आपल्या भारतीय संस्कृतीतील ग्रंथ कधीच जुनेच होत नाही. दरवेळी वाचताना काही तरी नवं असं नवनीत त्यामध्ये आढळते. कधी कधी एखाद्या ऋच्याचा वेगळाच अर्थ पुन्हा नव्याने कळतो. म्हणुनच इतकी हजारो वर्षे झाली तरी ते ग्रंथ समाजात प्रवाहात आहेत. लोक आजही मोठ्या श्रध्देने हे ग्रंथ वाचतात. महाराष्ट्रातील साधू संत अभ्यासकांनी तर ह्या ग्रंथाचा सखोल अभ्यास करून वेगवेगळ्या रूपात त्यातील भाव आपल्याला नव्याने समजावले आहेत. देव म्हणजे काय? हे सांगताना माऊलींही विश्वरुपदर्शनाच्या आधारे वेगवेगळ्या विभूत्या स्पष्ट केल्या आहेत. ज्ञान बोधातील गोरक्षनाथ दत्तात्रयांचा संवाद, शंकराचार्यांनी मांडलेलं अष्टांग, मुक्ताईचे कूट अभंग, सिध्दारुढस्वामींची कोष्टक, चिदंबरम स्वामींचे भक्तीचे गणित, समर्थांचे समास, नारदांच्या भक्ती सुत्राची अकम्मादेवीनीं केलेली उजळणी हा सगळा पौराणिक ग्रंथातील अलौकिक खजिना ह्या असामान्य व्यक्तिंनी आपल्याला सुलभ केला. नाही तर खूप गोष्टी आपल्याला सविस्तर कळल्याच नसत्या. ह्यांनी खऱ्या अर्थाने ग्रंथ उकलले म्हंटले तर अतिशयोक्ती होणार नाही. अर्थात ग्रंथ म्हणजे गाठ आणि गाठ ही उकलली जाते.
आज मार्कंडेय ऋषींचा 'दुर्गा सप्तशती' हा ग्रंथ पुन्हा उकलताना माझ्या लक्षात आले की रामरक्षेत रामाने कसं वेगवेगळ्या अवयवांच रक्षण करावे सांगितले आहे अगदी तसेच दुर्गा सप्तशती मध्ये कोणत्या देवीने कोणत्या अवयवाचे रक्षण करावे ऋषींनी सांगितले आहे. उदा. माझ्या जीभेचे रक्षण सरस्वतीने करावे, माझ्या हृदयाचे रक्षण ललितेने करावे, माझ्या मानेचे रक्षण भद्रकालीने करावे, माझ्या कंठाचे रक्षण चंडीकेने करावे. वगैरे वगैरे! अर्थात अमूक एक देवीने तमूक एक अवयवांचेच का रक्षण करावे ह्याची कारणे सुध्दा ऋषींनी सांगितली आहे. प्रत्येक देवीच काम जणू सांगितले आहे. आणि सरतेशेवटी माझ्या सर्व देहाचे रक्षण सर्व बाजूंनी देवीनेच करावे. अर्थात हा देवी कवचातील शेवटचा श्लोक आहे.
देवीच्या वेगवेगळ्या विभूत्या मार्कंडेय ऋषींनी अगदी लोभसवाणे सांगितल्या आहेत. आधी देवी कवच ,अर्गला नंतर तिलक असा मंत्राचा भाग ऋषींनी अफाट सुंदर रंगवला आहे. ह्या इथे आपल्याला काही गोष्टी लवकर उमगत नसल्या तरी, अर्गला म्हणजे कडी आणि तिलक म्हणजे त्या कडीत घातलेला कोयंडा असे समजून मंत्र कसे बांधून ठेवलेत याचा प्रत्यय येतो. बहुधा मंत्रांमुळे विलक्षण शक्ती आपल्या अंगात येतं असावी. म्हणुन काही मंत्र आपल्या पर्यंत पोहचू दिले नसावेत ह्या ऋषींनी ! त्याला जणू अर्गला तिलक घालून ठेवले आहेत. जसे रामरक्षेत अर्गला तिलक आहेत अगदी तसेच ह्या पाठात आहे. त्यानंतर १०८ देवीची नाव वगैरे सुरू होते. ही नाव त्या देवींना कशी पडली ह्याचे कारणही फार सुंदर रेखाटले आहे. उदा. इंद्राने शक्ती देता ती इंद्राणी झाली. ब्रम्हाने शक्ती देता ती ब्रम्हाणी झाली. रूद्रांनी शक्ती देता ती रुद्राणी झाली. नारायणाने काही देता ती नारायणी झाली. बरीच नाव आणि खूप साऱ्या शक्त्या इथे मार्कंडेय ऋषींनी स्पष्ट केल्या आहेत. तात्पर्य देवीच्या शक्त्या कशा वाढल्या हे गमक त्यांना सांगायेच आहे. आपल्या माणसांणी आपलं मनोबल वाढवले की अंगात एक वेगळीच शक्ती संचारते याचा प्रत्यय आपल्याला खरंतर दरदिवशी येतो. एका स्त्री मध्ये बळ कधी येते, जेव्हा सगळे त्या स्त्रीवर विश्वास ठेवतात. हा विश्वासच त्या देवीला विजयाकडे घेऊन जातो.
एका वेळी दोन हाताने दहा काम करणारी स्त्री ही त्या घरची अष्टभुजाच आहे. एक भाकरी तव्यावर, दुसरी भाकरी चुली जवळ, तिसरी भाकरी पानांमध्ये वाढलेली तर चौथी भाकरी हातावर आकार घेत असताना मध्येच स्त्री सहज शेजारची आमटी भाजी ढवळते तेव्हा तिची चपळाईने बघून आळसरूपी राक्षसही तिला घाबरतो. तो क्षणात आपला पराभव स्वीकारून तेथून काढता पाय घेतो. ग्रंथातही काही प्रमाणात ऋषींनी वेगवेगळ्या भावनांना राक्षसांच्या उपमा दिल्या आहेत. चंड आणि मुंड राक्षस हे त्याचे उत्तम उदाहरण! चंड म्हणजे बुद्धी आणि मुंड म्हणजे संशय आणि एकदा का संशय बुध्दी वर आरूढ झाला की कशी वाईट स्थिती होते आणि त्यासाठी त्या संशयरूपी राक्षसांचा म्हणजे मुंडाचा कसा वध केला पाहिजे हे देवीचे प्रतिकात्मक रूप घेऊन ताकदीची शौर्य गाथा युद्धाच्या रूपात आपल्यासमोर येते. चंड मुंड राक्षसांचा वध केल्यानंतर देवी अट्टाहास करते. म्हणजे जोरात खळखळून हसते तेव्हा तिला चामुंडा हे नाव पडले. आपण रोजच्या जीवनात किती वेगळा अर्थ घेतो ह्या अट्टाहास शब्दाचा ! अट्टाहास म्हणजे हट्ट घट्ट करणे वगैरे वगैरे ! अट्टाहास म्हणजे खळखळून हसणे.देव अट्टाहास करतात. तांडव झाल्यावर शंकर खळखळून हसले होते. तसेही भृगू ऋषींनी साहित्याचा रंग आकाशी, संकटाचा रंग काळा आणि हास्स्याचा रंग पांढरा आहे असे म्हंटले आहे. त्यामुळे वाईट विचार, वाईट शक्ती मेल्या की आपोआप हास्य फुलते. आनंद दिसतो सर्वत्र हेच सत्य ऋषींनी पाचव्या अध्यायात सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
निशुंभ मेल्यावर शुंभराक्षसाला वाटत देवीला सर्व देवांना आधार आहे. सगळ्या देवांची शक्ती तिच्या कडे आहे. सगळी देवांची शस्त्र तिच्याकडे आहे. त्याला वाटले आपण एकटेच लढतोय. एकावेळी एकाशीच लढावे ही युद्धनीती देवी विसरलीय आणि मी मात्र एकटा सर्व देवांशी लढतोय. तो देवीला सुचना देतो की देवांच्या शक्त्या, शस्त्र बाजूला ठेव आणि एकटी लढुन दाखव ! मी क्षणात तुझा पराभव करेन. अर्थात शुंभ म्हणजे वासना. ज्या स्त्री पुरुष दोघांनाही असतात. शुंभ राक्षसाचा पीळ सुटत नाही तेव्हा सुध्दा देवीने अट्टाहास केला आहे आणि दाखवून दिले आहे की स्त्री सहसा वासेनेच्या आहारी जात नाही. तिला तडजोड करावी लागेली तरी चालेल पण ती संसार तारून धरते. ती वध करते वासनेचा आणि विवेकाला विजयी करते.
तसे एकूण १३ अध्याय ! त्यात केवळ तीन देवींची सखोल माहिती आहे. आधी देवीचा अष्टांग लिहिला असून महामाया पासून सुरुवात केली आहे. संवाद हा आपल्या भारतीय संस्कृतीचा पाया असलेल्यामुळे इथेही पोथीत मार्कंडेय आणि भागुरींचा संवाद आहे. ऋषींनी देवीभक्त भागुरीला कथा सांगायल सुरवात केली आणि सरते शेवटी सार सांगताना म्हटले की हे सगळ माया देवीच काम आहे. सर्वत्र माय पसरली आहे. इथे मायेचे तीन प्रमुख प्रकार सांगितले आहेत. मोहमाया, योगमाय, महामाया...हे मायेचे प्रकार वाचताना ठायीठायी जाणवत की कसे आपण ह्या मायेत गुरफटून गेलोय. त्यासाठी ऋषींनी दिलेली उदाहरणं अगदी आजच्या काळाला सुध्दा सुचक आहेत. मधु, कैटभ, महिषासुर, शुंभ, निशुंभ, चंड, मुंड ,धुम्रलोचन अशा कैक राक्षसांचे केलेल्या वधाचे सविस्तर वर्णन पोथीत आहे.
सगळ्यांत मुख्य म्हणजे आपल्यातील मोठा अहंकार म्हणजेच महिषासुर हे सांगताना अहंकार माजला की कसा उच्छाद मांडतो ह्याचे फारच सुंदर रीतीने स्पष्टीकरण केले आहे. अहंकाराचे जे आठ प्रकार आहेत त्याचा ऋषींनी महिषासुराचे आठ सेनापती असा उल्लेख केला आहे. अगदी सोपं उदाहरण म्हणजे माणसाच्या मनात अहंकार निर्माण होण्याचे मुख्य कारण म्हणजे अर्धवट ज्ञान आहे. त्याला ऋषींनी 'चिक्षून' असे नाव दिले आहे. हा पहिला सेनापती ! नंतर चामर, उदग्र, बाष्फल, बिलाड असे ओळीत आठ अहंकार सेनापतीच्या रूपात मांडले आहेत. बिलाड पासूनच पुढे जाऊन बिल्ली शब्द आला आहे. बिलाड म्हणजे धूर्तपणा ! तो तर थोड्याफार प्रमाणात सगळ्यांमध्ये असतोच असतों. प्रत्येक व्यक्तीत थोड्याफार प्रमाणात हे अहंकार दिसतात यांची हळूहळू मनाला जाणिव होते. परिवारिता अहंकार म्हणजे शक्ती प्रदर्शन करणे. तो महिषासुराचा सेनापती आजही समाजात दिसतो. लोकांना शक्ती प्रदर्शन करायला खूप आवडतं. माझी अशी ओळख तशी ओळख सांगायला आवडते. हे अहंकार वाचले की जाणवत अजूनही कलियुगात महिषासुर जणू जिवंत आहे. अर्थात त्यासाठीच पुन्हा पुन्हा दुर्गेला यावं लागतंय. महिषासुराला (अहंकाराला) माराव लागतंय. संसाराचा तोल सांभाळावा लागतोय. तेव्हाच तिची स्तुती होते.पोथीत सुध्दा चौथा अध्याय स्तुतीचा आहे.
नमो दैव्ये महादैव्ये
शिवायै सतत नम:
२१ कडव्याचे स्तोत्र. स्तुती कोणाला आवडत नाही अशी व्यक्तीच नाही. देव दानव मानव अगदी सगळ्यांना स्तुती आवडते. इथे पुन्हा ऋषींनी भागुरीला देवीच्या विविध विभूत्या सांगितल्या आहेत. शंकराने आपल्या शरीरातून शक्ती बाहेर काढली ती शिवा ! पार्वतीच्या कोशातून बाहेर आली ती कौशिकी, जगाला जन्म देणारी ती जगदंबा वगैरे वगैरे!
खरं तर ही देवीची रूप सुध्दा आजच्या काळात ठायीठायी दिसतात....कशा स्वतः एकट्या लढतात स्त्रिया परिस्थिशी. कशा तडजोड करतात. जन्म देतात जीवाला. कशा सावरतात संसाराला आणि राग आला तर कसा संसार उद्धवस्त करतात ही सगळी परिस्थिती जणू ऋषींनी ग्रंथात रेखाटली आहे.
ग्रंथात शेवटी शेवटी देवीने कसा हुंकाराने राक्षस मारला याचे सुंदर वर्णन आहे. एखाद्याला तुच्छ लेखताना आपण सहज हड, हुड, हॅं, हूं बोलतो .स, न,प ,व ही अक्षरे नाही वापरत. मग 'ह' का वापरतो तर 'ह' म्हणजे महाप्राण ! ह्याचा उल्लेख विश्वामित्रांच्या ग्रंथात सुध्दा आहे. एकदा दिक्षा घेतली किंवा यज्ञ केले की हातात शस्त्र घेत नाही. तेव्हा तुमच्या हुंकारातही शस्त्रा इतकी आपोआप ताकद येते. विश्वामित्रांंनी नुसत्या हुंकाराने कैक राक्षस मारले, नुसत्या हुंकाराने राक्षस पळवून लावले असा उल्लेख ग्रंथात आहे.
काही अक्षरांची ताकदही सांगितली आहे. इथेही दुर्गेने धुम्रलोचनाला पासुन नुसते 'हुं' करता तो पळून गेला. खरंतर धुम्रलोचन राक्षस म्हणजे नुसता धूर...धुळ...आपल्या डोळ्यात धुळ फेकणाऱ्या अनेक व्यक्ती ह्या कलियुगात आहे. त्यांना आपण नाक मुरडून हुं केले पाहिजे. धुळीमुळे आलेले आंधळेपण झटकून टाकले पाहिजे. नजर स्वच्छ ठेवली पाहिजे. कारण मनात रोज युद्ध चालू असतं. अलिकडे तर व्हॉट्स ॲपमुळे कोणी लाईक नाही दिलं तरी मनात द्वंद्व उभं रहात.
तुकाराम महाराज म्हणतात रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग ! गोंदवलेकर महाराज म्हणतात रणांगणात शत्रू समोर दिसतो तरी पण साधकांना आणि संसारात रमलेल्यांना आयुष्यभर कळत नाही आपला खरा शत्रू कोण होता. त्यांची अखंड लढाई चालू असते परिस्थितीशी ! मोहमायाने कस जग वेढल आहे हे सांगताना ऋषींनी वादविवादाची कैक उदाहरण दिली आहेत. ही न संपणारी माया आहे. त्यातील एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे रिकाम्या हाती सगळ्यांना जायचे आहे. सगळ इथेच सोडायचे आहे. तरीसुद्धा आपले आयुष्य आपण संग्रह करण्यात वेचतो. त्यासाठी कितीवेळा किती गोष्टींशी लढतो यांचा अंदाजच बांधता येत नाही. ऋषीनी शेवटी योगमायेची उत्तम ओळख करून दिली आहे. अर्थात ह्या देवीची उपासना केवळ देव आणि साधूसंत करतात. कारण योग साधण्यासाठी ब्रम्ह मुहूर्त महत्वाचा आहे. जो पहाटे तीन ते साडेतीन पर्यंत असतो आणि इतरांनासाठी ही वेळ साखर झोपेची असते. त्यामुळे योगमायेची उपासना कलियुगात कठीण आहे. ग्रंथातील पाच पासून दहा पर्यंतचे अध्याय नीट अर्थ लावून वाचल्यावर अस वाटत की ह्या जन्मी आपल्या महामाया आणि मोहमाया जरी नीट कळल्या तरी आपल्या मनातील युद्ध क्षणात थांबेल.
ऋषींचे आभार मानावे तितके कमीच आहेत. कारण क्षणोक्षणी जन्म घेणारा महिषासुर आणि आपल्या अफाट ताकदीने त्याचा वध करणारी दुर्गा कशी हवी, कोणत्या शक्त्या तिच्यापाशी हव्यात, तिने कुठे अट्टाहास करावा, तिने कसा संपूर्ण विश्वाचा आत्मसन्मान तारावा ह्याचे अनेक दाखले ग्रंथात दिले आहेत. सहज जमल तर यंदाच्या नवरात्रात जरूर वाचावा हा ग्रंथ ! तुमचा वेळ भरून पावेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा