ऑ, हे काय उल्ट ?
असं तुम्ही म्हणणार, हे माहित असून उलट्या डोक्याने विचार केला तर सुलटी उत्तर मिळतात. हे तुम्हाला सुचवायचंय.
या प्रकारे विचार केल्यास अनेक अनुत्तरीत प्रश्न सुटतील, माझे सुटलेत, असं मला वाटतं.
अट एकच विचार पूर्णपणे भारतीय करावा.
मला माहित आहे, लेखाचा शेवट झाल्यावर तुमच्या हातून काहीतरी चिह्न स्क्रीनवर नक्कीच उमटणार.
कसा काळ बदलतो पहा ना ! कधी वाटलं पण नव्हतं... पेनशिवाय, लेखणीशिवाय लिहिता येईल. पूर्वीच्या काळी नव्हती का धूळपाटी... तसंच काहीसं. स्क्रीनवर फक्त बोट फिरवत बसायचं की झालं शिक्षण !
असो !
आपल्या भारतीय परंपरेमधे खचाखच गर्दी हा पाचवीला पुजलेला अविभाज्य कार्यक्रम आहे.
जन्म होण्याअगोदर पासून हेच माणसे जमविण्याचे संस्कार झालेत.
सुरवात झाली डोहाळजेवण करण्यापासून. त्याअगोदर बोलायचे तर फुले माळण्यासाठी, ओटी भरण्यासाठी शेजारी पाजारी आप्त इष्ट मंडळी, आपल्या घरी येतात आणि आनंदोत्सव साजरा करतात.
दिवस राहिलेल्या मुलीला आपादमस्तक फुलांनी सजवली जाते. तिच्या हाती फुलांचा धनुष्यबाण, फुलांची परडी, चंद्राच्या झोपाळ्यावर बसवले जाते. जमलेल्या सर्व जणी गाणी म्हणत, गप्पा गोष्टी करतात. चहा फराळ वगैरे करतात. आणि घरी जातात. नाजूक गर्भिणीच्या चौथ्या सातव्या नवव्या महिन्यात घरी माणसे मुद्दाम बोलावली जातात. एवढी गर्दी का ? कशासाठी ?
नंतर तिची प्रसूती झाल्यावर पाचवी पूजन घुगर्या खायला पुनः बोलावले जाते.
पुनः बाराव्या तेराव्या दिवशी बारसे.
एवढी गर्दी का कशासाठी ?
अधेमधे निमित्त शोधून वाढदिवस, लग्नदिन, श्राद्धपक्ष, महालय, असे वार्षिक उत्सव, चैत्रातले हळदीकुंकु असो वा नवरात्रीतील. घरी माणसांची गर्दी बोलावली जातेय.
का ? कशासाठी ?
मला सुचलेलं उत्तर टायटलमधेच लिहिलं आहे. इम्युनिटी वाढवण्यासाठी ! हो. आपली प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठीच.
कशी वाढेल प्रतिकार क्षमता ?
ईश्वरनिर्मित या सृष्टीमधे असंख्य, अगणित जीवजंतु निर्मिलेले आहेत. "जीवो जीवस्य जीवनम्" या तत्वानुसार एक जीव दुसर्या जीवावर अवलंबून आहे. केवळ खाद्य किंवा भक्ष्य म्हणून नव्हे ! ( खाद्य किंवा भक्ष्य म्हणजे एका जीवावर दुसरा जीव, त्याला खाऊन, स्वतःचा जीव वाचवतो, हा पाश्चात्य विचार झाला. ) तर एकमेकांच्या साहचर्याने हे परस्पर जीवनचक्र अविरत अव्याहत सुरू आहे. किडे, मुंगी, माश्या,वाळवी, डासाप्रमाणे अनेक जीव आपल्याला डोळ्याने दिसतात. पण त्याहीपेक्षा अनेक पटीने सूक्ष्म असणारे जीव आपल्याला दिसतही नाहीत. त्यांची नावे शोधणे पण सोडून द्या, त्यांचे आकार, वय, कार्य, इ. गोष्टीदेखील आपण अभ्यासू शकत नाही. विज्ञानाच्या या मर्यादा आहेत जिथे विज्ञान थांबते, तिथे डोके उलटे करून भारतीय विचार करायचा की सुलटे उत्तर मिळते.
हे सर्व जीव त्याने निर्मिलेले आहेत. जो सुप्रीम कर्ता आहे, तो केवळ टाईमपास, वेळ घालवण्यासाठी म्हणून हे जीव निर्माण करत बसला असेल का ? बरं हे जीवयंत्र त्याने असे बनवले की त्यातूनच दुसरे यंत्र तोच निर्माण करू शकतो. त्यासाठी परत परत नवीन यंत्राची गरज नाही. बरं, जे यंत्र बनवलंय त्याला मोबाईल सारखे दर पंधरा दिवसांनी अपडेशन येत नाही, करावं लागत नाही. जे डिफॉल्ट मोड ला ठरवले आहे, तेच तसेच अजूनही तयार होतंय.
माणसांचा विचार केला तर जगात कुठेही जा, तसेच, त्याच ठिकाणी दोन हात, दोन पाय, दोनच डोळे, दोन कान, काही जणांचे कान, त्यांच्या गरजेप्रमाणे लहान मोठे लांब रूंद, तसेच पोट, पाठ छाती, जननेंद्रिय, पुनः स्त्री पुरूष वेगळेच. त्यांची शारीरिक ठेवण वेगळी, विचार वेगळे, कार्यबल वेगळे, पण आजपर्यंत कधीही त्यात तसूभरदेखील बदल झालेला नाही. तिसरा डोळा कपाळावर नाही, की नाक पोटाला चिकटवलेलं माॅडेल आलं नाही.
ते जाऊदेत !
ही गर्दी का जमवली जातेय ?
या सर्व जीवजंतुची आपल्या शरीराला सवय व्हावी, आजच्या भाषेत बोलायचे तर ते जीवजंतु आपणाला युजर्स फ्रेंडली व्हावेत. मेडीकल टर्म मध्ये बोलायचे तर त्यांच्या अॅण्टीबाॅडीज आपल्या शरीरात तयार व्हाव्यात. म्हणजे त्यांच्या शरीरातील "अपकारक" भाग आपल्या शरीरात आल्यावर तो "उपकारक" व्हावा. म्हणजेच एका तर्हेने लसीकरण.
(सोकाॅल्ड) कोरोनाच्या काळात आपण ही सर्व प्रक्रिया बघितली, अनुभवली सुद्धा !
आपल्याला नवीन जीवाची ओळख होणे, त्या जीवाचे जीवनचक्र जाणून घेणे, त्या जीवाचा संपूर्ण नाश करण्यापेक्षा तो जीव आपल्याला उपयोगी कसा ठरेल, याचा प्राथमिकतेने विचार करणे, हा भारतीय विचार झाला आणि ईश्वरनिर्मित त्या जीवाला लगेचच ठार मारणे हा पाश्चात्य विचार झाला.
एखादा जंगली हत्ती पिसाळला आणि मानवी वस्तीत आला तर त्याला लवकरात लवकर कसे माणसाळवता येईल, याचा विचार करणे, म्हणजे भारतीयत्व ! आणि त्याला लगेच गोळी घालून ठार मारणे हा पाश्चात्य विचार.
एखादा जीवजंतु स्वतःचा जीव वाचवण्यासाठी स्वतः काहीतरी धडपड करत असतोच. ईश्वराने त्याला काही नैसर्गिक शक्ती दिलेली आहे. याला आपण डिफॉल्ट मोड म्हणू. जसे डासाला त्याचा जीव वाचवण्यासाठी त्याच्या शरीराच्या भोवती आलेला हवेचा अतिसूक्ष्म दाब देखील काही क्षणात समजतो आणि त्याला मारण्याआधीच, मारण्यासाठी उगारलेल्या आपल्या हातानी निर्माण झालेला हवेचा झोका त्याला आधीच समजतो. आणि आपणच आपल्याला चापटी मारून घेतो. डास कधीच पसार झालेला असतो.
तर या शक्तीचा वापर निसर्ग करतच असतो.
बरं, डास हे माणसाचेच रक्त पिण्यासाठी आणि कानात आवाज करून झोपमोड करायला त्याने जन्माला घातलेले नाहीत. नाहीतर डास जंगलात कशाला रहायला गेले असते ? जिथे मानवी वस्ती नाही, तिथेदेखील डास असतोच. त्याचा उदरनिर्वाह काही वनस्पतींच्या पानातील रसावर किंवा खोडातील पाण्यावर पण होत असतो. आणि जंगली पशू पक्षी प्राण्यांचे रक्त देखील त्यांना मिळतेच. जेव्हा बाहेरील निसर्ग माणसाने नष्ट करायला सुरवात केली की जंगलातील पशूपक्षी प्राणी मानवी वस्तीवर आक्रमण करणारच !
असो !
गर्दी जमवणे, वारंवार गर्दी जमवणे, गर्दीत जाणे, वारंवार गर्दीत मुद्दाम जाणे ही आपली भारतीय परंपरा आहे.
घरातील लग्न मुंज, वास्तुशांत, गृहप्रवेश हे धार्मिक कार्यक्रम आम्ही सोहळे बनवतो. सर्वांना लेखी आमंत्रण देऊन बोलवतो.
देवीचे नवरात्र, महालक्ष्मी, सवाषिण भोजन, दांपत्य भोजन, ब्राह्मणा करवी एकादषणी असतेच.
एवढंच पुरत नाही म्हणून श्री सत्यनारायण, सत्य विनायक, सत्य दत्त महापूजा, उदकशांत, रूद्राभिषेक, होम हवन, व्रत उद्यापन सोहळे, आहेतच.
वर वर्णन केलेल्या सर्व घटना घरात बोलावलेल्या माणसांची गर्दी आहे. त्या परिमितीच्या बाहेरील जंतुचे काय करायचे ?
त्यासाठीच आपण गर्दी जमवतो.
गणपतीच्या आरत्यांना एकमेकांच्या घरी जातो. भजनी मंडळी मेळ घेऊन फिरत असतात. होलीकोत्सवात वेगवेगळी रूपडी घेऊन हा जत्था घराघरात फिरत असतो.
कोणाच्या घरी जन्म असूदेत किंवा मृत्यु गर्दी होतेच.
फक्त फरक एवढाच असतो, स्मशानभूमीतून आल्यावर आंघोळ केल्याशिवाय परत घरात प्रवेश नाही. तसं देवळात जाऊन आल्यावर आंघोळ करायला सांगितली नाही. जिथे जंतुसंसर्गाची जास्त शक्यता तिथून परतल्यावर घ्यायची काळजी देखील भारतात धार्मिक परंपरामध्ये अत्यंत खुबीने बसवलेली आहे. ज्यांना औपसर्गिक रोग म्हटले आहे, ताप, त्वचाआजार, नेत्र विकार, टीबी सारखे संक्रामक रोग अशा अनेक आजारांवर स्पर्श आणि संपर्क टाळायलादेखील सांगितले आहे.
स्पर्श कधी टाळावेत याचेही असे वैशिष्टय़पूर्ण प्रकार भारतात पाळले जातात.
यालाच सुवेर सुतक पाळणे म्हणतात. तसाच एक प्रकार आपल्याकडे पाळला जातो, तो म्हणजे चार दिवस मासिक पाळी पाळणे. या विषयावर माझा स्वतंत्र लेख आहे. जिज्ञासूनी तो वाचावा.
आजच्या भाषेत सांगायचे तर डू एण्ड डोन्ट ( do and don't ) आपल्या भारतीय अध्यात्म शास्त्रात सांगितले आहे. आणि हे डू एण्ड डोन्ट जिथे सांगितले जातात, त्यालाच खरंतर शास्त्र म्हणतात.
गावात असलेल्या देवळात दशावतारी नाटक असते. तिथे गर्दी. शाळेत सरस्वतीपूजन वार्षिकोत्सव असतात, तिथे गर्दी. आठवडा बाजार भरतो तिथे गर्दी. एस टी स्टॅण्ड, रेल्वे स्टेशन, बस इथेही गर्दी. माॅल, मार्केट, इथेही गर्दी. साईबाबांचा भंडारा असूदेत किंवा अन्न छत्र, निवडणूका असूदेत किंवा नृत्यस्पर्धा असूदेत गर्दी होतेच.
देवस्थानातील समाराधना असो वा मांड भरणी असो, गर्दी होणारच.
गावात एखादे देवालय असतेच असते. आठवड्यातून एकदा तरी जायचेच. दर सोमवारी महादेव, मंगळवारी देवी गुरूवारी दत्त, शनिवार मारूतीचा. ही रचना मुद्दाम केली गेली असेल. ज्यांचा जो देव आवडीचा, त्याच्या देवळात तो जाईल.
महिन्यातून एकवेळ संकष्टीच्या निमित्ताने गणपतीच्या देवळात आवर्तने म्हणायला एकत्र यायचे. नवरात्रात गरबा, किंवा रास खेळायला, श्रावणातील मंगळागौरीसाठी एकत्र येऊन एकमेकाना स्पर्श करीत फुगड्या, झिम्मा, गोफ, इ. अनेक अनेक खेळ खेळले जातात. यातूनही सहवासाने, स्पर्शाने, गर्दी केल्याने, अंगावरील जीवजंतुची देवाणघेवाण नक्कीच होत असते. म्हणजेच एकमेकांपासून एकमेकांना प्रतिकारशक्ती वाढण्याचा आशीर्वाद या जीवजंतुपासून नक्कीच मिळत असणार.
एवढ्याने भागत नाही म्हणून प्रत्येक गावागावात जत्रा नावाचा धार्मिक उत्सव, गर्दी जमवण्यात पटाईत असतो. प्रत्येक घराघरातील व्यक्तीच्या अंगावरील जीवजंतु ( आपण त्याना आता व्हायरस बॅक्टेरीया म्हणू ) जत्रेच्या निमित्ताने गावात सर्वत्र पसरतात. गावच्या गाव आपली स्वतःची इम्युनिटी तयार करते. आपल्या शरीरातील एण्टीबाॅडीज तेवढ्या मोठ्या प्रमाणात तयार होत जातात. जेवढा संपर्क जास्ती तेवढ्या एण्टीबाॅडीज जास्ती. तेवढीच प्रतिकारशक्ती वाढत जाते. काही जणाना त्रास होईलही, पण तो कमी प्रमाणात असतो. नंतर होतच नाही. पहिल्या पावसात सर्दी होते नंतर नंतर होत नाही. तसेच आहे.
जत्रेत अनेक माणसे अनेक ठिकाणाहून आलेली असतात वस्तूंची देवाणघेवाण होते. काही नवीन खाद्यपदार्थ वेळी अवेळी पण खाल्ले जातात. त्याचीही सवय आपल्या पचनसंस्थेला होते.
रोज उकळून पाणी पिणार्यांना एखादा दिवस साधे पाणी प्यायले तर पचत नाही. म्हणून रोज पाणी उकळून प्यायची पण गरज नाही. ( नाहीतर बिचार्या लिव्हरने काम कधी करायचे ? )
गावातील जत्रेने गावातील सर्व लोकांना दरवर्षी या नवीन एण्टीबाॅडीज मिळतात. एका गावातील लोकांची हर्ड इम्युनिटी इतर गावातील लोकाना कशी मिळणार?
यासाठी पंढरपूरची वारी करा. लाखो भाविक अत्यंत सुनियोजित रित्या एकत्र येतात, आणि एकमेकांना माऊलीचे आशीर्वाद देऊन जातात. दशक्रोशीच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रातील माणसे या निमित्ताने एकत्र येतात आणि एकमेकांना नवीन एण्टीबाॅडीज मिळवून देतात.
राजापूरसारख्या गावात गंगावतरण होते, इथेही संपूर्ण राज्यातून लोकं येतात. एकत्र स्नान करतात.
हिरण्यकेशी, आंबोलीसारख्या ठिकाणी स्नान करण्यासाठी होणारी आंतरराज्य गर्दी देखील काय सांगते ?
एका राज्यातील नवीन एण्टीबाॅडीज इतर राज्यातील मंडळीना कशा मिळणार ?
यासाठी कुंभमेळा
दर बारा वर्षांनी वेगवेगळ्या ठिकाणी हा कुंभ, महाकुंभ मेळा भरतो.
सर्व देशातून, परदेशातून लाखो करोडो लोक एकत्र येतात आणि एकमेकांना जंतुचे महास्नान घडवतात. यालाच काहीजण पुण्य म्हणतात, आणि इम्युनिटीचे पुण्य पदरात पाडून घेतात. बाकी बुद्धीवादी मंडळी, दुष्परिणामांचा अजिबात विचार न करता, टुचुक टुचुक लसीचे डोस, बूस्टर डोस ढोसत बसतात.
जसे कोरोनाचे जंतु एकमेकांना स्पर्शाने पसरवत होते, तसेच त्या जंतुच्या विरोधातील तयार झालेल्या एण्टीबाॅडीज देखील एकमेकाना स्पर्शानेच पोचवल्या जातात, असे आजचे विज्ञान देखील म्हणते. त्याला एक्वायर्ड इम्युनिटी म्हणतात. जेव्हा एखादा जंतु स्वतःला बदलवून घेतो, ( व्हायरल म्युटेशन) तेव्हा त्याच्या एण्टीबाॅडीज देखील बदलल्या गेल्या पाहिजेत. हर्ड इम्युनिटी मिळवली पाहिजे, तरच आपण सरवाय्व होऊ शकतो.
ही देवाणघेवाण फक्त आणि फक्त स्पर्शाने, सहवासाने, अन्नपचनाने, श्वासोच्छ्वासाने होऊ शकते. औषधाशिवाय इम्युनिटी वाढवायचा हा अगदी सोपा आणि निर्धोक उपाय आहे.
पण ज्यांना आपले प्राॅडक्ट / औषधे/ लसीचे डोस खपवायचे असतील ती मंडळी याला विरोध तर करणारच.
आपल्या एक लक्षात आलं का ? परदेशामधे या गर्दीला जाणीवपूर्वक टाळले जाते. मुळात लोकसंख्या कमी. त्यात संपर्क कमी. वर रोगजंतुच्या प्रसाराची भीती निर्माण केल्यावर काय होणार ?
फक्त आणि फक्त लसीकरणावर अवलंबून रहावे लागणार.
तोपर्यत ???
ठणठणगोपाळ !
बसा बोंबलत. म्हणूनच तर 30 टक्के जनता परदेशात किडामुंगीसारखी मेली.
पण आपल्या भारतात ?
प्रचंड लोकसंख्या असूनही....
उत्सवप्रिय समाज असूनही...
मुंबईतल्या लोकलमधे तर कोरोना अक्षरशः चिरडूनच मरेल अशी ( मालवणी भाषेत मरनाची गरदी) असूनही.....
डेथ रेट फक्त 3 टक्केच ????
काय रहस्य असेल या मृत्युदराचे ?
उत्तर एकच - भारतातील माणसांची गर्दी.
ज्या गर्दीला परदेशी संशोधक घाबरत होते, तीच गर्दी भारतातील लोकांना कोरोनापासून वाचवून गेलीय, वाचवणार आहे, हे कटू सत्य आहे. सहज पचनी पडणारे नाही. कारण बुद्धीवादी शास्त्रज्ञ मंडळी देवापेक्षा स्वतःला जास्ती हुशार समजू लागली आहेत.
म्हणून म्हणतो, गर्दी करा, गर्दीत मिसळा, इम्युनिटी वाढवा.
वैद्य सुविनय वि. दामले, कुडाळ, सिंधुदुर्ग
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा