तो तिचा डीपी बघून हरवून गेला होता. साधीसरळ फोटो होती, पण त्या फोटोत एक वेगळं आकर्षण होतं, एक ओढ होती जी त्याला खेचून तिच्याकडे घेऊन गेली. हळूहळू मैत्री झाली. दोघंही चाळीशी पार केलेले, आयुष्यात खूप अनुभव घेतलेले, पण तरीही मनातल्या भावना ताज्याच होत्या.
सुरुवातीचे दिवस हसण्यात, मजेत गेले. छोट्या छोट्या गोष्टींवर गप्पा मारायला लागले. ती हसली की त्याला वाटायचं की दिवस सार्थकी लागला. पण या गप्पांमध्ये त्याच्या मनात नकळत आपुलकी निर्माण होत होती. तिच्या बोलण्यातून त्याला जाणवायचं की ती तिच्या पतीवर मनापासून प्रेम करते. हे कळलं तरी त्याच्या मनात तिच्याबद्दल वेगळं स्थान निर्माण झालं होतं.
त्याला प्रश्न पडायचा – "हे मी काय अनुभवतोय? ही आपुलकी आहे की खरंच प्रेम?" पण प्रत्येकवेळी मनाने उत्तर दिलं – "हे प्रेमच आहे."
एकदा असं झालं की तो काही कामामुळे दिवसभर बोलू शकला नाही. संध्याकाळी ती अचानक विचारली –
"तू मला इग्नोर करत आहेस का?"
हा प्रश्न ऐकून त्याच्या मनाला धक्का बसला. त्याने लगेच उत्तर द्यायचा प्रयत्न केला –
"असं काही नाही, मी तुला कधीच इग्नोर करू शकत नाही."
ती थोडी चिडून म्हणाली –
"का नाही करू शकत? अगदी सोपं आहे, इग्नोर करून टाक मला."
त्याच क्षणी त्याला जाणवलं – हीच योग्य वेळ आहे मनातलं सांगण्याची. आणि तो धाडस करून बोलून गेला –
"मी तुला इग्नोर करू शकत नाही कारण मी तुझ्यावर खूप प्रेम करतो."
इतकं ऐकताच ती स्तब्ध झाली. क्षणभर शांत झाली. मग हळू आवाजात म्हणाली -
"हे काय बोलतोस तू? माझ्या मनात असं काही नाही."
त्यानेही ठामपणे उत्तर दिलं –
"मला जे वाटतं ते मी तुला सांगितलं. तुझा निर्णय महत्त्वाचा आहे. तू 'हो' म्हणालीस तरी ठीक, 'नाही' म्हणालीस तरी मला मान्य आहे. पण मनातलं दडवून ठेवणं मला जड गेलं होतं."
हे ऐकून ती खूप रागावली. तिच्या मनात गोंधळ सुरू झाला. एकीकडे तिला आपल्या पतीवर प्रेम होतं, तिचं संसारावरचं नातं होतं. दुसरीकडे हा माणूस – ज्याने कधीही तिचा अपमान केला नाही, उलट तिला नेहमी हसवलं, समजून घेतलं, तिच्या आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टीत रस घेतला.
त्या दिवशी दोघंही गप्प झाले. संवाद थांबला. पण दोघांच्या मनात एकमेकांचे शब्द घोळत राहिले.
दिवस गेले. तिने स्वतःलाच विचारलं – "तो असं का बोलला असेल? खरंच त्याच्या मनात इतकं प्रेम आहे का?" तिच्या मनात अजूनही राग होता, पण त्या रागामध्येही एक वेगळा स्पर्श होता. मनातल्या खोलवर कुठेतरी तिला त्याची आठवण यायला लागली.
तो मात्र शांत होता. त्याने आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्याला माहित होतं – जर तिला खरंच आपल्याबद्दल काही वाटत असेल तर ती परत येईल. नाहीतर आठवणीतलं एक पान म्हणून तो हे जतन करून ठेवेल.
हळूहळू तीही त्याच्या स्वभावाकडे आकर्षित होऊ लागली. त्याची शांतता, त्याचा संयम, त्याचं प्रामाणिकपणं – या सगळ्यांनी तिला जिंकून टाकलं. ती विचार करायची –
"ज्याने मला इतक्या प्रामाणिकपणे प्रेमाची कबुली दिली, ज्याने माझ्या रागातही मला समजून घेतलं, तो खोटा असूच शकत नाही."
मग एके दिवशी तिने मन मोकळं केलं. म्हणाली –
"मी त्या दिवशी खूप रागावले होते. पण खरं सांगायचं तर तुझ्या शब्दांनी मला हादरवलं. मी स्वतःलाच प्रश्न विचारले की तुझ्या शिवाय माझं आयुष्य अपूर्ण वाटेल का? आणि उत्तर 'हो' आलं."
तो फक्त शांतपणे ऐकत राहिला. त्याच्या डोळ्यांत आनंदाचे अश्रू तरळले. ती पुढे म्हणाली –
"माझं संसारावर प्रेम आहे, यात शंका नाही. पण तू माझ्या आयुष्यात आला आहेस, हेही खरं आहे. तुझ्या शांत स्वभावाने, तुझ्या प्रामाणिक नजरेने मला जिंकून टाकलं आहेस. मला मान्य करावं लागतं – मीही तुझ्या प्रेमात पडले आहे."
तो काही बोलू शकला नाही. त्याने फक्त एकच वाक्य उच्चारलं
"धन्यवाद... माझं मन समजून घेतल्याबद्दल."
हे नातं शब्दात मावत नाही. चाळीशीच्या वयात जेव्हा माणूस आयुष्यात स्थिरावलेला असतो, तेव्हा असं अचानक कोणीतरी भेटून मनाला वेगळाच रंग देतं. हे प्रेम कदाचित समाजाला मान्य नसेल, पण दोघांच्या मनात मात्र ते स्वच्छ, निर्मळ होतं.
त्याला तिच्या हास्याशिवाय दिवस अपूर्ण वाटायला लागले होते. तिलाही त्याच्याशी बोलल्याशिवाय मन शांत राहत नव्हतं. प्रेम असंच असतं – वयाचं बंधन ओलांडून, समाजाचे नियम मोडून, मनाला जिथे समाधान मिळतं तिथे थांबतं.
दोघांनी ठरवलं – जगाला न दाखवता, एकमेकांच्या मनातलं गुपित जपायचं. आयुष्याच्या उरलेल्या प्रवासात ही भावना दोघांना आधार देईल, उर्जा देईल. कारण खरं प्रेम लपवता येत नाही, फक्त शांतपणे जगता येतं.
✍🏻माणिक उचित, नाशिक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा