मंगळवार, २१ ऑक्टोबर, २०२५

2344. व्यक्तीविषयक

     माझे लेख नियमित वाचणाऱ्या माझ्या एका मैत्रिणीने आवर्जून सांगितले की तिला खास करून माझ्या व्यक्तीविषयक पोस्ट खुप आवडतात. तेव्हा लक्षात आलं खरंच माझ्या कडून हल्ली आपोआप व्यक्तीविषयक सदर जास्त लिहिल्या जातंय. ह्यामागे एक कारण असं की अशा व्यक्तींच्या पोस्ट सकाळीं सकाळी वाचनात आल्या की दिवसभर त्यांचे चरित्र आपल्या मनात रेंगाळत राहत आणि त्यांच्यातील बऱ्याचशा चांगल्या गोष्टी स्वतः आचरणात आणण्यासाठी मन तय्यार होत. ह्या गोष्टींची नोंद घेऊन तस वागावस वाटणं ही पण एका चांगल्या बदलाची नांदी असते. असो त्यामुळे कधी कधी अशा व्यक्तींच्या जन्मदिनी, स्मृतिदिनी ह्या पोस्ट बरेचदा रिपीट ही होतात.
        आपल्या देशाचा आपल्याला अभिमान वाटतो. हा अभिमान आपल्याला अनेक कलाकृती, अनेक व्यक्ती मिळवून देतात. ह्या व्यक्ती आपल्यासाठी आदर्श असतात, त्यांचा ओझरता जरी कुठे उल्लेख आला नं तरी आपली मान गर्वाने ताठ होते. अशी व्यक्तीमत्व आपल्या भारताची शान असतात, अगदी कायमस्वरूपी.            
           आज 15 ऑक्टोबर. ही तारीख आली की आपले डोळे आपोआप आठवणीने पाणावतात,  श्वास अडकतो आणि मनोमन आतुन जाणवणारं दुःख आवंढ्या बरोबर गिळावं लागतं. आज आपल्या भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती ए. पी. जे अब्दुल कलाम ह्यांचा जयंतीदिन. त्यांनी दिलेल्या योगदानासाठी शतशः विनम्र अभिवादन.  
    आजची तारीख अजून एका गोष्टीची जाणीव करून देते.  लहानपणी शाळेत जातांना बहुतेकांना वाटतं भराभर दिवस जावेत आणि आपण काँलेजमध्ये जावे.  महाविद्यालयीन शिक्षण घेतांना असं वाटतं कधी हे एकदाच शिक्षण आटोपतं आणि आपण कमवायला लागतो. कालांतराने ते ही घडतं आणि आपण आर्थिक दृष्टीने स्वतःच्या पायावर उभं राहतो.               
   एकदा का कमावता झालो आपण की खरचं हुश्श वाटतं आणि एकदाचं शिक्षण संपलं म्हणून श्वास सोडतो. पण नंतर आपल्याच लक्षात येत पुढील वाटचाल करतांना आपण जे  आधी शिकलोय त्याची इथे काडीचीही मदत होत नाही.                 
         पूढील जीवन जगतांना आता वेगळ्याच अभ्यासक्रमाची गरज भासते आणि आपण परत एकदा विद्यार्थी बनून रोज नित्यनवीन धडे घेतो.              
      हे सगळं आठवायचं अजून एक कारण म्हणजे आज 15 आँक्टोबर."जागतिक विद्यार्थी दिन".माणूस हा शेवटच्या श्वासापर्यंत विद्यार्थीच असतो हे रोज कौटुंबिक जबाबदा-या पार पाडतांना प्रत्येकाला जाणवतं.       
      अब्दुल कलाम भारताचे अकरावे राष्ट्रपती. ते एरोनाँटिकल इंजिनिअर होते. त्यांनी भारताच्या अग्नी 1, 2 व 3 प्रक्षेपण अस्त्रांची निर्मीती केली.  त्यांनी चार  दशके शास्त्रज्ञ आणि विज्ञान प्रशासक म्हणून, प्रामुख्याने संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) येथे काम केले.  बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि प्रक्षेपण वाहन तंत्रज्ञानाच्या विकासावर केलेल्या कामामुळे ते भारताचे मिसाइल मॅन म्हणून ओळखले जाऊ लागले.           
      त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ह्या महान शास्त्रज्ञाने भारताला क्षेपणास्त्रामध्ये संपन्न केले. लहान मुले त्यांची खास आवडती,"ही आहेत आपल्या उज्ज्वल भारताचं भविष्य" असे ते नेहमी म्हणत. त्यांच्या बरोबर ते आनंदाने संवाद साधत असत. ते विद्यार्थ्यांना सहज सोप्या भाषेत मार्गदर्शन करीत. अगदी शांतपणे न चिडता ,न रागावता ते विद्यार्थ्यांच्या समस्यांचं निराकरण करीत.     
     आयुष्यात कलाशिक्षक म्हणून पण स्वतःची ओळख पटावी अशी कलामांची ईच्छा होती. त्यांना पद्मभूषण, ईस्त्रो व डीआरडीओ मधील कामाबद्दल पद्मविभूषण, विज्ञान, तंत्रज्ञानाचे आधुनिकीकरण, वैयक्तिक संशोधनातील अतुलनीय कामगिरीबद्दल भारतरत्न ह्यांनी सन्मानित करण्यात आले. इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार, वीर सावरकर पुरस्कार, रामानुजन पुरस्कार त्यांच्या योगदानाबद्दल मिळाले होते.     
         विज्ञानाचे परमभोक्ते असलेले कलाम मनाने खूप संवेदनशील होते. त्यांना रुद्रवीणा वादनाची पण खूप आवड होती. ते विद्येची अखंड साधना करीत. खडतर आयुष्य जगलेले व जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतीपदी निवड झालेले डॉ कलाम हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तीमत्व होते. डॉ कलाम हे राष्ट्रपती पदावर आरुढ होण्याआधीच भारतरत्न पुरस्कारप्राप्त होते.     
           त्यांनी अनेक उत्तमोत्तम लिहीलेल्या पुस्तकांपैकी "अग्नीपंख"आणि "प्रज्वलित मने" ही पुस्तकं मी आवर्जून कायम समोर ठेवते.     
       राष्ट्रपती भवनात येतांना डॉ कलाम फक्त दोन बँग्ज घेऊन आले. छोटी बँग कपड्यांची व मोठी बँग पुस्तकांची. अख्ख्या आयुष्यात डॉ. नी वैयक्तिक रित्या कोणाकडूनही, कशाही स्वरूपात भेटवस्तू घेतल्या नाहीत. अशी वैशिष्ट्य असतात ह्या किमयागार साध्या लोकांमध्ये.    
      डॉ कलाम ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण यशस्वी पोखरण चाचणी केली तसच डॉ. नी डॉ राजू ह्यांच्या मदतीने ह्रदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या स्टेंट बनविल्या ह्यामुळे स्टेंटच्या किमती निम्म्याने कमी होऊन रुग्णांना मोठा दिलासा मिळाला.     
       डॉ नेहमी वाटायचं मृत्यू येतांना व्यक्ती ही ऊभी हवी, व्यक्तीने बूट घातलेले हवे आणि  व्यक्तीला तिचं आवडतं कामं करतांना अखेरचा श्वास घ्यायला मिळावा आणि घडलेही तसेच डॉ व्यासपीठावर ऊभे राहून मार्गदर्शन करीत असतांनाच कोसळले.           
  आजच्या पोस्टची सांगता डॉ कलाम ह्यांना पुनःश्च अभिवादन करुन करते.

कल्याणी बापट (केळकर)
9604947256
बडनेरा, अमरावती
15/10/2025

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...