अमेरिकेतील तरुण मुलाचा लेख परवा कुठेतरी वाचत होतो. एका ओझरत्या उल्लेखाने थोडा थबकलो. त्याच्या क्लासरुममधील लेक्चरबद्दल त्याने लिहिले होते. खुद्द बराक ओबामा यांनी त्याचे हे लेक्चर घेतले! ओबामा राजकारणात येण्यापूर्वी विद्यापीठात शिकवत होते. अध्यक्षपदाची कारकीर्द संपल्यानंतर आता पुन्हा विद्यापीठांमध्ये शिकवणे आणि लेखन करणे यात ते मग्न आहेत. राजकारणात ते आहेतच. राजकीय भूमिका ठोसपणे घेत आहेत. मात्र, त्याचवेळी अध्यापन-लेखन-वाचन यातही गुंतून गेलेले आहेत.
हेन्री किसिंजर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री होते. वारले ते नुकतेच. निक्सन आणि किसिंजर ही जोडगोळी तेव्हा प्रख्यात होती. खरं म्हणजे कुख्यात होती, असं म्हटलं पाहिजे. परराष्ट्रमंत्रीपद गेल्यानंतर किसिंजर विद्यापीठात शिकवू लागले. एका विभागाचे अधिष्ठाता झाले. दीर्घकाळ त्यांनी ते काम केले. लंडनचे महापौर आणि मग इंग्लंडचे पंतप्रधान झालेले बोरिस जॉन्सन मूळचे पत्रकार, लेखक आणि संपादक. स्वतःच्या घोडचुकांमुळे त्यांचे पंतप्रधानपद गेले. त्यानंतर ते पुन्हा स्तंभलेखक म्हणून काम करू लागले. संपादक, स्तंभलेखक म्हणून लोकांना दिसू लागले. “पंतप्रधानपद गेल्यानंतर आता वृत्तपत्राच्या कचेरीत कसे वाटते?” असे त्यांना कोणीतरी विचारले. तेव्हा ते म्हणाले, “याच कचेरीने माझे पंतप्रधानपद घालवले आहे. याच्याएवढी शक्तिशाली जागा आणखी दुसरी कुठली असेल !”
मुद्दा असा की, युरोप वा अमेरिकेत पंतप्रधानपदाएवढेच संपादकपद महत्त्वाचे मानले जाते. राजकारणातल्या उच्च पदाइतकेच महत्त्व विद्यापीठातल्या प्राध्यापकांना असते. संशोधकांना असते. त्यामुळे कालचा पंतप्रधान आज विद्यापीठात शिकवताना दिसू शकतो. ग्रंथालयात अभ्यास करताना भेटू शकतो. प्रयोगशाळेत संशोधनही करू शकतो. ही सगळी कामे तेवढीच महत्त्वाची आहेत, अशी तिकडे धारणा आहे. राजकारणातले एखादे पद मिळाले म्हणजे काहीतरी आकाशाला हात टेकले, असे त्या व्यक्तीला वाटत नाही. आणि, मुख्य म्हणजे लोकांनाही वाटत नाही. ते पद गेल्यानंतर जेव्हा अन्य काही उद्योग तो करू लागतो, तेव्हाही 'अरे बापरे! याचे असे कसे झाले?' वगैरे प्रश्न लोकांना पडत नाहीत.
राजकारणामध्ये अगदी अत्युच्च पदांवर काम करणाऱ्या नेत्यांची मुले कुठल्यातरी साध्या कंपनीत काम करताना दिसतात. स्थानिक सामन्यांमध्ये हॉकी, क्रिकेट वा फूटबॉल खेळत असतात. त्याचेही कोणाला आश्चर्य वाटत नाही. बराक ओबामा आठ वर्षे अमेरिकेचे अध्यक्ष आणि कमांडर-इन-चिफ होते. साशा आणि मालिया या त्यांच्या दोन तरूण मुली. त्या राजकारणाकडे ढुंकूनही बघत नाहीत. त्यांना आवडणाऱ्या क्षेत्रात दोघीही काम करत आहेत. आणि, अमेरिकेच्या अध्यक्षांच्या मुली आपल्या शेजारी बसून काम करताहेत, याचे कोणाला फार अप्रूप वाटत नाही किंवा यांचे फारच वाईट झाले, असेही कोणी म्हणत नाही! हे केवळ ओबामांबद्दल नाही. जॉर्ज बुश यांच्यासारखा सत्तापिपासू अध्यक्ष. त्यांचे वडीलही अध्यक्ष होते. त्यांच्याही मुली सामान्य कंपन्यांमध्ये काम करतात. मध्यंतरी मद्यपान करून त्यांनी गाडी चालवली, तर या दोघींवर खटला वगैरे दाखल झाला. त्याचेही कोणाला आश्चर्य वाटले नाही. सगळी क्षेत्रे तेवढीच महत्त्वाची आहेत. प्रत्येक काम तेवढेच महत्त्वाचे आहे. मुख्य म्हणजे, संशोधन, अध्यापन, पत्रकारिता या क्षेत्रांना तर त्या देशांमध्ये अत्यंत वलय आहे. इंग्लंडच्या एखाद्या मंत्र्यांपेक्षाही केंब्रिजमधल्या स्कॉलरला कदाचित अधिक प्रतिष्ठा असू शकते.
आपल्याकडे मात्र राजकीय पद हा लोकांना मोक्ष वाटतो! म्हणजे तुम्ही कितीही मोठे काम करा. काही भूमिका घ्या. लोक विचारतात,” तुम्हाला विधानपरिषद किंवा राज्यसभा कधी मिळणार?” कायदेमंडळ म्हणून या सभागृहांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पण, मागच्या दाराने आमदार वा खासदार होणे हा काही मोक्ष असू शकतो का? त्यापेक्षा कितीतरी महत्त्वाची कामे करता येणे शक्य असते. ज्याला ज्या क्षेत्रात गती आहे, त्याने त्या क्षेत्रामध्ये अत्युच्च टोक गाठावे. एवढे ते साधे आहे.
यामुळे एक मोठीच गडबड आहे. अनेक चांगली माणसे त्यांचे काम सोडून आपण राजकारणात आली आणि वाया गेली. मुळात एखाद्या शास्त्रज्ञाला राष्ट्रपती करण्याचे कारणच काय? शास्त्रज्ञाने संशोधन करायला हवे. आणखी नवे काही शोधायला हवे. त्या क्षेत्रात त्याला जे हवे, ते सरकारने पुरवायला हवे. पण, त्याला राष्ट्रपती केल्याने काय होते? राष्ट्रपती होऊन देशभर भाषणे करत सुटणे हे काही शास्त्रज्ञाचे काम नाही. स्वतः शास्त्रज्ञाला राजकीय आकांक्षा असतील, त्याही विषयांमध्ये रस आणि गती असेल, तर त्याने स्वतः होऊन राजकारणामध्ये यावे. त्यामध्ये गैर काही नाही.
त्या अर्थाने मार्गारेट थॅचर किंवा ॲंजेला मर्केल या दोघीही शास्त्रज्ञ. पण, त्यांना राजकारणामध्ये विलक्षण गती होती. त्यामुळे त्या राजकारणात आल्या. त्यांनी त्या त्या देशाचे नेतृत्व केले. मात्र, राजकीय पद हे जणू काही पारितोषिक आहे, अशा पद्धतीने वेगळ्या क्षेत्रातील अभ्यासकांना त्या खुर्चीवर बसवणे निरर्थक आहे. त्यातून कायदेमंडळाला काही फायदा होणार असेल, त्यांच्या बुद्धिमत्तेचा- प्रतिभेचा उपयोग होणार असेल, तर त्यांना तसे पद द्यायला हरकत नाही. पण, संसदेमध्ये तोंडही न उघडणाऱ्या क्रिकेटच्या देवाला खासदार करून उपयोग काय? त्यापेक्षा क्रिकेटमध्ये भारत उंचीवर कसा पोहोचेल, यासाठी त्याला सगळ्या सुविधा उपलब्ध करून देणे हे सरकारचे काम आहे. गंमत बघा. अल्बर्ट आईन्स्टाईन मूळचा जर्मन. अमेरिकेने त्याला नागरिकत्व दिले. संशोधक म्हणून जे जे हवे, ते ते दिले. सगळ्या सुविधा दिल्या. पण, त्याला कुठल्याही पदावर बसवले नाही. उलटपक्षी ज्यू असलेल्या आईन्स्टाईनला इस्त्राइलने अध्यक्ष होण्याची ऑफर दिली होती. मात्र, मी त्या पदाला पात्र नाही आणि माझे काम वेगळे आहे, असे सांगून आईन्स्टाईनने ते पद स्वीकारण्यास नकार दिला. तिकडे न्यूटनला इंग्लंडने महत्त्वाचे पद दिले हे खरे, पण ते त्याच्या क्षेत्राशीच संबंधित होते.
याला आणखी एक बाजू आहे. ज्याप्रमाणे अमेरिकेचे अध्यक्ष सहजपणे प्राध्यापक होऊ शकतात, अगदी त्याचप्रमाणे एखादा प्राध्यापकही अमेरिकेचा अध्यक्ष होऊ शकतो. ते सोपे आहे, असे नाही. पण शक्य आहे. कारण, ते रिंगणही तेवढेच खुले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष होण्यासाठी तशा प्रकारची राजकीय पार्श्वभूमी असणे, अमाप पैसे असणे वगैरे काही आवश्यकता नाही. आपले डॉ. श्रीनिवास ठाणेदार अमेरिकेत खासदार झाले. डॉ. ठाणेदार भारतामध्ये असते, तर खासदार होऊ शकले असते का, हा मोठा प्रश्न आहे. याचा अर्थ तिकडे सगळे छान आहे, असे अजिबात नाही. तिकडे सगळे बरे असते, तर डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष होऊच शकले नसते. तिकडे राजकीय रिंगण खुले आहे, हे मात्र फार महत्त्वाचे. एखाद्या सर्वसामान्य घरातला तरुण मुलगा आपल्याकडे आयएएस होण्याचे स्वप्न ज्याप्रमाणे बघू शकतो, अगदी त्याप्रमाणे तो खासदार अथवा मंत्री होण्याचे स्वप्न तिकडे बघू शकतो. डॉ. श्रीनिवास ठाणेदार हे तिकडे खासदार झाले, याचे कौतुक आपल्याला जेवढे आहे, तेवढे तिकडे नाही. याचे कारण, तिकडे खासदार झाला म्हणजे फार मोठे तीर मारले, असे कोणी मानत नाही. आपल्याकडे राजकीय रिंगण इतके आक्रसून गेलेले आहे की, बाहेरच्या माणसाला तिथे प्रवेशच करता येत नाही. विशिष्ट वर्गासाठी राजकीय रिंगण आरक्षित आहे. त्यासाठी खूप अटी आहेत. तुमच्याकडे राजकीय पार्श्वभूमी असायला पाहिजे. नसल्यास उदंड पैसे तरी असले पाहिजेत. एवढे असून चालत नाही. तुमच्याकडे तशी विशिष्ट जातही असली पाहिजे.
एखाद्या तरुणाने राजकारणात उतरणे ही आपल्याकडे सहजसाध्य अशी गोष्ट नाही. अगदी सहजपणे एखादा तरुण म्हणाला की, मला डॉक्टर व्हायचंय. मला आयएएस व्हायचंय. मला संशोधक व्हायचंय… तर लोक त्याला शुभेच्छा देतात. पण, तो म्हणाला की, मला येत्या पाच वर्षांत खासदार व्हायचंय, तर मात्र लोक त्याला समजावतात. त्याची समजूत काढतात किंवा त्याला वेड्यात काढतात. तरीही तो गंभीर असेलच, तर लोकांचा पहिला प्रश्न असतो- तुझ्याकडे किती पैसे आहेत? मग, तुझी जात कुठली आहे?
खरे म्हणजे, युरोप-अमेरिकेपेक्षाही आपण फार पुढे होतो. थोडा इतिहास पाहिला तर आपल्या लक्षात येते की, आपल्याकडे अकॅडमिशियन आणि बुद्धिमान असणाऱ्या तरुणांनी राजकारणाची वाट चोखाळली. सुरुवातीच्या टप्प्यात आपल्याकडे सगळे असेच तरुण होते. त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून ते सी. डी. देशमुखांपर्यंत, काकासाहेब गाडगीळांपासून ते मधू दंडवते आणि बॅ. नाथ पैंपर्यंत अशी अनेक नावे सांगता येतील. ही बुद्धिमान माणसे राजकारणात आली. त्यांनी यशस्वी राजकारण केले. त्यांना चांगल्या जबाबदाऱ्या मिळाल्या. त्यांनी आपल्या कामाचा ठसाही उमटवला. मधू दंडवतेंचा मी उल्लेख केला. प्राध्यापकी सोडून हा माणूस राजकारणात आला. खासदार झाला. केंद्रीय मंत्री झाला. दंडवते प्राध्यापक झाले, तेव्हा प्राध्यापक पदासाठीचा त्यांचा इंटरव्यू साक्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घेतला होता.
ज्या कोकणात प्रा. मधू दंडवते आणि बॅ. नाथ पै अशी मोठमोठी माणसे राजकारणात होती, त्याच कोकणात आता किती छोटे-छोटे पुढारी दिसू लागले आहेत! अनेक नावे सांगता येतील. यशवंतराव चव्हाण यांच्यासारखा अत्यंत बुद्धिमान, प्रतिभावंत, प्रगल्भ, व्यासंगी अशा प्रकारचा नेता आपण पाहिला आहे. एस.एम.जोशी, ना. ग. गोरे, प्रा. ग. प्र. प्रधान, अहिल्या रांगणेकर, मृणाल गोरे, प्रा. एन. डी. पाटील, भाई उद्धवराव पाटील, कॉम्रेड डांगे, भाई वैद्य असे नेते आपण पाहिले आहेत. काय मोठा वारसा आहे हा! डॉ. पंजाबराव देशमुखांसारखा स्कॉलर तरूण राजकारणात उतरला. सलग दहा वर्षे केंद्रीय कृषिमंत्री म्हणून त्यांनी ठसा उमटवला. राजकारणात आलेली ही सगळी माणसे ध्येयवादी होती. बुद्धिमान होती. ठरवून राजकारणाच्या रिंगणामध्ये उतरलेली होती. लोकमान्य टिळकांपासून सरदार वल्लभभाई पटेल पर्यंत, नेताजी सुभाषचंद्र बोस, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून ते डॉ. राममनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण यांच्यापर्यंत…!
आपल्या राजकारणाला असा इतिहास आहे. आणि तो काही प्राचीन नाही. म्हणजे गंमत बघा. काकासाहेब गाडगीळ हे नेहरूंच्या पहिल्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते. त्यानंतर ते पंजाबचे राज्यपाल झाले. त्यानंतर ते पुणे विद्यापीठाचे कुलगुरू झाले. कुलगुरू झाल्यानंतर ते असे म्हणाले की, ‘आता मी सगळ्यात महत्त्वाच्या पदावर आहे.’ मी नेहमी सांगत आलो आहे. एका संशोधकाला अथवा अभ्यासकाला राजकारणाच्या प्रक्रियेत आणण्यात गैर काहीच नाही. मात्र, तशी गती त्याला असली पाहिजे. आणि, तसे योगदान त्याला देता आले पाहिजे. हे फक्त प्रतिकात्मक होता कामा नये.
कायदेमंडळात असणारा एक नेता ज्या गलिच्छ भाषेत बोलला, त्यानंतर तर मला हे तीव्रपणे जाणवलं. असे लोक कायदेमंडळामध्ये आलेच कसे? सभागृहापर्यंत असे लोक पोहोचले कसे? असे भयंकर लोक राजकारणात येतात, ते मोठ्या पदापर्यंत पोहोचतात आणि तरीही, मागच्या दरवाजाने राजकारणातले पद मिळवणे हाच आपल्याकडे प्रतिभावंतांना सुद्धा मोक्ष वाटतो! या सगळ्याचे लॉजिक काय, हे मला कळत नाही. नक्की काय बिनसलं आपलं, ते बघितलं पाहिजे. ‘आयडिया ऑफ इंडिया’विषयी सातत्याने लिहित-बोलत असतो. नव्या पिढीशी संविधानाबद्दल सांगू पाहातो. आणि, त्याचवेळी अशी पात्रं टीव्हीवर दिसतात. हा रस्ता आपला नव्हता. ही वाट आपली नव्हती. काय चुकलं नक्की? काय गडबडलं नेमकं? विचार तर आपल्यालाच करावा लागणार आहे. कारण, आपणच खरे आणि अंतिम सत्ताधीश आहोत. अशा अपात्र लोकांच्या हातात सत्तेची सूत्रं आज आपण दिली असतील, तर त्याची जबाबदारी आपल्यालाच स्वीकारायला हवी. एखादा अपवाद म्हणून भंपक नेता आपण समजू शकतो. पण चांगला नेता हाच अपवाद वाटावा आणि वाह्यातपणा हा नियम व्हावा, हे भयंकर आहे.
हे बदलायला हवं. नाहीतर, येणारा काळ फार कठीण असणार आहे.
👍👍👌👌✅✅✅
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा