आणि तिच्या हृदयाचा ठोका चुकला. अरे देवा, हे मी काय ऐकतेय. माझे कोठे काय चुकले म्हणून मला ही शिक्षा? डॉक्टरांनी सांगितलेले ऐकून तिला धक्का बसला. खूप वर्षांपासून थंडीचे दिवस आले की तिच्या छातीत डाव्या बाजूला दुखायचे. खूपदा ती ऍसिडिटी समजून उपचार करायची. दोन तीनदा तिने इसीजी पण केली होती पण सगळे रिपोर्ट नॉर्मल आले होते. पण दुखणे नेहमी तिच्या सोबत असायचे. मग एका मैत्रिणीने सुचविले की तू एकदा मेमोग्राम करून बघ. काही असेल तर कळेल.
दोन दिवसांनी रिपोर्ट आला आणि डॉक्टरांनी सांगितले, "शमिता, हे खूप भयानक आहे पण तुला ते मान्य करून घेतले पाहिजे. तुला छातीचा कर्करोग झालाय आणि जास्ती दिवस नाहीत आपल्याकडे."
शमिताला वाटले ते आपल्याबद्दल नाही दुसऱ्या कोणा पेशंटबद्दल बोलत असतील पण डॉक्टरांचा नाईलाज होता. त्यांना ते तिला समजावून सांगणे पडलेच. काही क्षणभर शमिता खाली मान घालून मुसमुसून रडू लागली. तिच्या सोबत कोणी आले नव्हते. साहजिकच होते. तिला किंवा तिच्या घरच्या लोकांना असा काही घात होईल अशी तिळभरपण शंका नव्हती. हुंदके देत रडणाऱ्या शमिताला डॉक्टरांनी खांद्यावर थोपटले. प्रदीर्घ प्रिस्क्रिपशन लिहून ट्रीटमेंट लिहिली. सोबत एका लहान चिट्टीवर त्यांच्या एका मैत्रिणीचा फोन नंबर दिला आणि शमिताला तिला ताबडतोब भेटण्यास सांगितले. पाण्यानी भरलेल्या डोळ्यांनी तिने कसेबसे ती चिट्टीवर असलेले नाव आणि पुढची ओळ वाचली.
डॉक्टर सुधा, मानसोपचारतज्ज्ञ.
डॉक्टरांनी अनुकंपा आणि आपुलकी दाखवत तिला पाणी पिण्यास दिले. धीराचे दोन शब्द सांगितले. मग डोळे पुसून शमिताने डॉक्टरांना विनंती केली की तिचा हा आजार त्यांनी कोणाला कळवू नये. अविनाशला पण नाही. तिला थोडे दिवस हवे होते सगळी तयारी करण्यासाठी. शेवटच्या निरोपाची. अदिती आणि अनुपची व्यवस्था करण्यासाठी. अदिती सात वर्षांची आणि अनुप अकरा वर्षांचा. खूप घाईघाईने जीवन पुढे धावले असे तिला वाटू लागले. वयाची फक्त चाळीशी. लग्न झाल्यापासून नवरा, घरदार, सासूसासरे आणि नंतर दोन मुले. हे सगळे सांभाळता सांभाळता कधी कर्करोगाने घाला घातला कळायला वेळच नव्हता. किंबहुना स्वप्नातपण असे होईल असे वाटले नव्हते. पण आता काही करता येणार नाही. वय माघारी जाणे शक्य नव्हते आणि पुढे वाढवणेपण अशक्यच होते.
काही निग्रहाने शमिता हळुवारपणे तिच्या खुर्चीवरून उठली. डोळे पुसून तिने डॉक्टरांचे आभार मानले. प्रिस्क्रिपशनची माहिती समजून घेतली. जड पावलाने आणि भारी मनाने ती क्लिनिकच्या बाहेर पडली. संध्याकाळचे सात वाजले होते आणि बाहेर काळोख दाटत होता. शमिताला तिच्या मनातही अंधारून आल्यासारखे वाटत होते. अगदी दबक्या आणि जड पावलांनी ती घरात घुसली. अनुप आणि अदिती अभ्यासाला बसली होती. अगदी समजूतदारपणे. तिला आतून गलबलून आले. एवढी समंजस आणि गोड मुले. कशी काय आई विना जगणार पुढे. तिला पाहताच अदिती धावत तिला बिलगली. डोळ्यातील पाणी थोपवून शमिताने तिच्या केसांवरून मायेचा हात फिरवली आणि तिचा गालगुच्चा घेतला. अनुप तसा थोडा मोठा असल्याने त्याला समज जास्ती होती. न बोलता आत जाऊन त्याने आईसाठी पाणी आणले. परत शमिताला संयम ठेवणे खूप जीवघेणे झाले. तिची नजर आता अविनाशला शोधत होती. एव्हाना तो घरी सहापर्यंत पोचायचा . साडेसात वाजलेत.
एकदम कुकरची शिट्टी ऐकू आली . अगं बाई, अविनाश काय करतोय स्वयंपाक घरात. ती आत धावली. तिला डॉक्टरांकडून यायला उशीर होईल म्हणून अविनाशने डाळभाताचा कुकर लावला होता. आणि गॅसकडे त्याची काही खटपट चालू होती.
"आलीस बुवा तू? आज फक्त भात वरण चालेल ह. आणि पापड सांडगे कुठे ठेवलेस? मी शोधत होतो. बर, मी आता थोडावेळ बातम्या बघतो. तू ठीक आहेस ना?"
उत्तरादाखल शमिता अविनाशच्या कुशीत शिरून हमसून रडू लागली.
"अरे, काय झाले वेडाबाई रडायला? बरे वाटत नाहीय का?
मीच वरण करून टाकू का? तू हवी तर झोप थोडा वेळ. मी उठवतो तुला नंतर."
त्याच्या आत्मीयतेने शमिता आणखी इतकी हळवी झाली. परत तिने मन घट्ट केले आणि चेहरा हसरा करत त्याला नकार दिला. रात्रभर शमिता कुशी बदलत राहिली. 'मोजके दिवस' हा शब्द हा तिला झोपू देईना. तशीच तळमळत ती विचार करत राहिली. पहाटे पहाटे तिचा डोळा लागला. जाग आली तेव्हा आठ वाजले होते. तिला न उठवता अविनाशने मुलांच्या शाळेची तयारी केली होती. दोघांना बोर्नव्हिटा आणि टोस्ट देऊन तो हळुवार पाऊले टाकत शमिताला उठवायला आला. पटकन पोळ्या भाजी करून तिने सगळ्यांचे डब्बे बांधून दिले. अविनाश ऑफिसला गेल्यानंतर ती चहा घेऊन बसली. तिच्या डोक्यात विचारांचे चक्र गरगर फिरू लागले. मोजकेच दिवसच आहेत आपले. आता सगळी निरवानिरव केली पाहिजे. तिने वही आणि पेन घेऊन आपली चेकलिस्ट तयार केली.
कोणाचे देणे; कोणाचे येणे.
कुठे जाणे, काय आणणे.
कोण नातेवाईक आणि मैत्रिणींना भेटणे.
कुठल्या देवळांचे काय नवस.
घरची काय कामे तुंबलीत वगैरे वगैरे.
मग तिला यमूमावशीची आठवण आली. लहानपणापासून ती मावशीची लाडकी होती. काका जाऊन चार वर्षे झाली होती. मावशीचा एकुलता एक मुलगा अमेरिकेला स्थायिक झाला होता. कोकणात लहान गावात मावशी एकटीच राहत होती. शमिताने तिला इथे बोलावून घ्यायचा निर्णय घेतला. मुलांना घरची हक्काची माया मिळेल आणि मावशीला पण म्हातारपणी आधार. रविवारी ती अविनाशाबरोबर बाहेर जाऊन त्याला सगळे सांगणार होती.
आज गुरुवार.
तिने डॉ सुधाची संध्याकाळची अपॉइंटमेंट घेतली. सोमवारी परत जोशी डॉक्टरनी बोलावले होते. ते तिची ट्रीटमेंट सुरु करणार होते. "किमो करून उपयोग नाही. आपण जेवढे होतील तेवढे प्रयत्न करू. प्रत्येक दिवस मोलाचा आहे आणि तुझे मनोबल आणि देवावरील श्रद्धा खूप गरजेची आहे." हे त्यांचे बोल होते.
संध्याकाळी डॉक्टर सुधानीपण तिला तेच सांगितले. "मनाची तयारी ठेव. धीर आणि धैर्य सोडू नकोस. असल्या संकटावर मात करायची असेल तर मनाची तयारी हवी". त्यांनी एक आठवड्याच्या सेशन्स ठरवल्या आणि पुढच्या दिवशी परत यायला सांगितले. फक्त मुलांशी कसा संवाद साधायचा हे शमिताला अजिबात सुचेना. निदान त्यांच्या मनाची तयारी करवली तर त्यांनाच सगळे मान्य करायला बरे होईल असे तिला वाटत होते पण तिचे मन कचरत होते.
शनिवारी रात्री अविनाशला सांगितले तिने. "अवी, मला तुमच्याशी काही महत्वाचे बोलायचे आहे. उद्या आपण आपल्या आवडत्या 'मिलाफ' रेस्टारंटला जाऊया. दुपारी जेवण तिथेच करू.
अनुप आणि अदिती लतामावशीच्या घरी जाणार आहेत. जेवणानंतर आपण चौपाटीला फिरायला जाऊ. जमेल ना?"
अविनाश मोहरला. "अरे वा, राणीसाहेबानी हुकूम दिल्यावर मी नाही कसे म्हणेन? आपणाला हल्ली वेळ मिळतोयच कुठे एकमेकांसोबत फिरायला? सब मंजूर है, भाई!" शमिताच्या छातीतून कळ उमटली.
असू दे; मोजकेच दिवस आहेत. डोळ्यात अजिबात पाणी नाही आणायचे.
ती सुंदर दुपार शमिता आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. तो प्रेमाचा मोजका दिवस, ते प्रेमाचे मोजके क्षण, दोघांची संगत आणि हळव्या आठवणी.
संध्याकाळी चौपाटीला वाऱ्यात फिरताना अविनाशला कोणाचा फोन आला. त्याचा चेहरा थोडा गोंधळल्यासारखा दिसला आणि आवाजात कातरता.
"दोन मिनिटे. हं.." म्हणत तो थोड्या अंतरावर दूर गेला. दुरून तिला दिसत होते की तो कोणावर तरी खूप रागावला आहे. तावातावाने वाद घालत होता. थोड्या वेळाने शांत होऊन तो शमिताच्या जवळ आला आणि तिला पाहून गोड हसला आणि ती वेळ आली. शमिताने त्याला आपल्या कर्करोगाची आणि मोजक्या दिवसांची बातमी सांगण्याची.
मान खाली घालून थरथरण्याऱ्या आवाजात शमिताने सुरुवात केली.
"अवि, मला तुम्हाला काही खूप महत्वाचे सांगायचे आहे. खूप विचार केला मी. जर सांगायला उशीर केला तर बरे नव्हे कारण माझ्याकडे आता मोजकेच दिवस आहेत. तुम्हाला माहीतच आहे की मी ह्या आठवडयात डॉक्टर जोशींकडे गेले होते. त्यांनी..."
पटकन अविनाशने तिच्या तोंडावर हात ठेवला. "काही बोलू नकोस. मला सगळे माहित आहे. आता तुला काळजी करण्याचे काही कारण नाही. सगळे व्यवस्थित आहे आणि नंतरही तसेच चालत राहील. तू निर्धास्त राहा."
तिला त्याच्या बोलण्याने कोडयात टाकले. "अवि, काय सांगताय तुम्ही? माझ्याबद्दल सगळे कळून तुम्हाला काहीच वाटत नाही? आणि शमिताने रडायला सुरवात केली.
तिला आपल्या जवळ घेत अविनाशने सांगितले, "वेडाबाई, उगीचच गोंधळून जाऊ नकोस. मला माहित आहे तू काय सांगणार होतीस ते. मघाशी मला आपल्या डॉक्टर जोशींचा फोन आला होता. खूप अजीजीने माफी मागत होते. म्हणाले, रोगनिदान लॅबने चुकीचा रिपोर्ट पाठवला. कोणा स्मिता नावाच्या कर्करोगी महिलाचा रिपोर्ट चुकून शमिताच्या नावाने टाईप केला गेला. आणि मी तिची ट्रीटमेंट उद्यापासून सुरु करणार होतो. तिला सांगायला धाडस झाले नाही म्हणून मी तुम्हाला फोन केला. तुम्ही हवे तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू शकता. "
शमिताला घेरीच आली. म्हणजे आपले दिवस मोजलेले नाहीत? अशी कशी आपल्याबरोबर गफलत झाली? हसावे की रडावे आता? डोळे पुसून तिने अविनाशला विचारले, "मग तुम्ही काय ठरविले त्याबद्दल?"
तिला हृदयाशी घट्ट धरत अविनाश म्हणाला, "तुला काही झाले नाही आणि काही होणार नाही..चल; ह्या खुशीत मी त्या सगळ्यांना माफ केले."
मग त्या सुंदर सोनेरी संध्याकाळच्या मोजक्या क्षणात एकमेकांचा हात धरत दोघे आपल्या उबदार घरट्याकडे निघाले. आपल्या गोड पिल्लांकडे.
मोजके दिवस एकेकदा जीवनात खूप काही शिकवून जातात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा