शनिवार, १८ ऑक्टोबर, २०२५

2325. आसवांत बुडालेली दिवाळी

 ती विधवा आणि तिची चार लहान मुलं असा परीवार. दोन मोठ्या मुली आणि त्या नंतरचे दोघे भाऊ. मोठी मुलगी आठवीला त्या नंतरची सहावीला, एक मुलगा पाचवीला, तर सर्वात धाकटा तिसरीला.
ती बिचारी कधी कुणाच्या शेतात राबून तर कधी कुणाची धुणी भांडी करून लाकडाच्या मोळ्या विकून मुलांना शिकवत जगवत होती. मोठ्या दोन मुली आणि मुलगा तिला जमेल तशी मदत करत होते. मुली कुणाचं अंगण सारवून देत. पाणी भरून देत तर कधी गोधड्या शिवून देत. कधी नदीवर जाऊन कपडेही धुऊन देत. मुलगा शेवग्याच्या शेंगा कागदाच्या पिशव्या बाजारात विकून आईला घर खर्चाला मदत करायचा.
मुलं अभ्यासातही बरी होती व्यवस्थित पास होत होती. झोपडीवजा घरात हे पाचही जण एकोप्याने रहात होते. गावात कुणी बाई मेली, की तिच्या घरात असलेल्या साड्या लोक हिला वापरायला द्यायचे. पुरूषांना लाजवेल अशी ढोर मेहनत ती करायची. आज ना उद्या माझी पोरं शिकून मोठी होतील आणि मग आमचे दिवस बदलतील असं ती शेजा-या पाजा-यांना बोलून दाखवायची. अगदी तापाने फणफणली असली, तरी तिने पडेल त्या कामाचा कधीच खाडा केला नाही. इतकी मेहनत इतक्या समस्या तरी त्यांचा बाऊ न करता ती हसत मुखाने सर्वांना सामोरी जायची.
गरीबी समंजसपणा शिकवते हे तिच्या मुलांकडे पाहून चटकन लक्षात यायचे. मुलांचे कपडे जरी स्वच्छ असले तरी त्यांना खूपदा थिगळांचे जोड असायचे. कधीमधी कुणी मुलांना जुने पुराणे कपडे द्यायचा. तिला मनातून खूप लाज वाटायची पण कपडे नाकारले तर ही लोकं रागावतील व त्यांच्या शेतात आपल्याला काम देणार नाहीत या भितीने ती कपडे ठेऊन घ्यायची. मुला मुलींना नेहमी सांगायची, आपल्या सारख्या गरीबांना शिक्षण आणि इज्जत महत्वाची.
दिवाळी पंधरा-वीस दिवसांवर आली होती. तिचं काळीज तुटत होतं. यावेळी तरी लेकरांना नवीन कपडे घ्यायला जमले पाहिजेत. तिने मुलांना सांगितलं, आपण सर्वांनीच जरा जास्त मेहनत करूया. पैसे हातात आले की तुम्हाला नवे कपडे घेईल.
मुलं खूपच खूश झाली. आई नवे  कपडे घेणार म्हणून धाकटा तर उड्याच मारू लागला. त्यांच्या वर्गातल्या मुलांनी नवे कपडे फटाके नागगोळ्या टिकल्या उडवण्याची पिस्तुलं असं काय काय घेण्याचं ठरवलं होतं. हे बिचारे गरीब असल्याने आणि परिस्थितीची जाणीव असल्याने शांतच बसत असत.
मुलांनी आणि त्यांच्या आईने दुप्पट मेहनतीला सुरूवात केली. सर्वात धाकटा दोन घरचे बैल नदीवर पाणी पाजण्यास नेऊ लागला. रोज आलेले पैसे ते मोजू लागले. घरखर्च आणि त्यातून कपड्यांसाठी काही पैसे बाजूला ठेऊ लागले.
एक दिवस आई दोघा मुलांना घेऊन दुकानात गेली. तिथून थोडं सामान खरेदी केलं. लहान मुलं आहेत..  घरात निदान करंजी चिवडा तरी बनवू असं तिने थोरल्या मुलींना सांगितलं होतं. छोट्याची नजर दुकानातल्या रंगबिरंगी फटाक्यांवर पडली तो आई फटाके म्हणणार इतक्यात मोठ्याने त्याच्या तोंडावर हात ठेवला. तिघे माय लेक घरी आले.
दहा पंधरा दिवसांत या पाच जणांनी ढोर मेहनत केली होती. आईने राञी पैसे मोजले अगदी गरीब लायकीचे का होईना पण मुलांना कपडे घेण्या इतके पैसे जमले होते. सर्वांना आनंद झाला. आईने थोरल्या ताईला सांगितलं उद्या लवकर उठ ग...  आपण सकाळच्या पहिल्या एसटीने तालुक्याला जाऊ. कपडे घेऊ आणि दुपार पर्यंतर घरी येऊ.
दोन नंबरची म्हटली, आई आज पाऊस पडल गं...  खूप गरम होतय. आणि संध्याकाळी आभाळही भरून आलेलं. कपडे मिळणार या आनंदात सगळे झोपी गेले. बाहेर वारा पाऊस सुरू झाला. दिवाळीत कधीमधी जोरदार पाऊस पडतोच. हे गाढ झोपलेले असतांना साधारण पहाटे चारच्या दरम्यान धाडधाड असा जोरात आवाज आला. सगळे घाबरून उठले. पाहतात तर काय अगोदरच मोडकळीस आलेल्या घराची एक भिंत आणि वरचे सगळे पञे उडून गेले होते. पावसाने अख्खं घर भिजवायला सुरूवात केली. तिने आणि मुलांनी घरातील वस्तु आडोशाला नेल्या. तिला आणि मुलांना धक्का बसला. तालुक्याला जाणं रहीत झालंच पण आजूबाजूच्या लोकांनी आईला सांगितलं, घरात वयात येणा-या पोरी आहेत. दोन चार दिवसातच घराची भिंत बांध आणि पञे घाल घरावर.
कुणीतरी नामा गवंढ्याला बोलवलं त्याने बोटांवर हिशोब करून अमूक एक पैसे होतील सांगितलं. ती मटकन खाली बसली कारण तिने जमवलेल्या पैशांत आणखी दहा हजार रूपये घालायचे होते. तिने नामाला हात जोडून सांगितलं नामादादा आता माझ्या जवळ एवढेच पैसे आहेत. आता काम करा, मी तुमचे पैसे फेडेन थोडे थोडे. नामा म्हटला चालेल ताई मी लागतो आजपासूनच कामाला. मुलं मुसमुसू लागली पण पर्यायच नव्हता काय करणार.
सिमेंट रेती माती चिरे दारात येऊन पडले. काम सुरू झालं. आणि दिवाळीही सुरू झाली. आईने त्यातही राञी दोन मुलींना मदतीला घेऊन करंज्या चिवडा केला. धाकटा तर घरात बोलणं आणि खेळणंच विसरला. थोरला भल्या पहाटे उठायचा आणि गावात जिथे जिथे फटाके उडवायचे तिथे जायचा आणि न फुटलेले लवंगी फटाके नागगोळ्या गोळा करून धाकट्यासाठी आणायचा. पण त्याने त्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. घरात शांतताच होती पण धाकटा जरा जास्तच शांत झालेला.
आईने ताटात चिवडा करंज्या आणल्या. या मुलांनो फराळाला असं म्हटली. पण एक ही मुल उठेना. कपडे घेणं तर आता दूरच पण अजून तिप्पट मेहनत करून गवंढी नामाकाकाचे दहा हजार रूपये द्यायचे होते. मुलं खायला येतच नाही म्हटल्यावर आईचा धीर सुटला.
नवरा मेला, तरी मुलांना जगवायचय आणि आपणच रडलो तर लहान मुलं भेदरतील या विचाराने दुःख गिळलेली ती बाई मी माझ्या मुलांना साधा आनंदही देऊ शकत नाही असं बोलून रडू लागली. मुलं तिच्या भोवती गोळा झाली. धाकट्याने तिचे डोळे पुसले आणि म्हटला, आई नकोना रडू.  खरंच नकोय आम्हाला कपडे. घेऊ आपण नंतर. सर्व मुलं एका स्वरात बोलली आई नको आम्हाला कपडे. तेवढ्या वेळे पुरतं का होईना आईला वाटलं. खरंच आपण खूपच लाचार आहोत. धाकट्याने एक करंजी उचलली आणि आईच्या तोंडात कोंबली.
मोठी मुलगी म्हटली आई, आम्हाला कपडे घेणार होतीस आणि तुला एकही चांगली साडी नाही. आम्ही आहोत ना. हे ही दिवस जातील आपले. आईने डोळे पुसले तिची खरी संपत्ती तर तिच्या आजूबाजूलाच बसली होती.  मग सगळ्यांनी एक एक करंजी हातात उचलली आणि आसवांत बुडालेली दिवाळी गोड झाली.

प्रा.दीपक जाधव, संपादक शब्द खड्ग.
9967872052 / 7738735798

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...