शनिवार, १८ ऑक्टोबर, २०२५

2324. फरजानाची प्रियांका पासले झाली

 फरजानाची प्रियांका पासले झाली अन सुरू झाली कर्मकहाणी
(एका स्त्रीची संघर्षमय यशोगाथा)
***********
फ़रज़ाना मुस्लिम. शेजारी राहणाऱ्या हिंदू रघुवीर पासलेवर तीचं प्रेम बसलं. आंतरधर्मीय विवाह असल्यानं दोन्ही बाजूनी अपेक्षित असा प्रचंड विरोध झाला. तरी दोघांनी काही विरोधाला जुमानलं नाही. २००१ साली फ़रज़ाना आणि रघुवीर पासले यांचा विवाह झाला  आणि फ़रज़ानाची प्रियांका रघुवीर पासले झाली. फ़रज़ानाने धर्म बदलला. नाव बदललं. दोन्ही कडून संबंध तोडले असले तरी प्रियांका आणि रघुवीर यांचा संसार प्रेमाच्या आणि विश्वासाच्या भक्कम पाठिंब्यावर उभा होता. अक्षरश: एका झोपडीत उकीरडयावर त्यांनी संसार थाटला होता. हळूहळू परिस्थिती बदलत होती. रघुवीर गॅरेज चालवत होता. या दरम्यान दोन मुलं झाली.
पण २०१२ साली आक्रित आलं. अपघातात रघुवीरचा मृत्यू झाला. प्रियांकाचं एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. ती वेडिपिशी झाली. आधीच सगळ्यांचा विरोध पत्करुन लग्न केलं होतं. त्यात हे घडलं. दिवसचे दिवस ती नुसती बसून राहत असे. अशात दिराने थोडी मदत केली. ६ महिने झाले...थोडंस काही सुधरतंय तोच एक दिवस प्रियांकाचा मोठा मुलगा सारंग चक्कर येऊन पडला. डॉक्टरकडे नेलं तर डॉक्टरांनी सांगितलं की, रॅबीज झालाय. तोवर रॅबीज हे नाव पण प्रियांकाने ऐकलं नव्हतं. दोन दिवसात मोठा मुलगा रॅबीजने डोळ्यासमोर गेला. सहा महिन्याच्या आत नवरा आणि मोठा मुलगा गेले. प्रियांका अख्खी उन्मळून पडली होती. डोक्यात आत्महत्येचे विचार येत होते. काही सुचत नव्हतं. निराशेने, उदासीने, दु:खाने प्रियांकाला पूर्ण घेरुन टाकलं होतं.
अशात एक दिवस अचानक एक घटना घडली. प्रियांकाचा लहान मुलगा अचानक झोपेतून किंचाळत उठला. इतके दिवस प्रियांका स्वत:च्याच दु:खात होती, इतकी की, तीला या लहान मुलाच्या अस्तित्वाचा विसरच पडला होता. तीला त्यावेळी पहिल्यांदा जाणवलं या लहान मुलानं वडिलांचा मृत्यू बघितला आहे. रोज ज्याच्यासोबत खेळत होता त्या भावाचाही अचानक मृत्यू झाला तो बघितला आहे. त्याच्या बालमनावर काय भीषण परिणाम झाला असेल...प्रियाकांच्या आयुष्यात तो क्षण जागृतीचा होता.
मी एवढी मोठी असून जर ही अवस्था आहे, या मुलाच्या मनावर काय परिणाम झाला असेल....हा क्षण होता. मातृत्वाच्या भावनेचा...आईच्या ताकदीचा...स्त्री शक्तीचा....
प्रियांकाने या मुलासाठी उभं राहायचं ठरवलं. महाराष्ट्र शासनाच्या उमेद अभियानात ३०० रुपये महिन्यानं नोकरी धरली. तीला शिवण येत होतं. शिवण करु लागली. उमेद अभियानात काम करता करता हळूहळू तीनं कपडयाचं दुकान टाकलं...मग झेरॉक्सचं दुकान टाकलं...
उमेद अभियानातलं तीचं काम इतक चांगलं होतं की, लगेच पदोन्नती मिळत गेली. प्रियांकाला जवळपास ८ लाखांचे पुरस्कार या कामासाठी मिळाले. ते गुतंवून तीने २५ लाखांचं घर बांधलं.
आज प्रियांका स्त्रियांसाठी असलेल्या उमेद अभियानात क्लस्टर मॅनेजर म्हणून काम करते आहे. तीच्या अखत्यारीत १९ गावं, त्यामधील २५८ बचत गट आणि ४५०० हजार हून जास्त स्त्रिया आहेत. या स्त्रियांना वेगवेगळ्या सरकारी योजनांची माहिती देणे, त्या योजनांचा लाभ मिळवून देणे, त्यांना शेती, शेतीपूरक उदयोग, व्यवसाय यांची माहिती देणे, कर्ज मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे...या सर्व गोष्टी प्रियांका करते.
आज प्रियांका क्लस्टर मॅनेजर म्हणून १५ हजार पगार मिळतो. झेरॉक्सचं दुकान आणि कपडयाचं दुकान असं सर्व मिळून महिना ५० हजार तीचं उत्पन्न आहे. लहान मुलगा आता २३ वर्षांचा झाला आहे.
सासरी आणि माहेरी दोन्हीकडे खूप छान संबंध झाले आहेत. सर्वजण घरी जाण-येणं करतात. आपल्या सारख्या असंख्य स्त्रियांना उभं करायचं हेच ध्येय प्रियांकानं ठेवलं आहे.
तीच्या व्यक्तिमत्वातल्या ठळकपणे जाणवणाऱ्या काही गोष्टी म्हणजे चेहऱ्यावर असलेला प्रचंड शांतपणा, समाधान, प्रसन्नता आणि अफाट संयम...म्हणाली, “ताई संयम ठेवला म्हणून इथवर पोहोचले’’..
वयाच्या २७ व्या वर्षी प्रियांका विधवा झाली होती. आज तीचं वय ४२ आहे. २७ वर्ष ते ४२ वर्ष- १५ वर्षांचा एकटेपणा आणि दु:ख....एकटेपणा किती अर्थपूर्ण करता येऊ शकतो नाही का?  आणि आयुष्य कधीही कुठुनही सावरता येऊ शकतं...
माझी आणि प्रियांकाची भेट तुळजापूरला झाली. तुळजापूर मंदिर संस्थान आणि महाराष्ट्र सरकारनं आयोजित केलेल्या सांस्कृतिक महोत्सवात प्रियांका नवदुर्गा म्हणून भेटली. मी अर्थातच ॲंकरिंकला गेले होते. 
आयुष्याशी थेट भिडणाऱ्या एका स्त्रीचा रोज या महोत्सवात सत्कार होत होता. त्यात प्रियांका भेटली. माझ्याशी बोलता बोलता डोळ्यात पाणी आलं. म्हणाली, “ताई आज कितीतरी वर्षांनी डोळे भरून आले. तुमच्याशी बोलून मन हलकं झालं...”
तीची कथा ऐकताना मनात सतत याच ओळी येत होत्या...
बस अपनाही ग़म देखा है
तुने कितना कम देखा है
प्रियांकाला कडक सलाम!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...