शनिवार, १८ ऑक्टोबर, २०२५

2343. पश्चाताप

 नेहमीचा रिक्षावाला चंद्रकांत आणि मी, आमच्यात एक जवळचं नातं निर्माण झालं होतं.
मी रिक्षात बसले आणि नेहमीप्रमाणे आमच्या संभाषणाला सुरुवात झाली. "चंद्रकांत अभिनंदन.."
"कशाबद्दल मॅडम?"
"अरे आजच्या सकाळ पेपरला  नाव आलय तुझं.. रिक्षात विसरलेली बॅग प्रामाणिकपणे तु परत केलीसं म्हणे. तुझा गौरव होणार आहे, कारण परत केलेल्या बॅगेत रोख रक्कम व महत्त्वाची कागदपत्रे होती, शिवाय बक्षिस ही नाकारलेसं तु.!"
"मॅडम, त्यांचेचं कष्टाचे पैसे परत केले मी. त्यात काय एवढं?  बॅगे च्या मालकीण बाई, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, डोळ्यातले आनंदाश्रू पाहिले ना, तेच माझे बक्षीस आणि तोच माझा गौरव  आहे मॅडम. 
कष्टाच्या पैशाची चोरी झाल्यावर त्या माणसावर काय प्रसंग ओढवतो, त्याची जबरदस्त शिक्षा मिळालीय मला. अश्वत्थाम्याची जखम मरेपर्यंत त्याचा पिच्छा सोडणार नव्हती तशीच जखम अगदी मरेपर्यंत माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत माझ्या मनामध्ये राहील." प्रसंगाला वेगळेच वळण लागले होते. 
       चंद्रकांत माझा कायमचा रिक्षावाला. खूप शिकलेला. पण बेकारीच्या विळख्यात नाईलाजाने अडकला होता. रिक्षाच्या धंद्यात पडला. स्टॉप आला आणि नेहमी प्रमाणे माझा निरोप घेणारा हळवा चंद्रकांत डोळ्यातले पाणी लपवतच निघून गेला. कुठेतरी काहीतरी चुकलंय. कधी तरी नेहमीच्या मोकळेपणाने तो सारं काही सांगेल म्हणून मी वाट बघत होते.  नंतरचे दिवस भराभर गेले. शाळेला सुट्टी लागल्यामुळे आमची भेट झाली नाही आणि तो प्रसंग मी विसरले. मध्यंतरी चंद्रकांतचा सत्कार झाल्याचे कळले. त्याचा फोटो पण पेपरला रिक्षावाल्या मित्रांबरोबर सुरेख आला होता. मित्र वर्गात तो सगळ्यांचा आवडता होता. सगळ्या वयाच्या माणसांबरोबर त्याचे चांगले जमायचे. म्हणूनच मी त्याच्या पेक्षा मोठी असले तरी आमची मैत्री झाली होती. सुट्टी संपली आणि बोलावल्या प्रमाणे बरोबर अकरा वाजता रिक्षा चा हॉर्न वाजला.  बघितलं तर चंद्रकांत हात जोडून विचारत होता, 
"नमस्कार मॅडम,  कशा आहात?"
"मी मजेत ! पण बोलवल्या सारखा तू  कसा काय आलास?"
तो खेळकर पणे हसत म्हणाला, "मुलांजवळ चौकशी केली तर तुमची शाळा सुरु होणार असल्याचं कळलं. विचार केला, तुम्ही वाट बघत असणार. भराभर आंघोळ पूजा केली  आणि तुमच्या घराकडे धावलो.  माझ्यामुळे उशीर झाला का मॅडम?"
उत्तर देण्याऐवजी मी त्याच्याकडे बघतच राह्यले. किती साधा सरळ आणि प्रामाणिक मुलगा आहे हा. मला मागच्या  वेळेचे त्याचे भरून आलेले डोळे आठवले कसलं दुःख होतं त्याच्या मनात? पण मी गप्प बसले. कारण ते विचारण्याची ही वेळ नव्हती. त्यामुळे 'चांगला मूड असतानाच काय ते विचारू' असं मी ठरवलं.  चार-आठ दिवसांनी चंद्रकांत म्हणाला, "उद्या मी नाही येऊ शकणार मॅडम. तुमची सोय केली आहे मी. माझा मित्र येईल तुम्हाला घ्यायला. मी कुठे गावाला चाललॊ नाही. उद्या सत्यनारायणाची पूजा आहे आमच्याकडे. तुम्हाला आमंत्रण द्यायला आलोय. मोठ्ठया व छोट्या आईने बजावून सांगितले आहे, तुम्ही सगळ्यांनी नक्की यायचे. याल ना? आम्ही सगळेजण वाट बघतो."   
     वाऱ्यासारखा तो आला आणि गेलाही. पण जाताना मात्र माझ्या मनात शंकेचे पिल्लू सोडून गेला. 'मोठी आई आणि छोटी आई, काय भानगड आहे ही? त्याच्या वडिलांची दोन लग्ने किंवा काही  भानगड?' विचारांचा भुंगा तिथेच सोडून मी कामाला लागले. ठरल्याप्रमाणे आम्ही त्याच्याकडे तीर्थ प्रसादाला गेलो. घर छोटे व त्याच्या परिस्थितीला साजंसं होतं. पण अतिशय स्वच्छ आणि नीटनेटकं होतं. आम्हाला बघून सगळ्यांना खूपच आनंद झाला. दारात एक मराठमोळ्या सोज्वळ बाई स्वागताला सामोर्‍या आल्या. त्या चंद्रकांतच्या आई असल्याचे समजले. त्यांच्या सात्विक चेहऱ्याकडे बघितल्यावर एक गोष्ट लक्षात आली की चंद्रकांत ला वडील नव्हते.
      जवळच्या खुर्चीवर जराशा वयस्कर बाई बसल्या होत्या. आपल्याच विचारात गर्क असलेल्या आणि कुठेतरी नजर लावून बसलेल्या.
      चंद्रकांत ने ओळख करून दिली, "ही आमची मोठी आई." घरात त्याचा धाकटा भाऊ होता आणि एक चुणचुणीत मुलगी पण होती. आमचं आदरातिथ्य चांगले झाले. दोन दिवसानंतर चंद्रकांत भेटल्यावर मला म्हणाला "तुम्हाला वेळ असेल तर येता का जरा? समोरच्या  मंदिरात बसुया का? मला तुमच्याशी मोकळेपणी बोलायचे आहे."
   ‌मंदिराच्या पायरीवर आम्ही बसलो आणि तो सांगू लागला. माझं शिक्षण पूर्ण झालं आणि वडील वारले. आई, लहान भाऊ यांची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. नोकरीसाठी वणवण फिरलो, पण निराशाच पदरी पडली. आमची परिस्थिती बेताची होती. त्यातून भावाचं शिक्षण व्हायचं होतं. आई उदास असायची. माझ्या नोकरीकडे डोळे लावून बसलेली असायची. तिचा चेहरा मला बघवत नव्हता. परिस्थितीकडे पाठ फिरवून मी पळ काढत होतो. सतत घराबाहेर मित्रांबरोबर वेळ काढत होतो. त्यातून मला वाईट मुलांची संगत लागली. डोळ्यात पाणी आणून आई मला समजवायची. पण मवाली मुलांच्या सहवासातच माझा वेळ जात होता. पैसा मिळवायचा, पण तो कसा? रस्ता सापडत नव्हता, दिशा मिळत नव्हती. पण कुठून तरी कसातरी पैसा मिळवायचाच हा एकच विचार डोक्यात होता. अखेर मी व माझ्या मित्राने ज्येष्ठ नागरिकांना लुटायचं ठरवलं. आम्ही मोटारसायकल वर बसलो. मी पुढे आणि मित्र  मागे. आम्ही दोघेही हा धंदा करण्यात नवखे होतो. आड रस्त्याला वळणार इतक्यात एक बाई हळू हळू चाललेल्या दिसल्या.
       त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र पाहून आमचे डोळे चमकले. मित्राने इशारा केला. मी गाडीचा वेग कमी केला. त्या वळाल्यावर मित्राने मंगळसूत्र खेचले. बाई जोरात ओरडल्या. मागे काय झाले हे वळुनही न बघता मी गाडी जोरात चालवली. त्या आजीचा केविलवाणा आवाज कानावर पडला. "अरे बाळांनो माझं मंगळसूत्र मला परत द्या. ते... ते...."
      आमची गाडी जोरात धावत होती. त्यांचे दुर्देव म्हणा की आमचे सुदैव, हेल्मेट मुळे मला आणि मित्राला कुणी बघितलं नव्हतं. तो मित्र घाबरून दुसऱ्या दिवशी गावाला पळून गेला. अर्थात ते मंगळसूत्र माझ्याकडेच राहीलं. आईपासून ही गोष्ट मी लपवली. पण माझे मन मला खात होतं. मी रिक्षा चालवायला लागलो. काही दिवसांनी त्याच रस्त्यावर जायची वेळ आली. माझ्या रिक्षात एक आजी बसल्या होत्या. त्या म्हणाल्या, "घरापर्यंत सोड रे बाबा मला. काही दिवसांपूर्वी याच रस्त्यावर शेजारच्या फ्लॅटमधल्या आजींचं मंगळसूत्र चोरांनी पळवलं. काय मिळालं चोरांना? आजींचा तळतळाटचं ना?.  एकच मुलगी आहे त्यांना. मालक अंथरुणावर. लुळेपांगळे होऊन पडलेले. बिच्चाऱ्या हळव्या आजी !"
मी विचारलं, "काय हो, किती नंबरच्या फ्लॅटमध्ये राहतात त्या? आणि आडनाव काय त्यांचं?"
भाबडेपणाने रिक्षातल्या आजींनी सगळी माहिती सांगितली खरी, पण नंतर त्या पटकन म्हणाल्या, "का रे एवढी का चौकशी चालवली आहेस?" मी म्हणालो, "त्यांना काही मदत लागली तर... त्यांचे मिस्टर आजारी आहेत ना?"
आजी आणखी काही सांगणार होत्या इतक्यातं त्यांचं घर आलं. उतरताना त्या बडबडत होत्या, "वाटोळं होईल त्या मेल्या चोराचं."
       आजी उतरून गेल्या खऱ्या पण माझ्या मनात प्रचंड उलथापालथ चालली होती. रात्रभर मी तळमळत होतो. आईने माझी घालमेल ओळखली. आईच्या मांडीवर डोकं ठेवून मी खूप रडलो. माझा गुन्हा मी आईजवळ कबूल केला. आई अवाक् झाली. आपला मुलगा असं काहीतरी भयंकर करेल असं तिला  स्वप्नातदेखील वाटलं नव्हतं. तिने मला दूर लोटलं. इतके चांगले केलेले संस्कार, लावलेलं वळण, सगळं सगळं वाया गेलं होतं. आईने माझ्या मुस्काडात मारली. इतकं सात्विक, उत्तम घराणं आपलं, अशा पापभिरू घरात माझ्यासारखा दिवट्या कुलदीपक निघावा, ह्याचं फार फार दुःख झालं तिला. देव्हाऱ्यात देवांबरोबर बाबांचा फोटो पण होता. मला बाजूला सारून आणि दिवा लावून देवांपाशी ती सुन्न होऊन बसून राहिली. तिच्या डोळ्याला अविरत धारा लागल्या होत्या. तिच्या डोळ्यातलं पाणी माझ्यासाठी भयंकर आणि फार मोठी शिक्षा होती. पुन्हा पुन्हा जवळ जाऊन क्षमा मागूनही ती माझ्याकडे बघायला तयार नव्हती. अखेर रडता-रडता मी आईच्या पायाशी कोसळलो. माझा डोळा लागला. मी जमिनीवर थंडीने कुडकुडत पाय पोटाशी घेऊन झोपलो होतो. मला रोज पांघरूण घालून डोक्यावरून मायेनं हात फिरवणारी आई आज कठोर झाली होती.
  ‌  सकाळ झाली. मी उठलो. आई रात्री किती वेळ जागी होती कुणास ठाऊक, पण आता मात्र ती आंघोळ करून देवाची पूजा करत होती. रात्रभर मला चित्र विचित्र स्वप्नं पडत होती. चोरी, तुरुंग, बाबांचा दुःखी चेहरा, आईचे अश्रू.. नुसता गोंधळ उडाला होता माझ्या मनात. पुन्हा मी आईकडे धावलो आणि तिचे पाय धरून म्हणालो "खरंच मी चुकलो गं आई. मला खूप पश्चाताप झालाय.. चोरी मी नाही केली पण चोरी करणाऱ्याला साथ दिली आहे. चोरी करणाऱ्या पेक्षाही त्याला साथ देणारा जास्त गुन्हेगार ठरतो  हे कळलंय मला. पण मी आता काय करू? तू सांगशील ती शिक्षा भोगायला तयार आहे मी. वचन देतो तुला, पण हा अबोला सोड आई ! हा पहिला आणि शेवटचा गुन्हा असेल माझा. हा एकच अपराध पोटात घाल ना माझा. आई मला क्षमा कर नाहीतर इथेचं तुझ्या पायाशी मी जिभ हासडून प्राण देईन." 
        चंद्रकांत मला त्याची कहाणी सांगत होता आणि रडत होता. नकळत परिस्थितीमुळे त्याच्या हातून गुन्हा घडला होता. त्या क्षणी खुप निर्मळ भाबडा वाटला मला तो. त्याच्या पाठीवर मायेने हात फिरवत मी म्हणाले, 
"शांत हो बाळा, शांत हो ! पण मग नंतर काय झालं ? तुझ्या आई साठी तो फार मोठा कसोटीचा क्षण होता हो ना?"
"हो मॅडम, कर्तव्य आणि मुलाचीं माया, या संकटात, या कात्रीत सापडली होती आई. ती उठली आणि म्हणाली, "पटकन आवर, चल माझ्याबरोबर आणि ती मंगळसूत्र ठेवलेली डबी घे बरोबर."
       कुठे जायचं काय काय करायचं? मला काहीच समजेना, पण माझी आई माझ्याशी बोलली हेच माझ्यासाठी खूप होतं. वाटेत आईने मला विचारलं, "तुला त्या ताईचं नाव आणि पत्ता माहित आहे ना? चल तर मग, त्यांच्याकडे जायचंय आपल्याला."
मला धडधडायला लागलं. आईने दटावलं आणि आम्ही निघालो. बेल वाजवल्यावर एका मुलीने दार उघडलं अनोळखी माणसांना कसं घ्यावं घरात? या संभ्रमात पडली ती. आई पटकन पुढे झाली आणि म्हणाली, "त्या वयस्कर ताई इथेच राहतात ना? आहेत का त्या घरात?  आणि  बाळ तु कोण त्यांची ? आम्हाला त्यांच्याशी बोलायचय. त्यांना भेटायचंय."   
        आईला आतं घेत ती म्हणाली, "माझ्या आईला भेटायचय का? पण ती तुम्हाला नाही ओळखू शकणार, कारण तिला स्मृतिभ्रंश झालेला आहे. बाबा... बाबा गेले." तिचे वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच त्या बाई दारापाशी आल्या. त्यांच्याकडे बघितलं. मी कोसळणारच होतो.. कारण.. कारण त्यांच्या गळ्यात मंगळसूत्र तर नव्हतंच पण कपाळ पांढरं फटफटीत होतं. म्हणजे ? त्यांचे मिस्टर गेले की काय? 
       माझी आई तर मटकन खालीच बसली. त्या मुलीने पटकन पाणी आणलं. थोड शांत झाल्यावर आईने तिला हें सगळं कधी कसं झालं. मला मावशी समजून सगळं विश्वासाने सांग पोरी' असं म्हणाल्यावर ती सांगू  लागली, "काही दिवसांपूर्वीच बाबा गेले. आम्हाला कोणीच नातेवाईक नाहीत. आईला बाबा गेल्यावर भ्रम झाला. कधी कधी तिची स्मृती येते तेव्हा खूप रडून ती म्हणते 'मंगळसूत्र भारी नव्हतं पण तो माझा सौभाग्य अलंकार होता, तोच चोरांनी का न्यावा ? अपशकुन वाटला मला तो. आणि त्याच दिवशी हे कां जावेत?' असे म्हणत असताना तिची शुद्ध जाते. मंगळसूत्र ओढल्यावर त्या दिवशी माझे बाबा गेले याचा तिच्या मनाला फार मोठा धक्का बसला. काळ्या मण्यात ओवलेले लेणं लेवून ती थाटात वावरायची. मला नोकरी लागली आणि मी एक ग्रॅमचे मंगळसूत्र तिच्यासाठी आणलं होतं." 
    ती मुलगी रडत सांगत होती, माझ्या आईचा हात तिच्या पाठीवरुन फिरत होता, त्यामुळे अनोळखी असूनही प्रेमाची भावना तिच्या मनात उमटली. डोळे पुसत ती पुढे म्हणाली, "आईला प्रचंड धक्का बसला. तिची स्मृति गेली. कधी कधी तिची स्मृती परत येते तेव्हा ती खुप रडते. आई इतकी खचण्याचं कारण म्हणजे त्या...त्याच दिवशी आमचे बाबा गेले ना! डॉक्टरांनी सांगितलच होतं. बाबा जाणारच होते, पण असं घडल्यामुळे आईच्या मनाला फार मोठा धक्का बसला आहे." ती मुलगी, म्हणजे शर्वरी ताई डोळे पुसत आम्हाला सांगत होती. माझ्या आईचा आश्वासक हात तिच्या पाठीवरुन फिरत होता, आणि तिच्या आई, म्हणजे शालीनीताई गोंधळून आमच्या कडे बघत होत्या. माझ्या आईने जळजळीत नजरेने माझ्याकडे बघितलं. तीची नजर मला जाळत होती. ती नजर म्हणत होती 'तुझ्या पापी दुष्कृत्यामुळे एक घरटे उद्ध्वस्त झाले. एका स्त्रीचे सौभाग्य स्वप्न तु उधळून लावलंस. काय शिक्षा करू मी तुला ?'
   मी मान खाली घातली. मॅडम मला माझ्या कृत्याची शरम वाटली.. माझ्या अघोरी गुन्ह्याचं प्रायश्चित्त मला मिळायलाच हवं, पण मी काय करू? मी सैरभैर  झालो होतो. या घरासाठी मी काय करू ते मला कळत नव्हतं. पण माझी आई धोरणी आणि विचारी होती. प्रथम तिने शर्वरीला विश्वासात घेऊन सगळी हकिगत सांगितली. माझ्यासारखा मुलगा असं काही करेल यावर तिचा विश्वासच बसेना. शर्वरी ताईचे मी पाय धरले. मला उठवत मोठ्या मनाने ती म्हणाली, "खरंच पश्चाताप झालाय ना तुला? शिक्षा हवी आहे ना तुला? मग मला वचन दे की, इथून पुढे तू असलं काहीही दुष्कृत्य करणार नाहीस. राखीपौर्णिमा जवळ आली आहे, तू माझा धाकटा भाऊ व्हायचस.
      तुझ्या आईमध्ये मी माझी हरवलेली आई पाहिली. रोज मी बाबांच्या आठवणीने, आईच्या काळजीने खूप रडायची. जवळचं असं कोणी नाही आम्हाला. पण आता मला या मावशीमुळे खूप दिलासा मिळाला. दैवी संकेत असा असावा हा, म्हणूनच तुम्हाला इथे यायची बुद्धी झाली." 
     त्यावर माझी आई म्हणाली, "मला मुलगी नव्हती, ती मुलगी मला मिळाली. दोघी ही एकमेकींच्या मिठीत विसावल्या. हें इतकं सहज अचानक घडत गेलं की ते स्वप्न की सत्य तेच मला समजेना. 
       शर्वरी चे बाबा परत येणार नव्हते, त्याला ईलाजच नव्हता, पण माझ्या गुन्ह्याचे प्रक्षालन होणार होते. आमच्या तिघांच्या त्रिवेणी अश्रू संगमात माझे पाप धुऊन गेलं होतं. खरंच मॅडम त्या दिवशी मी शांत झोपलो. आईने मला निक्षुन सांगितलं "आता या घराची सगळी जबाबदारी तू घ्यायचीस, शर्वरी ताईसाठी उत्तम स्थळ आणून आपण तिची पाठवणी करू. आज पासून तू माझा नाही, ह्या  शालिनी ताईंचा  मुलगा आहेस हें लक्षात ठेव."
        मंडळी, गोष्ट इथेच संपली नाही तर चंद्रकांतच्या आयुष्याला खरी सुरुवात झाली. तो शिकलेला होताच, कालांतराने त्याला चांगली नोकरी लागली. शर्वरीला ही प्रमोशन मिळालं.. शालिनीताई ही बऱ्याचशा सावरल्या गेल्या आहेत.  शर्वरीचं लग्न ठरलं.. आणि आज... आज तिची पाठवणी होती. पाठीराखा भाऊ पाठीशी होता.
       दोन्ही आयांच्या डोळ्यातून आनंदाश्रुंच्या गंगा यमुना वहात होत्या. कसा हा योगायोग बघा ! मागील जन्मीचे ऋणानुबंध असावेत हे. मला गाणं आठवलं 'दोन ओंडक्याची होते सागरात भेट.....  
      आता एक जबाबदार कर्ता पुरुष म्हणून चंद्रकांतचंही लग्न ठरेल. वरमाई म्हणून दोन्ही आया थाटांत मिरवतील आणि आपल्या ह्या लेकाला आभाळाएवढे आशीर्वाद देतील आणि म्हणतील "चंद्रकांत बाळा, सुखी भवं..."     
    
©सौ.राधिका माजगावकर पंडित.
 पुणे. 8451027554
(आवडल्यास शेअर करतांना कथेत कुठलाही बदल न करता मुळ लेखिकेच्या नावासहच शेअर करा ही विनंती.).

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...