लग्नाला ७ वर्ष झाली तरी बायकोची कुस काही उजली नव्हती. "बाबा" म्हणून ऐकायला कान हत्तीसारखे झाले होते. डॉक्टर इलाज करून पण हाती निराशाच लागत होती. बाप होता तर नास्तिकच पण शेवटचा उपाय आणि आईच्या इच्छा म्हणून तुळजाभवानीला नवस केला. "तुझ्या आशीर्वादाने जर माझ्या घरात लक्ष्मीची पावल उमटली तर पायी तुला भेटायला येईन' असा नवस केला. बोलात आणि फुलात गाठ पडली. काही महिन्यातच तुम्ही बाप होणार असल्याची बातमी बायकोने दिली. बातमी ऐकून नास्तिक बाप अस्तिक झाला. रोज मनोभावे तुळजाभवानीची पूजा करू लागला. आईचे आणि बायकोचे शेकडो नवस, प्रार्थना, पूजापाठ कामी आले होते.
बरोबर श्रावणातल्या तिसर्या दिवशी पहाटे तिचा जन्म झाला. बापाची लेकीसाठी असलेली,आजीची नातीसाठीची आस संपली होती.ही आस संपायला सात वर्षांचा काळ लोटला होता. श्रावणातले ऊन पाहिल्यानंतर तणांचा जसा आकार बदलतो, ज्याप्रमाणे श्रावण चैतन्याचं वातावरण निर्माण करतो. तसाच आकार बापाच्या मनाने बदलला होता, चैतन्याच वातावरण त्याच्या आयुष्यात निर्माण झालं होतं.
मुलीच्या आनंदात नवस फेडण्यासाठी पायीदेखील चालत गेला. चालून चालून पायाला फोड आले होते. खोलवर काटे रुतले होते, बोटातून रक्त वाहत होते पण ते सगळ मुलगी झाल्याच्या आनंदापुढे फिक होत. लेकीच्या आनंदपुढे वेदना तग धरत नव्हत्या.
पाचीला "ताई तू दीदी च नाव श्रावणीच ठेव बर का" अस आवर्जून मोठ्या बहिणीला सांगितल. त्या श्रावनाणे वातावरणात चैतन्य आणलं होतं तर या श्रावणीने बापाच्या मनात आणि जीवनात. नाव जरी श्रावणी ठेवल असल तरी तो लाडाने दीदीच म्हणत. दिदीची चेहरेपट्टी आई वर गेली होती पण नाक मात्र बापासारख होत.लांबसडक...! बापाची दीदी हळूहळू घरात लक्ष्मीची पावलं टाकू लागली. तिच्या प्रत्येक पावलाने घरातील वातावरण प्रसन्न होत होत. आई तर दिवसभर ताई ताई म्हणत पकडण्यातच दमून जाई. दीदीला काहीही कमी पडू नये म्हणून बापाने दुसरे अपत्य होत असून देखील जन्म न देण्याचा निर्णय घेतला.
येणाऱ्या श्रावणात दीदीला पाच वर्ष पूर्ण होणार होती. दीदीचा वाढदिवस मोठा करायचा म्हणून वर्षभरापासून पगारातून काही रक्कम बाजूला काढून ठेवत होता. आयुष्यात एकदाही केकच तोंड न पाहिलेल्या बापाने लेकीसाठी पाच किलोचा केक आणला होता. त्याला निमित्त होतं ते फक्त दीदीला पाच वर्ष पूर्ण झाल्याच. दीदीच्या वाढदिवसाला मी माझ्या दीदीला डाक्टर करणार म्हणून त्याने ठरवून टाकलं. त्यासाठी पुढच्या महिन्यापासून पैसेही शिक्षणासाठी बाजूला काढू लागला. ताईची दिदी आता छोटा शिशुत जाऊ लागली. बाप स्वतः मात्र चड्डीला ठिगळ लावून सरकारी शाळेत गेला होता. पण मुलीला मात्र इंग्लिश मीडियमल घातलं होतं. मुलगी थोडीच बापासारखी होणार आहे ती तर डॉक्टर होणार आहे ना ? एकदा गावी जाऊन आल्यानंतर पाणी बदल झाल्याने ताप आला म्हणून तो रात्रभर मिठाच्या पट्ट्या बदलत होता. रात्रभर त्याच्या दिदीचा हातात हात घेऊन चोळत होता. त्या रात्री एक मिनिटही त्याला झोप लागली नव्हती.
या श्रावणात दीदी सात वर्षांची झाली. दिदीला पैंजण करायचे म्हणून बापाने हातातील अंगठी गहाण ठेवली पण मुलीला पैंजण केली. बापाला थोडीच अंगठी शोभून दिसते, शोभून दिसतात तर ती लेकीच्या पायातील पैंजण नाही का.? पैंजण घालून दीदी चालत होती तेव्हा त्यांच्या आवाजाने मात्र बापाचे काम तृप्त होत होते. कोकिळेच्या आवाजाने निसर्ग तृप्त होतो तसा. त्याचा पगार दहा हजार पण मुलीला तीन हजाराचा ड्रेस आवडला म्हणून तोही घेतला. स्वतः दोन वर्षांपूर्वी घेतलेला शर्ट अजूनही अडकवत होता. बापाला कशाला नवीन कपडे पाहिजेत? त्याला कसली हौस. हौस तर मुलीची असते. बापाला कोण बघणार आहे? मुलगी चारचौघात उठून दिसली पाहिजे नाही का? दिदी पाचवी उत्तीर्ण झाली. लेकीच तोडक मोडक इंग्लिश ऐकून त्याला मोठं अप्रूप वाटत हात. अजून मेहनत करण्याची ताकद मिळत होती. तो अजून जोमाने काम करत होता.लेकीच्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होता. लेकही तशी हुशार होती. शाळेत कायम दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर असायची. मोठेपणी कोण म्हंटल्यावर तीही "मी डॉक्टर होणार" म्हणूनच उत्तर देत होती.
नववीत असताना पहिल्यांदाच तिने प्रथम क्रमांक पटकावला. नेहमीप्रमाने शाळेने प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याचे ठरविल. आपल्या मुलीचा होत असलेला सत्कार पाहून बापाच्या डोळ्यातून आनंदाश्रू थांबायचे नाव घेत नव्हते. डोळे सभागृहाला ओरडून सांगत होते "माझी लेकय माझी". सत्कार समारंभ झाल्यावर एक दिवस अशीच डाक्टर सायबिन होऊन माझी मान उंचाव असं बजावून सांगितलं. त्यावर तिने "होय बाबा" म्हणत मानही डोलावली. दिदी दहावीला तृतीय क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाली. आनंदाच्या भरात पूर्ण कॉलनीत पेढे वाटले. पेढे वाटताना माझी दीदी डॉक्टर होणार हे सांगायचं विसरला नव्हता. त्याने सगळ्यांना पेढे भरवले पण त्याला कोणीच पेढा नाही भरवला. त्याने काय केले पेढा भरवायला गुण तर दिदिने मिळवलेत नाही का? त्याला का म्हणून श्रेय द्यायचं.?
दिदीने विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. विद्यालयात जाऊन महिना झाला आणि मोबाइलची मागणी केली. तो ही मोठा टच स्क्रीनचा बर का.. "घेऊ ना आपण तुला लागत आसल ना अभ्यासासाठी...! त्याच्यामूळ उगाच अभ्यासात खोळंबा नको". बाप म्हणाला. दुसऱ्या दिवशी दुकानात गेल्यावर तिने सरळ सरळ दहा हजाराच्या फोनला हात लावला. लेकीची इच्छा मोडू नये म्हणून तो हळूच दुकानदाराला म्हणाला आता अर्धे देतो बाकीचे पुढच्या महिन्यात देतो. पण दुकानदार ऐकायलाच तयार होईना शेवटी दुकानदाराने हप्त्यावर घेण्यास सांगितले. बापाच्या बटनाच्या फोनला दोन ठिकाणी रबर लावला होता. बॅटरीला मागून कागदाची घडी लावून वापरत होता. पण. त्याला कशाला लागतोय नवीन फोन? त्याला काय करायचय? त्याला काय कळतय? फोन तर लेकीला पाहिजे तोही नवीन आणि मोठा. लेक डॉक्टर होणार आहे ना? मोबाईल वर लेक मध्यरात्रीपर्यंत काही तरी करत असायची. माझी लेक अभ्यास करते म्हणत बापाला वेगळाच अभिमान वाटत होता. अकरावीला म्हणावे तसे गुण पडले नाही. पण पेपर आता अवघड झाले असतील म्हणून बापाने काय विचारलं नाही आणि लेकिनेही काही सांगितलं नाही. बारावीला चांगले गुण मिळवायचे म्हणून क्लास लावला. कॉलेज आणि क्लास करून आठ वाजेपर्यंत दीदी घरात यायची.
एकदा दहा वाजून गेले तरी दीदी घरी आली नाही. क्लासमध्ये फोन केल्यावर "श्रावनी आज आलीच नाही". म्हणून सांगितलं. ते ऐकून काय करावं आणि काय नाही त्याला समजतच नव्हतं. बायकोचे डोळे रडून रडून लाल झाले होते. "माझ्या ताईला काही झालं नसेल ना" म्हणून रडत रडत होती. बापाचेही मन रडू पाहत होतं पण तो रडला तर बायकोला कोण आधार देणार ? आधारस्तंभच जर गळून पडला तर त्याला कोण आधार देणार ?
काही वेळाने तो सहज चालत चालत टेबलाजवळ गेला त्याला चिठ्ठी दिसली. चिठ्ठीत लिहिलं होत...
"बाबा माझ एका मुलावर जीवापाड प्रेम आहे. तो खूप श्रीमंत आहे. तुम्ही तुमचं पूर्ण आयुष्य एका छोट्याशा खोलीत काढल. मला माझा आयुष्य अस काढायचं नाही. तुम्ही माझ्या इच्छा पूर्ण करू शकत नाही म्हणून मीच माझ्या आयुष्याचा जीवनसाथी निवडला आहे. तुम्ही मला शोधण्याचा प्रयत्न करू नका आणि पोलिसातही जाऊ नका तुम्ही मला शोधून परत घेऊन आला तर मी जिव देईन. आम्ही लवकरच लग्न करणार आहोत."
तुमची लाडकी,
दिदी.
बापाचे पाणावलेले डोळे पत्र वाचत होते, तर पत्रातले शब्द त्याच्या काळजावर घाव घालीत होते. काल पर्यंत मला नवीन ड्रेस पाहिजे म्हणून हट्ट करणारी माझी दिदी असं कसं करू शकते हे त्याला कळतच नव्हतं. जे हात दिदिला डॉक्टर बनवायचे म्हणून झिजून गेले होते ते देवाकडे लेक परत यावी म्हणून विनवणी करत होते. काट्याकुट्यातून चालणाऱ्या पायांमध्ये तर उभ राहण्याचदेखील बळ उरलं नव्हतं.
बापाला कळतच नव्हतं चुकलं ते चुकलं काय?
स्वतः फाटक्या कपड्यात राहून लेकीला पाहिजे ते ड्रेस घेऊन देणं चुकलं का?
लेकीच्या आनंदात अनवाणी नवस फेडणं चुकलं का?
स्वतः फुटका मोबाईल वापरत लेकीला मोठा मोबाईल घेऊन देण चुकलं का ?
लेकीला डॉक्टर बनवण्याच स्वप्न बघन बापच चुकलं का? स्वतःच्या संस्कारांवर ठेवलेला विश्वास चुकला का ?
लेकीला स्वतः चा स्वाभिमान समजण चुकलं का?
लेकिवर स्वतः पेक्षा जास्त जीव टाकणं चुकलं का?
बापाला अजून हेच कळत नाही आहे की शेवटी चुकलं ते चुकलं काय ?
काय देण्यात कसर ठेवली होती म्हणून लेक काही महिन्यापूर्वी भेटलेल्या मुलासाठी जन्मदात्यांना लाथाडून गेली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा