वडिलांना वृद्धश्रमात न ठेवता तो एका छान टुमदार वृक्षाच्या खाली असलेल्या घरात घेऊन आला. आपले प्राक्तन कळल्यामुळे वडिलांनी आपण कुठे जात आहोत हे न बघता डोळे मिटून घेतले होते. कालपासून मुलगा आणि सून बॅग भरून देत होते त्यांना, आपल्याला बाहेर जायचे आहे. एवढेच सांगितले होते. तीन चार दिवस ते विचार करत होते,आपले काही चुकले का? सहा महिन्यांपूर्वी बायको निजधामाला गेल्यावर ते मुलाच्या संसारात रमले होते. जमेल तेवढे करत होते. त्यांना काय? कुठे? का? असे प्रश्न न विचारता आपले आपले जगत होते. मन मात्र नक्कीच नव्हते आता संसारात पण तरीही ते जगत होते. आजकाल तीची खूप आठवण येत असे पण सांगणार कोणाला आणि काय?बायकोने समजून घेतले होते. तिच्याशी बोलायचे नेहमी..पण आता??? त्यामुळे ते अधिकचं विरक्त झाले.
मुलाने अचानक त्यांना, "बाबा, उतरता आहात ना..आले आपले घर.." असे म्हंटल्यावर चमकून ते बाहेर बघायला लागले.
अरे हा परिसर ओळखीचा आहे. मी इथे आधी येऊन गेलो आहे. कसे शक्य आहे? कशाला तू वृद्धाश्रमात आला असशील? मनाशी चाललेला संवाद थांबवून त्यांनी गाडीचे दार उघडले आणि बाहेर पाऊल ठेवले.
नान्या, अशी आनंदाची साद कानावर पडली आणि एक त्यांच्याच वयाचा माणूस व्हीलचेअर वर भरभर त्यांच्याकडे आला.
अप्पा... अप्पा....अप्पा..,हे कसे शक्य आहे? तू जिवंत आहेस? हाती पायी धड आहेस??
नाना...,अरे जरा बघ...नीट बघ ..हाती धड आहे. पायी मात्र जरा घोळ झाला गड्या असे दिलखुलास हसत म्हणत, अप्पा त्यांच्या जवळ आले.
दोघांनी एकमेकांना जमेल तशी मिठी मारली. खांदे ओले झाले होते आणि डोके हलके.
घरात शिरून बसल्यावर, मुलाकडे बघत त्यांनी मान हलवली.
बाबा, शाळेत असताना तुमच्या बाबांची बदली झाली होती शहरात. इतकी लहानपणापासूनची घट्ट मैत्री सोडायला तुम्ही तयार नव्हता. पण कुणी ऐकत नव्हते, मग शेवटचा एक दिवस एकत्र घालवायचा असा विचार करून, घरातल्यांचा डोळा चुकवून तुम्ही दोघं गावच्या डोंगरावर गेला होतात. चढताना त्रास नाही झाला पण उतरताना एकतर संध्याकाळ झाली होती आणि वाट चुकल्यामुळे तुम्ही दोघे घाबरला होता आणि अचानक तुमचा पाय घसरला. तुम्हाला सांभाळताना अप्पा पण घसरले, दोघे घसरत खाली जात असताना तुमच्या हाताला दगड लागला आणि तुम्ही थांबला, दगड घाबरून, घाईघाईने धरता यावा म्हणून तुम्ही अप्पांचा हात सोडला आणि अप्पा उतारावरून घसरत दिसेनासे झाले. काय करावे कुठे जावे काही कळत नव्हते आणि सभोवतालचा अंधार मनात भीती निर्माण करत होता. त्यांनी आपले मन मोकळे केले. कसा बसा मी घरी पोहोचलो. सगळे घाबरून गेले होते. मी सगळे सांगितल्यावर, गावातील लोक तुला शोधायला बाहेर पडले. पहाटे आम्हाला निघायचे होते. लहान होतो रे मी. काही चालले नाही माझे आणि शहरात आलो.
खर सांगतो अप्पा त्या दिवसापासून झोपलो नाही रे मी शांत. बऱ्याच वेळी मनात यायचे, जाऊन बघावे का गावाला. पण भीती वाटायची रे, तुझा भिंतीवरच्या फोटोला बघून मी काय उत्तर देऊ घरातल्यांना. त्यांच्या हातावर थोपटत मायेने अप्पा म्हणाले, अरे तू हात सोडल्यावर मी भीतीने बेशुद्ध झालो. मलाही वाटले आला शेवट आता. पण अचानक पायात काहीतरी अडकले, जीवाच्या आकांताने मी ते धरून ठेवले. शुध्दी बेशुद्धीच्या सीमेवर मी पाय घट्ट पकडून ठेवले. पहाटे लोक शोधत आली आणि मला हॉस्पिटल मध्ये नेले. रात्रभर एका झाडाला घट्ट आवळून धरल्यामुळे माझ्या पायाच्या नसा बधीर झाल्या. सहा तास तसेच राहिल्यामुळे पायातली संवेदना गेली. पण मी जिवंत होतो हा आनंद होता.
अरे तुला तरी आपले गाव माहित होते, मला तर तू कुठे आहेस काहीचं माहीत नव्हते. पण खात्री मात्र होती. कधीतरी आयुष्य संपायच्या आधी आपली भेट नक्की होईल.
"बाबा...आईने मला सगळे सांगितले होते, म्हणाली, "ह्यांच्या मनातला हा अपराधी भाव काढता आला तर बघ...मनात असून मला नाही जमले ते."
मग मी गेले सहा महिने सगळे शोधून काढले. अप्पा काकांना येऊन भेटलो, त्यांना सगळे सांगितले. ते ही वाट बघतचं होते. आता तुम्हाला हवे तेवढे दिवस एकत्र रहा.तुमची सगळी सोय केलेली आहे. इथे रहा नाहीतर घरी परत या,पण ह्यावेळी एकटे नाही दोघेही. गाडी घराच्या अंगणातून बाहेर पडली आणि दोघे मित्र एकमेकांना सांभाळत.
नाना व्हीलचेअर चालवत आणि अप्पा त्यांचा हात घट्ट धरून. त्यांच्या मैत्रीच्या जगात परतत होते.
🙏🙏🙏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा