खुप वर्ष तो गायब होता. फोन नाही, मेसेजेस नाहीत.
रमला कुठे गं कान्हा असं अनेकदा व्हायचं.. आमच्या गाठीभेटी वरचेवर व्हायच्या. कधी पिठलं भाकरी , कधी थालीपीठ, कधी कॉफी , कधी शॉपिंग , कधी एकत्र कार्यक्रम तर कधी फोटोग्राफी , झाडे लावणे , पुरूष आणि स्त्री हा भेदभाव आमच्यात कधीही नव्हता.. लिंग विसरुन शरीरापलिकडे असलेल्या मैत्रीला कुठेतरी पॉज आला पण तो फुलस्टॉप नक्कीच नव्हता हे मला माहित होतं कारण तीही एक फेज होती..सगळ्याच नाड्या वरच्याच्या हातात त्यामुळे जेजे घडेल तेते पहात रहावे याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता. कारण जे आपले आहे ते कधीना कधी माघारी फिरुन येतच यावर आणि माझ्या प्रामाणिकपणावर माझा विश्वास होता आणि आहे..
जगावेगळं काहीही घडलं नाही साहेब प्रेमात पडले आणि स्वच्छन्दी माझा मित्र अचानक अबोल झाला.. फुलपाखराचं रूपांतर एका कोमेजणाऱ्या फुलात झालं.. सुरुवातीला त्या आवेगात काहीतरी आणाभाका घेतल्या जातात आणि नंतर त्याचं गिल्ट येतं किवा त्रासही होता.. स्वतःचा राग येतो पण सुटका दिसत नाही.. आपल्यातील बागडणारं फुलपाखरू निघून गेलय याची जाणीव होवूनही त्याला पुन्हा मुठीत पकडण्याचा अट्टाहास व्यर्थ जातो आणि फुलपाखरु कोमेजुन जातं. खरच प्रेम त्रासदायक आहे का?? अजिबात नाही.. प्रेम हे जुई सारखं नाजूक , अळवावरच्या थेंबासारखं पारदर्शी बकुळीसारखं सुंदर आणि मोरपिसासारखं सुबक असतं. मग पेनफुल काय असतं तर नको त्या कमीटमेंट , नको त्या अटी, नको ती वचनं, आणि सगळं माहीत असतानाही उडवुन घेतलेली झोप. आपण कुठल्या वयात आहोत आणि आणाभाका काय घेतो याचं भान ठेवून विश्वासाने एकरुप होवून प्रेम केलं तर ते उत्तम बहरतं.. एकमेकांना मिस करणं म्हणजे आपली शुगर किवा बीपी वाढवणं नसून एखाद्या ठिकाणी गेल्यावर एखाद्या व्यक्तीची आठवण येणे हेच प्रेम ना.. अमुक एक गोष्ट पाहिल्यावर ही तिला छान दिसेल किवा आवडेल हेच प्रेम ना.. कृष्ण राधेला सोडून गेला पण तिच्यावर असलेलं प्रेम विसरला नाही हाच आदर्श आपल्याला ठेवायचा आहे.. आपली व्यक्ती आपल्याला सोडून जाईल या भितीने त्याला सतत टॉर्चर करणं किवा सतत शारीरिक सुखात अडकवून किवा त्याचं आमीष दाखवणे हीच आपली हार आहे.. कलियुगात यालाच प्रेम समजतात यासारखी शोकांतिका नाही.. ती शरीरसुख देते पण मानसिक सुखाचं काय ??.. ती प्रेम करते पण स्वच्छन्दीपणाचं काय ??..
साहेब अशा निरर्थक प्रेमातुन भानावर येतात तेव्हा बरच पाणी पुलाखालुन गेलेलं असतं आणि मग सोनल सारखी मैत्रीण आठवते कारण सत्य, मैत्री, प्रेम यातला फरक कळतो आणि मोकळ्या आकाशाकडे पहात इतकी वर्षे साठवलेल्या मनात कुजलेल्या घाणीला वाट मोकळी करुन दिली जाते.. यात दोष कोणाचा??.. कर्माचा कि आपल्या चुकीच्या कमीटमेंटचा?? कारणाशिवाय या सगळ्यात दोषी ठरतं ते प्रेम कारण प्रेम आपल्याला उमगलच नाही.. कृष्ण आपल्याला कळलाच नाही. जिथे कृष्ण गवसला नाही तिथे राधा कधी कळणार.. प्रेम करायचा अधिकार प्रत्येकाला आहे फक्त मुक्तपणे आणि मुक्तहस्ताने करा.. इतकं प्रेम करा कि त्या प्रेमालाही लाली चढेल.. त्या प्रेमालाही हेवा वाटेल..
#Sonal Sachin Godbole
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा