शुक्रवार, २३ मे, २०२५

1914. दोन पिरियड ऑफ

 लता...संगीताची मोठी बहीण. लताचे लग्न ती दहावीत असतांनाच  झाले. आई सतत आजारी, वडील सतत दौऱ्यावर.  मग घराची संपूर्ण जबाबदारी सातवीत असलेल्या संगीतावर  पडली. पाठी एक लहान बहीण आणि दोन भाऊ. जोडीला एक म्हातारी आजी. दोन्ही डोळ्याने आंधळी. 
   बारा तेरा वर्षाची संगीता खरच कौतुकच वाटते बाई त्या पोरीच. सकाळी साडेपाच चा गजर लावून झोपायची. उठल्या बरोबर एखाद्या कसलेल्या गृहिणी प्रमाणे तिची दिनचर्या चालू व्हायची. दाताला मंजन लावून झाले की तिचा मोर्चा वळायचा फड्याकडे. फडा हातात घेऊन झरझर आंगण झाडून काढायचे. मग त्यावर शेणाचा सडा. कधी आपल्या परकरचा ओचा सांभाळायचा तर कधी केसांच्या उडणाऱ्या बटा. पुढचं काम त्याहून जबाबदारीच. एक लोखंडी शेगडी, त्याच्या मधोमध एक नळकांड ठेऊन त्याच्या तोंडाशी एक कापडाचा बोळा ठेवला जायचा.  मग त्यात दाबून दाबून लाकडाचा भुसा भरला जायचा. हळूच ते नळकांड काढून तोंडाजवळचे कापड काढायचे. मग त्यात एक बारीकशी लाकडाची काडी,त्यावर घासलेट टाकून पेटवायचे. मग त्यावर पाण्याचा हंडा तापवत ठेवायचा. खरंच खूप निगुतीचे हे काम. जरा जरी दाब कमी पडला तरी सगळा भुसा फस्सकण खाली. शेगडी विझून धुरच धूर. कसे जमायचे देवच जाणो त्या इवल्याश्या जीवाला.
   आताशी सकाळी घाई होते म्हणून रात्रीच हे काम करून ठेवते. पुढील मोर्चा अजूनच थरारक. एका बादलीत पाणी, त्यात थोडी माती आणि शेण घेऊन तीन खोल्यांचे आणि तुळशी वृंदावन सारवण. नंतर आंघोळ करून देवाजवळ , तुळशी जवळ रांगोळी. त्यावर हळदीकुंकू टाकलेले असलेच पाहिजे. रांगोळी कधीच पांढरी ठेऊ नये .आईने सांगितले म्हणे. मग दहा वर्षाच्या लहान बहिणीला उठवून तिला आंघोळीला पाणी, मग तिच्या लांबसडक केसांच्या दोन वेण्या घालून द्यायच्या. चहा देऊन शाळेत पाठवायचे. ती सुद्धा त्याच शाळेत सातवीत. पण तिला वेळेत शाळेत जाणे जमलेच नाही. लहान बहिणीला पुढे पाठवून हिचे पुढचे काम  वाट पाहत असायचे. विहिरीवर जाऊन आधी एक मोठा ड्रम पाणी आणि पिण्याचे चार गुंड भरून ठेवायचे .चूल पेटवून चुलीवर भात, उल्यावर वरण शिजत घालून ,मग शाळेत जायचे. तोवर दोन पिरियड होऊन जायचे.  पी .टी .सर जॅम खडूस होते. ती उशिरा आली की दोन्ही हातावर सपासप छड्या मारायचे . हि मुकाट्याने मार खाऊन घ्यायची. बोलायची मात्र काहीच नाही. बिचारी रोज मार खायची. एक दिवस धाकट्या बहिणीने. सरांनी तिला मारतांना पाहिले. वर्गातून बाईंना परमिशन मागून बाहेर आली. तोवर संगीता वर्गात गेली होती. सरळ सरांजवळ गेली. 
पहिला प्रश्न ,सर तुम्ही माझ्या ताईला का मारलं?
का म्हणजे?
अग ती रोजच मार खाते? काय? अग हो !
सर का पण ?
मला कळेल का? 
का तुला माहित नाही? 
सर तुम्ही काय बोलता ?
मला खरंच काही कळत नाही?
हि रोज शाळेत यायला निघते. आणि दोन पिरियड कुठे भटकत असते देवच जाणो?
सर तुमचा काहीतरी गैरसमज होतो.
म्हणजे ?
सर ती रोज दोन पिरियड उशिरा कुठेच भटकत नसते तर मला वेळेत शाळेला पाठवून पुन्हा एका लहान भावाला शाळेसाठी तयार करून, स्वतः घरचे सगळे काम करून येते. सकाळी सात ला कशी येणार मग. 
सर ती अर्ध जेवण सकाळी बनवुन मधल्या बेल मध्ये घरी जाऊन भाजी आणि जमेल तश्या पोळ्या, भाकरी करते. शाळेतून गेल्यावर कपडे धुणे,भांडी घासणे ही काम करते. उरलेल्या वेळेत अभ्यास. पुन्हा संध्याकाळी झाडलोट दिवेलावण करून एका सराईत गृहिणी प्रमाणे जेवण बनवते. तेराव्या वर्षी सर ती आमची आई झाली आहे. मी तीच्या पेक्षा फक्त तीन वर्षाने लहान पण कधीच मला काम करू देत नाही. मी बोलते कधी. ताई तू भांडी घासते तर मी धुवून देते तर म्हणते कशी अग तू लहान आहे. ताई पण तुही लहानच आहे ग. तर म्हणते नाही नाही. काही झालं तरी तू काम करायचे नाही. सर कधी कधी ती झोपेत उठून माझ्या दोन्ही वेण्या सोडते. चित्रा चल पटकन वेणी घालून देते म्हणते तर कधी दोरीवरचे कपडे काढते. म्हणते चित्रा बाळा चल पटकन आंघोळ करून घे. उशीर होईल शाळेला. सर खूप जोरात पट्टी मारतात. सर तुम्ही तिला उशीर होतो म्हणून पट्टी मारता. म्हणून तिला तुमची पट्टी किती जोरात लागते माहित आहे. ती पट्टी मला बसू नये. म्हणून झोपेत सुद्धा विचार करते. सर माझा लहान भाऊ फक्त दोन वर्षांचा आहे.आंधळी आजी सांभाळते त्याला. पण कधी कधी खूप त्रास देतो. तर ही अर्ध्या रात्री त्यालाही सांभाळते. सर हे सगळे झेपत नाही म्हणून. लता ताईने आठवीतच शाळा सोडली. तिचे लग्न झाले. ही आता घर आणि शाळा दोन्ही जबाबदाऱ्या लीलया पार पाडते. बदल्यात दोन पिरेड ऑफ आणि रोज तुमचा मार खाते.
हे सगळं तू खरं सांगते चित्रा.
हो सर 100% खरं असं म्हणून चित्रा वर्गात गेली.
        संध्याकाळी सर घरी. खरच ही पोरगी दोन पिरियड रोज ऑफ करुन नक्की काय करते. संगीताचे सर घरी आले .नक्कीच काहीतरी भानगड आहे. वेटाळभर चर्चेला उधाण आली. पोट्टीन काय भानगड करून ठेवली कोणास ठाऊक. हाच विषय सगळ्यांच्या तोंडी. सर आईच्या कॉट जवळ आले.
नमस्कार ....मी संगीताचे सर.... पी .टी शिकवतो...
नमस्कार सर.....कस येणं केलं....काही चुकलं का पोट्टीच.....
नाही माझंच चुकलं.... 
सर हे काय बोलता तुम्ही.....काय झालं...? सर मी अशी बिमार....बाबा सारखे दौऱ्यावर.....काही चुकलं असंन तं माफी मागते सर....पोरीले माफ करा....तोवर संगीता ताईने चहा केला....संगीता फक्कड चहा केला बेटा....
आणि संगीता तू उद्या पासून दोन पिरियड उशिरा आलीस तरी चालेल. यानंतर तुला शिक्षा होणार नाही. मी उद्याच हेडमास्तर च्या कानावर टाकतो. तू जमेल तशी ये शाळेत आणि काही नाही समजले तर त्या त्या विषयाच्या शिक्षकांना शंका विचार. ते सुद्धा बोलतो मी त्याच्याशी. पण तू शिक. अजून काय काय आवडते तुला....? 
सर मला फुटबॉल खेळायला खूप आवडते....
अच्छा तुला माहित नसेल ....यावर्षी आपण स्टेट लेव्हल साठी फुटबॉल टीम तयार करतो. तू घेशील का भाग.
हो सर नक्की....फुटबॉल माझा जीव की प्राण आहे. पण त्याची प्रॅक्टिस सकाळी असते. तू कशी अडजेस्ट करशील. सर मी करते मैनेज. तुम्ही माझे नाव घाला टीम मध्ये आणि घरची जबाबदारी पार पाडून स्टेट लेव्हल चॅम्पियन म्हणून नावारूपाला आली...
सर त्या दिवशी घरी येऊन आणि भरभरून पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन गेले.
संगीताने सुद्धा मिळालेल्या संधीचे सोने केले. 
अशा प्रकारे तिच्या घर सांभाळून शिकण्याच्या धडपडीला माझा सलाम..
सत्य घटनेवर आधारित. माझ्या मोठ्या बहिणीची कथा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...