शनिवार, १८ ऑक्टोबर, २०२५

2331. निर्णय

      रविवार होता. मानसीला ऑफिसला जायचे नसल्यामुळे मानसी आरामात आरामखुर्चीवर बसून एका हातात कॉफीचा मग व दुसऱ्या हातात कादंबरी घेऊन कॉफीचा व वाचनाचा आनंद घेत होती. वाचनात ती एवढी गढली होती की तिला वेळेचे भानच राहिले नाही.बऱ्याच वेळाने तिला भुकेची जाणीव झाली. ती किचन मध्ये गेली. कालच तिने ब्रेड आणून ठेवला होता. फ्रिज मधून चटणी , काकडी व बटर काढून तिने झटपट सॅंडविच केले. आणि परत एका हातात सँडविच घेऊन खात-खात ती पुन्हा वाचनात गढली.
     संध्याकाळचे पाच वाजले आणि मानसीची बहीण वेदा हिचा फोन आला," मनू , लक्षात आहे ना?  तुला आज शेखरला भेटायला जायचे आहे. दोघेही अगदी मनमोकळ्या गप्पा मारा.... दोन-तीन वेळा एकमेकांना भेटा. एकमेकांना जाणून घ्या आणि  रात्री मला फोन कर. कशी झाली आजची  डेट... ते सांग ." " हो ऽ हो ऽ " म्हणत तिने फोन ठेवला व घड्याळ पहिले, पाच वाजले होते. आता तयारीला लागायलाच  हवे. शेखरने  सहाची वेळ दिली होती. नाराज होतच तिने हातातील पुस्तक बाजूला ठेवले आणि ती तयारीला लागली .‌ 
     फ्रेश होऊन, मानसीने छान पंजाबी ड्रेस घातला. वरच्या नेव्ही ब्लू खमीजवर गुलाबी रंगाचे काश्मीरी वर्क होते. खाली गुलाबी रंगाची सलवार आणि गुलाबी रंगाची ओढणी. आरशासमोर उभी राहून तिने हलकासा मेकअप केला .नॅचरल गुलाबी रंगाची लिपस्टिक ओठावर फिरवली. नंतर आपल्या कुरळ्या काळ्या, स्टेप कट केलेल्या केसांवरून ब्रश फिरवला .अगदी स्मार्ट व सुंदर दिसत होती ती . आरशात आपली छबी पाहून ती स्वतःवरच खुश झाली. नंतर ती कार घेऊन ठरलेल्या हॉटेल मध्ये गेली. शेखर वाट पाहत होताच. त्याने तिचे हसून स्वागत केले. टेबल रिझर्व्ह केलेले होतेच. दोघेही तेथे जाऊन बसले. कॉफी व सॅंडविच खाता-खाता एकमेकांचा परिचय होत होता. 
     शेखरची बायको पाच वर्षांपूर्वीच वारली होती. त्यांना एक मुलगा होता . त्याचे लग्न होऊन तो अमेरिकेला स्थायिक झाला होता. घरात शेखर व त्याची आजारी आई दोघेच राहत होते. आईसाठी व स्वयंपाक वगैरे कामासाठी बाई होती. शेखर म्हणाला," मी स्वयंपाकीण बाईच्या हातचे व डब्याचे जेवण जेवून अगदी कंटाळलो आहे. घरात बघणे , घर मॅनेज करणे मला जमत नाही. ऑफिसमधून आलो की, गरम गरम चहा मला कोणी द्यावा आणि घर मॅनेज करावे. म्हणून मी लग्न करीत आहे."
       मानसीनेही आपला परिचय व पार्श्वभूमी सांगितली. मानसी एका कंपनीत, एका चांगल्या पोस्टवर नोकरी करीत होती. तिचे यजमान मंदार, एका इंटरनॅशनल कंपनीत उच्च पदावर होते . घरात सासू-सासरे, मानसी , मंदार व त्यांची मुलगी रेवा असे पाच जणांचे सुखी कुटुंब होते .मंदारच्या प्रेमात मानसी अक्षरश: न्हाऊन निघत होती. सासू-सासरे तिच्यावर मुलीप्रमाणे प्रेम करीत होते .आणि रेवा मुळे तर घरात चैतन्य होते. घर हसरे ...खेळते झाले होते.... आणि याच हसऱ्या  - खेळत्या घराला..... एक दिवस दृष्ट लागली .
    एक दिवस मंदार ऑफिस कामासाठी टूरवर जात असताना अचानक विमान अपघातात त्या सगळ्यांना कायमचा सोडून गेला. मानसीच्या मनावर मोठा आघात झाला. पण दहा वर्षाच्या रेवाला, सासू-सासर्‍यांना तिला सांभाळायचे होते. त्यामुळे तिने स्वतःला कसे बसे सावरले. सासू-सासऱ्यांच्या मदतीने रेवाला सांभाळून ती नोकरी सांभाळत होती. पण आपली म्हातारपणाची काठी....आपला तरुण मुलगा गेल्याचा धक्का सासू - सासरे सोसू शकले नाहीत. मनाने ते खूपच खचले होते. त्यांना नैराश्य आले होते. पण मानसी व रेवासाठी ते उसने अवसान आणत होते. जेव्हा मनानेच नकारात्मकता स्विकारलेली असते, तेंव्हा बाह्य उपचारांचा काहिही उपयोग होत नाही हेच खरे . नंतर काही वर्षातच दोघेही पाठोपाठ मानसी व रेवाला कायमचे सोडून गेले .मानसीला सगळीकडूनच आधार सुटल्यासारखे वाटले. एकटेपणा आल्यासारखे वाटले. पण त्यातूनही तिने स्वतःला सावरले .रेवाची जबाबदारी तिच्यावर होती. तिला आईबरोबरच वडिलांची ही भूमिका बजावायची होती.तिला रेवाला आजी - आजोबांच्या प्रेमाची उणीव भासू द्यायची नव्हती.
      रेवाही  परिस्थितीने समजदार झाली होती. तिला आईच्या मनस्थितीची व  परिस्थितीची जाणीव होती. त्यामुळे त्या दोघीत आई - मुली पेक्षाही मैत्रीणीचे नाते निर्माण झाले होते. दिवसेंदिवस ते अधिकच घट्ट होत होते . बघता बघता रेवा मोठी झाली . इंजिनियर झाली. नंतर मानसीने रेवानेच निवडलेल्या मुलाशी तिचे लग्न लावून दिले. लग्नानंतर रेवा बंगलोरला गेल्यामुळे मानसी परत एकटी पडली. पण मानसीने आॅफिसच्या कामात स्वतःला झोकून दिले . मुळात तिचा स्वभाव मनमिळावू असल्यामुळे, तिचे फ्रेंड सर्कलही मोठे होते. तरी रेवाला आई एकटी असल्यामुळे काळजी वाटतच होती. मानसीची बहीण .... वेदाने जेंव्हा मानसी पुढे पुनर्विवाहाचा प्रस्ताव मांडला. तेव्हा मानसीने," छे ऽ गं ऽ काहिही.... बोलतेस या वयात आणि जावई आल्यानंतर लग्न करायचे.?" असे म्हणून तिचा प्रस्ताव मानसीने धुडकावून लावला.वेदाने तिला समजावले, " अगं ऽ मानसी, उलट आता तुझ्या जबाबदाऱ्या संपल्या आहेत. रेवाही लग्न होऊन गेली. आता तुला एकटेपणा येईल. तेव्हा  तू आपला साथीदार शोध . स्वतःचा विचार कर." पण मानसीला ते पटत नव्हते. विषय टाळण्यासाठी तिने     "' बरं ऽ बघू " असे म्हणत तो विषय टाळला. मानसी पुनर्विवाह चे मनावर घेत नाही म्हटल्यावर वेदा रेवाशी बोलली .रेवालाही ते पटले. तिनेही आईला समजावले , " आई  ,बाबा गेल्यानंतर तुझ्यावर माझी व आजी-आजोबांची जबाबदारी होती त्यामुळे तू स्वतःच्या सुखाचा कधीच विचार केला नाहीस. आता सर्व जबाबदाऱ्या संपल्या आहेत .आता स्वतःचा विचार कर. माझी काळजी करू नकोस. मावशीने मांडलेल्या प्रस्तावाचा विचार कर."  मानसीने सर्व ऐकून सोडून दिले.
      पण वेदा मानसीसाठी स्थळं बघतच होती. त्यातच  तिला शेखर विषयी कळले. मानसी नको नको म्हणत असतांनाही वेदाने त्यांची भेट ठरविली. मग मात्र मानसी वेदाचे म्हणणे टाळू शकली नाही. म्हणून ती आज शेखरला भेटायला आली होती. पहिल्या भेटीत ओळख व इतर गप्पा झाल्या. त्यांनी पुढच्या आठवड्यात परत भेटायचे ठरवले.
 दुसऱ्या भेटीच्या वेळी मानसी छान लेमन कलरची सिल्कची साडी व त्यावर स्लीवलेस ब्लाऊज घालून गेली. त्यातही ती आकर्षक दिसत होती......शेखर आधीच आला होता. तो म्हणाला,"दहा मिनिटे तू लेट आलीस. माणसाने वेळा पाळाव्यात ....बरे असो, तुला साडी छान दिसते. मानसी समोरच्या खुर्चीवर बसता बसता म्हणाली, "सॉरी गाडी पार्क करता करता उशीर झाला. पार्किंगसाठी जागा मिळत नव्हती." शेखर ,..." ठिक आहे. असू दे. तुझ्याकडे कार आहे म्हणायची. प्रॉपर टेस्ट देऊन लायसन्स मिळवले ना ? "असे म्हणून तो खो ऽ खो ऽ करत हसला. मानसीचा मूडच गेला. वेटरने आणून ठेवलेली कॉफी व सॅंडविच तिने कसेबसे संपवले. शेखर चेही झाल्यानंतर  काम आहे असे म्हणून मानसी निघाली. निघतांना शेखरने तिला शनिवारी ये म्हणून सांगितले. 
     मानसी दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेली. आणि गेल्या गेल्याच तिला प्रमोशन मिळाल्याची बातमी कळली सहकाऱ्यांनी तिचे अभिनंदन केले. तिने लगेच सगळ्यांसाठी समोसे, पेढे व कॉफी मागविली. योगायोगाने या आठवड्यात शुक्र, शनि , रवि असे सलग तीन दिवस ऑफिसला सुट्टी होती. त्यामुळे सगळ्यांनी महाबळेश्वरला जायचे ठरविले. लगेच काही उत्साही लोकांनी  बसही बुक केली .सर्व प्लॅनिंगही झाले सुध्दा.
     मानसी आनंदातच घरी आली . तिने वेदा व रेवाला फोन केला.त्यांना आपल्या प्रमोशनची बातमी दिली. दोघींनाही खूप आनंद झाला. नंतर तिने शेखर ला फोन करून प्रमोशनची बातमी दिली .शेखरने अभिनंदन केले.नंतर तिने ऑफिस स्टाफबरोबर पिकनिकला जात असल्याचे सांगितले व शनिवार ऐवजी रविवारी संध्याकाळी भेटूया असेही म्हटले. शेखरने  " ठीक आहे " असे म्हणून फोन ठेवला . मानसीला का कुणास ठाऊक शेखरच्या बोलण्याचा टोन खटकला. पण तो विचार झटकून ती आपल्या कामाला लागली .आज ऑफिसचे राहिलेले काम तिने घरी आणले होते . आता प्रमोशनमुळे आणखीनच जबाबदारी वाढणार याची तिला जाणीव होती. त्यामुळे इतर विचार करायला तिला वेळच नव्हता. तो आठवडा तिचा, नवीन पोस्टवर रुजू होणे, नवीन जबाबदाऱ्या व कामाचे स्वरूप जाण्यातच गेला .
शुक्रवारी ऑफिस स्टाफ बरोबर मानसी महाबळेश्वरला गेली.सगळ्यांचेच  मौज- मस्तीत, फिरण्यात दोन दिवस कसे गेले ते कळलेच नाही. रविवारी ब्रेकफास्ट करून सारे परतीच्या मार्गाला लागले. सारेच हास्य-विनोद, गाणी म्हणत धमाल मूड मध्ये प्रवास करत होते. पण अर्ध्या वाटेवरच बस बंद पडली.. मग काय?. मेकॅनिकला शोधा शोध करून, त्याला पकडून आणून त्याने बस ची दुरुस्ती करून निघायला नाही म्हटले तरी दोन - अडीच तास गेलेच.आता मात्र सर्वांना घरी जाण्याची ओढ असल्यामुळे बस अगदी शांत झाली होती.ओरडा आरडा एकदम थांबला होता.
     मानसी संध्याकाळी साडेपाच वाजता घरी आली. तिने फ्रेश होऊन चहा घेतला.खरतर तिला बाहेर जायची ईच्छा नव्हती.तसे शेखरला कळवण्या साठी तिने फोन हाती घेतला. तेव्हढ्यात शेखरचाच फोन आला,  "निघालीस ना ? मी पोहोचतोच आहे." असे म्हणून मानसीला काहीही बोलू न देता त्याने फोन ठेवला. मानसीने विचार केला , शेखर रस्त्यात आहे तर त्याला परत पाठविणे योग्य नाही. म्हणून ती फ्रेश झाली आणि पटकन तिने जीन्स व त्यावर छानसा फुलांचा टाॅप घातला. केसांवरून ब्रश फिरवला व हलकासा मेकअप करून निघाली. एवढी दमलेली असूनही मानसी अगदी स्मार्ट व सुंदर दिसत होती.                                                                                                                  ठरलेल्या हॉटेलमध्ये मानसी पोचली तर शेखर यायचाच होता.ती त्याची वाट पाहत बसली. तेवढ्यात शेखर आला.त्याने तिच्याकडे एकटक बघतच वेटरला कॉफी व सॅंडविचची ऑर्डर दिली .त्याने मानसीशी बोलायला सुरुवात केली," काय मग मित्र-मैत्रिणींबरोबर ट्रीप छान एन्जॉय केली असेलच. पण ट्रिप ला जाण्याचे ठरवताना एका शब्दाने तरी मला विचारायचे ना ! ....आणि खरं सांगू ?.... मला आपल्या बायकोने कोणाबरोबरही ट्रिपला गेलेले आवडत नाही. आपले लग्न झाले की तुला नोकरी सोडावीच लागेल. घरात माझी आई अंथरूणावर आहे. तिचे कोण बघणार? माझा मोलकरणीवर विश्वास नाही. शिवाय माझ्याकडे, माझ्या खाण्याकडे आणि घराकडे घरच्या गृहिणीनेच लक्ष घातले पाहिजे या मताचा मी आहे. माझी पहिली बायको तेच करीत होती आणि हे जिन्स, पंजाबी ड्रेस मला अजिबात आवडत नाही. बाई ही साडीतच छान दिसते. म्हणून मी तुझ्यासाठी माझ्या आवडीची साडी आणली आहे. पुढच्या वेळी हीच साडी नेसून ये. तेव्हा आपल्या लग्नाचेही ठरवू." मानसीने काही बोलण्यापूर्वीच तिच्या हातात त्याने साडीचा बॉक्स ठेवला. शेखरचे बोलणे ऐकून ती थक्क झाली. तिला काय बोलावे सुचेना. तिने कसेबसे स्वतःला सावरत म्हटले ,"अहो मला आत्ताच प्रमोशन मिळाले. मी माझ्या कष्टाने ते मिळवले आहे. इतकी चांगली नोकरी  मी कशी सोडू? " लगेच शेखर म्हणाला,"का नाही सोडू शकत? तुला असून असून किती पगार असणार? माझ्या सारखा महिन्याला दोन-अडीच लाख नक्कीच नसणार. तसे इतर अलाउन्स मिळून त्याहूनही मला जास्त मिळतात. बरं ....ठीक आहे. आता चर्चा नको. ..पुढच्या भेटीत बोलू . कसे लग्न करायचे वगैरे तेही ठरवू. निघू ‌या आता." असे म्हणतच तो उभा राहिला व चालू लागला. मानसी यंत्रवत उठली व चालू लागली. बाय ऽ  करून दोघेही आपापल्या वाटेने गेले .                                                                                                                                                            मानसी घरी आली. शेखरने दिलेला साडीचा बॉक्स उघडूनही न बघता तिने तो टेबलावर फेकला. कपडे बदलून ती अंथरुणावर पडली. खरतर ती खूप थकली होती. शेखरच्या बोलण्याने ती अस्वस्थ झाली होती. तिच्या मनात आले, शेखर आत्ताच आपल्याला इतके गृहीत धरतो. अरेरावी करतो. किती बुरसटलेल्या विचारांचा आहे तो. तो म्हणतो म्हणून नोकरी सोडायची ? त्याला बायको म्हणून त्याच्या तालावर नाचणारी कटपुतली , मोलकरीण हवी आहे. स्वतःचे व्यक्तिमत्व, स्वाभिमान सर्व गुंडाळुन खाली मान घालून त्याची आज्ञा पाळायची, तो म्हणेल तेच कपडे घालायचे, तो म्हणेल तसेच राहायचे, वागायचे. थोडक्यात म्हणजे दावणीला बांधलेले ढोरच व्हायचे....छे ऽ बुरसटलेल्या   विचारांबरोबर पैशाची घमेंड असलेला माणूस आहे हा. स्री विषयी तर त्याला थोडा सुद्धा आदर नाही. मला माझ्या नवऱ्याने मंदारने किंवा सासू-सासर्‍यांनी कधीच  बंधने घातली नाहीत. उलट मी पुढे जावे म्हणून नेहमीच मला प्रोत्साहन दिले. सगळेच एकमेकांना किती समजून घेत होते. रेवा ही किती छान वातावरणात वाढली. खरंच त्या तिघांनी मला जे भरभरून प्रेम व विश्‍वास दिला तो मला या जन्मातच काय पुढच्या जन्मीही पुरेल. मला त्यासाठी कोणाच्याही सोबतीची मुळीच गरज नाही. मंदारच्या फोटोकडे पाहत ती म्हणाली, " काय मंदार आहे तू आहेस ना माझ्या सोबत ?" मंदारही फोटोतून हळूच हसला. मानसीचा निर्णय  ठरला आणि ती शांत झोपली.                                 दुसऱ्या दिवशी तिने शेखर ला फोन केला." मला तुमच्याशी महत्वाचे बोलायचे आहे. संध्याकाळी नेहमीच्या जागी भेटा." असे म्हणून शेखर काही बोलण्याच्या आधीच तिने फोन ठेवला. संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर ती शेखरला भेटायला गेली. शेखर येऊन बसला होताच. ती तिथे टेबलाजवळ गेली आणि उभ्या उभ्याच शेखर समोर त्याने दिलेल्या साडीचा बॉक्स ठेवला व म्हणाली," तुम्हाला सहचरी म्हणून बायको नको आहे. स्वतःचे व्यक्तिमत्व व स्वाभिमान विसरून तुमच्या तालावर नाचणारी कटपुतली - मोलकरीण तुमच्या दिमतीला हवी आहे... सॉरी ऽ ऽ ' ती मी नव्हे' असे म्हणून मानसी पाठ फिरवून चालू लागली.

- स्मिता भलमे
-  9421058149
( ' शब्दगंध ' कथासंग्रह - फेब्रुवारी 2022 -
 यात वरील कथा आली आहे. )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...