'आई...पाठवतो पैसे एक दोन दिवसात..करतो व्यवस्था..तुम्ही व्यवस्थित राव्हा..आणि मनु कडे लक्ष ठेव..तुम्ही काळजी घ्या..तिकडं पण कोरोना जास्त आहे.. वाढायलय...व्हय व्हय..आम्ही काळजी घेतो..तू काळजी करु नको..ठिवू का.. ठेवतो..हां..काळजी घ्या..'
रवी ने फोन बंद केला. काही वेळ तो तसाच फोनकडे बघत राहिला. आंघोळ करुन येत, देवापुढे दिवा लावून नमस्कार करत जयाने, रवीच्या बायकोने त्याच्याकडे पाहिले. हे आजकाल असंच झालं होतं रवीचं...मन था-यावर नव्हतं त्याचं. त्यात त्यांची एकूलती, चार वर्षाची लेक मानसी, रवीच्या आईकडे क-हाडला होती. तिला बघून चार महिने झाले होते. हे दोघे मुंबईत नोकरीला होते..आधी लाॕकडाउनमुळे आणि आता कामामुळे क-हाडला जायला जमलच नव्हतं त्यांना. रवी आईला दर महिन्याला दोन हजार रुपये खर्चाला पाठवायचा..पण आता दोन महिन्यात तेही जमलंच नव्हतं त्याला.
गॕसवर चहाचं आधण ठेवत जयाने विचारलं..
'काय हो..काय म्हणत होत्या आई..पैशाची नड असंल ना हो..? दोन महिन्यात पैशेच पाठवले नाहीत तुम्ही...काय ते सरकारी पेन्शन दिड हजार मिळतय..कसंबसं वडत्यात त्या आला दिवस...परवा फोन केल्ता तवा सांगत होत्या..मनीसाठी अजून अर्धा लिटर दूध वाढवलय गवळ्याकडून..ती आता सकाळ संध्याकाळ न खळखळ करता दूध पित्या म्हणं..चार वर्षाची पोर..तिची आता भूक वाढत जाणारच की....पैशे पाठवायला पायजे लवकर आईंना...'
रवीने तिच्याकडे पाहिले. अगतीकपणे हसत तो म्हणाला..
'जयू...मला काय कळत न्हाई व्हय..? अग पण मी तर काय करु..एप्रील पासून तीन महिने झाले...पगार मिळाला न्हाई..मालक म्हणतो पैशे नाहीत पगार द्यायला..माल पडून हाय..कस्टमरनी डिलीव-या थांबवल्यात...पेमेंट येईना झालय..मार्चचाच तुमचा पगार पदरमोड करुन केली म्हणतो मालक...आता खरं खोटं देवालाच माहित...गेला एक महिना कारखान्यात एक पार्ट बनला न्हाई..पॕकींगला प्राॕडक्शनच नाही तर आम्ही पॕक काय करणार?
जाउन बसतो कारखान्यात. नशीबाला आणि कोरोनाला दोष देत..डबा खातो आणि परत येतो..काय करणार..?
'अहो पण...तुमी सगळीजण जाउन बोला की मालकाला..तीन तीन माहिने पगार नाही दिला तर खायचं काय म्हणावं आमी?' जयाने त्याच्या हातात चहाचा कप देत म्हंटलं.
'कोण बोलणार मालकाला..? सगळंच बंद करुन बसला तर काय?
आज ना उद्या आॕर्डर येइल..काम चालू होईल या आशेवर हायेत सगळीजण..प्रत्येकाला आपापली काळजी..नोकरी सुटू नये म्हणून ज्याची त्याची धडपड...' चहा सवयीने सुर्र करत पिता पिता रवी बोलला.
'कालच तो सुरेश सांगत होता..मालक कामगार कमी करणार हाय म्हणे..जेवढे कुशल कामगार हायेत त्यांनाच ठेवणार..आता पॕकींग सेक्शन मधे तर मीच सगळ्यात चांगला पॕकर हाय त्यांचा..काय होईल काय कळंना झालय..सगळ टेंशन वालं काम झालय सध्या..'
त्याच्या हातातला चहाचा मोकळा कप घेत जया म्हणाली..
'नका जिवाला घोर लावून घेउ..होईल सगळ ठीक..'
रवी उठला..मोबाईल खिशात टाकत म्हणाला
'जयू..तुझा सयपाक होईस्तोवर मी शनीमारुतीला जाउन येतो पलिकडच्या..शनीवार हाय आज..देव बी सध्या बंदिवानच हायेत म्हणा..तरी भायेरुनच नमस्कार करतो आणि येतो..'
'बरं...लवकर या..' म्हणत जया लगोलग स्वयपाकाच्या तयारीला लागली.
नाष्टा करुन डबा घेउन रवी कामावर गेला. त्याची फॕक्टरी कुर्ल्याला होती..तिची कलीनाला. जयाने पटकन आवरलं. स्वतःचा डबा भरला. कापडी पिशवी..त्यात डबा..अजून दोन पिशव्या घेतल्या..संध्याकाळी मिळाली तर एखाद दोन भाज्या घ्याव्या या उद्देशाने. किल्ली चाळीत त्यांच्या शेजारी राहणा-या पाटील बाईंना देउन ती निघाली.
मसाले चटण्या पापड बनवणा-या एका छोट्या बचत गटात ती कामाला होती. तिच्यासारख्याच पंधरा बायका होत्या तिथे कामाला. सुदैवाने लोकांचे खाणे पिणे वाढल्याने व त्यांच्या पदार्थांना चांगली मागणी असल्याने बचत गटाच्या सगळ्या बायकांना भरपूर काम होते. सध्या लाॕकडाउन आणि बेस्टचा भरवसा नसल्याने बचत गटाच्या मॕनेजमेंटने मिनी बसची सोयही केली होती..कुर्ल्याहून कलीना आणि संध्याकाळी परत कुर्ल्याला बस तिला सोडायची.
काहीतरी मनाशी ठरवून ती दुपारी जेवणाच्या सुट्टीत बचत गटाच्या संचालीका हेमलता ताईंना जाउन भेटली. ती हेमलता ताईंच्या केबिनमधून बाहेर आली तेंव्हा तिच्या चेह-यावर एक वेगळीच चमक व हसु तिची जवळची मैत्रीण फरीदाला दिसले
'क्या मॕडम..बहोत खूश लगरेली है..? मॕडम ने पगार बढाया क्या तेरी अकेली का?' फरीदाने तिला हसत हसत विचारलं.
मसाले पाकिटांचा भरलेला ट्रे उचलून जवळच्या रॕकवर ठेवत जया हसली..'नही रे..कुछ खास नही..ऐसेच थोडा काम था...!!'
संध्याकाळी पाच वाजता काम संपवून ती बाकी बायकांबरोबर बाहेर पडली. बसने कुर्ल्यात स्टेशनजवळ उतरुन चालत घराकडे निघाली. वाटेत थोडं वाणसामान, दोन भाज्या घेउन ती जिने चढून घरी आली तेंव्हा सहा वाजले होते. घरासमोर येउन पाहते तो कुलूप.
गेला महिनाभर काम नसल्याने रवी चारची शिफ्टची वेळ संपली की लागलीच घरी येउन जायचा. त्याची कंपनी कुर्ल्यातच असल्याने तो जया यायच्या वेळी तो घरी आलेला असायचा.
"अग बाई..आज आले न्हाइत की काय आमचे मिस्टर अजून.." असं स्वतःशीच बोलत ती पाटील बाईंकडे गेली..
'ताई..आमचे हे आल्ते का..? चावी घेउन परत देउन गेले असतील..?'
'नाही ग जया..दादांना आज उशीर झाला वाटतं..नाही आलेले दिसले आज. तु सकाळी देउन गेल्यापासून किल्ली इथच आहे अडकवलेली..' पाटीलबाई म्हणाल्या.
'बरं ताई..असतील आडकले कुठेतरी..येतीलच इतक्यात..बरं, येते मी...' जया घराची किल्ली घेउन वळत म्हणाली.
घरात येउन तिने आवरुन एकदा केरसुणी खोलीत फिरवली. एकच खोली होती. दहा मिनीटात तिने केर, फरशी केली..नळाला पाइप लावून मोरीतल्या दोन्ही बकेटमधे पाणी भरुन ठेवले. देवासमोर दिवा लावला. रवी आला की पटकन चहा टाकावा म्हणून ती थांबून राहिली. साडेसात वाजले तरी रवीचा पत्ता नाही म्हंटल्यावर मात्र तिला काळजी वाटायला लागली. आपल्या नव-याचा जीव सध्या था-यावर नाही..त्यात त्याच्या कंपनीत नोकर कपात होणार होती.
"कदाचित आज कंपनीत काही...? नाही नाही..!! असे वंगाळ विचार संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळेला नको..." असे म्हणत तिने तो विचार झटकला. देवासमोर हात जोडून उभी राहिली.
आठ वाजले तसे तिचे अवसान गळू लागले. ती पटकन पाटील बाईंकडे आली. पाटील बाईंकडून मोबाईल घेउन रवीच्या मोबाईलवर तिने फोन लावला...तर फोन स्विच आॕफ. आता मात्र तिचा धिर खचला आणि ती तोंडाला पदर धरुन रडू लागली.
पाटील बाईंच्या मिस्टरांनी देखील फोन लावून पाहिला पण पुन्हा तेच..स्विच आॕफ. शेवटी कंपनीतल्या नंबरवर त्यांनी फोन लावला. फोन वाजून वाजून गेटवर कंपनीतल्या वाॕचमन कडे गेला. त्याने एवढेच सांगितले की आज कंपनीतल्या दहा कामगारांना मालकाने कमी केलं होतं..आणि त्यात रवीचेही नाव होते. कमी केलेले हे कामगार मालकावर पोलीस केस करणार म्हणून तीन वाजताच बाहेर पडले. रवीदेखील त्यांच्याबरोबर तेंव्हाच बाहेर पडला. त्यानंतर ते लोक कुठे गेले ते वाॕचमनला ठाउक नव्हते.
पाटील साहेबांनी हे सांगताच जया मटकन जवळच्या खुर्चीत बसली आणी ओक्साबोक्सी रडू लागली. नव-याची नोकरी गेल्याची तिला इतकी काळजी नव्हती. पण तिचा नवरा थोडा मनस्वी होता...गोष्टी मनाला लावून घेणारा. भावनेच्या भरात आपल्या नव-याने स्वतःचे काही बरे वाईट...नाही..नाही..!!
ती तडक उठली. नव-याला शोधायला हवं आता..वेळ न दवडता.
पाटील बाईंनीही आपल्या नव-याला पिटाळलं स्टेशनला..तिथं रवीचा शोध घ्यायला. त्यांच्याबरोबर चाळीतली अजून दोन तीन लोकं देखील बाहेर पडली.
जयाने घरात येउन आपली पैशाची पर्स हातात घेतली. देवासमोरच्या दिव्याला अजून तेल घातले. मनोभावे देवाला हात जोडला व मग कुलूप लावून बाहेर पडली.
आधी पलिकडच्या गल्लीतल्या शनी मंदिराशी जाउन तिने पाहिले. तिथे कुणीही नव्हते. संध्याकाळी सातनंतर संचारबंदी असल्याने बाजारपेठा, दुकाने बंद झाली होती. तरी मुंबई असल्याने रस्त्यावर तुरळक वाहतूक, काही घरी परतणारे चाकरमनी दिसत होते. लांबून कोणी पुरुष माणूस चालत येताना दिसला की ती आशेने पहायची..पण रवी काही तिला भेटत नव्हता. जवळ जवळ दिड तास तिने तिच्या घराजवळचा भाग पिंजून काढला..चालत चालत ती शेवटी स्टेशन पर्यंत आली. स्टेशन वर प्रत्येक फलाटावर उतरून ती त्याला शोधून आली. पण कुठेही रवीचा पत्ता नव्हता.
रडवेली होउन ती स्टेशनबाहेर आली तसं तिला बाहेर उभ्या एका पोलिसाने हटकले. ती आणखीनच घाबरली. तसच थरथरत तिने त्या पोलीसाला थोडक्यात हकीकत सांगितली. पोलीस मामाचे नाव तानाजी शिंदे होते. रिटायरमेंटला आला होता तो. आपल्या पोरीच्या वयाच्या या मुलीला अशा अडचणीत पाहून तानाजी मामांनी तिला धीर दिला. पोलीस ठाण्यात फोन करुन 'मिसींग' ची वर्दी दिली...रवीचे साधारण वर्णन, अंगावरचे कपडे वगैरे गोष्टी नोंद केल्या व त्याच्या काही सहका-यांना शोध कामास लावले.
पाटलांच्या मोबाईलवर फोनवर फोन करुन तानाजी मामानी चौकशी केली..रवी अद्याप घरी परताला नव्हता. आपली स्कुटर घेउन तानाजी मामा आले व रडणा-या जयाला म्हणाले
'चल ग पोरी...शोधून काढू तुझ्या नव-याला..बस मागं...'
जयाही पटकन गाडीवर बसली आणि त्यांची शोधमोहीम सुरु झाली.
मिठी नदीच्या पुलावर येउन त्यांनी तिथे आसपासच्या लोकांकडे चौकशी केली..तिथून पुन्हा रवीच्या कंपनीत आले..तिथून थोडी फार माहिती काढून रवी बरोबर नोकरी गेलेल्या एका कामगाराच्या घरी गेले...त्याने सांगितले की पोलीस केस करायला जाणा-या इतर कामगारांबरोबर पोलीस स्टेशनला यायला नकार देउन रवी दुपारीच बरं वाटत नाही म्हणून निघून गेला होता.
तानाजी मामांनी कुर्ल्यातल्या दोन तीन मुख्य हाॕस्पीटलना विचारुन कुठली एखादी अॕक्सीडेंट केस आलीय का याची चौकशी केली. पण तिथे आज दिवसभरात या वर्णनाची कोणती केस तिन्हीकडे आली नव्हती.
तानाजी मामांनी शेवटी जयाला घराशी सोडलं. तिच्याकडून घरातला रवीचा एक फोटो घेतला. आपला नंबर तिला लिहून दिला. पाटलांचा मोबाईल स्वतःकडे नोंद करुन घेतला
'हे बघ पोरी..आता रात्रीचं तु कुठे फिरत बसू नकोस..आम्ही आहे नाईट ड्यूटीवर.. शोधतो तुझ्या नव-याला..काळजी करु नकोस..तपास लागला तुझ्या नव-याचा की ह्या पाटील साहेबांच्या नंबरवर फोन करतो..' असे म्हणत हेड काॕन्स्टेबल तानाजी शिंदे निघून गेले. पाय लटलट करीत ती पाटील बाईंचा हात धरुन जिना चढून घरी आली. एव्हाना चाळीतल्या लोकांना हकीकत कळाली होती. तेही आपल्या परीने रवीला शोधायचा प्रयत्न करु लागले होते.
रात्रभर जयाच्या डोळ्याला डोळा लागला नाही. आपला नवरा कुठे असेल, काय करत असेल हे विचार करुन करुन तिचे मन चलबिचल होत राहिले. शेवटी पहाटे कधीतरी ग्लानी येउन तिला थोडीशी झोप लागली.
अचानक दरवाजा वाजला तशी ती खाडकन जागी झाली.
दरवाजात पाटील बाई होत्या. त्यांच्या हातात फोन होता व चेह-यावर आनंद.
'जया..देव पावला बघ तुला...दादा सापडले बघ...हे घे..त्या हवालदार शिंदेंचा फोन आहे...'
जयाला ते ऐकूनच हर्षवायू झाला..
तिने झटकन फोन कानाला लावला..आणि 'हॕलो' म्हणाली तसा
पलिकडून आवाज आला.
'हां.हॕलो..मी तानाजी शिंदे..पोरी, तुझा नवरा सापडला बरं का..रुसला होता बघ तुझ्यावर..आम्हाला सकाळी इंडस्ट्रिअल इस्टेटमधे एका कोळशाच्या फॕक्टरीत ट्रक मधे कोळसा भरताना सापडला. त्याला तसाच उचलला आणि आताच आमच्या जीपने त्याला तुमच्या चौकात सोडलय..स्टेट बँकेजवळ..मी घरी निघालोय..आमचा काॕन्स्टेबल शिर्के आहे त्याच्याबरोबर..घेउन जा तुझ्या नव-याला घरी, आणि बांधून ठेव त्याला..काळजी घे..' असं म्हणत तानाजी मामा हसले.
तिने 'थँक यू मामा..' म्हणेपर्यंत फोन कटही झाला.
फोन कडे पहात..हसत ती पाटील बाईंना बिलगली.
मग मात्र फोन पाटील बाईंच्या हातात देउन ती वेड्यासरखी धावत सुटली.
स्टेट बँकेच्या चौकात ती आली. सकाळचे फक्त सहा वाजले होते. सगळी दुकाने अजून बंद होती. स्टेट बँकेसमोर पोलीस व्हॕन उभी होती व एक पोलीस काॕन्स्टेबल जिपशेजारी थांबला होता. तिला पाहताच त्याने नजरेनेच तिला समोर पहायला सांगितले.
बँके समोरच्या बिल्डिंगच्या दुकानासमोर एक कट्टा होता आणि त्या कटृयावर मळके कळकट कपड्यानीशी तिचा रवी बसला होता.
ती धावत धावत जाउन त्याच्यासमोर उभी राहिली.
त्याने तिच्याकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात पाणी होते.
'अहो..कुठे गेला होता असं नं सांगता.. असं करत्यात का कोणी वेड्यागत?' डोळ्यातले अश्रू पुसत तिने विचारलं.
त्याच्यासमोर खालीच जमिनीवर बसत तिने रडत रडत त्याचा हात हातात घेतला. नवरा बायको दोघेही रडताहेत हे पाहून पोलीस काॕन्स्टेबल शिर्केनी हसत हसत गाडी स्टार्ट केली. दोघांना हाताने निरोप देउन ते निघून गेले.
'अग जयू..आईला पैशे पाठवायचेत..हातात एक दमडी नाही..त्यात नोकरी गेली..काय करावं सुचत नव्हतं..फिरत फिरत त्या कोळशाच्या वखारीपाशी आलो तर त्यांना माणसं पाहिजे होती अर्जंट...रात्रभर ट्रकभरून पाठवायचे होते कोळश्याचे..काल दुपारी चारपासून आज सकाळी सहापर्यंत..एक हजार रुपये देतो म्हणाले...लगेच गेलो कामाला..पण फोन बंद पडला आणि तुला कळवता आलं न्हाई..मला ते हवालदार साहेब म्हणाले...नशीबवान आहेस..अशी बायको मिळाली..यमाच्या दारातून सुद्धा सोडवून आणल तुला ती..' जयूचा हात धरुन थरथरत्या ओठांनी रवी म्हणाला.
जया उठून रवीच्या शेजारी बसली.
त्याच्या कमरेला मागून मिठी मारत ती म्हणाली.
'अहो ऐका की तुमची ही नोकरी गेली जाउदे..आमच्या हेमलता मॕडमशी मी बोललेय..आमच्या कडे पण पॕकींगला आणि डिलीव्हरीला एक माणूस पायजेल हाय..आमचा टेम्पो चालवणारा माणूस कोरोना मुळे आजारी आहे..त्यामुळे पॕकिंगचे काम करत करत टेम्पोने डिलीव्हरी करणारा माणूस आमच्या फॕक्टरीत लगेच पाहिजेलच हाय...त्यामुळे आजपासून तुम्ही माझ्याबरोबर कामाला चला..आमच्या बचत गटाच्या कारखान्यात...'
कोळशाने माखलेला रवीचा चेहरा उजळला.
'अग पण..तुमच्या बचत गटात तर फक्त बायका असत्यात ना कामाला..?'
'आसं काही नाही..काही काही कामाला पुरुष माणसं भी हायेत की..फक्त मी तिथे असताना इतर बायकांकडे बघायचबी न्हाई..कळलं..?'
तिचे बोलणे ऐकून त्याने तिच्याकडे पाहिले. तिच्या चेह-यावरचे ते खट्याळ भाव पाहून त्याच्या गालावर हसू आले. मग दोघेही खळखळून हसले.
हसत हसतच जयाने अलगद रवीच्या खांध्यावर प्रेमाने आपली मान टेकली. जयाचा हात पाठीशी असेल तर आपल्याला कोणतेही संकट पार करता येईल हा आत्मविश्वास रवीला आता नव्याने आला होता.
काळरात्र संपून एका प्रसन्न दिवसाची सुरुवात झाली होती.
© सुनिल गोबुरे
टीप - माझी काॕलेज मैत्रीण निवेदिता हिने फोटो गेल्यावर्षी मला व्हाॕट्सअपवर पाठवला. फोटो अतिशय बोलका होता व मला तो खूप आवडला. तिने मला सुचवले की मी या फोटोच्या पार्श्वभूमीवर एखादी कथा लिहावी. मी तिला हो म्हणून सांगितले आणि जवळजवळ आठवड्याने ही कथा लिहून काढली होती. त्यामुळे या कथेचे श्रेय माझ्याइतकेच माझ्या या मैत्रीणीलाही जाते. या कथेला गेल्या वर्षी तुम्ही सर्वांनी खूप छान प्रतिक्रिया दिल्या होत्या. आजही ही कथा तितकीच प्रस्तुत वाटते म्हणून हा 'रिपोस्ट प्रपंच'. धन्यवाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा