापण्या ओलावल्या. काही दिवसांनंतर तिच्या ठेवलेल्या पोरीतील एक पोरगी आली. सड्यावर दावा करण्यासाठी. मी अलगद त्या साड्या काढल्या. व्यवस्तीत बांधून कार्बन कॉपी बीलवर तिची सही घेऊन तिच्या सुपूर्द केल्या. जगाच्या दृष्टीने ती दीड वर्षांपूर्वी गेली असली तरी चांदनीची आणि माझी नाळ आज इथेच त्या बातमीने तुटली पण ही चांदनी आजही माझ्या मनात घर करून आहे. आज सुरू असलेल्या देवी उत्सवातील एक माळ मी तिला का चढवू नये.

कल्पना मापुसकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...