आज एन्क्वायरी काउंटरला बसायचं आहे हे माहित होतंच. नीता बॅग आपल्या जागेवर ठेवून आणि फ्रेश होऊन काउंटरला आली. काउंटर पावणेअकराला सुरू व्हायचा. पण त्याआधी आपण तयार असलं पाहिजे असा नीताचा कटाक्ष होता. कम्प्युटर चालू करून तिनं फोन सुसज्ज केला आणि तो लगेच वाजलाच.
"मी वसंत आपटे बोलतोय. वय वर्षे पंचाहत्तर. मला पेंशनची चौकशी करायची आहे. दर महिन्याच्या एक तारखेला माझे पाॅलिसीचे सात हजार जमा होतात. यावेळी आले नाहीत. असं कसं?"
"सर, आपला पाॅलिसी नंबर सांगता का?" काका वगैरे म्हटलेलं बऱ्याच लोकांना आवडत नाही हे अनुभवानं तिला माहीत झालं होतं.
"नंबर कशाला हवा? नावानं शोधता येत नाही?"
"सर, शोधता येईल. पण साडेसात लाख पाॅलिसीज आहेत हो आमच्याकडे. कम्प्युटरलाही वेळ लागतो बराच. तोपर्यंत तुमच्यासारख्याच चार-पाच जणांना खोळंबून उभं राहावं लागेल काउंटरला. म्हणून विचारतेय."
"मी पाॅलिसी नंबर शोधून मग फोन करतो." म्हणून आपट्यांनी फोन ठेवून दिला.
नीता, समोरची लाईन आणि फोन अशी कसरत करत राहिली. सगळ्यांना समाधानकारक उत्तरं देण्यात व्यग्र झाली. एकनंतर जरा काउंटर शांत झाला. तेवढ्यात रेशमानी तिला आवाज दिला.
"नीता, डब्यात काय आणलंय आज? मी भाजी नाही आणलीय. कँटिनला जाऊया का जेवायला?"
"नको ग ! त्यापेक्षा फोन करून इथेच मागव ना ! कँटिनला गेलं की वेळ जातो खूप आणि आज मला एन्क्वायरी आहे ना?"
"हो ग बाई, आणि तुला एक मिनिटंही उशीर चालत नाही. कळलं मला." रेश्मा फणकारली. पण तिने फोन करून भाजी मागवली. दोघींचं जेवण आवरलं. जराशा गप्पा-टप्पा करून नीता परत काउंटरला आली. ती स्थानापन्न झाली आणि फोन वाजला. सकाळच्या आपटे काकांचा फोन होता. त्यांनी आता पाॅलिसी नंबर दिला होता. त्यांनी 'जिवंत असल्या'चा दाखला जमा केला नव्हता, त्यामुळे त्यांच्या पेंशनचं पेमेन्ट थांबवण्यात आलं होतं. त्यांना तसं सांगताच ते वैतागले.
"मीच बोलतोय ना फोनवर, मग तुमच्या रेकॉर्डला तशी नोंद करून टाका आणि माझे पैसे पाठवा बँकेत. घर कसं चालवायचं आम्ही?"
"सर, असं करता येत नाही." तिने त्यांना दाखला कसा आणि का हवा, समजावून सांगितले.
पण आपटे त्या दाखल्यासाठी घराबाहेर पडू शकत नव्हते. त्यांना त्यांच्या शरीराचा तोल सांभाळणे जमत नव्हते काही आजारामुळे. त्यांच्या पत्नीचीही दृष्टी कमी झाल्यामुळे तिलाही बाहेर पडता येत नव्हते. दोन्ही मुलं नोकरीच्या ठिकाणी बाहेरगावी रहात होती. फाॅर्म पोस्टाने पाठवता येईल, पण परत कसा येणार? या विचारात एक नजर तिने त्यांच्या पत्त्यावर टाकली आणि तिच्या चेहर्यावर हसू उमटलं. "तुमचं 'सहयोग गृहसंकुल' माझ्या वाटेवरच आहे. मी अशोकनगर मध्ये राहते. मी पोचवते तुम्हाला फाॅर्म, संध्याकाळी घरी जाताना. तुमचं पॅनकार्ड किंवा इतर काही ओळखपत्र असलं तर ते शोधून ठेवा." असं म्हणून नीतानं फोन ठेवला.
मागच्या टेबलवर बसलेल्या रेश्मानी हे ऐकलं. "नीता, आपलं आज शाॅपिंगला जायचं ठरलं होतं, विसरलीस ना? धन्य आहे तुझी ! सगळ्यांना मदत करायची जबाबदारी तुझ्यावरच आहे का?"
नीताने त्यांची परिस्थिती तिला सांगितली. "त्यांच्या मुलांना नको का काळजी आई-बापाची? स्वतः मस्त मजेत राहात असतील आणि इथे आपण यांची काळजी घ्यायची."
"रेश्मा, शाॅपिंगला उद्या जाता येईल की! पण त्या बिचाऱ्यांना घरखर्च चालवणं मुश्किल झालंय ग ! त्यांच्या मुलांबद्दल तुला काय माहित आहे? उगाच कशाला आपण त्यांना बोल लावायचा. त्यांच्याही काही अडचणी असतील. माझ्या वाटेवरच आहे, म्हणून सहज शक्य आहे मला."
तेवढ्यात कोणीतरी चौकशीसाठी पुढे आलं आणि नीता त्यांच्याकडे वळली. आणि मग काम करता करता साडेपाच कसे वाजले ते तिला कळलंच नाही. रिक्षाने घरी जाताना ती सहयोग गृहसंकुलापाशी उतरली. आपटेंच्या फ्लॅटची बेल वाजवून ती दार उघडण्याची वाट पाहू लागली.
दोन मिनिटांनी आपटेबाईंनी दार उघडलं. आणि नीता अवाक् होऊन बघतच राहिली. आपटेबाई छानशी सिल्कची साडी, केसांत गजरा, अशा प्रसन्न मुद्रेनी समोर उभ्या होत्या. नजर अधू आणि हातात आधाराला काठी असली तरी चेहरा आनंदी होता. आपटे काका समोरच सोफ्यावर बसले होते. त्यांच्याही चेहऱ्यावर प्रसन्नता होती. नीताच्या कल्पनेतल्या चित्रापेक्षा हे खूपच छान होतं. पाणी पिऊन झालं आणि मग तिने फाॅर्मवर मि. आपटेंची सही घेतली. ओळखपत्राची नोंद करून, त्यावर स्वतःची सही करून, दाखला पर्समध्ये टाकून ती उठली.
काकांनी तिला थांबवलं. "पाच मिनिटं वेळ अजून देणार ना आमच्यासाठी?"
नीता जरा गोंधळली. 'काय हवंय यांना आता ?'
काकांनी टेबलावरच्या गिफ्ट पॅककडे हात दर्शवला. "ते जरा टिपाॅयवर ठेवाल?"
नीताने त्याप्रमाणे केलं.
"आता प्लीज ते उघडा." त्या पॅकमध्ये छोटासा केक आणि चांदीसारख्या धातूची छोटीशी जहाजाची प्रतिकृती होती. केकवर, 'Happy Birthday Aai', लिहिलेलं.
नीता वाचत असतांनाच काका म्हणाले, "अहो, हे आमच्या मुलानं, सागरनं पाठवलं आईचा वाढदिवस लक्षात ठेवून. थोड्या वेळापूर्वी आलं पार्सल. तो मरिन इंजिनीयर आहे. सध्या शिपवर आहे ब्रह्मदेशला. म्हटलं चांगला योग आहे. अनायसे तुम्ही येणार आहात, तेव्हाच केक कापून वाढदिवस साजरा करू. नाहीतर आम्ही दोघंच असतो कायम घरात. मलाही काहीतरी द्यायचं होतं हिला. पण तुमच्याकडून पैसेच आले नाहीत. म्हणून जरा वैतागलो. साॅरी, साॅरी हं! अहो, कापा बरं केक लवकर. यांना उशीर नको व्हायला, घरी जायला." नीताला काय बोलावं तेच सुचेना. काकूंनी मग पुढे होऊन केक कापला. नीताने काकांबरोबर टाळ्या वाजवत, काकूंना शुभेच्छा दिल्या. त्यांच्याबरोबर केकचा समाचार घेता घेता, तिला कळलं की आपट्यांचा दुसरा मुलगा मिलिट्रीत आहे आणि आत्ता काश्मीरमध्ये आहे.
मुलांबद्दलचा अभिमान दोघांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. आपल्या इथे येण्याच्या निर्णयाचं सार्थक झालं असंच नीताला वाटलं. तिच्या छोट्याशा कृतीमुळे त्या वृद्ध दांपत्याला किती मोठ्ठा आनंद मिळाला होता.
©️प्रणिता खंडकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा